30 May 2020

News Flash

ऑर्वेल खोटा ठरला त्याची गोष्ट !

न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा आर्डेन  पदावर आल्यापासून चर्चेत आहेत. त्यांची कार्यशैली, पद न मिरवणं, वैयक्तिक आयुष्य..

संग्रहित छायाचित्र

 

गिरीश कुबेर

प्रथमदर्शनी कौतुकफुलांचा वर्षांव झेलणारे द्वितीय दर्शनापासून आपण या कौतुकास किती अयोग्य आणि अपात्र आहोत हे स्वहस्तेच दाखवू लागतात. जेसिंडा आर्डेन यांचं अद्याप तसं झालेलं नाही, हे अधिक कौतुकास्पद..

न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा आर्डेन  पदावर आल्यापासून चर्चेत आहेत. त्यांची कार्यशैली, पद न मिरवणं, वैयक्तिक आयुष्य.. अशा अनेक मुद्दय़ांवर त्यांच्याविषयी बोललं जात असतं. आश्चर्य हे की हे बोलणं बऱ्याचदा कौतुकाचं असतं. आणि त्यापुढचं आश्चर्य हे की त्यांचं कौतुक करणाऱ्या प्रसारमाध्यमांना कौतुक न करणारी माध्यमं ‘पंतप्रधानांचे चमचे’ असं म्हणत नाहीत. असं म्हणत नाहीत कारण जेसिंडा यांचं कौतुक न करणारी माध्यमं फारशी नाहीत. म्हणजे त्यांच्यावर टीकाच होत नाही, असं नाही. धोरणात्मक मुद्दय़ांवर त्यांच्या काही ना काही मतभेद तर असणारच. पण व्यक्ती या नात्यानं त्यांच्याविषयी नेहमी चांगलंच बोललं गेलं.

त्या देशावर गेल्या वर्षी जेव्हा भयानक दहशतवादी हल्ला झाला त्यावेळी जेसिंडा पहिल्यांदा कौतुकाच्या सावलीत आल्या. खरं तर त्याआधीच्या दोन वर्षांपासून त्या पंतप्रधानपदावर होत्याच. पण त्यांची इतकी दखल कधी घेतली गेली नाही. तेव्हा चर्चेचे विषय होते त्यांचं अविवाहित मातृत्व आणि आपल्या तान्ह्य बाळास अंगावर पाजताना पंतप्रधानपद आड न येणं वगैरे. पण दहशतवादी हल्ल्यानं या बाईंमधलं पोलादीपण बाहेर आलं.

ख्राइस्टचर्चमध्ये दोन मशिदींवर हल्ला झाला आणि त्यात चार डझनांहून अधिकांचे प्राण गेले. हल्ल्याचं स्थान लक्षात घेतल्यास त्यामागचा धर्माचा दृष्टिकोन लगेच समोर येतो. अशा प्रकारच्या हल्ल्यानंतर धार्मिक विद्वेषाची मोठी भीती होती. पण पंतप्रधान जेसिंडा यांनी ती कमालीच्या संयत आणि सहिष्णूपणे हाताळली. हल्लेखोर हे ऑस्ट्रेलियन असल्याचं स्पष्ट झालं. त्यानंतर लगेच पत्रकार परिषदेत जेसिंडा यांनी ‘‘आपल्या देशात अशा अतिरेकी (विचारास) थारा नाही.. खरं तर तो सर्व जगातच नसायला हवा,’’ अशा प्रकारचे उद्गार काढले. अवघ्या लाखांत लोकसंख्या असणाऱ्या कमालीच्या सुशेगात, आरोग्यदायी अशा न्यूझीलंड देशास त्या हल्ल्यानं मुळापासून हादरवलं. आपल्या देशाचं नक्की चुकलं काय, असे प्रश्न विचारले गेले. पण जेसिंडा यांनी बळी पडलेल्यांच्या आप्तजनांना मिठीत घेत आश्वस्त केलं आणि परिस्थिती लगेचच पूर्वपदावर आणली. त्या वेळी ‘धर्माधांचा हिंसाचार’ कशा प्रकारे हाताळावा त्याचं जेसिंडा हे आदर्श उदाहरण.. अशा प्रकारच्या प्रतिक्रिया जागतिक पातळीवर व्यक्त झाल्या. जेसिंडा यांच्यात राजकीय नेत्यांना आवश्यक धीरोदात्तपणा असला तरी त्यामुळे त्यांच्यातील संवेदनशील माणूस अजूनही कसा शाबूत आहे यावर अनेक बडय़ा नियतकालिकांनी रकानेच्या रकाने लिहिले.

ही त्यांची जगाला नव्याने झालेली ओळख. यामुळे त्या एकदम प्रकाशझोतात आल्या. माध्यमांमुळे हे असं होण्याचं प्रमाण हल्ली चांगलंच वाढलंय.

आणि तसं दुसरं हल्ली वाढलेलं प्रमाण म्हणजे भ्रमनिरासाचं. सर्वसाधारण अनुभव असा की प्रथमदर्शनी कौतुकफुलांचा वर्षांव झेलणारे द्वितीय दर्शनापासून आपण या कौतुकास किती अयोग्य आणि अपात्र आहोत हे स्वहस्तेच दाखवू लागतात. जेसिंडा यांचं अद्याप तसं झालेलं नाही, हे अधिक कौतुकास्पद.

आताच्या करोना काळातही त्यांचं नेतृत्व आगळं ठरत असल्याचे दाखले अनेकांनी जागतिक पातळीवर दिले. वास्तविक शेजारच्या, आकाराने आणि सर्वार्थानेच मोठा असलेल्या ऑस्ट्रेलियाची करोना हाताळताना फे फे उडाली आहे. त्या देशातही सरकारजन्य आदेशांमुळे नागरिक कावलेले आहेत. त्या देशाचे करोनाकालीन धिंडवडे रोजच्या रोज निघत आहेत. आणि इकडे या जेसिंडाबाईंनी गेल्या आठवडय़ाच्या आधीच जाहीर घोषणा केली : न्यूझीलंड करोनामुक्त झाला.

त्याहीवेळी त्यांना वेडय़ात काढलं गेलं. हे असं कसं शक्य आहे, वगैरे नेहमीच्याच प्रतिक्रिया त्यांच्या या घोषणेबाबतही उमटल्या. पण लवकरच न्यूझीलंड ‘शून्य’ करोनाग्रस्तांच्या रांगेत येईल. म्हणजे महिनाभरात एकही नवा रुग्ण आढळला नाही तर ही अशी ‘शून्यावस्था’ येते म्हणतात.

पण जेसिंडा आर्डेन यांचं करोनायश सांगणं हा काही या ‘अन्यथा’चा उद्देश नाही. या बाईंची गोष्ट दखलपात्र ठरते ती वेगळ्याच कारणासाठी. या गोष्टीला आता आठवडा झाला. पण आपल्याकडे ती फारशी चर्चिली गेली नाही. म्हणून ती सांगायला हवी.

झालं असं की गेल्या शनिवारी आळसभरल्या सकाळी जेसिंडा आणि त्यांचा जोडीदार (पती नाही, जोडीदारच) क्लार्क गेफोर्ड हे निवांत ब्रंचसाठी म्हणून बाहेर पडले. ब्रंच ही एक अलीकडची तरुण पद्धत. सुटीच्या दिवशी इतकं उशिरा उठायचं की सकाळची न्याहारी आणि जेवण यात काही फारसं अंतरच उरत नाही. अशावेळी मग ब्रेकफास्ट आणि लंच एकत्रच करायचं. म्हणजे ब्रंच. अनेक शहरांतली अनेक मोठी हॉटेलं आताशा अशी ब्रंच पॅकेजेस देत असतात.

तर या ब्रंचसाठी त्यांनी जे हॉटेल निवडलं तिथे ही तोबा गर्दी. हेही साहजिकच. कारण टाळेबंदीतनं न्यूझीलंडवासी नुकतेच कुठे बाहेर आलेत. त्यांच्यावरची बरीच बंधनं उठवण्यात आलेली आहेत. पब्ज, बार्समध्ये जे काही मुक्तपणे वाहायला हवं तेही वाहू लागलं असेल. बऱ्याच काळच्या बंदिवासानंतर मोकळी हवा खाण्याची आणि रास्त ते पिण्याची घाई स्थानिकांना झाली असणारच. त्यामुळे समस्त न्यूझीलंडच जणू त्या शनिवारी बाहेर असणार. म्हणजे फारच कमी घरांत चूल त्या दिवशी पेटली. यात आपल्या कथानायिका पंतप्रधानही आल्या. पंतप्रधान झाल्या म्हणून काय झालं, रोजच्या पोळीभाजीचा त्यांनाही कंटाळा येणारच. असो.

पण आपल्या ‘ब्रंचव्य’ स्थानी त्या पोहोचतात तो काय समोर तोबा गर्दी. आणि त्या रेस्तराँने हाऊसफुल्लची पाटी लावलेली. खरं तर त्या काचेमधून दिसत होतं.. आतमध्ये अनेक टेबलं रिकामी आहेत ते. निम्म्यापेक्षा जास्त रिकामी. आणि तरीही बाहेर हाऊसफुल्लचा बोर्ड. आगाऊ नोंदणी करून ठेवली असणार अनेकांनी असंही त्यांना वाटून गेलं. पण तसं नव्हतं. टेबलं रिकामीच होती आणि त्यावर बसू देण्यास रेस्तराँ व्यवस्थापनाचा नकार होता. त्यांनी पंतप्रधानांना आत घेतलं नाही. का?

तर पंतप्रधान जेसिंडा यांच्या सरकारनंच करोना-मुक्तीसाठी घालून दिलेला नियम. सर्वाना अजूनही अंतरसोवळं पाळायचंच आहे. त्यामुळे रेस्तराँत क्षमतेच्या निम्म्यांनाच आत घ्यायचं. म्हणजे आतल्यांच्या पंगती अंतर सोडून बसवायच्या.

पण साक्षात सरकारप्रमुखच समोर आल्या तरी त्या रेस्तराँमालकानं हा नियम मोडला नाही. आणि न्यूझीलंडमध्ये राजकीय नेत्यांच्या आगेमागे भालदारचोपदार चमचे घेऊन हिंडायची प्रथा नसावी. त्यामुळे त्यांच्यामार्फत कोणी रेस्तराँमालकाला दटावलंही नाही ‘तुला मायतीये का या मॅडम कोणेत’ अशा किंवा तत्सम शब्दांत.

डोळ्याचं पारणं का म्हणतात ते फिटेल असं दृश्य: रेस्तराँमालकानं नियम दाखवलाय.. आणि त्या देशाची पंतप्रधान आणि तिचा जोडीदार पोटात भुकेने कावळे ओरडत असतानाही वाट पाहातायत. शेवटी त्या मालकालाच राहवलं नाही.. तो माफी मागायला गेला. तर पंतप्रधान म्हणाल्या : व्हाय सॉरी? मी काही अन्य नागरिकांपेक्षा वेगळी नाही आणि माझ्यासाठी त्यांच्यापेक्षा काही वेगळे नियमही नाहीत.

खरी कमाल आहे ती आत बसलेल्यांची. बाहेर पंतप्रधान ताटकळतोय हे पाहून एकानंही आपलं जेवण आटपायचा प्रयत्न केला नाही. परत वर चेहऱ्यावर ‘‘पंतप्रधान असला तर तो त्याच्या घरचा’’छाप तुच्छताभाव नाही. सगळं कसं नेहमीसारखंच.

थोडा वेळ वाट पाहून पंतप्रधान जाऊ लागतात. निघतात. तेवढय़ात एक टेबल रिकामं होतं. हात धुऊन ते बाहेर निघालेत याची खात्री झाल्यावर आतनं पोऱ्या धावत पंतप्रधानांकडे येतो. टेबल रिकामं झाल्याचं सांगतो. ते दोघे वळतात. रेस्तराँत येतात. जेवतात.

दुसऱ्या दिवशी रेस्तराँमालक ट्वीट करून हा प्रसंग सांगतो. पंतप्रधानांचा जोडीदार क्लार्क ते रिट्वीट करताना म्हणतो : माझंच चुकलं.. मी आगाऊ नोंदणी करायला हवी होती.

लोकशाहीत सर्व समान असले तरी काही जण अधिक समान असतात असं सुनावणारा जॉर्ज ऑर्वेल कधी तरी खोटा ठरू शकतो तर!

girish.kuber@expressindia.com

@girishkuber

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 23, 2020 12:02 am

Web Title: loksatta anyatha article on jacinda arden abn 97
Next Stories
1 सेवा हाच धर्म.. आणि कर्मही!
2 ..मग हरणार कोण?
3 जरा सा ‘झूम’ लूं मैं..
Just Now!
X