दोन भिन्न देश. भिन्न भूगोल, भिन्न इतिहास आणि भिन्न वर्तमान असलेले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हे भिन्न देश म्हणजे सौदी अरेबिया आणि रशिया.

आणि त्यांच्यातला समान धागा म्हणजे तेल आणि अमेरिका.

तर यातल्या सौदीचा राजपुत्र महंमद बिन सलमान यानं कसं आपल्याच भाऊबंदांना तुरुंगात टाकलं, देशाची सूत्रं हाती घेण्याचा कसा त्याचा प्रयत्न आहे आणि या सगळ्याला भ्रष्टाचारविरोधी कारवाईचा मुलामा देत आपलं कथित नैतिक श्रेष्ठत्व सिद्ध करण्याचा त्याचा कसा प्रयत्न आहे.. वगैरे वगैरे अलीकडे छापून आलेलंच आहे. ते पुन्हा नव्यानं मांडायचं काही कारण नाही. पण याखेरीज नव्यानं मांडावं असंही बरंच आहे.

यातली सगळ्यात मोठी घडामोड म्हणजे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा जावई जेरेड कुशनेर आणि राजपुत्र महंमद बिन सलमान यांच्यातले अद्याप उघड न झालेले गुप्त संबंध. हा कुशनेर अमेरिकी माध्यमांच्या सतत नजरेखाली आहे. याचं कारण त्याचे उद्योग. अमेरिकी निवडणुकीच्या आधी हा कुशनेर अनेकदा रशियाला भेट देऊन आल्याचं आढळलं. याच कुशनेर याचे अनेक रशियन उद्योगपतींशी लागेबांधे असल्याचं पुढे उघड झालं. या कुशनेर याची पत्नी म्हणजे ट्रम्प यांची कन्या इव्हान्का ही अमेरिकी अध्यक्षांचं अधिकृत निवासस्थानात, म्हणजे व्हाइट हाऊसमध्ये, मोक्याच्या जागेवर आहे. ती वेतन घेत नाही. परंतु ट्रम्प यांच्या अनेक महत्त्वाच्या निर्णयांत तिचा सहभाग असतो. अध्यक्षांची सल्लागार अशासारखं तिचं पद आहे. पण त्या पदाचे अधिकार काय वगैरे काही सुनिश्चित झालेलं नाही. तिचंच स्थान काही नक्की नाही. त्यामुळे तिच्या नवऱ्याचंही नक्की करायचं काय, याचा पूर्ण अंदाज अद्याप अध्यक्षीय कार्यालयाला नाही. अशा परिस्थितीत इव्हान्का आणि कुशनेर हे दोघे या प्रशासनात महत्त्वाची भूमिका बजावताना दिसतात.

तर अशा या अध्यक्षीय जावयानं गेल्या काही महिन्यांत सौदी अरेबियाला तीन भेटी दिल्या. या तीनही दौऱ्यांचा नक्की कार्यक्रम काय होता, याची पूर्ण माहिती नाही. दौरे दाखवताना खासगी असेच दाखवले गेले. पण हे गृहस्थ सौदीत गेल्यावर त्यांना राजाच्या पाहुण्याची वागणूक मिळली. कहर म्हणजे यातला शेवटचा तिसरा दौरा तर शेवटपर्यंत गुप्त राखला गेला. ऑक्टोबरच्या मध्यास हा अध्यक्षीय जावई रियादला जाऊन आला. या दौऱ्याची माहिती तो परत अमेरिकेत आला तेव्हाच दिली गेली. आणि या दौऱ्याचं महत्त्वाचं वैशिष्टय़ म्हणजे या वेळी हा जावई मुक्काम करता झाला तो थेट राजपुत्र सलमान याच्या फार्म हाऊसवर. शेकडो एकरांत पसरलेलं त्याचं हे फार्म हाऊस गुप्तता बाळगायची असते अशांच्या खासगी भेटींसाठीच वापरलं जातं. या दौऱ्यात कुशनेर यांच्या समवेत राजपुत्र सलमान दोन दिवस राहिला. या दोन्हीही दिवशी मध्यरात्रीनंतरही उशिरापर्यंत दोघेही बराच काळ बोलत होते, असाही तपशील उघड झाला आहे.

कुशनेर अमेरिकेत परतला आणि अवघ्या काही दिवसांत सौदी राजपुत्रानं मोठय़ा प्रमाणावर अटकसत्र सुरू केलं. आपल्या सख्ख्या, सावत्र अशा अनेक नातलगांना त्यानं नजरकैदेत ठेवलंय. कुशनेर याच्या सौदी भेटी, त्याचं आणि सौदी राजपुत्राचं वाढत चाललेलं गुळपीट आणि नंतर सौदीत झालेली कारवाई यांचा काही संबंध आहे का, याचा शोध अनेक अभ्यासक घेतायत.

आणि यातील बहुश: सर्वच अभ्यासकांचं मत असं की होय हा संबंध आहे. सौदी राजपुत्रानं तिथं ही कारवाई केली आणि इथं अमेरिकेत अध्यक्ष ट्रम्प यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांनी तिचं त्याक्षणीच स्वागत केलं ही बाबदेखील लक्षणीय असल्याचं अनेक जण दाखवून देतायत. सौदीत कारवाई व्हायला आणि अमेरिकी अध्यक्षांकडनं तिचं स्वागत व्हायला जणू एकच गाठ पडली हा योगायोग दुर्लक्ष करता येण्यासारखा नाही. हा झाला एक भाग.

दुसरा मुद्दा म्हणजे अचानक ही अशी भ्रष्टाचारा विरोधात कारवाई करण्याची उबळ राजपुत्र सलमान याला का यावी? अभ्यासकांच्या मते त्याची कारणं दोन.

एक म्हणजे सौदी सम्राट सलमान यांचं अधिकाधिक गलितगात्र होत जाणं. दोन महिन्यांपूर्वी अध्यक्ष ट्रम्प सौदीत होते त्या वेळी या दोन्ही नेत्यांनी संयुक्त निवेदन वाचून दाखवायचं असं ठरलं होतं. पण ते दोन-तीन परिच्छेदांचं निवेदनही राजे सलमान वाचू शकले नाहीत. ते एखाद्या पुतळ्यासारखे निश्चल होते आणि मध्येच संदर्भहीनही होत होते. त्या वेळी पहिल्यांदा त्यांच्या विकलतेचं दर्शन जगाला झालं. या सौदी सम्राटाला विस्मरणदेखील होऊ लागलंय, अशीही वदंता आहे. सौदी राजघराण्यानं अर्थातच याचा इन्कार केलाय. पण यात तथ्य असावं. कारण राजे सलमान हल्ली कोणत्याही जाहीर कार्यक्रमांना जाईनासे झालेत. तेव्हा वडिलांची प्रकृती आणखीनच खालावायच्या आधी सत्तेवर नियंत्रण मिळवलेलं बरं असा विचार राजपुत्र सलमान यानं केला असणार.

आणि दुसरं कारण म्हणजे सौदी राजघराण्याची आटत चाललेली गंगाजळी. २०१४ सालच्या मध्यापर्यंत सौदी तिजोरीत वट्ट ७३,७००० कोटी डॉलर्सची अगडबंब माया नुसती पडून होती. तेलाचे दर वाढते होते आणि तीत हातपायसुद्धा न हलवता भरच पडत होती. पण २०१४ च्या उत्तरार्धात सगळंच चित्र बदललं. तेलाचे दर कोसळत गेले आणि दौलतजादा करण्यासाठी सौदी राजघराण्यास तिजोरीतल्या श्रीशिलकीस हात लावावा लागला. जगण्याचा या मंडळींचा खर्च इतका प्रचंड की बघता बघता ही तिजोरी आटत गेली. इतकी की आजमितीला त्यातले फक्त ४७,५०० कोटी डॉलर्स तेवढे शिल्लक आहेत. आपली पैसे उडविण्याची गती लक्षात घेतली तर या आहेत त्या रकमेत दोनपाच वर्ष तेवढी निघू शकतील याचा अंदाज सौदी राजपुत्राला आलेला असणारच.

या तिजोरीत धन करण्याचे दोनच मार्ग सौदीसमोर होते आणि आहेत.

एक म्हणजे खनिज तेलाचे भाव पुन्हा कसे वाढतील यासाठी प्रयत्न करायचा. आणि दुसरा मार्ग म्हणजे सौदी राजघराण्यातच दडून बसलेला, दडपून ठेवलेला पैसा बाहेर काढायचा. या दोन्ही मार्गाचं यश एकाच घटकावर अवलंबून. या घटकाचा पाठिंबा नाही मिळाला तर या दोन्हींत अपयशच येण्याची हमी. तेव्हा हा घटक आपल्या बाजूला हवा.

या घटकाचं नाव युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका.

खनिज तेलाचे भाव वाढतील यासाठीही अमेरिकाच प्रयत्न करू शकते आणि देशांतर्गत पैसा बाहेर काढायच्या मार्गातही अमेरिकेचीच मदत होऊ शकते या सत्याची जाणीव राजपुत्र सलमान याला असणारच असणार. ती व्हावी यासाठी काही अभ्यासाचीही गरज नाही. नुसता आपल्याच घराण्याचा इतिहास त्यानं पाहिला तरी पुरे. आता राजा व्हायचंय म्हटल्यावर तेवढं तरी त्यानं नक्कीच केलं असणार.

आता या देशांतील समान धाग्याविषयी.

या दोनही देशांच्या राज्यकर्त्यांचा आधार आहे तेल आणि त्यातनं येणारा पैसा. हा आधार काढून घ्यायला सुरुवात केली अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा यांनी. त्यामुळे रशिया सैरभैर झाला आणि सौदी राजघराणं अस्थिर. २०१६ सालच्या निवडणुकीत ओबामा जाऊन रिपब्लिकन पक्षाचे ट्रम्प आले.

आणि या दोन्हीही देशांना एकदम हायसं वाटेल अशी परिस्थिती तयार होऊ लागली. तेल दराची घसरण थांबली. आणि आता तर ते दर वाढूदेखील लागलेत. आणि त्याबरोबर पुतिन आणि विद्यमान सौदी राजघराणं या दोघांच्या सत्तेचा हलता खुंटा बळकट होत गेला. ट्रम्प सत्तेवर आले आणि अमेरिकेचं रशियाबरोबरचं धोरण सौम्य झालं, या दोन्हीही देशांतले राज्यकर्ते अधिक बलवान झाले आणि मुख्य म्हणजे तेलाचे दरही वाढू लागले. हा योगायोग असेल का?

इतिहास सांगतो तो तसा नसेल. वर्तमानाचं म्हणणंही तसंच आहे. आणि भविष्य समजून घेण्यासाठी त्या जावयाकडे लक्ष ठेवायला हवं. जावयाला दशमग्रह म्हणतात. या दशमग्रहाची दशा इतके दिवस अमेरिकाच अनुभवत होती.

हळूहळू जगालाही ती सहन करावी लागेल.

गिरीश कुबेर

girish.kuber@expressindia.com

Twitter: @girishkuber

मराठीतील सर्व अन्यथा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Relation between mohammad bin salman al saud and jared kushner
First published on: 18-11-2017 at 03:00 IST