यंत्रमानव, कृत्रिम बुद्धिमत्ता, स्वयंचलीकरण अशा वेगवेगळ्या कारणांमुळे मानवी मजुरांची गरज आता झपाटय़ानं कमी होतीये. याचा सोपा अर्थ नोकऱ्या आता हळूहळू कमी होतायत.

मग रोजगारांचं काय?

Home alone safety tips
मुलांना घरी एकटे ठेवण्याशिवाय पर्याय नाही? नोकरी करणाऱ्या पालकांनी मुलांना शिकव्यात ४ महत्त्वाच्या गोष्टी
chinese company spending huge amount on shameless sales training skills for employees
“तुम्ही जितके निर्लज्ज व्हाल तितका तुमचा पगार वाढेल”, ‘ही’ कंपनी कर्मचाऱ्यांना देत आहे निर्लज्ज होण्याचे प्रशिक्षण
Danger from electric wires on footpaths Inexcusable negligence of the Municipal Corporation after entrusting the work to the contractors navi Mumbai
पदपथांवरील विद्युत तारांमुळे धोका; कंत्राटदारांकडे काम सोपवल्यावर महापालिकेचे अक्षम्य दुर्लक्ष
meetings between ola uber companies and cab drivers
ओला, उबरचा तिढा सुटेना! कॅबचालक भाडेवाढीच्या मागणीवर ठाम; जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीकडे लक्ष

आपल्याकडे शहरात राहणाऱ्यांना उबर हा काय प्रकार आहे, हे माहीत असेल. शक्यता अशीही आहे की त्यांनी उबरची सेवा कधी ना कधी वापरली असेल. त्यातील बऱ्याच जणांना हेही माहीत असेल की उबर ही जगातली सगळ्यात मोठी वाहतूक सेवा देणारी कंपनी आहे.

पण यातल्या अनेकांना हे निश्चित माहीत नसेल की जगातल्या या सगळ्यात मोठय़ा प्रवासी वाहतूक सेवा कंपनीच्या मालकीची एकही मोटार नाही. सर्वात मोठी वाहतूक सेवा कंपनी आणि तरी एकही मोटार मालकीची नाही?

ही २००८ सालची गोष्ट. ट्रेविस कलानिक आणि गॅरेट कँप हे दोघे पॅरिसमध्ये होते. संध्याकाळी काही भेटीगाठी होत्या दोघांच्या. मग जेवण. ते सगळं करून हॉटेलवर जायला ते निघाले तर टॅक्सीच मिळेना. बराच वेळ झाला. अशा रखडंपट्टीनंतर टॅक्सीवाला नामक जमातीचा जो काही आपल्याला राग येतो, तसा तो त्यांनाही आला. पण दोष टॅक्सीवाल्यांचा नव्हता तसा. हे दोघे ज्या भागात होते त्या भागात मुळातच टॅक्सी कमी येत होत्या. त्यामुळे तर यांची चिडचिड अधिकच वाढली. आपली होते तशीच.

पण आपल्यात आणि त्यांच्यात फरक हा की त्यांनी विचार केला, आपण असं काही तंत्रज्ञान विकसित करायला हवं की कोणाला कधी टॅक्सीची वाट पाहायला लागू नये.

त्यांनी ते केलं. हा काळ मोबाइल्सच्या अ‍ॅप्सच्या जन्माचा. यांनी टॅक्सी सेवेसाठी वापरता येईल असं अ‍ॅप जन्माला घातलं. ते हे उबर (उबर म्हणजे सर्वोत्तम.). कशी असते ही सेवा..

ही सेवा मोटार मालक/चालकांना बांधून घेते. मोटारीची मालकी इतरांकडेच. ती ठेवून या मोटार मालक/चालकांनी उबरला कळवायचं, आम्ही टॅक्सी सेवा द्यायला तयार आहोत. त्यानंतर जो काही करारमदार व्हायचा तो होतो आणि ही मोटार अन्य मोटारींप्रमाणे टॅक्सीच्या ताफ्यात येते. एका बाजूला हा असा टॅक्स्यांचा ताफा. आणि दुसरीकडे आपण. हातातल्या फोनमधल्या उबर अ‍ॅपच्या मदतीनं टॅक्सीला बोलावणारे. हे अ‍ॅप आसपास कोणत्या टॅक्स्या उपलब्ध आहेत ते शोधतं आणि सगळ्यात जवळच्या टॅक्सीवाल्याला निरोप जातो.. गिऱ्हाईक अमुक अमुक ठिकाणी आहे. तो टॅक्सीवाला मग आपल्याशी संपर्क साधतो आणि रस्त्यावर टॅक्सी-रिक्षावाल्यांना येतोस का रे.. येतोस का रे.. असं न विचारावं लागता आपल्या दारात टॅक्सी येऊन उभी राहते. परत त्या टॅक्सीवाल्याला पसेही रोखीनं द्यायची गरज नसते. बँकेतनं किंवा क्रेडिट कार्डावरनं परस्पर द्यायचीही सोय आहेच.

टॅक्सी मिळणं इतकं सोपं करून दिल्यानंतर उबर लोकप्रिय न होती तरच नवल. बघता बघता जगातली ती सगळ्यात मोठी वाहतूक सेवा कंपनी बनली. तेही एकसुद्धा मोटार विकत न घेता. पण या उबरची गोष्ट सांगणं हा काही इथं उद्देश नाही.गोष्ट सांगायचीये ती जगात झपाटय़ानं सुरू झालेल्या उबरीकरणाची.

उबरीकरण म्हणजे काय?

समजा तुम्ही नव्या कोणत्या गावात आहात आणि तुम्हाला ताप आलाय. हातातल्या स्मार्ट फोनवरच्या अ‍ॅपवर तुम्ही तसा निरोप पाठवता आणि पाठोपाठ लगेच तुम्हाला डॉक्टरचा फोन येतो.. तीन मिनिटांवर मी आहे, पोहोचतो.

किंवा तुमच्या घरातला वीजप्रवाह अचानक बंद पडलाय. तुम्ही तेच करता.. अ‍ॅपवर संदेश आणि लगेच तंत्रज्ञाचा निरोप.. मी पोहोचतो.

किंवा दौऱ्यात एका गावात पोहोचलात. विमानातनं किंवा रेल्वेतनं बाहेर पडता पडता हातातल्या मोबाइलच्या अ‍ॅपवर तुम्ही हॉटेलांची चौकशी करता, किती महाग स्वस्त वगरे हवंय तो तपशील भरता.. आणि थोडय़ाच वेळात हॉटेलचा प्रतिनिधी तुम्हाला घ्यायला हजर..

किंवा घरातला किराणा संपलाय.. किंवा गळणारा नळ दुरुस्त करायचाय.. किंवा घरचा लॅपटॉप बिघडलाय.. किंवा घरकामाला बाई हवी आहे.. किंवा.. बँकेत निधी ठेवायचाय.. किंवा गणिताची शिकवणी लावायचीये.. असं आणि या प्रकारचं काहीही.

ज्या तंत्रानं आणि पद्धतीनं आपल्याला टॅक्सी उपलब्ध करून दिली त्याच तंत्रानं आपल्या अन्य गरजाही भागवल्या जाणं म्हणजे उबरीकरण. जे तंत्रज्ञान टॅक्सी मिळवून देण्यासाठी वापरलं जातं तेच तंत्रज्ञान डॉक्टर, प्लम्बर, इलेक्ट्रिशियन, वाणी, संगणक दुरुस्ती करणारे, हॉटेलवाले.. किंवा कोणतीही अन्य सेवा पुरवणाऱ्यांसाठी वापरणं म्हणजे उबरीकरण. सर्व सेवा देणारे जणू ड्रायव्हर आहेत असं समजून ड्रायव्हरांशी उबर जसा संपर्क साधते तसा अन्य सेवा देणाऱ्यांशी या व्यवस्थेत संपर्क साधला जातो. हे असं होणं म्हणजे उबरीकरण.

ही कविकल्पना नाही. प्रत्यक्षात उतरू लागलेली व्यवस्था आहे. आपल्याला याचा अंदाज नाही. पण बँकिंग ते माहिती तंत्रज्ञान ते अन्य कोणत्याही क्षेत्रात आज चर्चा आहे ती उबरीकरणाची. यंत्रमानव, कृत्रिम बुद्धिमत्ता, स्वयंचलीकरण अशा वेगवेगळ्या कारणांमुळे मानवी मजुरांची गरज आता झपाटय़ानं कमी होतीये. याचा सोपा अर्थ नोकऱ्या आता हळूहळू कमी होतायत. मग रोजगारांचं काय?

त्यावर हा उबरीकरण हा मार्ग आहे, असं अनेक तज्ज्ञांचं मत आहे. या पुढच्या काळात मोठी वाढ होईल ती फक्त  सेवा क्षेत्राची. सेवा देऊ इच्छिणाऱ्यांप्रमाणे सेवा घेऊ इच्छिणाऱ्यांची संख्या इतकी लक्षणीयरीत्या वाढतीये की जे काही भवितव्य आहे ते फक्त सेवा क्षेत्रालाच. त्यामुळे या क्षेत्रातले शहाणे या उबरीकरणाच्या तयारीला लागलेत.

यावर नेहमीप्रमाणे आपल्याकडचे काही, हे काय तिकडे अमेरिकेत वगरे ठीकाय.. अशा छापाची प्रतिक्रिया देतील. या अशा प्रतिक्रियांचा काळ आता खरं तर मागं पडलाय. कारण अमेरिकेत जे काही होतं ते काही दिवसांत.. वर्षांत वा महिन्यांत नाही.. आपल्याकडे होऊ लागतं. उबर हेच याचं ताजं उदाहरण. आपल्याकडे कोणाला खरं तरी वाटलं असतं का कुठेही जायचं तरी नाही न म्हणणारा, गिऱ्हाईकाला उडवून लावण्यातच धन्यता मानणारा असा कोणी टॅक्सीवाला आपल्याला पाहायला मिळेल? उबरमुळे हे शक्य झालं. ज्या झपाटय़ानं उबर पसरली त्याकडे पाहून अनेक भविष्यवेधी अभ्यासक हे सर्व सेवांच्या उबरीकरणाची चर्चा करायला लागलेत. न्यूयॉर्क विद्यापीठातला प्राध्यापक, द शेअरिंग इकॉनॉमी या पुस्तकाचा लेखक अरुण सुंदरराजन यानं तर दाखवून दिलंय, १९०० साली अमेरिकेत स्वरोजगारीत असलेले जितके लोक होते तितकेच आताही या क्षेत्राकडे येऊ पाहताहेत. म्हणजे तेव्हाही नोकरी करणाऱ्यांपेक्षा अशा स्वावलंबींची संख्या जास्त होती आणि आताही ती वाढायला लागलीये. सरकार, बहुराष्ट्रीय कंपन्या किंवा एखादा खासगी उद्योजक वगरे ठिकाणी चाकरी करून त्या कंपन्या वा सरकारच्या नफ्यात भर घालण्यापेक्षा आपण स्वत:च स्वत:चा रोजगार का सुरू करू नये, हा या मागचा विचार.

तो प्रत्यक्षात आणायचा सहज मार्ग उबर या कंपनीनं दाखवला. म्हणून हे उबरीकरण. आपल्या नकळत गुगल हे जसं क्रियापद बनलं तसंच कळणारही नाही आपल्याला आपलं उबरीकरण कसं आणि कधी झालं ते. मग आपल्यालाही निरोपाला उत्तर द्यावं लागेल.. मी उपलब्ध आहे.. तीन मिनिटांत पोहोचतो..

 

– गिरीश कुबेर

girish.kuber@expressindia.com

 twitter : @girishkuber