आधुनिकीकरणाचा आपल्या खाण्यापिण्याच्या सवयींवर, आवडी निवडींवरही मोठा परिणाम झाला आहे. त्याचप्रमाणे ओव्हन, टोस्टर, ग्रीलर, एअरफ्रायर यांसारख्या उपकरणांनी आपल्या पाककृतींमध्ये आणखी भर पाडली आहे. या उपकरणांमुळे हॉटेलात मिळणाऱ्या पदार्थापासून पाश्चात्त्य देशांतील चविष्ट पदार्थापर्यंतच्या अनेक गोष्टी करता येतात. त्यासाठी टीव्हीवरील पाककृतींच्या वाहिन्या, कार्यक्रम तसेच पुस्तके यांची मदत घेतली जाते. पण बऱ्याचदा अशा कार्यक्रमात किंवा पुस्तकांत सांगितल्या जाणाऱ्या पाककृतींमधील जिन्नस आपल्याला अनोळखी असतात.

टीव्हीवरचा ‘शेफ’ इंग्रजीतील काही तरी कठीण शब्द फेकत अतिशय शिताफीने एखादा जिन्नस वापरण्याची सूचना करतो, पण तो शब्द किंवा त्याचा अर्थ आपल्याला कळत नाही. कधी त्या शेफच्या तोंडी ब्लू चीझ, बेल्जियन वॅफल पदार्थ येतात तर कधी ‘कॅरमलाइज्ड’, ‘डिझॉल्व्ह’ अशा कृती करण्याच्या सूचना केल्या जातात. पण नेमकं काय करायचं तेच कळत नाही. असे प्रश्न तुमचा पाककलेचा उत्साह कमी करत असतील तर, अ‍ॅण्ड्रॉइडवरील ‘फूड डिक्शनरी’ हे अ‍ॅप नक्की वापरून पाहा. अन्नपदार्थ, जिन्नस, कृती, इंग्रजी शब्द या सर्वाचे अर्थ आणि तपशील पुरवणारे हे अ‍ॅप आहे. त्यामध्ये ब्रेड, बन, डाळी, चीझ, दुग्धजन्य पदार्थ, मसाले, सॉस, फळे, भाज्या अशा अनेक वर्गवाऱ्यांनुसार पदार्थाचे अर्थ, छायाचित्र आणि माहिती दिली आहे. याशिवाय हे पदार्थ कसे बनवायचे, याच्या रेसिपीदेखील या अ‍ॅपवर उपलब्ध आहेत. याखेरीज पदार्थाच्या सेवनाचा आरोग्यावर होणारा चांगला, वाईट परिणाम याविषयीदेखील यात विवेचन करण्यात आले आहे. एकूणच खाद्यान्नाचा महाकोश म्हणून या अ‍ॅपचा उल्लेख करता येईल.

‘रस’वंत व्हा!
उन्हाळा जवळ आला की थोडय़ाफार श्रमानेही थकवा जाणवू लागतो. उन्हातून घरी परतल्यानंतर तहानेने घशाला कोरड पडते. अशा वेळी शीतपेयांचे सेवन केले जाते. ही शीतपेये चवीला चांगली असली आणि त्याने तहान भागत असली तरी शरीरस्वास्थ्याच्या दृष्टीने ती हानिकारक आहेत. अशा वेळी सरबत किंवा फळांचा रस (ज्यूस) हा एक चविष्ट आणि आरोग्यकारक मार्ग आहे. सध्या बाजारात विविध चवीतील सरबताच्या बाटल्या मिळतात तर, हवाबंद ज्यूसची पाकिटेही मिळतात. पण घरच्या घरी सफरचंद, अननस, स्ट्रॅाबेरी, संत्रे, आंबा अशा नेहमीच्या फळांच्या ज्यूसच्या पलीकडे फार काही करता येत नाही. त्यामुळे ‘ज्यूसिंग’ हे अ‍ॅप खूप परिणामकारक ठरते. नावाप्रमाणे या अ‍ॅपमध्ये फक्त  आणि फक्त ‘ज्यूस’चे शेकडो प्रकार उपलब्ध आहेत. हॉटेलमध्ये किंवा ज्यूसबारमध्ये मिळणाऱ्या विविध फळांच्या मिश्रित ज्यूसपासून शरीराला ‘डिटॉक्स’ करणाऱ्या ‘ग्रीन ज्यूस’पर्यंतच्या वेगवेगळ्या प्रकारांतील ‘ज्यूस’बद्दल येथे माहिती उपलब्ध आहे. प्रत्येक ज्यूसमध्ये कोणत्या फळांचे किती प्रमाण असावे, अशा पद्धतीने ते बनवण्याच्या सूचना यात करण्यात आल्या आहेत. याशिवाय ज्यूस बनवण्याच्या चित्रफिती, वापरकर्त्यांनी नोंदवलेले वेगवेगळ्या प्रकारचे ज्यूस या अ‍ॅपमध्ये पुरवण्यात आले आहे.

– असिफ बागवान