News Flash

विद्या परीक्षेन शोभते!

|| गिरीश कुबेर ‘परीक्षा नको’ ही मागणी जरी विद्यार्थ्यांची असली तरी त्यातून समाजाची मानसिकता दिसते. असा समाज जो परीक्षणाला घाबरतो! मुंबई उच्च न्यायालयाचा संताप अगदी

|| गिरीश कुबेर

‘परीक्षा नको’ ही मागणी जरी विद्यार्थ्यांची असली तरी त्यातून समाजाची मानसिकता दिसते. असा समाज जो परीक्षणाला घाबरतो!

मुंबई उच्च न्यायालयाचा संताप अगदी सहज समजून घेता येईल. मध्यंतरी एका इसमाची काही कामासाठी एका स्नेह्यानं ओळख करून दिली. बोलता बोलता परीक्षांचा विषय निघाला. गडी खूश होता. आपल्या पोरांना यंदा परीक्षाच द्यावी लागणार नाही, म्हणून. मला तर हेवा वाटला त्याच्या पाल्याचा. आमच्या पिढीच्या लहानपणी परीक्षेलाच काय पण पेपर मिळायला जरी उशीर झाला तरी घरातल्या छताखाली महायुद्धाचे ढग जमा व्हायला लागायचे. परीक्षा लांबणार असा नुसता वास जरी आला तरी समस्त पालकांना त्या विलंबामागे आपल्या कुलदीपकांचा तर हात नाही ना, असा प्रश्न पडायचा. नशीब त्या वेळी व्हॉटसअ‍ॅप वगैरे नव्हतं. त्यामुळे खातरजमा करण्याच्या हौसेपोटी पालकांना शाळेपर्यंत येऊन समविचारींशी संधान बांधावं लागायचं.

तेव्हा ‘दहावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षांविना उत्तीर्ण करण्याचा सल्ला सरकारला दिला कोणी’ या न्यायमूर्ती महोदयांच्या संतप्त प्रश्नाच्या मुळाशी मिलॉर्डांची शालेय पाठ आणि त्यांच्या पालकांचे हात यांच्यातील संबंधांविषयीची वेदना नसेलच असे नाही. सुखाचा आनंद एखादी गोष्ट आपल्याला मिळण्यात जितका आहे त्यापेक्षा किती तरी अधिक ती इतरांना न मिळण्यात आहे. त्यामुळे या आजच्या पोट्ट्यांना परीक्षांशिवाय वरच्या वर्गात जाता येतं हे पाहिल्यावर अनेकांच्या हृदयात ‘आमच्या वेळी हे असं नव्हतं’ याची उत्स्फूर्त वेदना चमकून गेली असणार. म्हणून न्यायमूर्ती महोदयांच्या मताशी पूर्णपणे सहमती व्यक्त करत काही मुद्द्यांचा विचार करायला हवा.

त्यातला अत्यंत महत्त्वाचा म्हणजे ‘परीक्षा नको’ ही मागणी जरी विद्यार्थ्यांची असली तरी त्यातून समाजाची मानसिकता दिसते. असा समाज जो परीक्षणाला घाबरतो! अगदी वरपासून ते खाली दहावीच्या विद्यार्थ्यांपर्यंत. सर्वांचे प्रयत्न त्यामुळे होता होईल तेवढं परीक्षण कसं लांबवायचं, याचे. ते जमलं तर ठीक. नाही तर मग पुढचे प्रयत्न परीक्षांचं मूल्यमापन कसं ‘मॅनेज’ करता येईल यासाठी. आपल्याला हवं तसं मूल्यमापन झालं तरच मग परीक्षा न्याय्य होती असं म्हणायचं. तसं नसेल तर मग ती यशस्वीरीत्या पार पाडणाऱ्यांनी ती कशी ‘मॅनेज’ केली होती याच्या कहाण्या पसरवायच्या. अशा समाजात अशा वातावरणात सर्वात मोठा बळी जात असतो तो लखलखीत गुणवत्तेचा. यश केवळ कष्टसाध्य नसेल, अन्य घटकांचा त्यात मोठा वाटा असेल तर प्रामाणिक कष्ट करणाऱ्यांचा तो पराभव असतो. मग हे स्वत:कडे केवळ गुणवत्ता आणि ती सिद्ध करण्याचे कष्ट हे भांडवल असलेले आपल्या गुणांचं चीज होईल असं वातावरण शोधायला लागतात. आपल्या देशातून तरुण मोठ्या प्रमाणावर स्थलांतर का करतात… यामागे हे कारण आहे.

पण तरीही आपल्या देशात अजूनही काही गुणवंतांची बेटं टिकून आहेत. त्या बेटावर आपल्याला प्रवेश मिळावा यासाठी अभ्यासमार्गी विद्यार्थी जिवाचं रान करत असतात. या बेटांवर एकदा का प्रवेश मिळाला की आपल्या आयुष्यातला प्रगतीचा मार्ग खुला झाला- असं त्यांना वाटतं. बरोबरच आहे ते म्हणा! पण गंमत म्हणजे या बेटांवरनं थेट ते मग अमेरिका, युरोप वगैरेलाच निघून जातात. असो. तो मुद्दा वेगळा. आता या बेटांचं माहात्म्य पुन्हा जाणवायचं कारण म्हणजे एक ताजी पाहणी. ‘मिंट’ या वर्तमानपत्रानं अलीकडेच एक पाहणी केली आणि त्या निष्कर्षांवर छानसा वृत्तलेख लिहिला.

ही पाहणी आहे स्टार्टअप्सची. हा नवउद्यमींचा काळ आहे. नवनव्या कल्पना, नवनवे व्यवसाय जन्माला येतायत. काही यशस्वी होतायत तर बरेचसे बंद पडतायत. हे होतच असतं. एकविसाव्या शतकाची पहाट होत असताना असं वेबसाइट्सचं वेड आलं होतं. अमुक करणारी वेबसाइट, तमुक देणारी वेबसाइट… नाना तऱ्हा. आता वेबसाइटची जागा या अ‍ॅप्सनी घेतलीये. हे करून देणारं अ‍ॅप, ते करणारं अ‍ॅप… रोजच्या रोज हजारोंनी नाही तरी शेकड्यांनी अशी अ‍ॅप्स येतायत सध्या. त्यातल्या बऱ्याच जणांच्या मुळाशी चार पैसे कमावणाऱ्या व्यवसायविचारांपेक्षा उत्साहच जास्त. त्यामुळे यातली बहुसंख्य अ‍ॅप्स, उद्योग- व्यवसायाच्या मार्गावर मध्येच गळून पडतात.

जे टिकतात आणि किमान १०० कोटी डॉलर्सच्या उलाढालीचा टप्पा गाठतात त्यांना ‘युनिकॉर्न’ म्हटलं जातं. म्हणजे एक्कुलगा किंवा एकांडा शिलेदार या अर्थी. या अशा युनिकॉर्नकडे जगातल्या गुंतवणूकदारांचं लक्ष असतं. कारण एकदा का युनिकॉर्न अशी ओळख झाली की त्यातून अशा कंपन्यांची वाढ-विस्तारक्षमता दिसून येते. काळाच्या प्रवाहात या कंपन्या नफा मिळवू शकतात, हे सिद्ध होतं. तर या वृत्तकथा लेखक/विश्लेषकांनी विविध क्षेत्रांत हा युनिकॉर्नचा दर्जा मिळवलेले १०० नवउद्यमी निवडले. म्हणजे अगदी हॉटेलमध्ये बुकिंग देणाऱ्यांपासून ते हॉटेलांतून घरपोच खाद्यपदार्थ पोहोचवणाऱ्या किंवा संगणकीय वा मोबाइल खेळ खेळू देणाऱ्या अनेक नवउद्यमींचा यात समावेश होता. या अशा ‘यशस्वी’ कंपन्यांची कुंडली या वृत्तलेखात मांडली गेली. तिचे निष्कर्ष महत्त्वाचे आणि बरंच काही सांगून जाणारे आहेत.

उदाहरणार्थ या शंभरातल्या जवळपास तीन चतुर्थांश उद्योजकांत एक धागा समान आहे. तो म्हणजे ते भारतातल्या आयआयटी, आयआयएम किंवा अमेरिकेतल्या हार्वर्ड विद्यापीठात शिकलेले आहेत. ही वर्गवारी मजेशीर म्हणायची. या शंभरातले दहा आहेत दिल्लीच्या आयआयटीतले, त्याखालोखाल नऊ जण हार्वर्ड विद्यापीठातले, मुंबई आणि कानपूर आयआयटीतले प्रत्येकी आठ, बंगलोर आणि अहमदाबाद आयआयएमचे प्रत्येकी सहा, अमेरिकेतलं पेनसिल्वेनिया विद्यापीठ, आपलं बिट्स पिलानी आणि कोलकता आयआयएमचे प्रत्येकी पाच, अमेरिकेतलं कोलंबिया विद्यापीठ, खरगपूरची आयआयटी आणि युरोपातल्या ‘इन्सेड’ विद्यापीठाचे प्रत्येकी तीन अशी ही वर्गवारी. उर्वरित आहेत ते ‘अन्य’. म्हणजे अर्थातच भारतीय विद्यापीठांतले.

या पाहणीतले आणखी काही निष्कर्ष तितकेच महत्त्वाचे आहेत. उदाहरणार्थ या यशस्वी उद्योजकांतले ३८ टक्के हे अभियांत्रिकीचे विद्यार्थी आहेत. त्यातले काही रसायनशास्त्र अभियांत्रिकीचे आहेत, ऊर्जा अभियांत्रिकी शिकणारे आहेत. पण सध्या फॅड म्हणून शिकल्या जाणाऱ्या ‘आयटी’चे- माहिती तंत्रज्ञानाचे- विद्यार्थी यात जास्त आहेत असं काही दिसलेलं नाही. या अभियंत्यांखालोखाल ३७ टक्के हे व्यवसाय व्यवस्थापनाचे पदवीधर आहेत.

आणि मुख्य म्हणजे या सर्व यशस्वींना आपल्या व्यवसायाची स्वप्नं विशीत पडायला लागली. म्हणजे ओयो काढणारा रितेश अगरवाल हा कंपनी काढली त्या वर्षी फक्त २० वर्षांचा होता आणि ‘अनअकॅडमी’ काढणारा गौरव मुंजाळ होता फक्त २४ वर्षांचा. या यशस्वींमधले चक्क १४ उद्योजक पंचविशीच्या आतले आहेत आणि तितकेच २५ ते ३० या वयोगटातले आहेत. चाळिशीनंतर असं काही करू धजलेला फक्त एक आहे.

आता यातली वेदनादायी आणि लाजिरवाणी बाब. ती अशी की स्वत:च्या हिमतीवर असे काही नवउद्योग सुरू करणाऱ्यांत एकही महिला नाही. आणि ज्या दोघा-तिघांनी मिळून एकत्र येऊन असा काही प्रयोग केला त्यातही महिलांचं प्रमाण चार टक्क्यांच्या आतच आहे. घरच्या जबाबदाऱ्यांपासून पुरुष साथीदार/नातलग अशांच्या सहकार्याचा अभाव अशी अनेक कारणं आहेत यामागे. असो.

तात्पर्य : याचा अर्थ सरळ आहे. या आयआयटी, आयआयएम्स, हार्वर्ड वगैरेसारख्या संस्था म्हणजे शंभर नंबरी सोनं जशा. म्हणजे यातले विद्यार्थी परीक्षांना घाबरत नाहीत. किंबहुना या विद्यापीठातलं अधिकृत शिक्षण संपलं तरी जगण्यातल्या आव्हानांना, परीक्षांना ते सातत्यानं सामोरं जात असतात. जगताना अधिकृत परीक्षा नसते. पण रोजच्या रोज आपल्या कामाचं मूल्यमापन होईल असा मार्ग हे विद्यार्थी निवडतात. म्हणजे स्वत:च्या हाताने स्वत:साठी खडतर परीक्षांची व्यवस्था करतात. तेव्हा विद्या विनयेन शोभते यावर विश्वास नसला तरी काही फारसं बिघडत नाही. पण विद्या परीक्षेन शोभते हे मात्र कधी विसरून चालणार नाही.

girish.kuber@expressindia.com

      @girishkuber

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 22, 2021 12:02 am

Web Title: no exams passed without mumbai high court exams akp 94
Next Stories
1 धर्म, देव इत्यादी इत्यादी…
2 फरक!
3 ‘उत्सव’ बहु थोर होत…
Just Now!
X