गिरीश कुबेर

Torrential rain with hail in Shirol and Hatkanangle taluka
शिरोळ, हातकणंगले तालुक्यात गाऱ्यांसह वळिवाची दमदार हजेरी; उन्हात गरव्याची सुखद अनुभूती
Baramati farmer commits suicide by drinking poisonous medicine Allegation of neglect of government agencies
बारामतीत शेतकऱ्याची विषारी औषध पिऊन आत्महत्या, शासकीय यंत्रणांच्या दुर्लक्षामुळे आत्महत्या केल्याचा आरोप
(11 goats died in attack by stray dogs in Jalgaon )
जळगावात मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात ११ बकर्‍या मृत्युमुखी
A minor girl commits suicide due to not being able to bear the pain of menstruation Mumbai
मुंबई: मासिक पाळीचा त्रास सहन न झाल्याने अल्पवयीन मुलीची आत्महत्या

उद्योगी माणसाच्या अंगी एक धडाडी असते. या धडाडीच्या ऊर्जेत संस्कारानं मध्यमवर्गीय असलेल्यांचा विरोध जळून जातो. त्यात यांच्या घरची परिस्थिती तशी उत्तम. त्यावेळच्या मानानं सुखवस्तू म्हणावं अशी..

अलीकडेच लुधियानातल्या आजींची ही गोष्ट वाचली आणि लहानपणी ज्या गावात राहात होतो तिथली आठवण आली. त्या घराच्या परिसरात सकाळी सकाळी खमंग असा गोडसर वास भरून जायचा. जवळच एक मोठे चिक्की बनवणारे व्यावसायिक राहायचे. कोपऱ्यावरच्या वाडय़ात त्यांचा कारखाना होता चिक्की बनवण्याचा. त्या घराच्या तळमजल्यावरच्या भटारखान्यात गूळ, शेंगदाणे, तीळ, चणे वगैरे चुलीवर रटरटत असायचे. सकाळी चुली पेटल्या की वातावरण या ‘गूळ’कंदी वासानं भरून जायचं. त्यांच्याकडे चार चार फुटांचे असे भव्य चौकोनी पाट होते लाकडी. त्यावर मग चुलीवरचं सगळं ओतलं जायचं आणि मग माणसाएवढय़ा आकारांच्या लाटण्यानं ते मजूर त्याचं सपाटीकरण करायचे. वडय़ा पाडायचे. रविवारी किंवा सुट्टीच्या दिवशी वडिलांबरोबर मंडईतून परत येताना तिथं जायचा अनेक घरांचा परिपाठ होता त्या वेळी. चिक्कीच्या चौकोनी वडय़ा पाडून, खोक्यात भरून राहिलेल्या कडा तिथं सढळ विकल्या जायच्या. खूप गर्दी असायची ते विकत घ्यायला. पाच-दहा पैशात बख्खळ चिक्की मिळायची. गरम गरम चिक्कीची पुरचुंडी हातात धरून त्या खमंग गंधावर तरंगत घरी येस्तपर्यंत धीर धरणं अवघड.. अशी ती मोहमयी चिक्की.

पण आधी त्या लुधियानातल्या आजींविषयी.

ज्यानं त्यांची गोष्ट लिहिली त्याची पत्नी लुधियानाची. सत्तरच्या दशकात ती आजोळी जायची तिथून या गोष्टीची सुरुवात. त्या वेळी एक तरुण, शिडशिडीत आणि एक देखणी म्हणावी अशा एक बाई लुधियानातल्या उच्चभ्रूंच्या घरी, त्यांच्या भिशी मंडळात किंवा कौटुंबिक कार्यक्रमात वगैरे केक, पिझ्झा बनवून दाखवायच्या. इच्छुक असतील त्यांची शिकवणीत नोंदणी करायच्या. त्या बाई मूळच्या लुधियानातल्या नव्हत्या. लग्नानंतर तिथं आल्या. मूळच्या पाकिस्तानातल्या. लाहोरच्या. लग्न अगदी लहानपणीच झालं. म्हणजे अवघ्या १७व्या वर्षी. साहजिकच पुढचं संसाराचं लचांडही लवकरच मागे लागलं. लवकर लग्न झाल्याचा -म्हणजे इतकं लवकर नाही- एक फायदा असा की या संसाराच्या धबडग्यातून लवकर मोकळं होता येतं. यांच्या घरची परिस्थिती तशी उत्तम. त्या वेळच्या मानानं सुखवस्तू म्हणावं अशी. त्यामुळे पोरं मोठी झाल्यावर करायचं काय हा प्रश्न. मुलांना मसुरीला बोर्डिग स्कूलमध्ये घातल्यानंतर हातात वेळच वेळ.

वेळ घालवण्याचा भाग म्हणून त्याही अशाच एका महिला वर्गासाठी असलेल्या क्लासला गेल्या. त्यांना हे प्रकरण फारच आवडलं. मग घरच्या घरी केक बनवायला लागल्या. पिझ्झा हा प्रकार त्या वेळी मुंबई, दिल्ली वगैरेतली पंचतारांकित हॉटेलं सोडली तर भारतात यायचा होता. गार झाल्यावर चामडं तोडतो की काय असं वाटावं अशी तंदुरी रोटी, मसाल्याचा रंग आहे असं समजून खावं लागतं अशा लाल रंगाच्या कथित भाजीत बुडवून खाणं म्हणजे हॉटेलिंग असं मानलं जायचं तो काळ. पुण्या-मुंबईकडे सटीसमाशी आईवडील डोसा खायला घेऊन जायचे तेच काय ते हॉटेल दर्शन त्या वेळी. पावबिस्कीट मिळणं हीसुद्धा चैन होती तेव्हा. त्या काळी ही बाई पिझ्झा बनवायला शिकली. बरं मग. पुढे काय?

हाच प्रश्न त्यांनाही पडला. मग त्याही घरोघर हे शिकवण्याचा उद्योग करत राहिल्या. लुधियानात उन्हाळा खूप. एकदा पॉटचं आइसक्रीम बनवलं. ते इतकं झकास झालं की शेजारपाजारचे आग्रह करू लागले आमच्यासाठी बनवा म्हणून. हे असं किती वेळा करणार, हा प्रश्नच. आणि शेजारच्यांनाही संकोच त्याचा नुसतंच कसं काय त्यांच्याकडून हे बनवून घ्यायचं. म्हणून मग त्यांनी सरळ हे आइसक्रीम विकायला सुरुवात केली. साडेतीनशे रुपये खर्च करून एक पॉट आणला, पण तोही कमी पडू लागला. पॉटची संख्या पाच-सहावर गेली. तरीही ‘माल संपला’ची पाटी आहेच. नवऱ्याला लक्षात आलं एवढय़ानं काही होणार नाही. त्यानं त्या काळी चक्क २० हजार रुपये गुंतवले आणि मोठं मशीनच आणून दिलं आपल्या बायकोला आइसक्रीम बनवण्यासाठी.

धो धो धंदा सुरू झाला. बाईंना वाटलं हेच आता किती दिवस करणार? त्यांनी मग बिस्किटं बनवायचा उद्योग सुरू केला. बाईंच्या हातात जादू असावी. इतकी चविष्ट, खमंग आणि घरच्या घरी बनलेल्या बिस्किटांनाही सणसणीत मागणी यायला लागली. हळूहळू यातनं जमा होत जाणाऱ्या पैशातनं त्यांना व्यवसाय वाढवण्यासाठी आवश्यक असं भांडवल सहज मिळत होतं. नवनवीन करायची हौस होतीच. मग त्यांनी बिस्किटं बनवण्यासाठी आवश्यक साधनसामग्री घेतली. जागाही घेतली. आता मागणी आणि पुरवठा या दोन्हींतही चांगली वाढ झाली. आगाऊ नोंदणी करावी लागायची बिस्किटं वगैरे हवी असल्यास. लुधियानातल्या घराघरांत यांचीच बिस्किटं. पिझ्झाची सवयही लावली होतीच त्यांनी. आधीच पंजाबातल्यांचं खाणं दुधातुपाचं. आणि कोलेस्टेरोल, लिपिड प्रोफाइल, हायपर टेन्शन वगैरे तत्सम अभद्र संज्ञा आणि कल्पनांनी माणसांची मनं -आणि अर्थातच पोटंही- कलुषित व्हायची होती. त्यामुळे खाण्यात अनमान होत नसे. माणसं मोकळेपणानं बोलत आणि तितक्याच मोकळेपणानं खात. लोणी हा जमेल तितकं आणि समोरच्या वाडग्यात असेल तितकं, अन्य कोणास उरेल की नाही याचा विचार न करता चापूनचोपडून खाण्याचा पदार्थ होता तेव्हा. बटर नामक लोण्याच्या शहरी चटपटीत, स्मार्ट आंग्लाळलेल्या पिवळसर अवताराचा शिरकाव व्हायचा होता. त्या काळात या बाई लोण्यात, मलईत आपले पदार्थ बनवत. हे सर्व पदार्थ वाऱ्याच्या वेगानं संपत.

मग यानंतर पाव बनवणं ओघानं आलंच. एकेकाळी हे पाव विहिरीत टाकून पोर्तुगीजांनी गावंच्या गावं बाटवल्याचा इतिहास आहे. त्यामुळे पाववाला आणि पाववाली हे ‘आपल्यातले’ नाहीत असं घराघरांत बिंबवलं जायचं. पाव विकणारा त्याबरोबर बिस्कुट (बिस्कीट नाही) विकणारा ‘चाचा’ असायचा आणि ती महिला असेल तर ‘आँटी’ असायची. पण ही लुधियानातली बाई या दोन्हीतली नव्हती. त्या शहरातल्या बहुसंख्याकांतलीच ती एक. पण तरीही अल्पसंख्याकांसाठी ‘राखीव’ उद्योग करत होती ती त्या काळी. बहुसंख्याकांच्यात अल्पसंख्याकी गंड निर्माण करणारं राजकारण सुरू व्हायचं तेव्हा. आणि दुसरं असं की उद्योगी माणसाच्या अंगी एक धडाडी असते. या धडाडीच्या ऊर्जेत संस्कारानं मध्यमवर्गीय असलेल्यांचा विरोध जळून जातो. या बाईंच्या उद्योगात ही ताकद होती. आणि त्यांच्या या उद्योगाला एक चव होती. संपूर्ण लुधियानाभर यांचं नाव झालं. गावात कोणाच्याही घरी पाहुणेरावळे आले की जाताना या बाईंच्या कडचा पिझ्झा, केक, पाव नाही तर किमान बिस्किटं तरी जाताना घेऊन जायचे.

आता इतकं यश मिळाल्यावर पुढेच जायला हवं. मुलंही एव्हाना हाताशी आली होती. व्यवस्थापनशास्त्र वगैरे शिकून आली होती. आईनं मांडलेला व्यवसायाचा पसारा वाढवण्यासाठी फुरफुरत होती. ही मुलं येईपर्यंत आईनं आपलं नाव इतकं कमावलं होतं की आजच्या शब्दांत तो एक ब्रॅण्ड झाला होता एव्हाना. आता फक्त त्याच्या विस्ताराचं आव्हान. आई, व्यवसायतले वडील आणि मुलं अशा सर्वानी हा विस्तार झपाटय़ानं केला. इतकं होईपर्यंत पिझ्झा, पास्ता हे आपल्या इडलीडोशाइतके घरोघर पोहोचले. त्यामुळे यांच्या विस्तारासाठी अगदी योग्य परिस्थिती तयार झाली. मग तो इतका यशस्वी झाला की टाटा समूहाची हॉटेल्स, आयटीसीची हॉटेल्स, मॅकडोनल्डस, बरिस्ता, कॅफे कॉफी डे, पिझ्झा हट, डॉमिनो वगैरे सर्व नामवंत खाद्यान्न उद्योग यांचा पाव/पिझ्झा वापरू लागले.

आता म्हणजे आणखी मोठं होणं आलं.

गेल्या महिन्यात तेच घडलं. ‘मिसेस बेक्टर फूड’ कंपनीचा आयपीओ १९८ पट अधिक विकला गेला आणि दोन दिवसांत त्यातून अबब ५४१ कोटी रुपये उभे राहिले. ‘क्रीमिका’ पावाच्या या यशानं रजनी बेक्टर हे नाव डोळे दिपवून गेलं. आज रजनी बेक्टर ऐंशीच्या घरात आहेत. ‘दास डोंगरी राहतो, यात्रा देवाची पाहतो’ या समर्थ उक्तीप्रमाणे लुधियानात बसून त्यांनी आपल्या पावाची ही यशयात्रा पाहिली.

एक ‘साधी गृहिणी’ काहीही पार्श्वभूमी नसताना कसा आपला उद्योग उभा करू शकते याची ही कहाणी.

लहानपणच्या त्या चिक्की निर्मात्याचं काय झालं हे एकदा बघून यायला हवं.

girish.kuber@expressindia.com

@girishkuber