19 March 2019

News Flash

अपत्यप्राप्ती स्त्री-मनाचा वेध

आम्हाला ईश्वर कसा असेल हे पाहण्याची गरज नाही

‘आम्ही आईचे दर्शन घेतले आहे, आता आम्हाला ईश्वर कसा असेल हे पाहण्याची गरज नाही,’ असे विधान करण्या इतपत अनन्यसाधारण महत्त्व ‘आई’ होण्याच्या या घटनेला दिले गेले आहे. अपत्यजन्म, जगातील जवळपास प्रत्येक कुटुंबात घडणारी एक संस्मरणीय घटना. आई होण्याचे वय असूनदेखील, ‘मी आई झाले नाही तरी चालेल,’ असे जगातील मूठभरच स्त्रिया म्हणत असतील. जगात असे कोणते प्रोफेशन आहे, ज्यासाठी सर्वात जास्त वेतन दिले पाहिजे? या प्रश्नाचे उत्तर ‘आई’ असे देऊन विश्वसुंदरीने ‘आई’ला पुन्हा एकदा सर्वोच्च पदावर नेऊन ठेवले.

आई होणे ही कितीही गौरवास्पद बाब असली तरी आई होणे सोपे नाही. गर्भावस्थेत एका मानवी जिवात दुसरा जीव वाढतो आणि बाळंतपणात एका जीवातून दुसरा जीव बाहेर पडतो. चार-दोन दिवस नाही, एक-दोन महिने नाही, तर चक्क नऊ महिने आईला आपल्या पोटात गर्भ सांभाळावा लागतो, वाढवावा लागतो. बाळंतपणाच्या कळा सोसण्याच्या दिव्यातून जावे लागते. पुढे किमान वर्षभर स्तनपान करावे लागणे, एकंदरीतच बाळाला जन्म देणे आणि लहानाचे मोठे करणे ही एक मोठी जबाबदारी असते याचे भान, आपण आई झाले पाहिजे असे वाटणाऱ्या प्रत्येक स्त्रीला असतेच असे नाही. उलट ते बऱ्याच जणींना नसते.

अपत्यप्राप्तीच्या बाबतीत स्त्री-मनाचा वेध घेताना, ती स्त्री कोणत्या परिस्थितीतून जात आहे हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. लग्नानंतर, पहिल्या एक-दोन वर्षांत कोणतेच ‘प्लॅनिंग’ न करणारी स्त्री, दोन वर्षांपेक्षा जास्त विलंब लागत असल्यामुळे अस्वस्थ झालेली स्त्री, गर्भधारणा होते पण गर्भ टिकत नाही, या वारंवार गर्भपात होत असलेल्या स्त्रिया आणि एक अपत्य आहे- दुसरे व्हावे अशी तीव्र इच्छा आहे, पण गर्भ राहत नाही; साधारणपणे या चार वेगवेगळ्या परिस्थितींतून जाताना स्त्रियांच्या मनाची अवस्था ही वेगवेगळी असते. पहिल्या वर्गातील बऱ्याच स्त्रियांनी आपल्याला गर्भधारणा केव्हा असायला पाहिजे या बद्दल फारसा विचार केलेला नसतो. बहुतांश मुलींचे, विशेषत: ग्रामीण भागात आजही वयाची १८ वर्षे पूर्ण होण्याच्या आतच लग्न होते आणि ‘आई’ होणे म्हणजे काय याची फारशी समज नसताना लग्नानंतर लगेचच्या काही महिन्यांतच त्यांना गर्भ रहातो. या परिस्थितीत अपत्यप्राप्तीच्या ओढीचा प्रश्न नसतो. गर्भावस्था एका अर्थाने लादली जाते. सुशिक्षित, नोकरी करणाऱ्या मुलींचे प्रश्न वेगळे. शिक्षण, नोकरी आणि करिअर बनवण्याच्या दबावामुळे त्यांचे लग्नच मुळात उशिरा होत आहेत. पंचविशीनंतर, तिशीच्या जवळपास लग्न झाल्यानंतरदेखील त्यांना लगेच गर्भधारणा नको असते. लग्नानंतर किमान एक-दोन वर्षे तरी त्यांना लाइफ एन्जॉय करावसे वाटते, त्यासाठी ते ‘प्लॅनिंग’ करतात. त्यांना अपत्यप्राप्तीची ओढ नसते असे नाही. करिअर महत्त्वाचे का अपत्यप्राप्ती या द्विधा मन:स्थितीत त्या असतात. कधी ना कधी निर्णय हा घ्यावाच लागतो. बहुतेक वेळेस करिअरशी तडजोड करावी लागते. अपत्यजन्म बऱ्याचदा मुलींच्या करिअरच्या प्रवासातील स्पीडब्रेकर मानला जातो आपल्याला अजून गर्भधारणा झाली नाही यापेक्षाही आपल्यासोबत लग्न झालेल्या बऱ्याच जणींना मूलबाळ झालेय, आपल्याला अजून नाही, या विचाराने अस्वस्थ झालेल्या स्त्रिया दुसऱ्या वर्गात मोडतात. अपत्य व्हावे ही स्वत:ची इच्छा तर असतेच पण सामाजिक दबावामुळे त्या इच्छेचे रूपांतर अगतिकतेत होते. त्यातील बरेच लोक डॉक्टरकडे जाऊन तपासण्या आणि उपचार करून घेतात, पण अपेक्षित ‘यश’ लगेच मिळेल असे नाही. डॉक्टरांना दाखवणे, त्या तपासण्या, त्यावर होणारा खर्च, वेळेची करावी लागणारी अ‍ॅडजेस्टमेन्ट या सगळ्या गोष्टींमुळे वैताग वाढतो. जोडप्यांना बऱ्याचदा चीड आणणारी आणि कधी कधी न जमणारी बाब म्हणजे वेळापत्रकानुसार शारीरिक संबंध ठेवणे. डॉक्टरांनी सांगितलेले असते, अमुक या चार दिवसात रोज संबंध ठेवा. शरीरसुखाचा आनंद असा यांत्रिक पद्धतीने घेणे ही चेष्टा वाटायला लागते. अपत्यप्राप्तीची ओढ हे सगळे करायला भाग पाडते. एका जोडप्याची व्यथा ऐकून तर मी निरुत्तर झालो. ‘तो’ एका शहरात प्राध्यापक आणि ‘ती’ साधारणत: ३०० किलोमीटर अंतरावर असलेल्या शहरात चांगल्या पदावर नोकरीला. लग्न होऊन तीन वर्षे झाली, मूलबाळ होत नाही ही समस्या. मी म्हटले तुम्ही अगोदर काही दिवस एकत्र राहा मग बघू! तो म्हणतो खूप प्रयत्न केले हो डॉक्टर बदलीचे पण शक्य झाले नाही. शेवटी पालकमंत्र्यांकडे जाऊन माझी व्यथा बोलून दाखवली, त्यांना दया आली, मुंबईला गेलो, बदलीचे आदेश घेऊनच आलो पण हिचा वरिष्ठ अधिकारी ती चांगले काम करीत असल्यामुळे सोडायला तयार नाही. आता ३०० किमी प्रवास करून ती तरी इकडे येते नाही तर शनिवार-रविवार दोन दिवसांसाठी मी तरी तिच्याकडे जातो. ऑफिसच्या कामाने आणि प्रवासाने आम्ही इतके थकून जातो की काही ‘मजाच’ येत नाही. आता आम्ही दीडशे किमी अंतरावर असलेल्या ठिकाणी तरी बदली व्हावी यासाठी या वर्षी प्रयत्न करणार आहोत. अपत्यप्राप्तीची ओढ आहे, पण एवढय़ा चांगल्या पगाराची नोकरी ना तिला सोडता येतेय न मला. अपत्यप्राप्तीच्या या समस्येवर माझ्याकडे अर्थातच उत्तर नव्हते.

गर्भ राहतो पण टिकत नाही या प्रकारामुळेदेखील स्त्रियांच्या मानसिक अवस्थेचे संतुलन बिघडते. एखाद्या वेळेस गर्भ न राहिला तरी चालेल पण दर वेळेस तो टिकतो का नाही याच्या धाकधुकीने ती स्त्री वैतागून जाते. या संदर्भातील एक कमलबाईंची केस मी विसरू शकत नाही. बारा वर्षांच्या वैवाहिक जीवनात, एक-दोन वेळेस नाही तर तब्बल नऊ वेळेस तिचे गर्भपात झाले होते. खूप शारीरिक वेदना आणि मानसिक क्लेश सहन करत असलेल्या अवस्थेत दहावा गर्भ घेऊन ती आमच्याकडे आली. गर्भावस्थेच्या चौथ्या महिनापासून आम्ही तिला रुग्णालयात दाखल करून तिच्या तपासण्या आणि उपचार केले. या वेळेस तरी माझ्या पदरात बाळ पडेल ना, अशा अर्थाच्या प्रश्नांना ‘हो’ असे उत्तर तिला आणि तिच्या कुटुंबीयांना पाहिजे होते. आमच्या प्रयत्नांना निसर्गाने साथ दिली. गर्भ नऊ महिने टिकला आणि तिला मुलगी झाली. ‘बारा वर्षांचा आमचा वनवास आज संपला’ या एका वाक्याने तिने किती ‘सहन’ केले याचा अंदाज येऊ शकतो.

गर्भावस्था आणि अपत्यजन्म हा प्रवास तसा खूप खडतर या परिस्थितीत त्यांना आवश्यकता असते ती नवरा आणि कुटुंबातील इतर सदस्यांकडून अपेक्षित असलेल्या भावनिक आधाराची!

डॉ. किशोर अतनूरकर

atnurkarkishore@gmail.com

chaturang@expressindia.com

First Published on February 3, 2018 12:52 am

Web Title: articles in marathi on pregnancy and childbirth part 3