06 August 2020

News Flash

हम ‘अ‍ॅप’ के है कौन?

..घाम फोडणारं सत्य न्यूयॉर्क टाइम्सनं तशाच पद्धतीनं सादर केलं. त्यातून जे समोर आलं ते धक्कदायक आहे.

संग्रहित छायाचित्र

 

गिरीश कुबेर

..घाम फोडणारं सत्य न्यूयॉर्क टाइम्सनं तशाच पद्धतीनं सादर केलं. त्यातून जे समोर आलं ते धक्कदायक आहे. न्यूयॉर्क टाइम्सची ही शोध मोहीम दाखवून देते की आपल्यावर हेरगिरी करण्याचं काम फक्त फोनच करतो असं नाही..

पहिल्या छायाचित्रात एक काळाभोर पट्टा. नीट पाहिल्यावर दिसतात त्यात अगणित पिवळे प्रकाशमान ठिपके.

दुसऱ्या चित्रात अंधारी पट्टय़ाचा आकार बदलतो. पण तिथेही तेच. पिवळे प्रकाशमान ठिपके. असंख्य.

तिसऱ्या चित्रातही तेच. काळ्या पार्श्वभूमीचा आकार तेवढा वेगळा.

आपण पुढे पुढे जात राहिलो की ही पिवळ्या ठिपक्यांची अंधारी चित्रं संपतात आणि वर्णन सुरू होतं. ते अंधारे विविध आकार असतात व्हाइट हाऊस, पेंटॅगॉन, कॅलिफोर्नियातली काही बडय़ांची निवासस्थानं, न्यू यॉर्क स्टॉक एक्स्चेंज, इतकंच काय पण बेव्हर्ली हिल्समधली ती विख्यात हवेली. ह्य़ूज हेफ्नरचं प्लेबॉय मेन्शन अशा अनेक ठिकाणांचे. आणि तिथे आत ते काही पिवळे प्रकाशमान ठिपके.

काय दर्शवतात हे पिवळे प्रकाशमान ठिपके?

स्मार्ट मोबाइल फोनचा सुरू असलेला वापर. हा मोबाइल फोन असलेली व्यक्ती जसजशी हालचाल करेल तसतसे हे ठिपके पुढेमागे होतात. तो माणूस थांबला की थांबतात. त्या स्मार्टफोनवरून दुसऱ्या कोणाशी संपर्क साधला गेला की ती दुसरी व्यक्ती ज्या प्रदेशात आहे तिथे एक पिवळा ठिपका जन्माला येतो. असं चालूच. दिवसरात्र. अखंड.

आता इतकं वाचल्यावर कळलंच असेल की हे जे समोर सुरू आहे ते मोबाइलच्या साथीनं तो वापरणाऱ्यांचा माग काढणं. आणि तो काही कोणी जाणूनबुजून काढतोय असंही नाही. आपल्या हातातला स्मार्टफोन हे काम आपोआप करत असतो. आपल्याही नकळत. आता याच्या आधारे कोणाला या स्मार्टफोनधारी व्यक्तीवर नजर ठेवायची असेल, हेरगिरी करायची असेल तर हे सर्व तंत्रज्ञान विनासायास उपलब्ध आहे. हवं तेव्हा हव्या त्या व्यक्तीची हवी ती माहिती त्याला नको असतानाही आता सहज मिळवता येते. आणि जगातला स्मार्टफोन वापरणारा कोणीही हे टाळू शकत नाही. अगदी अमेरिकेचा अध्यक्ष झाला तरीही..

हेच सिद्ध करून दाखवायचं होतं ‘द न्यू यॉर्क टाइम्स’ला. या स्मार्टफोनच्या रूपातून येणाऱ्या हेरगिरीनं तुमच्याआमच्या आयुष्याला कसं लपेटून टाकलंय हे या वर्तमानपत्राला दाखवून द्यायचं होतं. त्यासाठी ‘द प्रायव्हसी प्रोजेक्ट’ नावाची एक मोहीमच हाती घेतली. साधारण सव्वा कोटी फोन- अर्थातच स्मार्टफोन- आणि त्यांच्याकडून झालेली ५०,००० कोटी इतकी आ वासून टाकेल अशी संदेशांची/ माहितीची देवाणघेवाण या मोहिमेत नोंदवण्यात आली. हे काम कित्येक महिने सुरू होतं आणि अनेक कंपन्या त्यात गुंतल्या होत्या. हा असा अजस्र माहितीसाठा या कंपन्यांनी गोळा केला आणि नंतर तो न्यू यॉर्क टाइम्सच्या हवाली केला. त्या वर्तमानपत्राच्या संपादकीय पानांच्या संपादकांनी या माहितीची छाननी केली. तिचा अर्थ लावला. त्यातून सुरुवातीला वर्णन केलेली छायाचित्रं आणि ते पिवळे ठिपके यांच्या आधारे हे सगळं कसं समजावून सांगायचं हे ठरलं. प्रत्येक पिवळा ठिपका म्हणजे एक मोबाइल फोन. त्यातून मिळणारं प्रत्येक संदेशवहन टिपलं गेलं. यात लक्षात घ्यायला हवी अशी बाब म्हणजे यातून समोर आलेलं सत्य : अगदी व्हाइट हाऊस किंवा अमेरिकी लष्कराचं मुख्यालय असलेल्या पेंटागॉनसारख्या सुरक्षित समजल्या जाणाऱ्या इमारतीतल्या मोबाइल फोनचासुद्धा माग काढता येतो. या मोबाइलवरून कोणाशी संपर्क साधला गेलाय आणि कोण कोणाशी बोलतोय आणि कोण कुठून आला आणि नंतर कुठे गेला याचा सर्व तपशील तसाच्या तसा गोळा करता येऊ शकतो.

नव्हे तो तसा गोळा केला जातो.

हे घाम फोडणारं सत्य न्यू यॉर्क टाइम्सनं तशाच पद्धतीनं सादर केलं. त्यातून जे समोर आलं ते धक्कादायक आहे. त्या सगळ्याचं सार असं की स्मार्ट मोबाइल वापरणारी या भूतलावरची प्रत्येक व्यक्ती ही हेरगिरीच्या टप्प्यात आहेच आहे. अशा स्मार्टफोनधारी व्यक्तीचे सर्व संदर्भ हवे तेव्हा, हवे तसे हाताला लागू शकतात. कोणीही कितीही सामर्थ्यवान असो या दूरसंचार जाळ्यातून त्याची सुटका नाही. आता यावर काही जणांचं म्हणणं असेल की महत्त्वाच्या, संवेदनशील वगैरे ठिकाणी असताना मोबाइल वापरायचाच नाही, म्हणजे आपण कुठे आहोत हे कोणाला कळणारच नाही. मग कसा काय लागणार माझ्या फोनचा सुगावा?

वरकरणी हा प्रश्न दिलासा देणारा वाटेल. चला.. या मार्गानी तरी स्वत:ला लपून राहता येईल, असं काही मानतील. पण तो दिलासा तात्कालिकच. कारण न्यू यॉर्क टाइम्सची ही शोधमोहीम दाखवून देते की आपल्यावर हेरगिरी करण्याचं काम फक्त फोनच करतो असं नाही. तर फोनइतकीच, किंबहुना जास्तच, हेरगिरी त्या फोनमधली वेगवेगळी अ‍ॅप्स करत असतात. आपल्याही नकळतपणे. एखादं अ‍ॅप आपल्याला हवामानाचा अंदाज सांगत असतं, एखादं ताज्या बातम्या पुरवतं, आसपासची हॉटेलं, पेट्रोल पंप वगैरे आपल्याला अशाच एखाद्या अ‍ॅपवरनं सुचवली जात असतात.

पण त्याच वेळी ही सर्व अ‍ॅप्स आपली हालचाल, आपला तपशील वगैरे माहिती त्यांच्या त्यांच्या केंद्राला पाठवत असतात. अशी दहा अ‍ॅप्स एखाद्याच्या फोनमध्ये असली तर? म्हणजे किमान दहा ठिकाणी ही आपली माहिती पुरवली जाणार. लाखो जणांच्या फोनमध्ये ही अशी दहाएक अ‍ॅप्स असतात. म्हणजे किती प्रचंड माहिती साठा तयार होत असेल याच्या अंदाजानेही डोळे विस्फारतील.

यात एकाही प्रकरणात संबंधित दूरसंचार कंपनी गुंतलेली नाही. म्हणजे एखाद्या टेलिकॉम कंपनीकडून हे सगळं सुरू आहे असं अजिबातच नाही. त्याचप्रमाणे यात काही सरकारांचा हात आहे, असंही नाही. त्यामुळे आपल्या नागरिकांवर पाळत ठेवण्याच्या व्यापक हिताचा कोणा दुष्ट सरकारचा हा डाव आहे, असाही आरोप कोणावर करता येणार नाही. जगभरात ही अशी अ‍ॅप्स बनवणाऱ्या असंख्य छोटय़ा छोटय़ा कंपन्या आहेत आणि सर्रास आंधळेपणानं त्यांची अ‍ॅप्स वापरली जातायत. या अ‍ॅपनिर्मिती कंपन्यांमागे कोण आहे, जमवलेल्या माहितीचं या कंपन्या काय करताहेत याचा कोणालाही अंदाज नाही.

आणि मुख्य म्हणजे या माहितीचं- विदेचं (डेटा)- करायचं काय याचा अनेक पातळ्यांवर निर्णयच झालेला नाही. आपण कोणत्या हॉटेलात जाऊन खातोय किंवा त्यांच्याकडून काय मागवतोय ही माहिती गुप्त नाही राहिली तर काय बिघडलं, असा प्रश्न असेल काही जणांचा. पण ही माहिती आपल्या नकळत जमा केली जाणं हा आपल्या खासगी आयुष्याच्या अधिकारावर घातलेला घाला आहे. आपण काय करतोय याची माहिती जमा करण्याचा अधिकार या अ‍ॅप वगैरेंना आपण कधी दिला हा प्रश्न आहे. आणि तो इतक्यापुरताच मर्यादित नाही.

ही आपली असंख्य, अज्ञात माणसांची माहिती ही अ‍ॅप, दूरसंचार वगैरे क्षेत्रातल्या कंपन्यांसाठी कच्चा माल आहे हे आपल्या ध्यानात येतंय का? आपल्या जगण्याच्या सवयी, खासगी आयुष्यात आपण काय करतो, काय खातो, पितो, कोणत्या कपडय़ांची खरेदी करतो, फिरायला कुठे जातो वगैरे असे असंख्य मुद्दे, आपल्या आवडीनिवडी या अनेकांच्या व्यवसायसंधी आहेत.

आता लक्षात आला असेल.. ‘डेटा इज न्यू ऑइल’ या म्हणण्याचा अर्थ आणि कोण हे म्हणालं होतं ते.

दोनच दिवसांपूर्वी गूगलच्या काही घोषणा झाल्या. त्या पार्श्वभूमीवर स्मार्टफोन्स, त्यातल्या अ‍ॅप्सचं आपल्यातल्या अनेकांना असलेलं कौतुक, या अ‍ॅप्सनाही आपण हवेच असणं, अधिकाधिक विविध अ‍ॅप्सची हाव वगैरेमागचं अर्थकारण लक्षात यावं, म्हणून हा लेखनप्रपंच.

बाकी तसं सर्व क्षेमच म्हणायचं..!

girish.kuber@expressindia.com

@girishkuber

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 18, 2020 12:02 am

Web Title: loksatta anyatha article on spying in the form of smartphones abn 97
Next Stories
1 लेडी ऑफ फायनान्स!
2 त्यात काय सांगायचं?
3 मात करायची झाली तर..
Just Now!
X