12 July 2020

News Flash

जरा सा ‘झूम’ लूं मैं..

आज एरिक युआन अमेरिकेतल्या काही बलाढय़ आणि धनाढय़ उद्योगपतींत गणला जातो.

गिरीश कुबेर girish.kuber@expressindia.com

@girishkuber

स्टीव्ह जॉब्स, एलॉन मस्क, सर्जी ब्रिन, जेन्सन हुआंग या आणि अशा साऱ्यांत आणि एरिक युआन यांच्यात एक समान धागा म्हणजे हे सगळे स्थलांतरित आहेत.. यांपैकी एरिक आत्ता- करोना आणि टाळेबंदीच्या काळात- यशाच्या शिखरावर आहेच आणि एका नव्या वादळातही सापडला आहे..

‘‘संकटांत डगमगू नये. प्रत्येक संकटात एक आव्हान असते आणि प्रत्येक आव्हानात एक संधी’’ – इति कोणीही भारतीय.

हे वाक्य प्रत्येक भारतीयाने किती वेळा ऐकले असेल त्याची गणतीच नसेल. पण किती भारतीयांना या आव्हानांचं रूपांतर संधीत करता आलं असेल याची मोजदाद करायला मात्र हाताची बोटंही पुरतील. म्हणजे परिस्थितीवशात कुरडया/पापडय़ा कराव्या लागल्यानं बनलेले/बनलेल्या गृहोद्योगी वा गृहोद्योगिनी यांच्याबाबत हे खरं असेलही. पण देश म्हणून समोरच्या आव्हानांचं रूपांतर भारतीयांनी संधीत केलंय आणि संधीचं सोनं केलंय.. अशी उदाहरणं किती हा प्रश्न आहे.

उदाहरणार्थ सध्याचंच हे करोना आव्हान.

या काळात जगभरात जवळपास प्रत्येकाच्या तोंडी असलेला एक शब्द म्हणजे झूम. मग तो उद्योगपती असो, मंत्री/मुख्यमंत्री असो, वार्ताहर/ संपादक/ बँकर/ कारकून किंवा सुखासीन निवृत्त गृहस्थ असो. झूम त्याला माहीत नाही असं असणार नाही. ‘झूम करू या’ किंवा ‘झूमवर भेटू’ आणि ‘झूम कॉन्फरन्स’ हे आजचे टाळेबंदीच्या काळातले परवलीचे शब्द. यातल्या प्रत्येकाच्या मोबाइल/लॅपटॉपमध्ये झूम अ‍ॅप डाऊनलोड केलेलं असतंच असतं. आता तर आपल्याकडे सर्वोच्च आणि उच्च न्यायालयंदेखील या झूमच्या माध्यमातनं खटले ऐकायला लागलीयेत.

आणि दोनच दिवसांपूर्वी बातमी आली : झूम हे भारतातलं सर्वाधिक डाऊनलोड झालेलं अ‍ॅप आहे आणि जगात कित्येक कोटी लोकांकडून सध्या या टाळेबंदीच्या काळात त्याचा वापर केला जातोय. संकटातलं आव्हान आणि आव्हानातली संधी म्हणतात ती ही.

एरिक युआन यानं ती बरोब्बर साधली.

एरिक जन्मानं चिनी. तिथल्या शांडोंग प्रांतातल्या खाण कामगाराच्या पोटी त्याचा जन्म. सत्तर सालातला. म्हणजे आता तो जेमतेम पन्नाशीत आहे. शिकला चीनमध्येच. तिसऱ्या जगातल्या (त्या वेळी चीन आणि आपण एकाच पंगतीत होतो.) प्रत्येक कळत्या मुलास अभियंता आणि मुलीस (आणि त्यांच्या पालकांनाही) वैद्यक व्हावं अशी दोनच स्वप्नं पडायची. एरिकच्या बाबतही तेच होतं. त्याप्रमाणे तो चीनमध्येच शिकून अभियंता झाला. त्या काळात अशा वयातल्या तरुणांचा एक जागतिक नायक होता.

बिल गेट्स. त्यानं आणि त्याच्या मायक्रोसॉफ्टनं तरुण मनांवर केलेलं गारूड पुढे कित्येक वर्ष उतरलं नाही. एरिकच्या बाबतही तसंच झालं. त्या वेळी मायक्रोसॉफ्ट स्थिरावलेलं होतं. ‘मेजवान’ (डेस्कटॉप) संगणकांचा अंमल सुरू झाला होता. पण इंटरनेटचं महाजाल अजून पसरायचं होतं. गेट्स यांचं एक भाषण होतं. इंटरनेट हे आता आपल्या भविष्याला कसा आकार देणार आहे.. वगैरे. तेच एरिकनं पाहिलं आणि तेव्हापासून त्याला गेट्सनं झपाटलं. आपल्याला हे असं काही तरी बनायचंय असं त्याला वाटू लागलं. तसं काही करायचं तर आपल्याप्रमाणे एरिकलाही एकच स्थळ होतं. अमेरिका.

त्यानं त्यासाठी अर्ज केला. अमेरिकेत पुढचं काही शिकायचं होतं त्याला. पण व्हिसा नाकारला गेला. काही महिन्यांनी परत अर्ज. आणि परत नकार. नंतर परत अर्ज. पण परत नकार. असं तब्बल आठ वेळा झालं. चिनी असल्यामुळे असेल, पण अमेरिका त्याला काही त्यांच्या देशात प्रवेश देत नव्हती. एरिक हिरमुसला व्हायचा. पण प्रयत्न सोडायचा नाही. अमेरिकेत जायचं हे आव्हानच होतं त्याच्यासमोर. प्रत्येक आव्हानात संधी कशी असते असा चिनी भाषेतला उपदेश झाला होता की नाही, हे माहीत नाही. पण एरिकनं प्रयत्न सोडले नाहीत. आठ वेळा नकार घेतल्यानंतर नवव्या खेपेला त्याला एकदाचा अमेरिकेत प्रवेश मिळाला.

आज एरिक युआन अमेरिकेतल्या काही बलाढय़ आणि धनाढय़ उद्योगपतींत गणला जातो. ज्या देशानं त्याला वारंवार येऊ नको म्हटलं त्या देशात जायची संधी मिळाल्यावर सर्व प्रतिकूलतेवर मात करत सर्वाच्या नाकावर टिच्चून इतकं भव्य यश मिळवणं.. म्हणजे आव्हानातली संधी साधणं. एरवी अमेरिकेत गेलेले तसे किती तरी आहेतच की. त्यांच्या त्यांच्या परीनं तेही तसे यशस्वीच. नाही म्हटलं तरी डॉलरमध्ये कमावतात हेच केवढं मोठेपण.

एरिक युआन या अशा सगळ्या ‘गडय़ा आपुला मार्ग बरा’ असं म्हणत अमेरिकेत जगणाऱ्यांपेक्षा वेगळा निघाला. जे काही मिळतंय त्यात तो समाधानी नव्हता. त्या देशात जाऊन त्याला स्वत:चं असं काही निर्माण करायचं होतं. एकविसाव्या शतकाची पहाट व्हायला पाचेक वर्ष असताना तो अमेरिकेत आला. ९७ साली वेबेक्स या कंपनीत त्याला चाकरीची संधी मिळाली. त्या वेळी वेबेक्स या कंपनीनं संगणकाच्या माध्यमातनं ऑनलाइन मीटिंगा, व्हिडीओ कॉन्फरिन्सगची सुविधा तयार करून दिली होती. त्यामुळे चांगलंच नाव होतं त्या कंपनीचं. माहिती तंत्रज्ञान वयात येण्याचा तो काळ. नवनव्या कल्पना आणि या अशा कल्पनांचं प्रत्यक्षात येणं यामुळे माहिती तंत्रज्ञान क्षेत्राचा देह उमलू लागला होता.

त्या काळात वेबेक्समध्ये बरंच काही करायची संधी एरिकला मिळाली. ही कंपनी नंतर इतकी यशस्वी झाली की ‘सिस्को’ या तिच्यापेक्षा किती तरी बडय़ा कंपनीनं ती विकत घेऊन तिला आपला भाग बनवून टाकलं. आता एरिक सिस्कोचा भाग बनला. वेबेक्सचं तंत्रज्ञान पुढे नेण्याची संधी आणि अंगभूत हुशारीच्या जोडीला असलेला खटपटय़ा स्वभाव, त्यामुळे ‘सिस्को’चं वातावरण त्याला चांगलंच भावलं. त्या कंपनीच्या व्हिडीओ कॉन्फरिन्सग विभागाचा तो प्रमुख बनला.

त्याच्यासाठी प्रेमात पडायचा आणि या व्हिडीओ कॉन्फरिन्सगचं महत्त्व कळायचा काळ एकच. हे व्हिडीओ कॉन्फरिन्सग तंत्र फारच गुंतागुंतीचं आहे, असं त्याला वाटत होतंच. त्यात प्रेमपात्राने त्याची गैरसोय अधिकच जाणवून दिली. तिला भेटण्यासाठी त्याला हजारो मलांचा दहा तासांचा प्रवास करायला लागायचा. ‘एक बटन दाबलं की थेट व्हिडीओ कॉन्फरन्स सुरू असं काही करता आलं तर आपण एकमेकांना हवं तेव्हा पाहू शकू’ हा त्याचा प्रेमालाप.

झूम हे त्याचं प्रेमापत्य. शोधाची जननी बऱ्याचदा ‘ती’.. म्हणजे गरज..  असते हे सत्य यातून पुन्हा सिद्ध झालं. आणि सध्याच्या करोनाग्रस्त काळानं २०११ साली जन्माला आलेल्या या सत्याचं महत्त्व अधोरेखित केलं. आज घरात बसून आपल्या कामाचा गाडा ओढणाऱ्यांचा आधार हे झूम अ‍ॅप आहे. सारं जग आज बंदिवासात असताना झूम यशोशिखरावर आहे. अलीकडेच भांडवली बाजारात उतरलेल्या झूमचे समभाग पहिल्याच दिवशी ६१ डॉलपर्यंत गेले आणि एरिकच्या झोळीत ७५ कोटी डॉलर्स ओतून गेले. त्या दिवशी एरिकनेही आपल्या मालकीचे झूमचे काही समभाग विकून वट्ट ५.७ कोटी डॉलर्सची कमाई केली.

झूमचं यश हे अनेकार्थी महत्त्वाचं. एक साधी, रोमँटिक कल्पना हेच उत्पादन होऊ शकतं हे सत्य हरखून टाकणारं आहे. ते प्रत्यक्षात आलं अमेरिकेत. स्टीव्ह जॉब्स, एलॉन मस्क, सर्जी ब्रिन, जेन्सन हुआंग या आणि अशा साऱ्यांत आणि एरिक युआन यांच्यात एक समान धागा म्हणजे हे सगळे स्थलांतरित आहेत.

या यशानंतर आता एरिक नव्या वादळात सापडलाय. ते आहे ‘हेरगिरी’चं. झूममधली माहिती चोरली जातीये आणि ती चीनला मिळतीये असा आरोप आहे. चौकशी सुरू आहे त्याची. एरिकनं काही चुका कबूलही केल्यात. त्यातून काय जे निघायचं ते निघेल.

पण तोपर्यंत एरिकचं यश साजरं करायला हवं. शोधकता, वैज्ञानिक दृष्टिकोन, ज्ञानाची आस अशा सगळ्याला ‘नारे बाबा ना,’ म्हणणारेच अधिक असताना एरिकचं ‘जरासा ‘झूम’ लूं मैं..’ निश्चितच सुखकारक. आणि आव्हानातली संधी कशी साधायची हे शिकवणारं..!

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 11, 2020 12:26 am

Web Title: zoom boss eric yuan success during global lockdow zws 70
Next Stories
1 साथसोवळ्याची साथ!
2 हस्तप्रक्षालनार्थे..
3 कासांड्रा क्रॉसिंग!
Just Now!
X