21 March 2019

News Flash

राहिलेल्या पदवीची गोष्ट

जातिवंत अर्थतज्ज्ञ, लेखक अमर्त्य सेन यांचा एक सुंदर लेखसंग्रह आहे

मार्क झकरबर्ग ( संग्रहित छायाचित्र)

जातिवंत अर्थतज्ज्ञ, लेखक अमर्त्य सेन यांचा एक सुंदर लेखसंग्रह आहे ‘द कंट्री ऑफ फर्स्ट बॉइज’ या नावाचा. भारत हा फक्त पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण होणाऱ्यांचाच कसा देश आहे ते सेन या पुस्तकात मांडतात. दुसऱ्या आणि खालच्यांना काही स्थानच नाही. शाळांपासनं विद्यापीठांपर्यंत पहिलेतर क्रमांकवाले जणू जगायलाच लायक नाहीत, असा आपल्याकडे आविर्भाव असतो सगळ्यांचा.

सेन यांनी हे सत्य असं सरळ मांडणं याला महत्त्व आहे, कारण आपल्याकडे मोठे झालेले स्वत:विषयी लिहिताना मी कसा पहिल्यापासनंच पहिल्या क्रमांकाचा वगरे थापा मारत असतात. असो. तर सेन यांच्या या पुस्तकाची आठवण झाली गेल्याच आठवडय़ात अमेरिकेतल्या हार्वर्ड विद्यापीठात झालेल्या एका समारंभाच्या वृत्तामुळे. पदवीदान समारंभ होता तो. नेहमी असतो तसाच. फक्त फरक इतकाच की या सोहळ्यात ज्याला पदवी प्रदान करून गौरवण्यात आलं तो उत्तीर्णातला नव्हता. कंटाळा आला आणि अधिक काही चांगलं करता येईल या विचारानं ज्यानं मध्येच महाविद्यालयीन शिक्षण सोडून दिलं त्याला पदवी देऊन गौरवण्याचा सोहळा होता तो.

त्या अनुत्तीर्ण पदवीधारकाचं नाव मार्क झकरबर्ग. तोच तो मार्क. ज्यानं फेसबुक नावाचं एक जगड्व्याळ जाळं माहिती महाजालात विणलं आणि ज्यात आज शहाणेसुरते पार अडकलेत तो हा झकरबर्ग. त्यानं याच विद्यापीठात शिकत असताना फेसमेश नावानं पहिली कल्पना साकारली आणि जिचं पुढे फेसबुक या जगातल्या अवाढव्य कंपनीत रूपांतर झालं. पण विद्यापीठ शिक्षण काही त्यानं पूर्ण केलं नाही. मध्येच त्यानं शिक्षण सोडून दिलं. ही २००५ सालची घटना. म्हणजे एक तपापूर्वीची. इतक्या मोठय़ा खंडानंतर मार्क विद्यापीठात आला. जिथं एके काळी आपण हुल्लडबाजी केली तिथे गेला. फेसमेशचा जन्म झाला त्या वर्गात गेला तो. त्या वेळी तुला हे काही जमलं तर मी तुझ्याकडे चाकरी करीन.. असं एक शिक्षक त्याला म्हणाले होते. त्यांच्याही कक्षात जाऊन आला तो. त्या गुरुजींनी त्याला अभिमानानं सांगितलं, आता तुझ्याच कंपनीत माझी मुलगी नोकरी करते. खूश झाले ते. या सगळ्या भेटीगाठी झाल्यानंतर मग मार्क समारंभस्थळी गेला. तिथं सगळे त्याची वाट पाहत होते. तिथं तो भाषण करणार होता.

या भाषणाची मोठीच तयारी केली होती त्यानं. भाषणाचं निमंत्रण आल्या आल्या त्याला आठवण झाली बिल गेट्स याची. तोही एके काळी असाच हार्वर्डमधून शिक्षण सोडून पळालेला. पुढे मायक्रोसॉफ्ट काढली त्यानं. जगातला सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून गणला जाऊ लागला तो. तेव्हा त्यालाही हार्वर्ड विद्यापीठानं असंच पदवीदान समारंभात बोलावून त्याची राहिलेली पदवी देऊ केली होती. ही दहा वर्षांपूर्वीची घटना. एव्हाना मार्कनं हार्वर्ड सोडलेलं होतं, पण त्याची त्या वेळची मत्रीण आणि आताची पत्नी प्रिस्किला चान हिनं त्या वेळी बिल गेट्स याच्या हातनं पदवी स्वीकारली होती. ती मार्कसारखी नाही. तिनं आपलं शिक्षण वगरे व्यवस्थित पूर्ण केलं. तेव्हा भाषण तयार करायला याचाच आधार घेतलेला बरा असं मार्कला वाटलं. त्याला भाषणात मदत करायला बिल गेट्स जातीनं फेसबुकच्या कार्यालयात आला. त्याला पाहिल्यावर मार्कचा पहिला प्रश्न होता : पण विद्यापीठाला माहितीये नं आपण शिक्षण पूर्ण केलेलं नाही ते.

त्यावर गेट्स म्हणाला.. हो. ते फारच चांगले लोक आहेत. ते आपल्याला बोलावतात आणि वर आपली राहून गेलेली पदवीही देतात. मग बिलनं मार्कला आपल्या भाषणाची आठवण सांगितली. तो म्हणाला होता.. मला जर पदवीदानाऐवजी परिचयदिनी बोलावलं असतं तर बरेच जण अभ्यासक्रम सोडूनच गेले असते.

या दोघांना आणखी अशा अनेकांची आठवण आली. त्यातला एक म्हणजे स्टीव्ह जॉब्स. २००५ साली जेव्हा मार्क झकरबर्गनं हार्वर्ड सोडलं, बरोबर त्याच वर्षी स्टीव्ह जॉब्सला त्याच्या स्टानफर्ड विद्यापीठानं असंच पदवीदान समारंभात भाषणासाठी बोलावलं होतं. मार्क, बिल या दोघांप्रमाणे स्टीव्हदेखील असाच महाविद्यालय सोडून गेला होता. त्याचंही पदवी शिक्षण अर्धवट राहिलेलं. ओरॅकल ही सॉफ्टवेअर कंपनी काढणाऱ्या लॅरी एलिसन याचीही अशीच कहाणी. त्यानं तर दोन दोन विद्यापीठं सोडली. इलिनॉईस आणि शिकागो. झालंच तर विख्यात विनोदी अभिनेत्री एलेन डिजेनरीस (गेल्याच्या गेल्या वर्षी गमतीदार पद्धतीनं, अनेकांच्या टोप्या उडवत ऑस्कर सोहळा तिनं साजरा केल्याचं काहींना आठवत असेल.) हिचंही तेच. ती आता विख्यात अभिनेत्री आहे, लेखिका आहे आणि तिची स्वत:ची मनोरंजन कंपनीदेखील आहे. पण इतिहास बिल गेट्स किंवा मार्क झकरबर्ग किंवा स्टीव्ह जॉब्स यांच्यासारखाच. अर्धवट शिक्षणाचा. केन वेस्ट या आणखी एक लोकप्रिय अमेरिकी कलाकाराचंही तेच (याची दुसरी ओळख म्हणजे तो किम कार्दशिन हिचा सध्याचा नवरा. आता किम कोण हेही सांगावं लागणार असेल तर अवघडच आहे म्हणायचं. असो.). दोन वर्षांपूर्वी शिकागो विद्यापीठाच्या कला शाखेनं त्यालाही पदवीदान समारंभात भाषणासाठी बोलावलं होतं. तोही वरच्या यादीतल्यांसारखाच. स्नॅपचॅटचा सहसंस्थापक एव्हान स्पिगेल हादेखील महाविद्यालयीन शिक्षण अर्धवट सोडून पळालेला. आता फेसबुकच्या संचालक मंडळावर असलेला अब्जाधीश गुंतवणूकदार पीटर थिएल यानं त्या वेळी शिक्षण सोडून जाणाऱ्यांसाठी एक स्टार्टअप निधी सुरू केला. चमकदार काही कल्पना असतील तर त्या सत्यात आणण्यासाठी पीटर अशा विद्यार्थ्यांना एक लाख डॉलर द्यायचे. स्नॅपचॅट यातनंच उभी राहिली. तोही पुढे असाच पदवीदान समारंभात भाषणासाठी गेला. इन्स्टाग्रामचा संस्थापक केविन सिस्ट्रोम याची कहाणीपण अशीच.

तर या सगळ्या इतिहासाची उजळणी करून हार्वर्ड विद्यापीठात गेल्यावर मार्कला काही जुने शिक्षकही भेटले. त्यातल्या एकानं अशांच्या भाषणांची वेबसाइट तयार केलीये. त्याच्या बरोबरच्या प्राध्यापिका म्हणाल्या.. पदवी पूर्ण करणाऱ्यांपेक्षा ती अर्धवट सोडून गेलेले जास्त चांगलं भाषण करतात. कारण त्यांना काही ना काही धडपड करावी लागलेली असते.. त्यामुळे त्यांच्याकडे सांगण्यासारखं काही तरी असतं. छान बोलतो त्यांचा अनुभव.

तर बिल गेट्स ते मार्क झकरबर्ग अशा अनेकांना संगणकीय विद्या शिकविणारे प्राध्यापक हॅर लेविस हे प्राध्यापक त्या दिवशी अन्य शिक्षकांना उद्देशून म्हणाले.. मित्रहो, हा इतिहास लक्षात घेता वर्गात मागच्या बाकावर बसून तुम्हाला सतावणारा तो व्रात्य मुलगा उद्याचा भविष्यवेधी उद्योजक असू शकतो एवढं लक्षात असू द्या.

या सोहळ्यातलं मार्कचं भाषण अपेक्षेप्रमाणे उत्तमच झालं. तो म्हणाला.. हे भाषण जर पूर्ण केलं तर हार्वर्डमध्ये येऊन मी एक तरी गोष्ट पूर्ण करू शकलो याचं मला समाधान मिळेल.

ही स्वत:च्या अर्धवट राहिलेल्या शिक्षणावर त्यानं केलेली कोटी होती. पुढचं त्याचं भाषण वेगळं आहे. विचार करायला लावणारं. तो म्हणाला.. ‘‘आज आपल्यासमोर आव्हान आहे ते पृथ्वीवरच्या प्रत्येक व्यक्तीस जगण्याचं कारण कसं सापडेल, त्याचं. नवनवीन तंत्रज्ञानामुळे नोकऱ्या जात असताना आणि सामाजिक सुरक्षा व्यवस्था नाहीशी होत असताना जगण्याचा उद्देश प्रत्येकाला देणारं जग आपल्याला तयार करायचंय. यात अनंत अडचणी आहेत. पण सगळ्यात मोठं संकट आहे ते वाढत्या संकुचितवादाचं, सत्ताधाऱ्यांच्या वाढत्या एकाधिकारशाही वृत्तीचं आणि याहीपेक्षा वेगाने वाढणाऱ्या राष्ट्रवाद नावाच्या भावनेचं. मुक्त विचाराचा श्वास या वातावरणात घुसमटतोय. हे वातावरण पुन्हा मुक्त-मोकळं करणं हे तुमच्या-आमच्यासमोरचं मोठं आव्हान आहे. आपल्याला ते पेलायलाच हवं..’’

या समारंभानंतर मार्कनं एखाद्या आज्ञाधारक मुलासारखा आईवडिलांबरोबर फोटो काढला. हार्वर्डची पदवी मिळाल्याचा आनंद तिघांच्याही चेहऱ्यावर दिसत होता. लगोलग हा फोटो त्यानं आपल्या फेसबुक पानावर झळकवला. त्या खाली लिहिलं-

आई.. तुला म्हणालो नव्हतो मी माझी राहिलेली पदवी मी मिळवेनच म्हणून.

 

गिरीश कुबेर

girish.kuber@expressindia.com

@girishkuber

First Published on June 3, 2017 3:10 am

Web Title: mark zuckerberg bill gates steve jobs ellen degeneres girish kuber