बोरीस येल्तसिन हे रशियाचे अध्यक्ष असताना एका आक्षेपार्ह सीडीचे प्रकरण खूप गाजले होते.  हा सीडी उद्योग नक्की केला कोणी, याचे शोधकार्य हाती घेतल्यानंतर अखेर तो एकाच नावापाशी येऊन थांबत होता. सगळ्यांची खात्री पटली याच व्यक्तीनं हा उद्योग केलाय..

पुढच्या शुक्रवारी २० जानेवारीला अमेरिकेत नवे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सत्तासूत्रं स्वीकारतील. या महत्त्वाच्या घटनेला अवघा आठवडा असताना एक भयंकर प्रकरण तिकडे उजेडात आलंय. डोनाल्ड ट्रम्प यांची अत्यंत आक्षेपार्ह म्हणता येईल अशी ध्वनिचित्रफीत रशियाकडे आहे अशी बातमी फुटलीये.

untitled-23

untitled-23-copy

रशियाच्या दौऱ्यावर बराक आणि मिशेल ओबामा ज्या हॉटेलच्या कक्षात राहिले होते त्याच कक्षात राहण्याचा आग्रह पुढे रशियात आले असताना डोनाल्ड ट्रम्प यांनी धरला आणि तिथं राहायची संधी मिळाल्यावर बराक आणि मिशेल ज्या शयनगृहात राहिले होते तिथेच काही वेश्यांना घेऊन नको ते उद्योग केले, अशी वदंता आहे. रशियाच्या हेरांनी या सगळ्याचं म्हणे गुप्त कॅमेऱ्यानं चित्रण केलं आणि अमेरिकी यंत्रणांच्या ते हाती पडेल अशी व्यवस्था केली. हीच ध्वनिचित्रफीत उघड करण्याची भीती दाखवत रशियन अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी ट्रम्प यांना आपल्याशी दोस्ताना करायला भाग पाडलं, असं बोललं जातंय.

बुधवारच्या पत्रकार परिषदेत काही वार्ताहरांनी त्यांना याबाबत छेडलं असता, ट्रम्प त्यांच्यावरच डाफरले. तुम्ही खोटारडे आहात, तुम्ही पीत पत्रकारिता करता वगैरे टीका त्यांनी केली वार्ताहरांवर. (ट्रम्प यांचा अजून भारत सरकारशी अधिकृत संबंध आलेला नाही. अन्यथा त्यांचा प्रेस्टिटय़ूट या शब्दाशी परिचय झाला असता. असो.) बीबीसीलाही त्यांनी नाही सोडलं. होतं कधी कधी असं. किंवा खरं तर बहुमताची हवा डोक्यात गेली  की असं होणं नैसर्गिकच असतं म्हणा. असो. मुद्दा तो नाही. तर रशियाचा आहे.

गोष्ट आहे १९९९ सालच्या जानेवारीतली. तत्कालीन अध्यक्ष बोरीस येल्तसिन यांच्या राजवटीचे तीनतेरा वाजले होते. कम्युनिस्ट पक्षाचे प्रिमाकोव्ह त्यांना आव्हान देतील अशी परिस्थिती तयार होत होती. त्या वेळी येल्तसिन यांच्यावर एका स्विस कंपनीकडून लाच घेतल्याचा आरोप होता. त्याच्या चौकशीची मागणी प्रिमाकोव्ह लावून धरत होते. या चौकशीत महत्त्वाची साक्ष होणार होती ती क्रेमलिनचे चीफ ऑफ स्टाफ, रशियाचे प्रोसिक्युटर जनरल युरी स्कुरातोव्ह यांची. त्यांच्या साक्षीच्या आदल्या दिवशी येल्तसिन यांनी त्यांना क्रेमलिनमध्ये बोलावून घेतलं. ते आल्यावर म्हणाले, ही व्यक्ती जरा बघ रे तुझ्यासारखी दिसते का ते..? असं म्हणून त्यांनी टीव्ही लावला. पडद्यावर स्कुरातोव्ह आणि दोन वेश्या यांच्यातल्या व्यवहाराचं चित्रण होतं. त्या रेकॉर्डिगची ती ध्वनिचित्रफीत होती. ती पाहिल्यावर येल्तसिन त्यांना म्हणाले.. राजीनामा दे.

येल्तसिन यांची भ्रष्टाचार चौकशी ऐन मध्यात असताना स्कुरातोव्ह यांचा राजीनामा घेण्याचा प्रयत्न झाला. पण खमके स्कुरातोव्ह बधायला तयार नव्हते. त्यांना माहिती होतं वेश्यांबरोबरच्या चित्रणात आपण नाही ते. पण त्यावर काही कोणी विश्वास ठेवण्याची शक्यता नव्हती. त्यांना राजीनामा द्यावा लागेल की काय अशी परिस्थिती होती. पण इतक्या उच्चपदस्थाने राजीनामा दिलाच तर तो प्रतिनिधी सभागृहाच्या समितीनेही मंजूर करायचा असतो. ज्या वेळी या समितीसमोर हा मुद्दा येणार होता त्या दिवशी सकाळपासून विविध रशियन टीव्ही वाहिन्यांवर स्कुरातोव्ह यांची ती ध्वनिचित्रफीत दाखवली जात होती. इतके दिवस ती येल्तसिन यांच्याकडे होती. त्यांनी ती आता उघड केली.

स्कुरातोव्ह खमके होते. ते जराही डगमगले नाहीत. जणू काही घडलंच नाही इतके ते शांत होते. इतरांप्रमाणेच त्यांनी ती ध्वनिचित्रफीत पाहिली. तसेच ते कार्यालयात जायला निघाले. ते बधत नाहीयेत हे दिसल्यावर दिवसभर ती अत्यंत आक्षेपार्ह अशी ध्वनिचित्रफीत रशियन टीव्हींवर दाखवली गेली.

स्कुरातोव्ह यांच्या बाजूनं अनेक राजकीय पक्ष उभे राहिले. येल्तसिन यांच्या विरोधकांचा सगळ्यांचाच पाठिंबा त्यांना मिळू लागला. त्यातूनच या सगळ्यांचा प्रयत्न सुरू झाला, हा उद्योग नक्की केला कोणी, हे शोधण्याचा. त्यासाठी अनौपचारिकपणे सरकारातील काहींची मदत मिळाली. हा सर्व शोध एकाच नावापाशी येऊन थांबत होता. सगळ्यांची खात्री पटली याच व्यक्तीनं हा उद्योग केलाय.

व्लादिमीर पुतिन हे या व्यक्तीचं नावं. एफएसबी म्हणजे रशियाच्या केजीबीचा नवा अवतार असलेल्या सुरक्षा यंत्रणेचे पुतिन प्रमुख होते त्या वेळी. आणि मुख्य म्हणजे त्यांच्या राजकीय अपेक्षा जाग्या व्हायला लागल्या होत्या. येल्तसिन यांनाही नाही तरी उत्तराधिकारी हवाच होता. पुतिन कायावाचामने येल्तसिन यांना हवं ते करत होते. त्याची फळं मिळाली. त्याच वर्षांच्या अखेरच्या दिवशी, म्हणजे ३१ डिसेंबरला, येल्तसिन यांनी पुतिन यांची अध्यक्षपदी नियुक्ती केली.

स्कुरातोव्ह यांना गप्प करण्यासाठी वापरलेल्या मार्गाचं महत्त्व गुप्तहेर खात्याचा प्रमुख या नात्यानं पुतिन यांच्या मनात ठसलं होतंच. त्यातूनच अगदी अलीकडे असे दोन प्रकार घडले.

क्रेमलिनमधल्या तरुणांचा असा एक गट आहे. नाशी नावाचा. यांनी २०१० च्या अखेरीस एक सीडी प्रसृत केली. या संपूर्ण सीडीभर एकच एक दृश्य. पुतिन यांचे विरोधक राजकारणी, त्यांच्यावर टीका करणारे संपादक, काही चळवळे नोकरशहा.. असे सगळे. या सगळ्यांबरोबर एकच वेश्या. मुमु नावाची. या सीडीतल्या प्रत्येकाला ती गटवते, एकाच इमारतीतल्या एका विशिष्ट घरात घेऊन जाते.. आणि पुढे तेच ते. प्रत्येकाबरोबर हेच. तीच वेश्या. तीच इमारत, तेच घर आणि तेच ते. यात एक प्रहसनकारसुद्धा होता. तो एकपात्री प्रयोगात पुतिन यांची नक्कल आणि टिंगल करायचा. तो वयानं बराच मोठा. सत्तरीच्या घरातला. पण त्यालासुद्धा ही मुमु त्याच इमारतीत त्याच घरात नेऊन तेच ते करू पाहते. आणि वयामुळे आलेल्या ओशाळपणानं हा अभिनेता तिला ‘या’ सेवेबद्दल धन्यवाद देत राहातो. ही सीडी प्रसृत झाली आणि एकच खळबळ उडाली. अर्थात पुतिन यांच्या विरोधातली प्रहसनं वगैरे बंद झाली, हे सांगायला नकोच.

हे सगळं निवडणुकांच्या तोंडावर बाहेर आलं, ही बाब सूचक.

गेल्या वर्षी असाच आणखी एक प्रकार घडला. २०१६ साली रशियात डय़ुमाच्या.. म्हणजे त्या देशाच्या प्रतिनिधीसभेच्या.. निवडणुका होत्या. या निवडणुका पुतिन समर्थकांनी जिंकल्या हे आता आपल्याला माहितीये. पण त्याआधी निवडणुकांचा हंगाम ऐन भरात येत असताना तिकडे पुतिन यांच्याविरोधात विरोधकांना एकत्र आणण्याचा प्रयत्न झाला. मिखाइल कास्यानोव्ह त्यासाठी खूप सक्रिय होते. ते माजी पंतप्रधान. म्हणजे त्या नात्यानंही त्यांना असं एक वजन होतं. त्यामुळे पुतिन यांच्याविरोधात सगळ्यांनी एकत्र यायला हवं तरच आपली डाळ कशी तरी शिजू शकेल, हा त्यांचा मुद्दा अनेकांना पटू लागला होता. कास्यानोव्ह यांच्या प्रयत्नांमुळे ही युती प्रत्यक्षात येईल अशी परिस्थिती निर्माण झाली.

आणि बरोबर त्यांची अशी एक सीडी प्रसृत झाली. तीत कास्यानोव्ह एका राजकीय कार्यकर्तीबरोबर छान रममाण होताना दिसले. या बाबतीत कास्यानोव्ह यांच्या या उद्योगाच्या बरोबरीनं ते आणि त्यांच्याबरोबरची स्त्री यांच्यातल्या गप्पांचा विषयही महत्त्वाचा होता. या गप्पांत कास्यानोव्ह अन्य राजकीय पक्षांच्या नेत्यांची यथेच्छ टिंगल करत होते.

साहजिकच विरोधकांची युती झाली नाही आणि पुतिनसमर्थक मोठय़ा बहुमतानं निवडून आले. रशियात या उद्योगाला सरकारी पातळीवर एक नाव आहे. कोम्प्रोमात. म्हणजे एखाद्याला ब्लॅकमेल करता येईल अशा अवस्थेत पकडणं.

अमेरिकेचे भावी अध्यक्ष या कोम्प्रोमात कारस्थानाला बळी पडलेत असं म्हणतात. या दोघांचं वर्तमान आणि इतिहास लक्षात घेता असं काही झालंच नसेल याची ग्वाही देणं अंमळ अवघडच आहे. पण जगाला या कोम्प्रोमातची काय किंमत द्यावी लागणार आहे, हाच काय तो प्रश्न आहे.

 

गिरीश कुबेर

girish.kuber@expressindia.com

@girishkuber