News Flash

‘उत्सव’ बहु थोर होत…

आज इंग्लंड जवळपास पूर्वीसारखं जगू लागलंय. सणसणीत ६० टक्क्यांनी त्या देशातले करोना रुग्ण कमी झालेत. याचं श्रेय लसीकरणालाच...

केट बिंग्हॅम (छायाचित्र सौजन्य: द डेली टेलिग्राफ)

गेल्या मे महिन्यात आरोग्यमंत्र्यांचा त्यांना निरोप आला, पंतप्रधान तुझ्याशी बोलू इच्छितात. एखादी असती तर हरखून गेली असती. पण हिनं विचारलं, काम काय? आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं. तर या म्हणाल्या… माझा काय संबंध त्याच्याशी. मी काही त्यांच्याशी बोलणार-बिलणार नाही. त्यावर आरोग्यमंत्री गयावया करते झाले. असं नको करूस… बोलायला काय हरकत आहे. ते पंतप्रधान आहेत आपले… वगैरे मिनतवाऱ्या झाल्या. मग या म्हणाल्या ठीक आहे, सांगा उद्या त्यांना.

दुसऱ्या दिवशी आला त्यांनी सांगितलेल्या वेळेला पंतप्रधानांचा फोन. त्यांनी विषय काढला थेट करोनाच्या साथीचा. त्यांना ही म्हणाली : तुम्ही म्हणताय त्याच्याशी माझा काहीही संबंध नाही. माझं आयुष्य गेलं ‘जोखीम भांडवलदार’ (व्हेंचर कॅपिटलिस्ट) या नात्यानं औषध, जैवसहायक रसायनं तयार करणाऱ्या कंपन्या उभ्या करण्यात (ही जोखीम भांडवलदाराची संकल्पना मोठी छान आहे. उद्या काय यशस्वी होऊ शकेल हे आज ओळखायचं आणि त्यानंतर त्यात गुंतवणूक करायची. जगात आज अनेक मोठमोठ्या झालेल्या कंपन्या ही काल जोखीम भांडवलदारांनी दाखवलेल्या द्रष्टेपणाची पुण्याई.) हे काम माझ्या आवडीचं. आयुष्यभर मी तेच करत आलीये. तुम्ही सांगताय त्यात मला काडीचाही रस नाही.

पंतप्रधानाला थेट असं सांगणं आणि नंतर पंतप्रधानांनी असा अपमान झाल्याचं जाहीर सांगणं… हे समजून घेणं अंमळ कठीणच. अशी शोभा झाल्यानंतर पंतप्रधानांनी शेवटचं अस्त्र काढलं : आपला देश अत्यंत कठीण परिस्थितीतून जातोय. माणसं टपाटपा मरतायत. त्यांच्यासाठी तरी तू ही जबाबदारी घ्यायला हवी.

हा बाण वर्मी लागला. ही जबाबदारी स्वीकारायला त्यांनी होकार दिला.

आज केट बिंग्हॅम या इंग्लंडच्या ‘लस सम्राज्ञी’ म्हणून सर्वत्र गौरवल्या जातायत. अवघ्या काही महिन्यांपूर्वी करोनानं ज्या देशाच्या चिंधड्या उडाल्या होत्या तो देश आज संपूर्ण जगात करोना प्रसार रोखण्यातला सर्वात यशस्वी म्हणून गणला जातोय. पंतप्रधानापासनं ते अतिकुजकट, तुसड्या ब्रिटिश माध्यमांपर्यंत सर्व जण याचं श्रेय एकाच गोष्टीला देतात.

लसीकरण. आणि त्याचं आव्हान पेलणाऱ्या केट बिंग्हॅम. त्यांच्या यशात ‘आपण चुकू शकतो’ हे मान्य करणाऱ्या पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांचा मोठा वाटा आहे हे जरी खरं असलं तरी या बाईंनी नेमकं केलं काय?

गेल्या वर्षी ६ मे या दिवशी त्यांनी नवी जबाबदारी घेतली. लशीसाठी शीघ्र कृती दलाच्या प्रमुख. त्या प्रमुख झाल्या, पण प्रत्यक्षात काही असं कृती दल नव्हतंच. मदतीला होते इंग्लंड सरकारचे मुख्य वैज्ञानिक सल्लागार सर पॅट्रिक व्हॅलेन्स. या दोघांनी नऊ जणांचं एक कृती दल बनवलं. सर्व जण खासगी क्षेत्रातले. दिमतीला आरोग्य यंत्रणा. तिचं नेतृत्व आरोग्यमंत्र्यांकडे. त्याच दिवशी केट यांनी प्रमुख वैद्यकीय कंपन्यांच्या उच्चाधिकाऱ्यांशी बोलायला सुरुवात केली. जगभरातनं दहाएक कंपन्या त्यांनी त्यासाठी निवडल्या. काही मोठ्या; काही अगदीच छोट्या. जॉन्सन अँड जॉन्सन, मॉडर्ना, अ‍ॅस्ट्राझेनेका, फायझर, सनोफी वगैरे. या सर्व कंपन्यांचे व्यवस्थापकीय संचालक, मुख्य कार्यकारी अधिकारी यांना केट यांचा थेट फोन. मुद्दा एकच : लशीचं संशोधन कुठवर आलंय. त्यातल्या काही कंपन्यांना लस चाचणीसाठी प्रसंगी स्वयंसेवक नोंदवायला मदत करणं, भांडवल उभारणी, संभाव्य कज्जेदलाली कशी रोखायची… अनेक मुद्दे. बाई युद्धपातळीवर धडाडीनं निर्णय घेत गेल्या. त्यापेक्षा अधिक धडाडीनं गुंतवणूक करत होत्या. ‘‘जणू काही कोरा धनादेशच सरकारनं मला दिला होता, असं आता मागे पाहिल्यावर वाटतं,’’ असं त्या जर्मन- इटालियन दैनिकांना हल्ली दिलेल्या मुलाखतीत म्हणतात.

यानंतर केट यांनी या लसनिर्मात्या कंपन्यांशी थेट करार करायला सुरुवात केली. काहीशे कोटी पौंडांचे करार त्यांनी केले. त्या सांगतात : हे करार करताना मी अजिबात दर चर्चा केली नाही. हे संशोधन आहे. बुद्धिवंतांचं काम आहे. त्यांच्या कामाचं असं नाही मोल करायचं. करोनाचं थैमान जर रोखून जीव वाचणार असतील तर ते केवळ या लशींमुळे. त्याच्या कामाचं मोल काय करणार?

केट स्वत: प्रत्येक लसनिर्मिती आणि चाचण्या यात जातीनं लक्ष घालायला लागल्या. या सगळ्याची जास्तीत जास्त माहिती- विदा- कशी जमा होईल याकडे डोळ्यात तेल घालून लक्ष देऊ लागल्या. कोणती लस कोणत्या तंत्रानं बनणार आहे, तिचे धोके काय, तिचे फायदे काय… इत्थंभूत माहिती आणि मग तिचं विश्लेषण. आणि त्याआधारे लशींची मागणी नोंदवणं आणि थेट कंपन्यांशी आधीच करार करणं. यातून इंग्लंड देशाच्या अंगणात किती लशी जमा झाल्या?

४० कोटी. इंग्लंडची लोकसंख्या सात कोटीदेखील नाही. पण इतका प्रचंड लससाठा त्या देशानं आपल्या हाती राहील, याची खात्री केली. यावर ‘‘जास्त झाल्या तर गरजू देशांना देता येतील; पण कमी नको पडायला,’’ असं खास अन्नपूर्णेच्या तोंडी शोभेल असं त्यांचं उत्तर. आणि जसजशा लशी हाती येत गेल्या तसतशी त्यांचं तितकंच युद्धपातळीवरचं वाटप त्यांनी हाती घेतलं. लस देणारा वैद्यक, रुग्णालय सरकारीच असायला हवं वगैरे थेरं नाहीत. जो कोणी लस देऊ शकेल त्याला लस देण्याचे अधिकार, पुरेसा लससाठा त्यांनी दिला. आणि प्रचंड मोहीम हाती घेतली लसीकरणाची. त्या देशातलं प्रत्येक वैद्यकीय केंद्र गेले काही महिने फक्त लसीकरणाच्या कामात जुंपलं गेलेलं आहे आणि अगदी रेल्वेस्थानकांतही ते लशी देतायत.

आज इंग्लंड जवळपास पूर्वीसारखं जगू लागलंय. सणसणीत अशा ६० टक्क्यांनी त्या देशातले करोना रुग्ण कमी झालेत. जॉन्सन यांच्यावर घणाघाती आसूड ओढण्यात जराही हात आखडता न घेणारी प्रसारमाध्यमं त्यांच्या सरकारच्या लस धोरणाचं मुक्त कंठानं कौतुक करतायत आणि पंतप्रधान कसचं कसचं म्हणत केट यांना श्रेय देतायत. हे दृश्यच तसं स्वप्नवत्. पण त्या स्वप्नातनं बाहेर येऊन केट यांचे या काळातले धडे काय, हेही पाहायला हवं.

प्रश्न : इतकं तुम्ही धडाडीनं निर्णय घेत होतात, पंतप्रधान जॉन्सन यांचं सांगणं काय होतं?

उत्तर : ते फक्त एकच वाक्य म्हणाले. ‘आपल्याला माणसं वाचवायची आहेत.’

प्रश्न : तुम्हाला जे जमलं ते अन्य युरोपला नाही साध्य झालं?

उत्तर : ते फार चिकित्सा करत बसले. मी जोखीम भांडवलदार आहे. मला उगाच कशाचाही कीस काढत बसायला आवडत नाही. एखादा जर्मनीचा अपवाद सोडला तर बाकीचे ही लस कितीला, तिची किंमत काय… वगैरे फालतू चर्चा करत बसले. या काळात इंग्लंड त्यांच्याशी करार करून मोकळा झाला.

प्रश्न : हेच एक कारण?

उत्तर : दुसरं म्हणजे एखादी लस तयार करणारी कंपनी आपली आहे की अन्य कोणाची यातही अनेकांनी वेळ घालवला. नको त्या ठिकाणी राष्ट्रवाद आणण्यात कसला आलाय शहाणपणा. जीव वाचतायत की नाही, हे महत्त्वाचं की कोणामुळे वाचतायत हे महत्त्वाचं? या लशीमधली अ‍ॅस्ट्राझेनेका ही फक्त काही प्रमाणात इंग्लिश आहे पण तिचं संशोधन आपल्या ऑक्सफर्डचं आहे. बाकी सर्व कंपन्या परदेशी आहेत. सगळ्यांची लस तितकीच महत्त्वाची. मुख्य म्हणजे ती वेळेत आपल्याला कशी मिळेल यासाठी प्रयत्न करणं हे महत्त्वाचं. आपण फक्त ते केलं.

प्रश्न : इंग्लंडची आहे म्हणजे अ‍ॅस्ट्राझेनेकाचीच लस सर्वोत्तम असेल नं…

उत्तर : ती उत्तमच आहे. पण मला विचाराल तर मी नोवावॅक्सचं नाव घेईन. (ही लस नोवावॅक्स या अमेरिकी कंपनीचं उत्पादन आहे पण बाजारात ती यायला अजून वेळ आहे.)

प्रश्न : करोना हाताळणीत तुमच्या मते कोणते उपाय निरुपयोगी?

उत्तर : टाळेबंदी आणि ‘टेस्ट अँड ट्रेस’. पहिल्या उपायानं साथ आटोक्यात येत नाही आणि ती आटोक्याबाहेर गेली की दुसऱ्याचा आग्रह धरता येत नाही. महानगरात किती जणांचा तुम्ही माग घेत बसणार? ते अशक्य आहे.

प्रश्न : पुढे काय करणार?

उत्तर : आधी करत होते तेच. सरकार माझ्याकडे येण्याआधी मी जे करत होते तेच मी मरेपर्यंत करणार. कंपन्या उभारणार. माणसाचं जगणं सुसह््य होण्यासाठी कोणी काही औषधं, रसायनं तयार करत असेल तर त्यांना उभं राहायला मदत करणार.

*  *   *

‘फायनान्शिअल टाइम्स’ किंवा ‘गार्डियन’ आणि ‘द डेली टेलिग्राफ’ ही ब्रिटिश दैनिकं, इटलीचं ‘रिपब्लिका’, जर्मनीचं ‘डी वेल्ट’ यांच्यासह जगातली सर्व प्रमुख वर्तमानपत्रं, माध्यमं केट बिंग्हॅम यांच्या कामावर लिहितायत. त्यांच्या मुलाखती घेतायत. त्यातलं काही वाचल्यावर एक जाणवतं : विज्ञान, चाचणी, संशोधन वगैरे आयुष्यभर करायचा उत्सव आहे.

एरवी आहेतच,  ‘उत्सव’ बहु थोर होत…

girish.kuber@expressindia.com

@girishkuber

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 10, 2021 12:05 am

Web Title: loksatta anyatha article on kate bingham abn 97
Next Stories
1 व्यवस्था ‘रोखे’ कुणाला?
2 गरिबीतली श्रीमंती!
3 सम्राटांच्या गर्दीतला ‘बिरबल’!
Just Now!
X