X

..आपणास शांती देवो!

१४ वर्षांपूर्वी २००४च्या मार्च महिन्यात या दुकानाचे संस्थापक टीएन शानबाग यांची मुलाखत घेतली होती.

कारवार सोडून तो  तरुणपणीच मुंबईत आला व त्याने व्यवसाय सुरू केला.. आणि नंतर जवाहरलाल नेहरू, यशवंतराव चव्हाण, जेआरडी टाटा, अब्दुल कलाम, मनमोहन सिंग, नानी पालखीवाला अशी अनेक उत्तुंग व्यक्तिमत्त्वे त्याच्याकडे येत.. कित्येक पिढय़ांना त्यानं आधार दिला. आता हा आधार कायमचा तुटणार आहे..

लंडनच्या ऐतिहासिक वर्तमानाचं लोभस दर्शन घ्यायचं असेल तर ऑक्सफर्ड स्ट्रीटसारखा रस्ता नाही. टॉटनहॅम कोर्ट किंवा चेंरिग क्रॉस या स्थानकांवर उतरायचं आणि रस्ता संपेपर्यंत निवांत चालत राहायचं. दिवस जातो एक. ऑक्सफर्ड स्ट्रीटला हॉलीवूडचे तारेतारका ते जगातले बडे बडे उद्योगपती शॉिपगला येत असतात. या रस्त्यावर ऐन झगझगाटी महादुकानांच्या रांगेत आहे ‘फॉइल्स’. पुस्तकांचं महादुकान. म्हणजे मॉल. झालंच तर ‘सेलफ्रिजे’सच्या जवळ आणखी एक असं महादुकान आहे ‘डब्ल्यूएच स्मिथ’. तेही पुस्तकांचं. पलीकडे टॉटनहॅम कोर्ट रस्त्यावर ‘वॉटरस्टोन्स’ आहे. तेही पुस्तकांचं महादुकान.

अमेरिकेत न्यूयॉर्कला मॅनहटनच्या कार्यालयीन तोऱ्यात ब्रॉडवेजवळ १२ व्या रस्त्याच्या कोपऱ्यावर आहे स्ट्रॅण्ड हे पुस्तकांचं दुकान. २२ लाख पुस्तकं आहेत या दुकानात विकायला. दोन मजली पुस्तकांचं दुकान. मान वाकडी होऊन थकते, पण पुस्तकं पाहून होतच नाहीत. या दुकानातली पुस्तकं एकापाठोपाठ एक ठेवली तर १८ मल लांबी भरेल त्यांची. मागे एकदा या दुकानावर ‘अन्यथा’त (१८ मलांची ग्रंथयात्रा, १५ ऑक्टोबर २०१६) लिहिलं होतं.

आजही स्ट्रॅण्ड बुक स्टोअरवरच लिहावं लागतंय. पण हे पुस्तकाचं दुकान ऑक्सफर्ड स्ट्रीट किंवा न्यूयॉर्कच्या स्ट्रॅण्डइतकं भाग्यवान नाही. आज लिहावं लागतंय ते स्ट्रॅण्ड अभागी मुंबईतलं आहे. बाकी दोन्हीही ठिकाणच्या पुस्तकांच्या दुकानांत आज किंडल, ईबुक्स वगरेंच्या काळातही गर्दी हटत नाही. मुंबईतल्या दुकानांतही आज गर्दी आहे. पण ही या दुकानातली आजची गर्दी पार्थिवाच्या अंत्यदर्शनाला जमणारी गर्दी आहे. म्हणजे हे दुकान बंद होतंय. एरवी लक्ष्मीपुत्रांसाठी ओळखली जाणारी ही नगरी सरस्वतीशी ज्या काही मार्गानी सलोखा टिकवून होती त्यातलं एक होतं हे स्ट्रॅण्ड. अक्षरांच्या दुनियेत राहू इच्छिणाऱ्या कित्येक पिढय़ांना या स्ट्रॅण्डनं आधार दिला होता. या महिना अखेरपासून हा आधार कायमचा तुटेल. स्ट्रॅण्ड बंद होईल.

साधारण १४ वर्षांपूर्वी २००४च्या मार्च महिन्यात या दुकानाचे संस्थापक टीएन शानबाग यांची मुलाखत घेतली होती. त्या वेळी एका बडय़ा अर्थविषयक नियतकालिकात काम करत होतो. त्याचा बंगाली संपादक मोठा ग्रंथप्रेमी होता. आठवडय़ातनं एखादी तरी चक्कर असायची त्याची स्ट्रॅण्डला. त्यानं बीबीसीवर एकदा खुशवंत सिंग यांना बोलताना ऐकलं. वाचकांच्या व्यक्तिगत गरजा पुरवणारं भारतातलं पहिलं.. आणि बराच काळ.. एकमेव दुकान असं वर्णन केलं होतं स्ट्रॅण्डचं. त्यामुळे शानबागांविषयी त्याला चांगलाच आदर होता. तो एकदा म्हणाला.. या शानबागांची आपण मोठी मुलाखत करू या. ती तू घे.

दुपारी ३-४च्या आसपास स्ट्रॅण्डमध्ये गेलो. शानबाग माहीत होतेच. त्याही दिवशी त्या वयातही कोटटाय वगैरे घालून होते. त्यांना सांगितलं मुलाखत हवी आहे. स्वत:च बाजूची खुर्ची ओढली आणि म्हणाले, लगेच.. विचार काय हवंय ते. खास दक्षिणी अशी कॉफीही आली. मी त्यांना स्मरणरंजनाच्या मार्गावर घेऊन गेलो.. सर्वात ऐतिहासिक अशा काही कोणाच्या भेटी आठवतायत का.. आजोबांच्या चेहऱ्यावरचा उत्साह उजळून निघाला. डोळ्यात चमक दिसायला लागली.. समोरच्याला सहज कळलं असतं यांना काही तरी सुंदर आठवतंय ते.

‘‘एकदा संध्याकाळी नेहरू आले ना या दुकानात. ही ५४/५५ सालची गोष्ट. ते मुंबईत होते कोणत्या तरी कार्यक्रमासाठी. आले संध्याकाळी थेट या दुकानात. काही सांगितलेलं वगैरे नव्हतं आणि तेव्हा काही आतासारखा सुरक्षेचा जामानिमा नसायचा. चांगले तासभर होते. नावं आठवत नाहीत आता वयपरत्वे पण इतकं नक्की आठवतंय की सहा पुस्तकं त्यांनी घेतली. मीच होतो गल्ल्यावर. इतर ग्राहकांना देता तशीच सवलत मलाही देताय ना.. असं त्यांनी विचारलं होतं. मी म्हणालो होतो तुम्हाला न देऊन कसं चालेल..? माझ्या या म्हणण्यावर तेही हसले. तोपर्यंत बाहेर पाचपन्नास जण जमले होते. काचेतनं नेहरूंकडे पाहात होते. त्यानंतर ते जवळपास दरवर्षी यायचे. एकदा त्यांच्याकडे पुस्तकांची यादी होती. मी ती ठेवून घेतली आणि पुढच्या महिन्यात दिल्लीत गेलो तेव्हा त्यांना भेटून ती पुस्तकं मी त्यांच्या हवाली केली. किती खूश झाले होते ते ती पुस्तकं पाहून. त्यांना वाटलं नव्हतं मी स्वत: येईन. त्यांनी ते तसं बोलून दाखवलं. तेव्हा मी त्यांना म्हणालो.. अहो तुम्ही राज्यकत्रे आहात. तुमची ज्ञानप्राप्तीची आस भागवणं हे आमच्यासारख्यांचं कर्तव्यच आहे. पण फक्त नेहरूच नाही. टीटीके (कृष्णाम्माचारी) देखील नेहमी यायचे. अर्थमंत्री होते तेव्हाही यायचे. पण मुंदडा प्रकरणात राजीनामा द्यावा लागला त्यानंतरही कधी मुंबईत आले की हमखास यायचे. महाराष्ट्रातले म्हणाल तर यशवंतराव (चव्हाण) हे माझे नियमित ग्राहक. बऱ्याचदा आठवडय़ाच्या सुरुवातीला त्यांचा फोन/निरोप यायचा. मी अमुक दिवशी येईन..  ही ही पुस्तकं काढून ठेवा. अफाट वाचन असायचं त्यांचं. आले की पुस्तकांविषयीच गप्पा असायच्या त्यांच्या. मी माझ्या परीनं त्यांना सुचवायचो नवीन काय काय आलंय ते. आवर्जून ते जाणून घ्यायचे. जेआरडी (टाटा) हे माझ्या नेहमीच्या गिऱ्हाईकातले आवडते. कसला साधा माणूस सांगू तुम्हाला. पुस्तकाची थली गाडीत ठेवायला म्हणून नोकर घ्यायचा तर तसं करू नाही द्यायचे. नव्या पिढीतल्यांपैकी नियमित येणारे म्हणजे नारायण मूर्ती आणि अझीम प्रेमजी. सोली सोराबजी, नानी पालखीवाला हे सुद्धा असेच नेहमीचे. दोघेही भयंकर चोखंदळ. एपीजे अब्दुल कलामदेखील तीन-चार वेळा येऊन गेलेत दुकानात. अर्थात राष्ट्रपती झाल्यानंतर नाही. पण आधी. माझ्या नेहमीच्या गिऱ्हाईकातले त्यामुळे माझ्या उत्तम परिचयाचे म्हणजे मनमोहन सिंग. इथे रिझव्‍‌र्ह बँकेत ते गव्हर्नर होते तेव्हा आठवडय़ातनं एकदा तरी ते यायचेच. त्यांची वेळ म्हणजे उशिराची. दुकान बंद होतानाची. येताना गाडीत कोट काढून ठेवायचे आणि बाह्य़ा दुमडून निवांतपणे पुस्तकं चाळत बसायचे ते. बऱ्याचदा पुढच्या वेळेला येईन ती तेव्हा अमुक अमुक पुस्तकं हवी आहेत असं सांगून जायचे. आणि गंमत म्हणजे बरोबर त्या दिवशी यायचेच यायचे. सांगून ठेवलेली पुस्तकं मिळाली आहेत हे सांगेपर्यंत त्यांच्या चेहऱ्यावर एक प्रकारचा तणाव दिसायचा. ती बघितली की त्यांच्या चेहऱ्यावर हलकंसं हसू उमटायचं. मग पुन्हा नवीन पुस्तकांचा शोध सुरू..’’.

शानबाग उत्साहानं बोलतच होते. आवश्यक तेवढं हाती लागल्यावर मग नुसत्या गप्पा सुरू झाल्या. आईवडील कसे अशिक्षित होते, कारवार सोडून मुंबईत कसं यावं लागलं, मोलमजुरी करत करत शिक्षण कसं पूर्ण केलं, एका ब्रिटिश अधिकाऱ्याला पहिलं पुस्तक कसं विकलं.. वगैरे वगैरे.

त्यानंतर जेव्हा जेव्हा त्या दुकानात गेलो तेव्हा शानबाग छापून आलेल्या मुलाखतीचं कात्रण दाखवत. तिथल्या एका छोटय़ा िभतीवर प्लॅस्टिकच्या आवरणात ते कापून लावलेलं होतं. आपल्या कारवारी सुरात ते आसपासच्यांना सांगायचे, याने घेतलीये ही मुलाखत. पुढच्याच वर्षी त्यांना सांगितलं, तेलावर पुस्तक लिहायला घेतोय. कोण आनंद झाला त्यांना. मग तेलावर काहीही नवं पुस्तक आलं की शानबागांचा हमखास फोन असायचा. त्यानंतर पाचेक वर्षांनी शानबाग गेले. दुकानात नंतरही जाणं-येणं असायचंच. अ‍ॅमेझॉन वगैरे कितीही सोयीचं असलं तरी पुस्तकाच्या दुकानात जाण्याचा जो काही शारीर आनंद आहे त्याला तोड नाहीच.

आता या दुकानापुरतं तरी त्या आनंदाला मुकावं लागणार.

अलीकडेच बातमी वाचली पुस्तकांना योग्य स्थळ मिळावं यासाठी न्यूयॉर्कच्या स्ट्रॅण्ड मालकांची तिसरी पिढीही तितक्याच उत्साहानं, निगुतीनं आणि निष्ठेनं पुढे आलीये.

मुंबईतलं स्ट्रॅण्ड बंद होणार आहे आता. ईश्वर आपणास शांती देवो!

गिरीश कुबेर girish.kuber@expressindia.com

@girishkuber