डॉ. किशोर अतनूरकर atnurkarkishore@gmail.com

गर्भावस्थेत सोनोग्राफी केल्यानंतर, मुलगा आहे का मुलगी हे समजू शकतं याचा गौप्यस्फोट कोणत्यातरी डॉक्टरनेच केल्याशिवाय ही बाब सामान्यांना समजलीच नसती. भरपूर पसा आणि तोदेखील लवकर मिळावा यासाठी सोनोग्राफी करून गर्भलिंगनिदान करण्याचा, त्यानंतर स्त्री-भ्रूणहत्या करण्याच्या मार्गाचा काही डॉक्टर्स अवलंब करतात. असं करत असताना आपण बेकायदा काम करत आहोत, समाजावर भविष्यात त्याचे भीषण परिणाम होतील, हे डॉक्टरसारख्या उच्चशिक्षित, समाजात उच्च दर्जा असणाऱ्या लोकांना कळत नाही असं कसं म्हणायचं?

Loksatta vasturang Gudhipadva 2024 Buy news house car goods
गुढीपाडव्याला उंचे गुढी उभवावी
Career MPSC exam Guidance UPSC job
करिअर मंत्र
Loksatta vyaktivedh economics Nobel Prize Standards Daniel Kahneman
व्यक्तिवेध: डॅनिएल कानेमान
What do you do when someone is choking in front of you
तुमच्यासमोर श्वास गुदमरल्याने एखादी व्यक्ती तडफडत असेल तर तुम्ही काय कराल? डॉक्टरांनी सांगितले हे महत्वाचे उपाय

पूर्वी जेव्हा लोकसंख्या नियंत्रणाचा प्रश्न ऐरणीवर नव्हता, पाळणा लांबविण्याची साधनं उपलब्ध नव्हती, गर्भजल चिकित्सा किंवा सोनोग्राफीचं तंत्र अस्तित्वात नव्हतं, तेव्हा बहुतांश लोकांची कुटुंबं मोठी होती. प्रत्येक जोडप्याला सरासरी पाच ते दहा अपत्ये होण्याचा तो काळ होता. शक्य-अशक्यतेच्या नियमाप्रमाणे, जवळपास प्रत्येक जोडप्याला मुलगे आणि मुली होत असत. त्या काळात सर्वसाधारणपणे किमान एकतरी मुलगा सहसा असायचा. आज तसं नाही. हा जमाना छोटय़ा कुटुंबाचा आहे.

एक किंवा दोन अपत्यांवर समाधान मानून आपलं राहणीमान उंचावण्याचं तंत्र आणि मंत्र आता लोकांना अवगत झालं आहे. ती आता काळाची गरज आहे. अडचण ही आहे की हा बदल होत असताना लोकांच्या मनातील किमान एकतरी मुलगा असायला हवा, या इच्छेत मात्र फारसा बदल झालेला नाही. तेव्हा कुटुंब मोठं असल्यामुळे आज ना उद्या मुलगा होतच असे. आज कुटुंब एक किंवा दोन अपत्यांवर मर्यादित ठेवण्याची गरज देखील तेवढीच महत्त्वाची आहे. कुटुंब मर्यादित ठेवण्याची गरज मुलगा होण्याच्या गरजेवर जेव्हा मात करते तेव्हा एक किंवा दोन मुलींवर (मुलगा होण्याची वाट न पाहता) समाधानी राहून लोक थांबतात. मुलगा नसला तरी चालेल अशी समजुतदारी दाखवतात. स्वत:च्या आणि कुटुंबीयातील सदस्यांना समजावून सांगण्याची त्यांच्यात क्षमता असते. पण किमान एकतरी मुलगा हवाच ही इच्छा जेव्हा तीव्र होते, मुलगा नसला तरी चालेल असं स्वत:ला समजावून सांगण्याची त्या जोडप्याची बौद्धिक कुवत नसते, नातेवाईक पण साथ देत नाहीत, अशा वेळेस कुटुंब मर्यादित ठेवण्याच्या दबावामुळे किमान एक तरी मुलगा असावा या इच्छेचं रूपांतर हव्यासात होतं. एकदा का हव्यास बळावला की माणसाला विवेकावर आधारित निर्णय घेता येत नाहीत. कमी वेळात भरपूर पसा कमावण्याच्या हव्यासापोटी काही डॉक्टर मंडळी देखील अशा रुग्ण आणि नातेवाईकांना साथ देतात. मागचा-पुढचा विचार न करता गर्भ मुलीचा म्हणून सर्रास गर्भपात केले जातात.

माणूस, मग तो कुणीही असो, वयोमानानुसार शरीर थकल्यानंतर, त्याला किंवा तिला आधार हा लागतच असतो. लग्नानंतर मुलगी सासरी जाण्याची प्रथा असल्यामुळे, मुलगा म्हातारपणाच्या आधारासाठी आवश्यक आहे असं जननक्षम वयात वाटत असतं. बदलत्या सामाजिक परिस्थितीत मुलगा हा म्हातारपणाच्या आधारासाठी आवश्यक आहे ही संकल्पना आता बदलत आहे. मुलगी जशी लग्नानंतर घर सोडून जाते तसं मुलगा देखील आजकाल घर सोडून नोकरी-व्यवसायासाठी गावातून मोठय़ा शहरात किंवा विदेशात जाऊन राहात आहे. यामुळे म्हाताऱ्या आई-वडिलांची गोची झाली आहे. आपलं गाव सोडून मुलाकडे मोठय़ा शहरात किंवा विदेशात जाऊन राहावंसं वाटत नाही. गावाकडे राहिलं तर ‘आधार’ कोण देणार अशी परिस्थिती. तात्पर्य काय तर मुलगा झाला तरी, भविष्यात तो आपल्याला आधार देईलच याची खात्री नाही.साधारणत: ३० वर्षांपूर्वी गर्भजल चिकित्सा केल्यानंतर आणि अलीकडच्या १० वर्षांत, गर्भावस्थेत सोनोग्राफी केल्यानंतर, मुलगा आहे का मुलगी हे समजू शकतं याचा गौप्यस्फोट कोणत्यातरी डॉक्टरनेच केल्याशिवाय ही बाब सामान्यांना समजलीच नसती. भरपूर पसा आणि तोदेखील लवकर मिळावा यासाठी सोनोग्राफी करून गर्भलिंगनिदान करण्याचा, त्यानंतर स्त्री-भ्रूण हत्या करण्याच्या मार्गाचा काही डॉक्टर्स अवलंब करतात. असं करत असताना आपण बेकायदा काम करत आहोत, समाजावर भविष्यात त्याचे भीषण परिणाम होतील, हे डॉक्टरसारख्या उच्चशिक्षित, समाजात उच्च दर्जा असणाऱ्या लोकांना कळत नाही असं कसं म्हणायचं? पुरतील आणि उरतील एवढे पैसे वैध मार्गाने कमावण्याची संधी डॉक्टरांना असताना देखील काही डॉक्टर्स ‘या’ मार्गाने पैसे कमावण्याच्या लालसेपासून स्वत:ला दूर ठेऊ शकत नाहीत ही शोकांतिका आहे.

गेल्या दहा वर्षांत गर्भलिंग निदान कायद्यांतर्गत महाराष्ट्रात अनेक डॉक्टर्सवर कायदेशीर कार्यवाही करण्यात आली. विविध माध्यमातून या बाबतीत डॉक्टर्सच्या या घृणास्पद कामाचा ‘समाचार’ घेण्यात आला. या सर्व बातम्या पाहात-ऐकत-वाचत असताना मात्र डॉक्टरांचा एक समूह कमालीचा व्यथित आहे. तो म्हणजे कधीही गर्भलिंगनिदान न केलेल्या डॉक्टर्सचा गट. हा गट संख्येने गर्भलिंगनिदान करणाऱ्या डॉक्टर्सच्या तुलनेत खूप मोठा आहे. गर्भलिंगनिदान करणाऱ्या मूठभर हावरट, पशांच्या लोभापायी आपल्या भावना बोथट करून घेतलेल्या डॉक्टर्समुळे कितीतरी इमानेइतबारे वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या डॉक्टर्सना बरंच काही सोसावं लागत आहे. अशा प्रकारचे आगाऊचे उद्योग आपल्या शहरात कोणता डॉक्टर करत आहे हे त्यांना माहिती असतं, पण त्यांचं नाव संबंधित अधिकाऱ्यांना सांगण्याची हिंमत त्यांच्यामध्ये नाही. गर्भलिंगनिदान न करता  देखील आपलं रेकॉर्ड नीट ठेवताना अनवधानाने काही चूक तर होणार नाही ना याची सतत उरात भीती बाळगून ते सोनोग्राफी करत असतात. गर्भलिंगनिदानाशी संबंधित या कायद्यात साध्या कारकुनी चुकीमुळे (उदाहरणार्थ सही केली पण शिक्का नाही मारला, फॉर्म भरताना घाईघाईत सोनोग्राफी केल्याचा दिनांक नमूद करायचं राहून गेलं, वगैरे) देखील डॉक्टरवर कार्यवाही होऊन त्याची मशीन सील करण्याची ‘व्यवस्था’ आहे. अशा चुकांवर बोट ठेऊन, डॉक्टर्सवर कार्यवाही करण्याने गर्भलिंगनिदान करण्याच्या प्रवृत्तीला आळा बसणार नाही असं या गटातील डॉक्टर्सना मनोमन वाटतं. कायद्याला अपेक्षित अशा पद्धतीच्या नोंदी करून गर्भलिंग करण्याचं तंत्र काही डॉक्टर्सनी अवगत केलं आहे, किंबहुना जे डॉक्टर्स गर्भलिंगनिदान करतात ते रेकॉर्ड ठेवण्याच्या भानगडीतच पडत नसावेत.

गर्भलिंगनिदानाच्या कायद्यात डॉक्टर्सवर कार्यवाही करून शिक्षा करण्याची जशी तरतूद आहे तशी गर्भवती स्त्रीस गर्भलिंगनिदान करून घेण्यासाठी प्रवृत्त करणाऱ्या व्यक्तीवर उदाहरणार्थ नवरा, सासू, सासरा इत्यादींवर देखील कार्यवाही करण्याची तरतूद आहे. त्यांना देखील शिक्षा होऊ शकते. आतापर्यंत झालेल्या सर्व कारवाया या डॉक्टर्सवरच झालेल्या आहेत. गर्भलिंगनिदान करून गर्भ मुलीचा असेल तर स्त्री-भ्रूण हत्या करणारे डॉक्टर्स तर दोषी आहेतच, त्यांना शिक्षा झालीच पाहिजे, पण गर्भलिंग निदान करण्याची मागणी करणाऱ्या नातेवाईकांवर कायद्यात तरतूद असून देखील कार्यवाही झाल्याचं ऐकिवात नाही याचं आश्चर्य वाटतंय. कार्यवाही केल्यानंतर असं बेकायदा काम करणाऱ्या डॉक्टर्सची नावं जशी माध्यमातून प्रसिद्धीस दिली जातात तशी नातेवाईकांना पण माध्यमातून का प्रसिद्ध केलं जात नाही हे एक गूढ आहे. अशा लोकांची नावे समाजाला समजली पाहिजेत, जेणेकरून लोकलज्जेस्तव का होईना गर्भलिंगनिदानाची मागणी कमी होईल.

बदलती सामाजिक आणि आर्थिक परिस्थिती, स्त्री शिक्षणाच्या आघाडीवर लक्षणीय सुधारणा, ‘बेटी बचाओ-बेटी पढाओ’सारख्या राजकीय इच्छाशक्तीचे पाठबळ लाभलेल्या योजना, गर्भलिंगनिदान प्रतिबंधक कायद्याची कडक अंमलबजावणी या सर्व प्रयत्नांना यश लाभत आहे असं आजचं चित्र निश्चित आहे. आपल्याला निदान एकतरी मुलगा असायला पाहिजे ही हजारो वर्षांपासून समाजमनात भिनलेल्या या मानसिकतेत बदल होण्यासाठी वेळ लागेल. या समस्येशी संबंधित एक महत्त्वाचा सामाजिक बदल होणं अपेक्षित आहे. मुलगा नसलेल्या आई-वडिलांनी म्हातारपणी शेवटच्या श्वासापर्यंत, नि:संकोचपणे मुलीच्या घरी जाऊन राहण्याची प्रथा रूढ होणं गरजेचं आहे.

आजही माझ्या आजारी असलेल्या सासू-सासऱ्यांना, आमच्या म्हणजे त्यांच्या लेकीच्या घरी येऊन राहणं सगळ्यांच्याच दृष्टीने सोईचं आहे हे समजून देखील-लेकीच्या घरी जाऊन कसं राहावं-लोक काय म्हणतील? या विचाराने पछाडलेलं आहे. माझीच जर अशी परिस्थिती असेल तर या आघाडीवर अजून किती काम करायचं शिल्लक आहे याचा अंदाज येऊ शकतो.

chaturang@expressindia.com