23 April 2019

News Flash

गर्भावस्थेतील कामजीवन

आपल्या संस्कृतीत विवाहानंतरच कामजीवनाचा आनंद घेण्यासाठीची समाजमान्यता आहे.

आपल्या संस्कृतीत विवाहानंतरच कामजीवनाचा आनंद घेण्यासाठीची समाजमान्यता आहे. गर्भधारणेसाठीचा मार्ग अर्थातच कामजीवनाच्या आनंदातूनच सुरू होतो. निसर्ग मोठा चतुर आहे. फक्त कामजीवनाचा आनंद घ्या आणि मोकळे व्हा, असं होत नाही. त्यातून गर्भधारणा होण्याच्या शक्यतेची निसर्गाने ‘मेख’ मारून ठेवली आहे. सामान्य माणसांच्या प्रत्यक्ष जीवनात ‘साधनांचा’ उपयोग सुरू होऊन आता अनेक दशकं उलटून गेली तरीही बरीच जोडपी अजूनही गर्भधारणेस प्रतिबंध घालून कामजीवनाचा आनंद घेताना झगडत आहेत असं वाटतं.

गर्भावस्था असताना कामजीवनाचा आनंद घ्यावा का घेऊ नये, याबद्दल अनेक गैरसमज आहेत. पत्नी गर्भवती आहे असं समजल्यापासून ते ९ महिन्यांच्या लांबलचक असलेल्या कालावधीत आणि बाळंतपणा नंतरचं कामजीवन कसं असायला पाहिजे, या नाजूक विषयाबद्दल फारसं कुठं बोललं जात नाही. या विषयावर पतीपत्नींमध्ये संवाद होणं, निर्माण झालेल्या शंकांचं समाधान करून घेण्यासाठी त्यांनी डॉक्टरांना संकोच न करता विचारणं आणि डॉक्टरांनी या संवेदनशील प्रश्नांसाठी पुरेसा वेळ देऊन योग्य ते मार्गदर्शन करणं, अभावानेच आढळतं. या विषयाची माहिती जननक्षम जोडप्यांना द्यावी, त्यांचं या बाबतीत असलेलं अज्ञान दूर करावं, किमान या अतिशय अल्पचर्चित अशा विषयाला वाचा फोडून हा विषय चर्चेत आणावा हा या लेखामागचा उद्देश.

गर्भावस्थेतील लैंगिक जीवनाबद्दल लोकांना बोलायचं असतं, पण स्वत:हून फार कमी लोक बोलतात, पण डॉक्टरांनी या बाबतीत बोलायला सुरुवात केली की मग बोलतात. गर्भवती स्त्री तपासणीसाठी सहसा आई किंवा सासूबाईंसोबत डॉक्टरकडे येते त्या वेळेस, मनात असूनदेखील या बाबतीत ती डॉक्टरांना स्वत:हून काही प्रश्न विचारत नाही. जेव्हा ती आपल्या पतीसोबत डॉक्टरकडे येते, तेव्हादेखील या बाबतीत ती काही बोलत नाही. पतीला मात्र विचारायचं असतं. काही पती आपल्या गर्भवती पत्नीसमोर यासंदर्भात शंका विचारतात तर काही पत्नीला- तू जरा बाहेर थांब, असं म्हणून ती कन्सल्टिंग रूमच्या बाहेर गेल्यानंतर या विषयावर चर्चा करतात.

गर्भावस्था असताना जोडप्याने शारीरिक संबंध ठेवावेत का ठेवू नयेत? या प्रश्नाचं सरळ सरळ उत्तर- ठेवायला हरकत नाही असं असलं तरी या बाबतीत काही गोष्टी त्या जोडप्यांनी समजून घेतल्या पाहिजेत. संभोग हा शब्द सम आणि भोग या दोन शब्दापांसून बनला आहे. सम म्हणजे समान आणि भोग म्हणजे आनंद. पती-पत्नी दोघांनाही समान आनंद मिळावा यासाठी निसर्गाने ही योजना केली आहे. गर्भावस्थेत असा समान आनंद मिळण्याची शक्यता कमी. कारण गर्भावस्थेत, सर्वसाधारणपणे स्त्रियांची ‘इच्छा’ कमी झालेली असते. पत्नी गर्भवती असताना पतीच्या ‘इच्छेत’ फारसा बदल होत नाही. गर्भावस्थेत शारीरिक संबंध ठेवताना जोडप्यांनी, संभोग आणि समागमाच्या वेळी शिगेला पोचलेली ‘उत्कटता’ या दोन भावनांमधील फरक समजून घेतला पाहिजे. भावनोत्कटतेचा आनंद न घेता फक्त संभोग ‘उरकणं’ असाच प्रकार गर्भावस्थेतील शारीरिक संबंध ठेवताना घडत असल्यास तो टाळलेला बरा, असं विशेषत: मला पतींना सांगावंसं वाटतं.

गर्भावस्थेतील संभोगामुळे गर्भाला धक्का पोचून गर्भपात होईल, असं बऱ्याच जोडप्यांना वाटतं. वास्तविक पाहता, गर्भाशयाचे स्नायू भक्कम असल्यामुळे आणि संभोगाच्या वेळेस पुरुषाचा लिंग आणि गर्भ यात अंतर असल्यामुळे गर्भाला इजा होत नसते. गर्भाशयाच्या मुखाशी असलेल्या नैसर्गिक चिकट द्रवाच्या ‘बुचामुळे’ रोगजंतूंचा संसर्ग सहसा होत नाही. गर्भावस्थेत संभोग केल्याने, गर्भधारणेशी संबंधित काही गंभीर गुंतागुंत निर्माण होऊ शकते याचादेखील भक्कम पुरावा आढळत नाही. गर्भावस्थेत एखाद्या स्त्रीस ‘डाग’ लागत असल्यास किंवा सोनोग्राफी केल्यानंतर ‘वार’ गर्भाशयाच्या मुखाशी (placenta praevia) असल्यास, वारंवार गर्भपात होणारी केस असल्यास डॉक्टर शरीरसंबंधांस मनाई करतात. वास्तविक पाहता, गर्भावस्थेच्या चौथ्या महिन्यापासून आठव्या महिन्यापर्यंत संबंधांनंतर योनिमार्गाद्वारे रक्तस्राव झाल्यास, ‘वार’ गर्भाशयाच्या मुखाशी असण्याची शक्यता असते.

पहिल्या तीन महिन्यांत बऱ्याच गर्भवती स्त्रिया मळमळ-उलटीने हैराण असतात. आहार कमी झाल्यामुळे त्या थकलेल्या अवस्थेत असतात. त्यामुळे अर्थातच त्यांचा ‘मूड’ नसतो. शेवटच्या तीन महिन्यांत गर्भावस्थेत स्त्रीमध्ये होणारे शारीरिक बदल, बाळाच्या होणाऱ्या हालचाली, कंबरदुखी, वगैरेमुळे पत्नी कामक्रीडेमध्ये, सक्रिय सहभाग घेऊ शकत नाही.

बाळंतपणानंतर पती-पत्नीच्या लैंगिक जीवनात बदल होतो. गर्भावस्थेत कमी झालेली ‘इच्छा’ लगेच पूर्ववत होत नाही. बाळंतपणानंतर, स्तनपानाची प्रक्रिया सुरू होते. स्तनपानाशी संबंधित हार्मोन्सचा लैंगिकतेवर विपरीत परिणाम होत असतो. केवळ हार्मोन्समुळेच नाही तर ‘आई’ झाल्यामुळे स्त्रियांमध्ये होणारे शारीरिक आणि मानसिक बदलदेखील यासाठी कारणीभूत असतात.

बाळंतपणानंतर ‘आईचं’ सगळं वेळापत्रकच बदलून गेलेलं असतं. बाळासाठी रात्री अधून-मधून उठावं लागतं, झोप नीट होत नाही. तिच्या प्राथमिकता बदलून जातात. ‘आईपणाला’ ती लवकर अ‍ॅड्जेस्ट होते का उशिरा यावरदेखील बाळंतपणानंतरच्या लैंगिक जीवनावर प्रभाव पडत असतो. लैंगिक जीवनाची सुरुवात बाळंतपणानंतर सर्वसाधारणपणे तीन महिन्यांपासून ते एक वर्षांपर्यंत होते. जसजसं स्तनपान कमी होतं, तसतसं स्त्रियांमधील सेक्सची इच्छा पूर्वपदावर येते. सिझेरियन झालेल्या स्त्रियांमध्ये बाळंतपणानंतर लैंगिक जीवनाची सुरुवात सहसा, नॉर्मल झालेल्या स्त्रियांच्या तुलनेत लवकर होते असं आढळून आलं आहे.

अपत्यजन्म आणि काम जीवन या संदर्भात अजून एक बाब इथे नमूद करावीशी वाटते. ती म्हणजे, ‘गर्भधारणेची भीती’ हा स्त्रियांच्या कामजीवनाचा आनंद घेण्यातील अडसर ठरू शकतो. अशा स्त्रियांची दोन गटांत विभागणी करता येईल. एक- ज्या जोडप्यांना अपत्य हवं आहे पण किमान (समजा) दोन-तीन वर्षांसाठी नको आहे म्हणून पाळणा लांबविण्याच्या एखाद्या पद्धतीचा वा साधनाचा वापर करणाऱ्या स्त्रिया आणि दुसरा गट म्हणजे अशा स्त्रिया ज्यांची अपत्ये बऱ्यापैकी मोठी झालेली आहेत, आता त्यांना एकही अपत्य नको आहे पण त्यांची किंवा पतीची कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया झालेली नाही. या दोन्ही गटांतील स्त्रियांचं लैंगिक जीवन समाधानकारक असेलच असं नाही. निम्मे लक्ष कामक्रीडेत तर निम्मे आपल्याला ‘दिवस’ तर जाणार नाहीत ना या चिंतेत. मासिक पाळी येईपर्यंत ती तशी चिंताग्रस्तच असते. घरातील वा ऑफिसमधील कामं तर ती करीत असते पण अपेक्षित तारखेच्या एक दिवस जरी मासिक पाळी येण्यास उशीर झाला तर तिची चिंता वाढते, फारसं कुणाशी शेअर करत नाही पण तिचा मूड जरा बिघडलेलाच असतो. या मानसिक अवस्थेत असताना एक-दोन दिवसांत मासिकपाळी सुरू झाली की केवढा आनंद! एक प्रकारची मुक्ती! पाळणा लांबविण्याची साधनं सहज उपलब्ध असताना, तिचा योग्य असा वापर करून निरामय कामजीवनाचा आनंद कसा घ्यावा या बाबतीत अजूनही बऱ्याच जोडप्यांना शिकवण्याची गरज ओळखून डॉक्टरांनी आवश्यकतेप्रमाणे तसं मार्गदर्शन केलं पाहिजे. आता मुलं पुरेशी मोठी झाली आहेत, कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया तुम्ही किंवा तुमच्या पतीने करून घ्यायला हरकत नाही, जेणेकरून उर्वरित आयुष्यात तुम्ही बिनधास्त कामजीवनाचा आनंद घेऊ शकता, असं सांगितल्यानंतर बऱ्याच जोडप्यांना पटतं. ज्यांची पत्नी गर्भवती आहे त्यांच्या पतीराजांना विनंती की, गर्भावस्थेत तिची ‘इच्छा’ कमी झालेली असते हे लक्षात घ्या. पहिल्या आणि शेवटच्या तीन महिन्यांत ‘पथ्य’ करा. मधील तीन महिन्यांत संबंध ठेवायला हरकत नाही.

पत्नी गर्भवती असताना आणि बाळंतपणानंतर पतीने तिच्या जवळ असण्याला जास्त महत्त्व दिलं पाहिजे, शारीरिक संबंध ठेवलेच पाहिजेत असं नाही.

– डॉ. किशोर अतनूरकर

atnurkarkishore@gmail.com

First Published on March 31, 2018 1:34 am

Web Title: is it safe to have sex during pregnancy