09 August 2020

News Flash

‘प्रगती’वरची अधोगती

बघता बघता राजकारण या विषयावर ‘सवासो करोडम् देसवासी’ तज्ज्ञ बनले.

(संग्रहित छायाचित्र)

बघता बघता राजकारण या विषयावर ‘सवासो करोडम् देसवासी’ तज्ज्ञ बनले. व्हॉट्सअपादी माध्यमांत येतं तेच वाङ्मय असं मानणारी एक नवी पिढी उदयाला आली. गाण्यांचे/संगीताचे जे काही तुकडे या माध्यमांतनं भिरकावले जातात तेच चघळत बसण्याच्या निर्बुद्ध आनंदात अनेकांची ब्रह्मानंदी टाळी लागू लागली..

वर्षांच्या सुरुवातीच्या पहिल्या काही आठवडय़ांत दिल्लीतला माहोल मधाळ असतो. या काळात तिथली हवा प्रदूषित असते अशी दिल्लीकरांची तक्रार. पण प्रदूषित राहणं हे दिल्लीच्या हवेचं प्राक्तनच आहे. गेली चारपाचशे वर्ष आहे हे प्रदूषण. तिथली काही प्रदूषणं दिसतात. काही दिसत नाही. प्रत्येक नवा राज्यकर्ता या प्रदूषणात तशी भरच घालत असतो. तेव्हा हवेतलं प्रदूषण हा काही तिथं फिरायला जाणाऱ्यांनी बाऊ करावा असा मुद्दा नाही. त्याकडे दुर्लक्ष करून तिथल्या माहोलाचा आनंद घ्यायचा.

या दिवसांत एक तर दुपारी चारलाच उन्हं उतरायला लागतात. रात्री किती कुडकुडायचं याचा अंदाज तिथपासून यायला लागतो. मग मंद झालेलं शहराचं यंत्र अधिकच मंद व्हायला लागतं. त्याआधीचा दिवसही काही गतीत गेलेला असतो असं नाही. सकाळी आठ-साडेआठच्या सुमारास सूर्य वर येतो. पण तोदेखील निवृत्त राजकारण्यासारखाच. कोणीही विचारत नाही त्याला. आकाशातल्या सूर्यापेक्षा कोपऱ्याकोपऱ्यात जमिनीवर पेटलल्या शेकोटय़ांवर त्यापेक्षा दिल्लीकरांचा अधिक विश्वास. दिल्लीतल्या बडय़ा राजकारण्यापेक्षा गल्लीतला कार्यकर्ताच स्थानिकांना अधिक जवळचा वाटावा तसंच हे. असो. हिवाळ्यातल्या दिल्लीचं वर्णन करणं हा काही इथला हेतू नाही.

तर या काळात दिल्लीत एक महत्त्वाचं प्रदर्शन झडतं, त्याची दखल घेणं, हा विचार. दिल्लीतल्या प्रदर्शनांच्या भाऊगर्दीत आवर्जून जावं असं एक प्रदर्शन म्हणजे पुस्तकमेळा. देशभरातलेच असं नाही, तर जगभरातले अनेक प्रकाशक, विक्रेते आपापली पुस्तकं छान हारीनं मांडून असतात या प्रदर्शनात. त्या अर्थानं पुस्तकप्रेमींसाठी या प्रदर्शनाइतका दुसरा चांगला योग नाही. कारण एरवी प्रत्येक जण आपापल्या गावातल्याच पुस्तक दुकानांत जात असतो. अ‍ॅमेझॉन आहे आता. पण त्यातही पुस्तकं पाहण्याचा असा आनंद नाही. ती एक सोय आहे आणि सोयीचा विचार करताना बऱ्याचदा सौंदर्याला चार हात दूर ठेवावं लागतं. तेव्हा ऑनलाइन पुस्तक खरेदी करणं आणि अशा पुस्तकांच्या महामेळ्यात जाऊन गावोगावच्या प्रकाशकांना भेटणं, एखाद्या स्टॉलवर रेंगाळणं, एखादा समानधर्मी भेटला की काय घेतलं/काय नाही.. याची उत्सुकतेनं चर्चा करणं, आपल्यापेक्षा त्याला जरा जास्तच दुर्मीळ पुस्तकं मिळाल्याचं लक्षात आल्यावर खट्टू होणं आणि तरीही ते न दाखवणं.. असा सगळा आनंदच आनंद असतो पुस्तकमेळ्यात.

या आनंदाला यंदा थोडी खिन्नतेची किनार आढळली. खरं तर ती गेल्या चार वर्षांपासनंच तशी आहे. पण तसं कोणी बोलून दाखवलं नव्हतं. यंदा ही खिन्नता प्रकाशकांच्या बोलण्यातनं जाणवली. तसं काही बोलून दाखवावं की नाही.. असा प्रश्न पडला होता त्यातल्या काहींना. साहजिकच आहे ते तसं. कारण अलीकडे जरा कोणी काही बोललं की समोरचा एकदम राजकारणातच घुसतो. (गेल्या मे महिन्यातला हा प्रसंग. रस्त्यात एक मित्र भेटला, बऱ्याच दिवसांनी. म्हणून सहज बोलत उभे होतो. बोलता बोलता तो सहज म्हणाला.. हल्ली जरा उकाडा जास्तच असतो नाही. शेजारनं मंडईकडे (बहुधा.. हातात कापडी पिशवी होती.) घाईघाईत निघालेल्या एकानं ते ऐकलं आणि म्हणाला : काँग्रेसच्या काळात बरं मुकाट सहन करत होतात उकाडा ते.. आता तो टोचायला लागला होय..? भर उन्हात गार पडलो आम्ही ते ऐकून. असो.) तसंच या प्रसंगाचंही आहे.

कारण प्रकाशकांना जी काही खंत आहे तिचं मूळ वर्ष आहे २०१४. आता याच वर्षांत आपल्याकडे निवडणुका झाल्या. इतिहास घडला. बऱ्याच वर्षांनी एखाद्या.. तेही भाजपला.. स्वत:च्या बळावर सत्ता स्थापन करता आली. पण त्याचा.. म्हणजे त्या वर्षांचा.. संबंध या पुस्तकमेळ्याशी आहे.

त्या वर्षांपासनं पुस्तकमेळ्याचा प्रतिसाद कमी कमी होत गेला. उदाहरणार्थ २०१२ साली हा मेळा पसरला होता ४५,९१३ चौ. मीटर इतक्या प्रचंड मोठय़ा आकारात आणि त्या वर्षी तिथं पुस्तकांची दुकानं होती १२९७ इतकी. हा या ४७ वर्षांच्या पुस्तकमेळ्याचा उच्चांक म्हणायला हवा. पुढच्या वर्षी २०१३ साली आकार वाढला, पण पुस्तकांचे गाळे कमी झाले. त्यांची संख्या झाली १०९२. नंतरचं वर्ष निवडणुकांचं वगैरे. त्या वर्षी आकारही आटला. ३७,७२४ चौ. मीटर आणि गाळेही कमी झाले. फक्त १०२३. त्यानंतरच्या वर्षांत २०१५ साली ही संख्या आणखी घसरली. पुस्तक प्रदर्शनाचं क्षेत्र झालं ३६,५४९ चौ. मीटर इतकं आणि पुस्तकाच्या दुकानात किंचित वाढ झाली. १०४७ इतकी दुकानं या प्रदर्शनात या वर्षी होती. यामुळे परिस्थिती सुधारते की काय अशी आशा निर्माण झाली असणार. पण पुढच्या वर्षीची घसरगुंडी.. खरं तर आपटी.. हा आनंद हिरावून घेऊन गेली. २०१६ साली पुस्तक प्रदर्शनानं ३६,५४८ चौ. मी. इतकी जागा व्यापली खरी. पण या इतक्या जागेत पुस्तक विक्रेते होते अवघे ८८६ इतकेच. आता काही जणांनी दोन दोन स्टॉल घेतले होते वगैरे युक्तिवाद करता येईल. पण तसे घेणारे प्रत्येक वर्षीच असतात. ते तसे अधिक स्टॉलवाले मोजले तरीही २०१६ साली पुस्तक विक्रेत्यांच्या संख्येत कपात झाली, हे मात्र सगळेच मान्य करतात. २०१८ साली पुस्तक प्रदर्शनाची जागा झाली २८,००० चौ.मी. इतकी आणि पुस्तक विक्रेते होते हजारापेक्षाही कमी. यंदाही साधारण अशीच परिस्थिती पाहायला मिळाली. ही कपात नुसती पुस्तकं विकणाऱ्यांच्या संख्येतच झाली असं नाही. तर पुस्तक खरेदी करायला येणाऱ्यांची संख्याही रोडावत गेली. फारच कमी जण फिरकतात हो हल्ली इकडे..  ही सर्रास प्रतिक्रिया.

इथंपर्यंत हा मजकूर वाचणाऱ्यांतल्या एका गटाचे हात एव्हाना शिवशिवू लागले असतील. कधी एकदा समाजमाध्यमात घुसतो आणि हे लिहिणाऱ्याला उभाआडवा घेतो.. असं त्यांना झालं असणार.. ज्यात त्यात राजकारण आणतात म्हणजे काय.. वगैरे प्रश्न एव्हाना त्याच्या मनात तयारही झाले असतील. पण पुस्तक प्रदर्शन आणि घसरती संख्या यांचा संबंध राजकारणाशी नाही.

तो आहे समाजमाध्यमांशी. समाजमाध्यमांचं प्रस्थ जसजसं वाढू लागलं तसतसं ग्रंथप्रेम कमी होऊ लागलं, असं या मेळ्यातल्या काही प्रकाशकांचं निरीक्षण आहे. २०१४ हे वर्ष केवळ यातला एक समान दुवा. या वर्षांपासनं देशात समाजमाध्यमं फोफावली. व्हॉट्सअप विद्यापीठाच्या शाखा घरोघर उघडल्या गेल्या. फेसबुकवर किती लिहू आणि किती नको.. असं अनेकांना व्हायला लागलं आणि याच काळात राजकारण या विषयावर ‘सवासो करोडम् देसवासी’ तज्ज्ञ बनले. व्हॉट्सअपादी माध्यमांत येतं तेच वाङ्मय असं मानणारी एक नवी पिढी उदयाला आली. या माध्यमांत कवीशायरांच्या नावे फिरणाऱ्या खऱ्याखोटय़ा कविता वाचायच्या म्हणजेच रसिकता असं मानलं जाऊ लागलं. गाण्यांचे/संगीताचे जे काही तुकडे या माध्यमांतनं भिरकावले जातात तेच चघळत बसण्याच्या निर्बुद्ध आनंदात अनेकांची ब्रह्मानंदी टाळी लागू लागली आणि फुकट वायफाय कुठे मिळतंय तिथे या रसिकांची गर्दी जमू लागली. या सगळ्याचा मिळून एक परिणाम असा की त्यामुळे मुळातच तोळामोळा असलेलं आपलं वाचनप्रेम अधिकच रोडावलं.

या सगळ्याचा परिणाम हा असा पुस्तक प्रदर्शनावर दिसायला लागलाय. यंदाचा पुस्तकमेळा आज, १२ जानेवारीला संपेल. किती जणांनी त्याला भेट दिली वगैरे तपशील कळेलच यथावकाश. त्यात काही सकारात्मक बदल असेल अशी आशा करू या. दिल्लीत प्रगती मैदानावर भरतो हा पुस्तकमेळा.

समाजमाध्यमांच्या वाढत्या प्रभावामुळे प्रगती मैदानावरची अधोगती काळजी वाढवणारी आहे.

girish.kuber@expressindia.com

@girishkuber

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 12, 2019 12:04 am

Web Title: new delhi world book fair
Next Stories
1 डेस्मंडजी.. देश बदल रहा है!
2 आपलं गुगलीकरण!
3 पोच असलेले आणि पोचलेले
Just Now!
X