अपत्यप्राप्तीची ओढ फक्त स्त्रियांनाच असते असं नाही, ती पुरुषांनाही असते. स्त्रियांना जसं आपण ‘आई’ व्हावं असं वाटतं तसं पुरुषांनादेखील आपण ‘बाप’ व्हावं असं वाटत असतं. असं वाटण्याची तीव्रतादेखील सारखीच असते. फरक इतकाच की या बाबतीत स्त्री ज्या प्रमाणात ‘व्यक्त’ होते त्याप्रमाणात पुरुष व्यक्त होत नाही.

अपत्यप्राप्तीसाठी विलंब लागणाऱ्या पुरुषांच्या व्यथांकडेदेखील गांभीर्याने पहिलं पाहिजे. नवऱ्याच्या वीर्यपरीक्षेत दोष आढळून आल्यानंतर तोदेखील मनातून अस्वस्थ असतो. वास्तविक पाहता त्याच्या वीर्यात शुक्राणूंची संख्या कमी असणे किंवा ती शून्य असणं यात त्या पुरुषाचा दोष नसतो. त्याच्या वीर्यात शुक्राणूंची संख्या किती असावी या गोष्टीवर त्याचं नियंत्रण नसतं. विशेषत: आपल्या बायकोत काही दोष नाही आणि आपल्यात दोष आहे, हे कळलं की त्याचं ‘पुरुषी’ मन दुखावलं जातं. तो समजूतदार असेल तर ठीक, नाही तर तपासणीच्या कामात योग्य ते सहकार्य त्याच्याकडून मिळत नाही. जोडपं समजूतदार असेल तर ते या प्रसंगाला समर्थपणे तोंड देतात, डॉक्टरांनी सांगितलेल्या तपासण्या आणि उपचार करून घेऊन ‘यश’ प्राप्त करतात. असं समजूतदारपणाने वागणारी जोडपी समाजात कमी प्रमाणात आढळतात. माझ्यामध्ये दोष नाही, दोष तुझ्यातच आहे असं, तुझं-माझं करतात. आपल्यात दोष आहे ही बाब तिच्या माहेरच्या लोकांना कळू नये, अशी नवऱ्याची इच्छा असते. आपल्यातल्या कमीपणाचं ‘ओझं’ घेऊन जीवन जगणारा पुरुष अपत्यप्राप्तीसाठी काहीही करायला तयार असतो. तो जर पैसेवाला असेल तर मग बघायलाच नको.

एका तालुक्याच्या ठिकाणी बिअरबारचा व्यवसाय करणारा वयाच्या साधारणत: ४५व्या वर्षी, लग्नानंतर बारा वर्षांनी मूलबाळ होत नाही या समस्येसाठी आला. बायकोचं वय ३७ र्वष. खूप प्रयत्न केले. अनेक डॉक्टरांना दाखवलं, भरपूर पैसे खर्च झाले, पण यश काही मिळालं नाही. रिपोर्ट्स पाहिल्यानंतर लक्षात आलं की, बायकोच्या प्रजननसंस्थेत काही दोष नाही, नवऱ्याच्या वीर्यात शुक्राणूंची संख्या शून्य आहे. त्या जोडप्याला मी नांदेडहून नाशिकचे डॉ. रणजीत जोशींकडे पुढील मार्गदर्शनासाठी पाठवलं. त्यांनी सिमेन बँकेतून शुक्राणूंचा वापर करून टेस्टटय़ूब बेबी करण्याचा निर्णय घेतला. एक-दोन वेळेस नाही तर सहा वेळेस टेस्टटय़ूब बेबीची प्रक्रिया केल्यानंतर अपेक्षित यश मिळालं. दोन र्वष तो आपलं घरदार आणि व्यवसाय सोडून नाशिकात फ्लॅट भाडय़ाने घेऊन राहिला आणि ‘यश’ घेऊनच आपल्या गावी परतला. लाखो रुपये खर्च झाले, आपल्या ७५ वर्षांच्या वडिलांना दोन र्वष व्यवसाय सांभाळावा लागला. कौटुंबिक ओढाताण, प्रचंड मानसिक ताण. त्याला त्याचं फारसं काही वाटत नव्हतं. तो एकाच गोष्टीवर खूश होता. आपल्यात ‘दोष’ होता हे गुप्त ठेवण्यात आलं आणि अपत्यप्राप्तीपण झाली. या पुरुषाला असलेल्या अपत्यप्राप्तीच्या ओढीचं मोजमाप कोणत्या तराजूत करायचं?

लग्नानंतर ठरावीक कालावधीत मूलबाळ न झाल्यास पुरुषांच्या व्यथा सांगणारं आणखी एक उदाहरण देता येईल. एका मोबाइलचा व्यवसाय करणाऱ्या तरुणाचं लग्न होतं. सहा महिन्यांनंतर, लैंगिक समस्या निर्माण झाल्यामुळे सल्ला घेण्यासाठी येतो. प्रामाणिकपणे सांगतो की, लग्नानंतर मी एकदाही पत्नीशी शारीरिक संबंध ठेवू शकलो नाही. त्याची योग्य ती तपासणी आणि उपचार करून सहा महिने झाल्यानंतरदेखील काही ‘फायदा’ झाला नाही. मी त्याला सेकंड ओपिनियनसाठी सेक्सोलॉजिस्टकडे जाण्याचा सल्ला दिला. त्यावर तो म्हणाला, ‘‘ते लैंगिक समाधानाचं जाऊ द्या हो डॉक्टरसाहेब, मला मूलबाळ होईल यासाठी काय करता येईल ते सांगा.’’ मी त्याला म्हटलं- ‘‘तुझं लग्न होऊन फक्त एक वर्ष झालंय, अगोदर आपण लैंगिक संबंधाची समस्या कशी सोडवता येईल ते बघू, नंतर गर्भधारणा होईल.’’ त्यावर तो म्हणाला, ‘‘टेस्टटय़ूब बेबी करता येणार नाही का?’’ ‘‘अगोदर सेक्सचा आनंद घेण्याचं बघ, लग्न होऊन एक वर्ष तर झालंय, इतकी काय घाई आहे?’’ त्यावर त्याचं म्हणणं असं की, ‘‘माझ्यासोबत आमच्या समाजात ज्यांची लग्न झाली, त्या सर्वाच्या बायकांना गर्भधारणा झाली आहे, फक्त माझ्याच नाही, याचं मला टेन्शन आलंय. नातेवाईकांत माझा अपमान होण्याची शक्यता आहे.’’ समाजाच्या तथाकथित दबावामुळे तो असा विचित्र निर्णय घेण्याच्या तयारीत होता. त्याच्या बायकोचाही यासाठी विरोध नव्हता ही माझ्यासाठी अनाकलनीय बाब होती.अपत्यप्राप्तीची ओढ ही ज्यांना मूलबाळ होण्यासाठी विलंब लागतो अशा जोडप्यांमध्येच असते असं नाही तर ज्यांना गर्भ राहतो पण टिकत नाही अशा वारंवार गर्भपात होणाऱ्या जोडप्यांमध्ये तितक्याच तीव्रतेने असते. अपत्यप्राप्तीची ओढ ही मुलींमध्ये जन्मजातच असते का ती तशी नसते, मुलगी घडवत असताना तिच्या मनावर तसं बिंबवलं जातं या विचारात मतभिन्नता आहे. काही संदर्भानुसार आई व्हावंसं वाटणं ही काही निसर्गदत्त अंत:प्रेरणा नसून, आई व्हावं वाटणारी हॉर्मोन्स शरीरात नसतात. ही जीवशास्त्रविषयक प्रेरणा नसून अनादी कालापासून भक्कम अशा सामाजिक आणि सांस्कृतिक विचारांचा परिणाम आहे. ‘स्त्री जन्मत नाही, तर घडवली जाते’ असं फ्रेंच लेखिका सिमोन द बोव्हूआने -‘द सेकंड सेक्स’ या  स्त्रीवादावरच्या महाग्रंथ समजल्या जाणाऱ्या जगप्रसिद्ध पुस्तकात लिहून ठेवलंय. भारतीय विचारसरणीचा पगडा असणाऱ्या आपल्या लोकांना ही विचारसरणी पटणं कठीण आहे.

अपत्यप्राप्तीच्या ओढीसाठी दोन महत्त्वाच्या गोष्टी कारणीभूत आहेत. एक म्हणजे आई होण्याची आंतरिक इच्छा आणि दुसरं म्हणजे समाजाचा दबाव. अपत्यजन्मामुळे सामान्य माणसाच्या जीवनाला एक उद्देश प्राप्त होतो. मुलंबाळंच नाही तर एवढा पैसा-प्रॉपर्टी कशाला कमवायची, असंपण बोललं जातं. अपत्यजन्माच्या घटनेकडे वंशाचा दिवा आणि म्हातारपणाची काठी म्हणूनदेखील पहिले जातं.. अपत्यजन्म हा जेव्हा प्रतिष्ठेचा प्रश्न बनतो तेव्हा ‘समाजाचा दबाव’ नावाचा मुद्दा कार्यरत असतो. अगदी कुटुंबातील, आपले जवळचे नातेवाईकदेखील टोमणे मारतात. आपल्या आंतरिक इच्छेसाठी नाही तर समाजाचा दबाव कमी व्हावा यासाठी तिला अपत्यजन्म हवा असतो. मला मूलबाळ नाही या एका कारणामुळे ती स्त्री नैराश्यात जाऊ शकते. समजा पत्नीमध्ये दोष आहे आणि नवरा ‘नॉर्मल’ आहे तर अपत्यप्राप्तीसाठी नवऱ्याने दुसरं लग्न केल्यास समाज फारसं काही म्हणत नाही. उलट परिस्थितीत अपत्यप्राप्तीसाठी तिने दुसरं लग्न करू नये, असा आपला समाजनियम.

वंध्यत्व निवारण्याच्या क्षेत्रात गेल्या काही दशकात विज्ञान आणि तंत्रज्ञानाने खूप प्रगती केली आहे. टेस्टटय़ूब बेबीच्या आगमनाने आजकाल मूलबाळ होण्याची शक्यता खूप वाढली आहे. वंध्यत्व हा शब्द आता मागे पडत आहे. आजकाल मूलबाळ होण्यास फक्त विलंब लागतो. ‘होणार नाही’ असं क्वचित घडतंय.

अपत्यप्राप्तीपेक्षा अपत्यसंगोपन ही अतिशय अवघड बाब आहे, किंबहुना ती एक जबाबदारी असते, हे बऱ्याच जणांना खूप उशिरा लक्षात येतं. ही गोष्ट जर योग्य वेळी लक्षात आली तर, एक सुधारित समाजनिर्मितीसाठी मदत होईल.

डॉ. किशोर अतनूरकर

atnurkarkishore@gmail.com

chaturang@expressindia.com