25 September 2020

News Flash

विश्वविधायकाचा वाढदिवस!

ही कलाकृती यापैकी एक. भारतीयांनी तर तिचा खास अभिमान मिरवावा असंही एक कारण त्यामागे आहे. ते काय ते ओघात येईलच.

यान लेबेन्स्टीन यांची कलाकृती (१९७४)

 

गिरीश कुबेर

भाषेचं वैभव नाही. टाळ्या घेणारी वाक्यं नाहीत. चमत्कृतीपूर्ण प्रसंग नाहीत. तरीही ती आजही तितकीच लोकप्रिय आहे, जितकी ती प्रसिद्ध झाली तेव्हा वाचकप्रिय होती. अगदी नेमकेपणानं गोष्ट सांगणारी ती कलाकृती ७५ वर्षांची होतेय..

‘‘Poets are the unacknowledged legislators of the world’’ असं विख्यात ब्रिटिश कवी शेली म्हणून गेला. कवी हेच खरे या विश्वाचे विधायक. इथे कवी म्हणजे सर्वच साहित्यिक, लेखक वगैरे. त्याच्या म्हणण्याचा अर्थ असा की, सत्ताधारी, राजकारणी वगैरे महत्त्वाचे असतील/नसतील. आणि तसे ते महत्त्वाचे असले तरी त्यांचं महत्त्व तात्पुरतं. खरं महत्त्व आहे ते कवीलेखकांना. आपल्या महेश एलकुंचवारांनी म्हटलंय तसं की : कलावंताचं आयुष्य मर्यादित असेल; पण त्याचं जीवन अनेक शतकांचं असतं.

आता हे खरंय की, हे वचन जातिवंत, सत्त्वशील कलावंत/ कवी/ लेखकांनाच लागू होतं. त्यासाठी त्या लेखकानं काही भूमिका घ्यायची असते. सत्ताधीशांचं लांगूलचालन करायचं नसतं. आपल्या लेखणीचं इमान विकायचं नसतं. त्यासाठी तडजोडी करायच्या नसतात. मुख्य म्हणजे, आपण कवी/लेखक आहोत, व्यवस्थेचे विकाऊ प्रवचनकार नाही असं स्वत:ला बजावत, त्याची किंमत मोजत आपापल्या मठीत मानानं जगायचं असतं. हे ज्यांना जमतं त्यांना शेली किंवा आपल्या एलकुंचवारांचा नियम लागू होतो. मग तो गेला तरी त्याच्या कलाकृती जगत असतात. आणि आपल्यालाही जगण्याचं भान देत असतात.

ही कलाकृती यापैकी एक. भारतीयांनी तर तिचा खास अभिमान मिरवावा असंही एक कारण त्यामागे आहे. ते काय ते ओघात येईलच.

खरं तर तीत काहीही वेगळं म्हणता येईल असं नाही. भाषेचं वैभव नाही. टाळ्या घेणारी वाक्यं नाहीत. चमत्कृतीपूर्ण प्रसंग नाहीत. पण तरीही ती आजही तितकीच लोकप्रिय आहे, जितकी ती प्रसिद्ध झाली तेव्हा वाचकप्रिय होती. नेपथ्यासाठी पुस्तकं घेणाऱ्यांच्या घरी ती असणार नाही कदाचित. पण जातिवंत ग्रंथप्रेमीच्या पदरी ती नाही असं होणं शक्यच नाही. या अशा वाचकांनी ती अनेकदा वाचलेली असते. त्यातले प्रसंग माहीत असतात. वाक्यच्या वाक्य उद्धृत करतात अनेक जण. पण तरी ती पुन:पुन्हा वाचतात. साधेपणातली सालंकृतता दाखवून द्यायची ताकद हेच तिचं मोठेपण असावं.

ती फक्त गोष्ट सांगते. त्या गोष्टीत मालक आहे. त्याच्या मरणावर टपलेले त्याचे सहकारी आहेत. तो मरतो. मग सगळे क्रांती करू पाहतात. क्रांतीइतकी सुबुद्धांनाही आकर्षित करणारी दिलखेचक बाब नसेल कोणती. ती एकदा झाली की आपलं आयुष्य कसं सुंदर आणि समान होईल, अशी आशा असते सगळ्यांना. ही व्यवस्था बदलायला हवी.. अशीच सगळ्यांची भावना. इतके दिवस या व्यवस्थेच्या वारुळांचा सांभाळ करणाऱ्यांच्या शेषनागाचे फणे फुललेले असतात. व्यवस्थेचा विष्णू रयतेच्या लक्ष्मीकडून पाय चेपून घेण्यात मश्गूल असतो. सगळं कसं निवांत आणि सुरळीत असतं आयुष्य. या सगळ्याच्या केंद्रस्थानी असणाऱ्यांनाही या व्यवस्थेच्या शाश्वततेची खात्री पटलेली असते. आपण करतोय ते अगदी योग्य आहे आणि जनता आपल्यावर खूश आहे.. अशा आभासांच्या लाटा अंगावर सुखदपणे आपटत असतात. तशा त्या नियमितपणे उठत राहाव्यात म्हणून सत्ताधीशांच्या पालखीचे भोई सत्तेच्या पालखीला धक्का बसणार नाही, याची पुरेपूर काळजी घेत असतात.

पण दूर कुठून तरी व्यवस्था बदलण्याची हाक देत क्रांतीची भाषा करणारा एखादा नरपुंगव त्या पालखीच्या भोईंना हात घालतो. किती दिवस तुम्ही या पालखीचा भार वाहता यावा म्हणून छातीफोड करत राहणार? कष्ट तुम्ही करताय आणि सुख मात्र ‘त्यांना’ मिळतंय, हा अन्याय आहे, असं तो सांगतो. तो असं सारखं सारखं सांगत राहिल्यानं मुद्दा पटू लागतो त्याचा. पालखीच्या भोईंनाही जाणवतं.. हा म्हणतो ते बरोबर आहे; आपण आपले पिढय़ान्पिढय़ा नुसते भोईच. आत सुखाने बसणारेही तेच, आपल्याला कधी मिळणार बसायला या पालखीत.. या प्रश्नांचा भुंगा मग भोईंच्या डोक्यात विचारांची भुणभुण सुरू करतो. आपल्यावरच्या ‘अन्याया’ची जाणीव त्यांना होते. ती अधिकाधिक व्हावी म्हणून आसपास प्रचाराचा भोंगा वाजू लागलेला असतो मोठमोठय़ानं. पालखीत बसणाऱ्यांची ही घराणेशाही उलथून टाकायला हवी, ही भावना दाटू लागते सगळ्यांच्या मनात. एकदा का ही क्रांती आपण केली, की नंतर आपल्याला सोन्याचे दिवस येतील, पालखीतून मिरवणाऱ्यांची मक्तेदारी संपून जनतेचं राज्य येईल याची खात्री सगळ्यांनाच पटलेली असते. त्या आशेपोटी या क्रांतिकार्यात सगळेच सहभागी होतात. सगळ्यांच्या सहभागाशिवाय कशी काय होणार ती? म्हणून सगळेच उत्साहाने ही व्यवस्था बदलण्यासाठी हातभार लावतात.

त्याप्रमाणे ही क्रांती होते. मग येतो महत्त्वाचा, बहुप्रतीक्षित मुद्दा : समता या भावनेचा..

त्याचं काय होतं याची गोष्ट ही कलाकृती सांगते. आणि कोणत्याही अभिजात कलाकृतीत नसतो तसा फाफटपसारा तिच्यातही आढळत नाही. अगदी नेमकेपणानं ही गोष्ट ती सांगते. लेखक तसा नवखाच म्हणावा असा. पण तरी त्याची ही कलाकृती गाजली. एरिक आर्थर ब्लेअर हे त्याचं नाव. जन्म भारतात. बिहारमधल्या मोतीहारी इथला. एरिकचे वडील हे त्या वेळच्या इंडियन सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये अधिकारी होते. आपल्यावर राणीचं राज्य होतं तेव्हा. त्या नोकरीचा एक भाग म्हणून ते बिहारात असताना.. तेही अफू खात्यात.. एरिकचा जन्म झाला. तो एक वर्षांचा झाल्यावर त्याच्या आईनं शिक्षणाचा वगैरे विचार करून त्याला बिहारातून ब्रिटनमध्ये नेलं. बिहारात शिक्षणाचं काही खरं नाही, असं त्यांना तेव्हा वाटलं. असो. तर ब्रिटनमध्ये गेल्यावर तिथं त्याचं रीतसर शिक्षण सुरू झालं. शिष्यवृत्ती वगैरे मिळाली त्याला. शाळा संपायचं वय आलं तसं याचं वेगळेपण दिसून यायला लागलं. एकदा एरिक मोक्याच्या ठिकाणी चक्क शीर्षांसनावस्थेत राहिला. विचारलं असं का, तर म्हणाला की पायांवर उभे असलेल्यापेक्षा डोक्यावर उभं असणाऱ्याची दखल लवकर घेतली जाते. याच काळात त्याला लिखाणाची गोडी लागली. कविता करायला लागला. अर्थातच अभ्यासात लक्ष नव्हतं. पण महाविद्यालयाच्या मासिकाच्या संपादनात रस घ्यायला लागला. त्यानिमित्तानं वाचन, लेखन वाढलं. साहित्यिक वर्तुळात चंचुप्रवेश झाला. हे आपल्याला मनापासून आवडतंय असं त्याच्या लक्षात आलं.

एरिकची आजी (आईची आई) बर्मात.. ब्रह्मदेशात.. होती. याचीही नोकरी करून स्वत:च्या पायावर उभं राहायची वेळ आली होती. म्हणून तो इंडियन इम्पिरियल पोलीस सेवेत रुजू झाला. नेमणूक झाली मंडालेला. तिकडे बर्मा ऑइल कंपनी फुलत असताना परिसर कसा काळवंडून जातोय हे तो पाहात होता. स्थानिक पातळीवर काही मित्र वगैरे नव्हते फारसे. त्यामुळे मिळेल तेव्हा रंगून या शहराला भेट द्यायची आणि पुस्तकं घेऊन परतायचं हा त्याचा रिवाज. काही वर्षांनी एरिक परतला ब्रिटनला. बर्मात हलाखीत राहणाऱ्यांच्या वस्त्या पाहिल्यानंतर लंडनमध्येही अशांचंच जिणं पाहायची इच्छा निर्माण झाली. त्याच्यातल्या लेखकाची मशागत होत असावी बहुधा या काळात. एरिक नंतर पॅरिसला गेला. तिथंही या अशा वाडय़ावस्त्या शोधून त्यांना भेट द्यायचा तो. पॅरिसमध्ये त्याची लिहिण्याची आवड बळावली. तो रीतसर लिहू लागला. त्याच्या आत्यानं त्याला त्यासाठी उत्तेजन दिलं. एरिक दोनेक वर्षांनी परतला इंग्लंडला. मायदेशी आल्यावर त्याच्यातल्या लिखाणाला धुमारे फुटले. त्याचं पुस्तकही प्रकाशित झालं. दरम्यानच्या काळात स्पॅनिश युद्ध सुरू झालं होतं आणि त्याआधी एरिकची हेन्री मिलरसारख्या तगडय़ा लेखकाशी ओळख झाली होती. हेन्रीनं सुचवलं त्याला युद्धाचा अनुभव घ्यायला. मग काही काळ बातमीदारीही केली त्यानं. एव्हाना सुरू झालेल्या दुसऱ्या महायुद्धानं जगण्याचा त्याचा अनुभव अधिकच समृद्ध केला.

महायुद्ध संपलं त्या वर्षी त्याची आपण ही चर्चा करतोय ती कलाकृती जन्माला आली.

जन्मदिनांक : १७ ऑगस्ट, १९४५.

एरिक ब्लेअर ज्या नावानं ओळखला जातो ते त्याचं टोपण नाव : जॉर्ज ऑर्वेल.

कलाकृतीचं नाव : ‘अ‍ॅनिमल फार्म’

परवाच्या दिवशी, सोमवारी १७ ऑगस्टला ही कादंबरी पंचाहत्तर वर्षांची होईल. शेले म्हणतो तशा या विश्वाच्या विधायकाला त्याच्या कलाकृतीच्या वाढदिवशी आदाब!

girish.kuber@expressindia.com

@girishkuber

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 15, 2020 12:02 am

Web Title: loksatta anyatha article on george orwell abn 97
Next Stories
1 उजाडल्यानंतरचा अंधार..
2 हम ‘अ‍ॅप’ के है कौन?
3 लेडी ऑफ फायनान्स!
Just Now!
X