26 November 2020

News Flash

‘आत्मनेपदी’ प्रत्ययकथा!

तीन देश. त्या देशांच्या प्रमुखांच्या या अलीकडल्या कथा.. नेते कोणत्या प्रकारे मोठे होताहेत, याचा प्रत्यय देणाऱ्या..

..अशा निषेध-निदर्शनांचं बापुडवाणेपण मग अधिकच वाढतं!

 

गिरीश कुबेर

तीन देश. त्या देशांच्या प्रमुखांच्या या अलीकडल्या कथा.. नेते कोणत्या प्रकारे मोठे होताहेत, याचा प्रत्यय देणाऱ्या..

चीनचा जॅक मा म्हणजे जिवंत रंग(ढंग)शारदाच. गरिबीतून वर येत आपलं व्यापार साम्राज्य उभारणारा जॅक मा म्हणजे चीनचा स्टीव्ह जॉब्स किंवा जेफ बेझोस.

त्याच्या ‘अलिबाबा’नं त्या देशात अ‍ॅमेझॉनला नेस्तनाबूत केलंय. या अलिबाबाचा चीनमध्ये इतका दबदबा आहे की त्यापुढे कोणत्याही परदेशी स्पर्धकाचा टिकाव लागत नाही. जगातल्या काही श्रेष्ठ धनाढय़ांत समावेश होण्याइतकी माया या अलिबाबानं जॅक मा याला मिळवून दिली. ज्या देशात कल्पक उद्योगांना फुलण्यासाठी पोषक वातावरण नसतं त्या देशात असा एखादा जॅक मा तयार झालाच चुकूनमाकून तर समाजाचा नायक बनून जातो. अनेक तरुणांना आपला आदर्श अशा व्यक्तींत सापडतो. चीनमध्ये जॅक मा याचं असं झालंय. कमालीचा लोकप्रिय. अशी लोकप्रियता आली की ती व्यक्ती मग आपली जीवनकहाणी तिखटमीठ लावून सांगू लागते. साधेपणा, रस्त्यावरच्या दिव्याखाली अभ्यास करणं वगैरे वगैरे. हे असे कीर्तनकार सर्वच देशांत असतात. जॅक मा असाच.

धनाढय़ता आणि लोकप्रियता हा तर चीनसारख्या देशात दुहेरी शाप. अशा देशात सर्वोच्च नेत्यापेक्षा कोणीही अन्य लोकप्रियता मिळवू शकत नाही. निदान त्यांनी ती मिळवू नये. कारण सत्ताधीशांच्या ती डोळ्यावर येते आणि मग अडचणी तयार होऊ लागतात. याच्या जोडीला जर व्यवस्थेतले दोष वगैरे दाखवून द्यायचा प्रयत्न अशा लोकप्रिय व्यक्तीनं समजा केलाच तर मग बघायलाच नको.

जॅक मा याला हा मोह आवरला नाही. ऑक्टोबर महिन्यात त्या देशात भरलेल्या एका आर्थिक परिषदेत त्यानं आपल्या देशातल्या वित्तव्यवस्थेवर तोंडसुख घेतलं. चीनमधल्या बँका उद्यमशीलतेला पोषक नाहीत, त्यांना जोखीम अजिबात पत्करायची नसते, त्यांची कार्यशैली मागास आहे वगैरे मुद्दे जॅक मा याच्या भाषणात होते. इतक्या मोठय़ा उद्योगपतीनं आपल्याच देशातल्या बँकांचे असे सोदाहरण वाभाडे काढल्यावर त्याची चर्चा तर होणारच. जॅक मा याच्या या कृतीचीही झाली. त्या देशात असं कोणी सरकारी यंत्रणांना धारेवर धरतंय हीच किती मोठी बाब. त्याचा त्यामुळे खूप गवगवा झाला. आपल्या देशाला नवा तारणहार सापडला असं त्या देशातल्या अनेकांना वाटलं इतकं जॅक मा याचं हे वक्तव्य गाजलं. इतरांच्या अशा धाडसाला पडद्यामागे राहून उत्तेजन देणाऱ्या काहींनी ‘जॅक मा आगे बढो..’ अशा घोषणाही दिल्या म्हणे. काहीही असो. पण जॅक मा खूश होते.

गेल्या आठवडय़ात भानावर आले. ते त्यांच्या कंपनीचा ‘आयपीओ’ येणार होता. चीन सरकारनं आदेश दिला : ‘आयपीओ तूर्त स्थगित’.

जगातल्या काही अत्यंत भव्य अशा आयपीओंत जॅक मा यांच्या कंपनीच्या समभाग विक्रीची गणना होत होती. ३,७०० कोटी डॉलर्स उभे करणारा हा अवाढव्य आयपीओ. सर्व तयारी झालेली. पण ‘वरनं’ आदेश आला. वधू-वर एकमेकांच्या गळ्यात हार घालणार.. आणि त्या क्षणीच लग्न मोडल्याची घोषणा व्हावी.. तसंच हे!!

आता जॅक मा मौनात गेलेत. तक्रार तरी कोणाकडे करणार? दाद मागायची कोणाकडे?

गेल्या वर्षी बर्लिनच्या बागेत झेलिमखान खांगोशविली आपला नैमित्तिक फेरफटका मारत होते. झेलिमखान यांचा बर्लिनला आल्यापासूनचा हा शिरस्ता. ते मूळचे जॉर्जियन. पण वंशाने चेचेन. राजकीय कार्यकर्ते होते. चेचेन्याच्या लढय़ात मोठी महत्त्वपूर्ण कामगिरी होती त्यांची. रशियाचे मनसुबे उघडे पाडण्यात आघाडीवर होते. नंतर जॉर्जियाच्या युद्धातही ते सक्रिय होते. पुतिन यांचे ते खंदे विरोधक. आता सगळं शांत झाल्यावर बर्लिनला राजकीय आश्रय मिळवून राहत होते. जर्मनीत आल्यानंतर त्यांचं आयुष्यच बदललं.

बदलला नव्हता तो भूतकाळ आणि त्याच्या केंद्रस्थानचे पुतिन. तर त्या दिवशी बागेतून फेरफटका मारून घराकडे निघाल्यावर मागून दुचाकीवरून दोघे जण आले आणि झेलिमखान यांच्या डोक्यात गोळ्या झाडून पळूनही गेले. नेम अचूक होता त्यांचा. दोन्ही गोळ्या झेलिमखान यांचा मेंदू भेदून गेल्या. ते जागच्या जागी गतप्राण झाले. जर्मन पोलिसांनी काही तासांत त्या मारेकऱ्यांचा छडा लावला.

पण पुढे काहीही झालं नाही. त्यांना कोणी पाठवलं होतं, कोणाची सुपारी होती वगैरे प्रश्नांची उत्तरं मिळाली नाहीत. ती मिळणार नाहीत याचा अंदाजही होता संबंधितांना. असे अनेक मृत्यू आतापर्यंत झाले होते. पण तरी याचा धक्का बसला. कारण पुतिनप्रणीत मारेकऱ्यांनी आता जर्मनीत येऊन कार्यभाग साधला होता. त्याआधी लंडनमध्ये अलेक्झांडर लिटविनेंको याचं मरण असंच होतं.

तरीही या हत्येनं अनेक हादरले. कारण पुतिन यांच्या रशियाचे गुप्तहेर आता परदेशातही आपली कृष्णकृत्यं सराईतपणे करू लागल्याचं यातून दिसत होतं. वास्तविक शीतयुद्धाच्या काळात अमेरिकेची सीआयए आणि सोव्हिएत रशियाची केजीबी यांनी अनेक देशांत उत्पात घडवले होते. इस्रायलची मोसाद हीदेखील या खेळात जो कोणी अधिक मोल देईल त्या बाजूने आपली हत्या/ उत्पात सेवा अदा करीत होती. पण अलीकडे हे प्रकार जवळपास बंद झाले होते. विशेषत: सोव्हिएत युनियनच्या पाडावानंतर केजीबीचे हे उद्योग जवळपास थांबले होते. पण एके काळचे केजीबी अधिकारी पुतिन हे रशियात सत्तेवर आले आणि या प्रकारांना पुन्हा गती आली. पुतिनविरोधक बघता बघता नाहीसे व्हायला लागले. मध्यंतरी ‘वॉशिंग्टन पोस्ट’नं यादी प्रसिद्ध केली. गूढपणे मृत्युमुखी पडलेल्या पुतिन यांच्या शत्रूंची.

या सगळ्यामागे आहे पुतिन यांनी २००६ साली मंजूर करवून घेतलेला आणि अजिबात गाजावाजा न झालेला विशेष कायदा. त्याद्वारे देशातल्या देशाप्रमाणे परदेशातही जाऊन ‘रशियाच्या शत्रूं’चा बीमोड करण्याचा, त्याविरोधात कारवाई करण्याचा अधिकार पुतिन यांना मिळाला.

आणि सर्वोच्च नेत्याला विरोध करणारे ते देशाचे शत्रू.. हे तत्त्व आता अनेक देशांत सर्वमान्य झालंय. त्यामुळे पुतिन यांचे विरोधक हे रशियासाठी धोका ठरले आणि एकामागोमाग एक नाहीसे होत गेले.

खरा धक्का आहे तो हा!

अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ख्रिस क्रेब यांना निलंबित केलं. ते अमेरिकेतल्या देशांतर्गत सुरक्षा व्यवस्था पाहणाऱ्या यंत्रणेत अधिकारी होते. या क्रेब यांचा गुन्हा काय?

तर त्यांनी ट्रम्प यांच्या आरोपांना दुजोरा दिला नाही, हा. या निवडणुकीत प्रचंड प्रमाणावर गैरव्यवहार झाले, बनावट मतदानाचे असंख्य प्रकार घडले; मोठय़ा, डेमॉक्रॅटिक पक्षाची सत्ता असलेल्या अनेक शहरांत मतपत्रिका वाटेल तशा वितरित केल्या गेल्या.. असे अनेक आरोप डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वत:च्याच अखत्यारीतील निवडणूक यंत्रणेवर केले. त्यांचे वकील ज्युलियानी हे या सगळ्या आरोपांना कायद्याच्या चौकटीत बसवू पाहताहेत. (या ज्युलियानी यांच्या कुटुंबातील सदस्यांनी मात्र आपले वडील ‘अशा’ व्यक्तीसाठी काम करतात याबद्दल घृणा व्यक्त करून जो बायडेन यांना पाठिंबा दिलाय.) तर या सगळ्यांत क्रेब यांनी मदत करावी, आपल्या आरोपांना पाठिंबा द्यावा अशी ट्रम्प यांची अपेक्षा होती.

पण क्रेब हे सच्च्या लोकशाहीवादी देशातले असल्याने त्यांनी ती पूर्ण केली नाही आणि ट्रम्प यांच्या विधानात काहीही तथ्यांश नाही, असा नि:संदिग्ध निर्वाळा दिला. साहजिकच ट्रम्प संतापले. आपला पराभव म्हणजे देशातील लोकशाही यंत्रणेचा पराभव.. असा त्यांचा समज असल्यानं त्यांनी क्रेब यांना काढून टाकलं.

खरं तर या क्रेब यांच्यापेक्षा आपले निवडणूक आयुक्त अशोक लव्हासा नशीबवान म्हणायचे. लव्हासा यांची फक्त बदली झाली. पण क्रेब यांनी नोकरी गमावली.

ट्रम्प यांनी काढलेल्या/ बदललेल्या/ राजीनामा दिलेल्या महत्त्वाच्या मंत्री/ अधिकाऱ्यांची संख्या आहे १८० इतकी. ट्रम्प यांचा कार्यकाल चार वर्षांचा. म्हणजे १४६० दिवस. यात गच्छंती झालेल्या अधिकाऱ्यांची संख्या १८०. म्हणजे दर आठ दिवसांत सरासरी एक या गतीनं अमेरिकी उच्चपदस्थांनी आपली पदं गमावली.

तीन देश. तीन देशप्रमुखांच्या या सत्यकथा. आत्मकेंद्री नेत्यांच्या या प्रत्ययकारी कथा व्यवस्थेपेक्षा व्यक्ती मोठी व्हायला लागली की काय होतं.. हे सांगतात!! आणि त्यातूनच खऱ्या लोकशाहीचं महत्त्वही अधोरेखित करतात.

girish.kuber@expressindia.com

@girishkuber

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 21, 2020 12:05 am

Web Title: loksatta anyatha article on zelimkhan khangoshvili abn 97
Next Stories
1 पुन्हा ‘रिपब्लिक’च; पण..
2 ‘रिपब्लिक’च, पण..
3 काळ्या पुठ्ठय़ाच्या बांधणीत, सोनेरी अक्षरांत..
Just Now!
X