गिरीश कुबेर

काही माध्यमगृहं, काही वाहिन्या या एखाद्या राजकीय पक्ष/नेत्याशी का जोडल्या जातात? हे असं जोडलं जाण्याचे परिणाम काय? कोण त्यांची किंमत मोजतं?.. आणि याहीपेक्षा महत्त्वाचा प्रश्न : नक्की कोण कोणासाठी काम करतं?

‘‘हल्ली फॉक्स टीव्ही आपल्यासाठी काम करीत नाही, ही वाहिनी आता आपली राहिलेली नाही,’’ अशा अर्थाचा ‘कृष्णाकाठी कुंडल आता पहिले उरले नाही’ छापाचा ट्वीट अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अलीकडे केला आणि माध्यमं आणि राजकारणी यांच्या पडद्यामागच्या संबंधांवर मोठी जोरदार चर्चा सुरू झाली. अमेरिकी माध्यमविश्वातला हा जिव्हाळ्याचा विषय.

त्याची सुरुवात काही ट्रम्प यांच्यापासून झाली, असं नाही. म्हणजे असं की फॉक्स टीव्ही आणि रिपब्लिकन पक्ष यांचे मधुर संबंध हे ऐतिहासिक आहेत. फॉक्स टीव्ही हा रिपब्लिकनांची प्रचार यंत्रणा म्हणून काम करतो, हेदेखील आता सर्वश्रुत आणि सर्वमान्य आहे. अमेरिकेतले मागास मूल्यधारी हे जसे रिपब्लिकन पक्षाकडे ओढले जातात तसेच ते फॉक्स टीव्हीशीही जोडले गेलेले असतात. २००३ सालच्या युद्धात जॉर्ज बुश यांना पाठिंबा देणारी, सद्दाम हुसेन याच्याकडे रासायनिक अस्त्रे आहेतच असे मानणारी, गर्भपातास विरोध करणारी, स्कंदपेशी (स्टेम सेल) संशोधनाकडे पाठ फिरवणारी, धार्मिक श्रद्धा/अंधश्रद्धा जोपासणारी अशी फॉक्स वाहिनी ही रिपब्लिकन पक्षाची आधारस्तंभ आहे यात आश्चर्य नाही. पाणी आपली पातळी गाठतं त्याप्रमाणे राजकीय नेते/पक्षदेखील आपल्या बुद्धी /वकूब यांना साजेसं, शोभेलसं माध्यम आपल्या मैत्रीसाठी निवडतात.

पण मुळात राजकारण्यांची माध्यमांशी अशी ‘मैत्री’ असावी का? अशा मैत्रीचा संबंधित माध्यमास कधी फायदा होत असेलही. म्हणजे ‘आपला जवळचा’ पक्ष/नेता सत्तेवर आल्यानंतर वगैरे. पण अशा संबंधांत दीर्घकाळचा विचार केला तर फायद्यापेक्षा तोटाच अधिक. माध्यमगृहं आणि राजकारणी दोघांचाही. हा दीर्घकालीन तोटा विश्वसनीयतेच्या रूपात असतो आणि त्याची तुलना आरशाशीच होऊ शकते. आरसा तुटला की कितीही उत्तम चिकटद्रव असला तरी तो परत चिकटवता येत नाही. माध्यमांच्या विश्वसनीयतेचं हे असं आहे. पण तरीही काही माध्यमगृहं, काही वाहिन्या या एखाद्या राजकीय पक्ष/नेत्याशी का जोडल्या जातात? हे असं जोडलं जाण्याचे परिणाम काय? कोण त्यांची किंमत मोजतं वगैरे प्रश्नाच्या उत्तरात रस असेल त्यांनी ‘होक्स : डोनाल्ड ट्रम्प, फॉक्स न्यूज अ‍ॅँड द डेंजरस डिस्टॉर्शन ऑफ ट्रथ’ हे पुस्तक अवश्य वाचायला हवं. सीएनएन वाहिनी पाहणाऱ्यांना रविवारी सायंकाळी माध्यमांवर कार्यक्रम करणारा तरुण पण डोक्याचा जवळपास तुळतुळीत गोटाधारी, घाऱ्या डोळ्यांचा बोलका ब्रायन स्टेल्टर माहीत असेल. हे पुस्तक त्यानं लिहिलंय. याआधी ‘न्यू यॉर्क टाइम्स’सारख्या दैनिकात माध्यमांवर लिहिण्याचा अनुभव असलेल्या ब्रायन यांचं हे पुस्तक त्याचमुळे विश्वसनीय झालं आहे. पण ते वाचू इच्छितात त्यांच्यासाठी तत्पूर्वी एक वैधानिक इशारा : ब्रायन स्टेल्टर यांचं हे पुस्तक आपल्याला जवळचं वाटायचा धोका आहे. असो.

तर हे पुस्तक अनेक कारणांसाठी महत्त्वाचं आहे. कारण आपल्याकडे बऱ्याच वृत्तवाहिन्यांनी हे फॉक्स टीव्हीचं प्रारूप निवडलं आणि ते बरंच पुढेही नेलं. अर्थात युद्धवार्ता सादर करताना वृत्तनिवेदकाला जवानांच्या पेहरावात सादर करण्याचा, हातात बंदूक वगैरे देण्याचा उच्च दर्जाचा बिनडोकपणा फॉक्सनं केला नसावा. गुरूपेक्षा शिष्य सवाई असावा त्यानुसार आपल्याकडे तोही आता केला जातो. असो. तर या वाहिनीची म्हणून एक संस्कारशैली आहे. रंगीबेरंगी, डोळे दिपवणारे.. ज्यांना सायकेडॅलिक म्हणतात असे प्रकाशदिवे स्टुडिओत, आरडाओरडा करण्यात धन्यता मानणारा वृत्तनिवेदक, अभ्यासपूर्ण माहितीपेक्षा मतंच रेटायची सवय अशा अनेक लक्षणांनी फॉक्स वाहिनी ओळखली जाते. बीबीसीसारखं संयत, अभ्यासपूर्ण, सभ्य सादरीकरण वगैरेची फिकीर फॉक्स करत नाही. लक्ष वेधून घेणं इतकाच विचार असेल तर हे असंच होणार. सुरेल सुरावटीपेक्षा गोंगाट नेहमीच दिलखेचक असतो, तसंच हे. तेव्हा ही वाहिनी ट्रम्प यांची कट्टर पाठराखण करणारी आहे यात काही नवल नाही. पण मुळात प्रश्न असा की, एखाद्या राजकीय पक्षाशी जोडले जाण्याइतकं पाप माध्यमांनी करावं का?

ब्रायन यांच्या या पुस्तकात त्याचं उत्तर आहे. ते दाखवून देतात की आपलं कायम गुणगान करणारी वाहिनीच सतत पाहणारा आणि कौतुकी पत्रकारांनाच जवळ करणारा राजकारणी हा अंतिमत: खड्डय़ात पडतो आणि सत्ताधारी असेल तर आपल्या प्रदेशालाही आपल्याबरोबर खाली आणतो. उदाहरणार्थ : करोना विषाणू हा चीनच्या वुहानमधल्या प्रयोगशाळेतनं ‘सोडण्यात’ आलेला आहे हा फॉक्सचा दावा. अध्यक्ष ट्रम्प आतापर्यंत तेच तुणतुणं वाजवत बसलेत. करोनात काळजी करण्यासारखं काहीही नाही, हा विषाणू आपोआप अंतर्धान पावेल, हादेखील फॉक्सचा जावईशोध. ही(च) वाहिनी सतत पाहणाऱ्या ट्रम्प यांनी तोही खरा मानला आणि आपल्या सरकारची धोरणं त्याबरहुकूम बेतली. परिणाम काय, हे नव्यानं सांगायची गरज नाही. अमेरिकेच्या संकटासाठी या देशात येणारे स्थलांतरितांचे लोंढे जबाबदार आहेत ही ‘शोधपत्रकारिता’ फॉक्सची! पुढे ट्रम्प यांनी या स्थलांतरितांविरोधात आघाडीच उघडली. गूगलला आवरायला हवं, हा सिद्धांत पहिल्यांदा मांडला गेला फॉक्सवर. काही दिवसांतच ट्रम्प हे गूगलवर घसरले.

ही अशी माध्यमं आणि हे असे राजकारणी हे एकमेकांसाठी पूरक असतात, हे ब्रायन यांचं हे पुस्तक अत्यंत चोखपणे दाखवून देतं. या ‘एक दूजे के लिये’ समीकरणाचा परिणाम असा की आज ट्रम्प यांच्या मतदारांपैकी साधारण ९० टक्के मतदार हे फॉक्स प्रेक्षक आहेत. यातल्या अनेक मतदारांची श्रद्धा रिपब्लिकन पक्ष आणि त्या पक्षाचे उमेदवार ट्रम्प यांच्यापेक्षाही फॉक्स वाहिनीवर अधिक आहे. अमेरिकेतल्या वैचारिकदृष्टय़ा मागास, प्रतिगामी धर्मवादी शक्तींच्या कलाकलानं घेत, बहुसंख्याकवाद रुजवणं हे फॉक्ससारख्या वाहिनीचं उद्दिष्ट आहे आणि या मतदारांच्या जोरावर आपली राजकीय पोळी भाजून घेणं हे रिपब्लिकनसारख्या पक्षाचं ध्येय आहे. हे सत्य या पुस्तकातून ब्रायन इतक्या सहजपणे सिद्ध करतात की ते सगळं आपल्याच अंगणात घडत असल्यासारखं जवळचं वाटू लागतं. पण या पुस्तकाचं यश यात नाही. ते आहे एका जळजळीत प्रश्नाला भिडण्यात.

यात नक्की कोण कोणासाठी काम करतं? फॉक्स वाहिनी रिपब्लिकन पक्षासाठी काम करते की हा पक्ष या वाहिनीसाठी?

– हा प्रश्न अंगावर येतो. त्याच्या उत्तरातला एक दाखला अत्यंत बोलका. अमेरिकेचे माजी अध्यक्ष, रिपब्लिकन पक्षाचे जॉर्ज बुश यांचे भाषण-लेखक डेव्हिड फ्रम यांचा. तो महत्त्वाचा अशासाठी की ट्रम्प यांच्याप्रमाणेच फॉक्स वाहिनी बुश यांचीही तळी उचलून धरत होती. ट्रम्प यांच्याप्रमाणेच बुशदेखील आपल्या प्रकांड अज्ञानासाठी (‘एपेक’च्या बैठकीला जाऊन ‘ओपेक’चा उल्लेख करणं वगैरे उदाहरणार्थ) ओळखले जातात. तर त्यांचे भाषण-लेखक फ्रम म्हणतात :  ‘‘रिपब्लिकनांना सुरुवातीला वाटत होतं फॉक्स आपल्यासाठी आहे. पण लवकरच त्यांना सत्य उमगलं की खरं तर आपणच फॉक्ससाठी आहोत.’’ गेल्या वर्षी फॉक्सचे राल्फ पीटर्स यांनी वाहिनीचा राजीनामा दिला. ‘‘आम्ही रिपब्लिकनांना पाठिंबा देतो हे एक वेळ समजून घेता येईल. पण आम्ही क्षुद्र, धार्मिक, वांशिक प्रचारयंत्राचा (प्रोपगंडा मशीन) भाग होणं सहनशक्तीच्या पलीकडचं आहे,’’ अशी पीटर्स यांची राजीनाम्यानंतरची भावना.

आणि एका निर्णायक मुद्दय़ावर येऊन हे पुस्तक थांबतं. ते म्हणजे एका व्यक्तीशी/पक्षाशी माध्यमगृहानं स्वत:ला इतकं बांधून घ्यावं का? उद्या ट्रम्प हरले तर काय? आणि त्यांच्यासाठी त्यांचे समर्थक, उद्योगपती आताच स्वतंत्र ट्रम्प वाहिनी काढण्याच्या तयारीला लागलेत. मग आपण काय प्रतिगामित्वाबाबत संभाव्य ट्रम्प वाहिनीशी स्पर्धा करायची का? हा फॉक्समधल्या काहींना पडलेला प्रश्न.

हा विषय अमेरिकेतल्या ज्या पक्षाबाबतचा आहे, त्याच्या नावातच ‘रिपब्लिक’ आहे; पण.. म्हणून मग तो वैधानिक इशारा.

girish.kuber@expressindia.com

@girishkuber