ज्याप्रमाणे अमेरिकेची ओसामाला ठार करण्याची कारवाई पाकिस्तानला विश्वासात घेतल्याशिवाय केवळ अशक्य त्याचप्रमाणे आपल्या अणुचाचण्यांची पूर्वकल्पना अमेरिकेला नसणं हे अशक्य.
फक्त हे सिद्ध करण्यात एक उणीव आहे ..

२ मे २०११ या दिवशी अमेरिकेच्या मरिन्स नावानं ओळखल्या जाणाऱ्या विशेष फौजांनी पाकिस्तानातील अबोताबाद इथं एका गूढ घरात अज्ञातवासात राहणाऱ्या ओसामा बिन लादेन याला ठार केलं. मध्यरात्री मूठभर अमेरिकी सनिक दोन हेलिकॉप्टरमधून या परिसरात आले. त्यांनी गच्चीवरनं घरात प्रवेश केला. झटापट झाली आणि त्यातल्या एका मरिननं ओसामाच्या डोक्याचा वेध घेतला. खेळ खलास. अल कायदा नावाची कराल दहशतवादी संघटना स्थापन करणारा ओसामा बिन लादेन एकाच गोळीत मारला गेला. त्यानंतर जाता जाता त्याच्या पाíथवाचीही विल्हेवाट अमेरिकी सनिकांनी लावून टाकली.
हे सगळं झालं आणि मग जगाला कळलं, ओसामा बिन लादेन या जगात नाही. अमेरिकेत वॉिशग्टनला व्हाइट हाऊसमध्ये बसून अध्यक्ष बराक ओबामा, परराष्ट्रमंत्री हिलरी क्लिंटन आणि अन्य ज्येष्ठ उशिरा जागून ही कारवाई पाहत होते. तीवर लक्ष ठेवून होते.
दुसऱ्या दिवशी मग अमेरिकी यंत्रणांनी आपल्या या शौर्याचा आढावा घेतला. ओसामाचा माग कसा काढला? सापडलेली व्यक्ती ओसामाच आहे ही खात्री कशी करून घेतली? मग त्याच्या हत्येची मोहीम आखली कशी? ती किती जोखमीची होती.. पण तरीही आम्ही ती कशी पार पाडली.. अगदी पाकिस्तानलासुद्धा जराही सुगावा लागू न देता आमची हेलिकॉप्टर्स कशी अबोताबादला पोहोचली आणि ओसामाला टिपला.. वगरे. युद्धस्य कथा रम्यच असतात. त्यामुळे हे सगळं वाचणं, ऐकणं अगदी थरारकच होतं त्या वेळी. दोन सिनेमेही त्यावर निघाले नंतर.
त्या वेळी या विषयावर ‘लोकसत्ता’त लिहिताना अमेरिका किती लोणकढी मारतीये, असं रविवारच्या लेखात मी म्हटलं होतं. या विषयाचा त्याआधी चार-पाच र्वष पाठपुरावा करताना अमेरिका, पश्चिम आशियातील अनेक देश आणि पाकिस्तान यांची खरी बाजू समोर आली होती. त्यामुळे ओसामा हा पाकिस्तानात लपून बसलेला नाही. तर पाकिस्ताननं प्रेमानं, हक्कानं त्याचं यजमानपण स्वीकारलेलं आहे. तो पाकिस्तानच्या संमतीशिवाय, त्याच्या सहकार्याशिवाय तिथे असूच शकत नाही अशा स्वरूपाचा युक्तिवाद त्या लेखात होता. त्याचं साधं कारण असं की ओसामा जिथं राहत होता तिथून हाकेच्या अंतरावर पाक लष्कराचा मोठा तळ होता आणि आहेही. तेव्हा पाक लष्कर आणि अल कायदा यांच्यातील मधुर संबंध लक्षात घेता पाक लष्कराला ओसामाचं अस्तित्व माहीतच नाही ही बाब केवळ अशक्य.
आणि दुसरी तशीच अशक्य बाब म्हणजे अमेरिकेनं पाकिस्तान लष्कराला अंधारात ठेवून ओसामाला टिपणं. पहिल्याइतकीच ही दुसरी बाबही सर्वथा अतक्र्य. ती तशी असायला अनेक कारणं आहेत. एक म्हणजे पाकिस्तानचा डोलारा संपूर्णपणे अमेरिकेच्या टेकूवर उभा आहे. हा टेकू अर्थातच अमेरिका काढायची काहीही शक्यता नाही. कारण अमेरिकेला पाकिस्तानची गरज आहे. अपंग, अशक्त असा पाकिस्तान. आणि पाकिस्तानला तर अमेरिकेची गरज आहेच आहे. तेव्हा अमेरिकेवर इतकं अवलंबून असणाऱ्या पाकिस्तानची भीड इतक्या महत्त्वाच्या कारवाईत अमेरिका बाळगेल याची सुतराम शक्यता नाही. तेव्हा पाकिस्तानी लष्करी तळाजवळ राहणाऱ्या ओसामाला ठार करायला जाताना अमेरिकेनं पाक सरकारला न सांगता जाण्याचं काही कारणही नाही.
आणि दुसरं असं की पाकिस्तान अण्वस्त्रसज्ज देश आहे. भारताविषयी एक प्रकारची असूया, भीती आणि शत्रुत्वाची भावना हे पाकिस्तानच्या अस्तित्वाचं प्रयोजन आहे. भारताच्या धोक्याचा बागुलबुवा जिवंत ठेवला नाही तर पाकिस्तानी सत्ताधीश राजकीयदृष्टय़ाही जिवंत राहू शकणार नाही. तेव्हा अशा परिस्थितीत पाकचं हवाईदल २४ तास सजग असतं. या इतक्या सज्ज हवाई दलाला दोन हेलिकॉप्टर थेट रावळिपडीपर्यंत येतात हे कळूच नये, ही बाब केवळ अशक्य आहे. तेव्हा पाकला अमेरिकी हेलिकॉप्टर्स घुसल्याचं कळलंच नाही, असं होऊच शकत नाही.
फक्त इतकंच की आम्ही पाकच्या मदतीनं ही कारवाई केली असं अमेरिका कधीही सांगणार नाही. कारण साधं आहे. पाकिस्तान आणि शेजारच्या वाळवंटी देशातील इस्लामी माथेफिरू पाकिस्तानचा गळा घोटणार हे उघड आहे. तेव्हा तुम्ही येऊन ओसामाचं काय करायचं ते करा, आम्ही कानाडोळा करतो.. अशी ही व्यवस्था असणार, हे समजून घेणं अवघड नव्हतं.
सेम्यूर हर्ष या धडाकेबाज पत्रकारानं नेमकं तेच समजून सांगितलंय. त्याचं ताजं पुस्तक आलंय ‘द कििलग ऑफ ओसामा बिन लादेन’. सेम्यूर हर्ष याच्या पत्रकारितेचा खाक्याच वेगळा आहे. तो एकलकोंडेपणानं काम करतो. िहडतो. अनेकांना भेटतो. स्वत: माहिती घेतो आणि नंतर जे काही लिहितो त्यामुळे अनेकांची ‘सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही,’ अशी अवस्था होते. मग तो मुद्दा अबू घारिबच्या अमानुष अमेरिकी तुरुंगाचा असो, ग्वाटानामो बे असो, बुश यांची युद्धखोरी असो किंवा अगदी आपले मोरारजी देसाई हे अमेरिकेच्या सीआयए या गुप्तहेर यंत्रणेला माहिती पुरवतात असा खळबळजनक वृत्तान्त असो. सेम्यूरला एकही विषय वज्र्य नाही. आणि तो जे काही लिहितो ते खणखणीत बंदा रुपया. फेटाळताच येत नाही ते कोणाला.
त्याचमुळे त्याचा हा ताजा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा ठरतो. सेम्यूरच्या मते अमेरिकेनं ओसामा बिन लादेनवरच्या कारवाईची पूर्ण कल्पना पाकिस्तान सरकारला दिली होती. इतकंच काय पाक लष्कर आणि हवाईदल यांचं अमेरिकेला या कारवाईत उलट सहकार्यच मिळालं. हर्षची ताकद ही की त्या वेळच्या गृहमंत्री हिलरी िक्लटन यांनीही त्याला दुजोरा दिलाय. फक्त यातले अधिक काही तपशील उघड करायला िक्लटनबाई तूर्त तरी नाही म्हणाल्यात. त्यांचंही बरोबर आहे. अमेरिकेच्या अध्यक्षीणबाई होऊ घातल्यात त्या. तेव्हा त्या जरा जपून बोलणारच.
२ मे २०१४ च्याही आधी किमान दोन वेळा ओसामा हा थेट अमेरिकी हवाईदलाच्या टप्प्यात आला होता. पण त्यांनी त्या वेळी ओसामाला सोडला. कारण राजकीय होतं. उपग्रह, ड्रोन आदींच्या मदतीनं गवताच्या गंजीतली सुईही शोधायची क्षमता असलेल्या अमेरिकेला ओसामाचा ठावठिकाणा लागत नाही, ही बाब अज्ञ आणि बालमनांनी विश्वास ठेवण्यापुरतीच. असो.
इथं मुद्दा ओसामा हत्येविषयीचा अंदाज किती बरोबर ठरला हा नाही. तर तो आहे १९९८च्या मे महिन्यात आपल्या इथं पोखरण २ घडलं त्याचा. या पोखरण २च्या अणुचाचण्या आपल्या शास्त्रज्ञांनी अमेरिकी उपग्रहांना चकवून केल्या.. अणुस्फोट अमेरिकेला न कळताच घडवले.. अमेरिकेचे उपग्रह भारताच्या डोक्यावर नसतात त्याच वेळात तिथे अणुस्फोटाची यंत्रसामग्री नेली.. आपले अब्दुल कलाम, अनिल काकोडकर वगरे शास्त्रज्ञही आकाशातल्या उपग्रहांचा डोळा चुकवून पोखरणला पोहोचले आणि अशा तऱ्हेने अमेरिकेला पूर्ण अंधारात ठेवून, फसवून आपण या अणुचाचण्या केल्या असं आपल्याला सांगितलं गेलंय. ते ऐकून अनेकांच्या छात्या त्या वेळी ज्या राष्ट्राभिमानाने फुगल्या त्या अजूनही तशाच आहेत. आता तर त्या अधिकच फुगल्यात.
परंतु ज्याप्रमाणे अमेरिकेची ओसामाला ठार करण्याची कारवाई पाकिस्तानला विश्वासात घेतल्याशिवाय केवळ अशक्य त्याचप्रमाणे आपल्या अणुचाचण्यांची पूर्वकल्पना अमेरिकेला नसणं हे अशक्य.
हे सिद्ध करण्यासाठी उणीव आहे ती सेम्यूर हर्षची आणि ती भरून निघणार असेल तर त्याला स्वीकारणाऱ्या वातावरणाची. देश म्हणून इतका समंजस मोकळेपणा असला तरच म्हणता येतं.. कळवण्यास हर्ष होतो की..

girish.kuber@expressindia.com
twitter : @girishkuber