सुपरमॅन, स्पायडरमॅन ही नावे माहीत नसतील अशी व्यक्ती सापडणं जरा कठीणच. आपल्या अचाट शक्ती आणि सामर्थ्यांने विध्वंसक शत्रूला नेस्तनाबूत करणारे हे सुपरहिरो प्रत्येक लहान मुलाचे पहिले आदर्श असतात. सुपरहिरोंची यादी दिवसेंदिवस भलीमोठी होत आहे. टीव्हीवर वाढत असणाऱ्या कार्टून वाहिन्या याचे कारण आहे. पण सुपरहिरोंना भेटण्याचे आणखी एक माध्यम म्हणजे कॉमिक्स. काही वर्षांपूर्वीपर्यंत टीव्हीवर कार्टून हा केवळ तास-दोन तासांचा कार्यक्रम असताना कॉमिक्समधूनच ही सुपरहिरो मंडळी नियमितपणे भेटायची. आता कॉमिक्सचे प्रस्थ कमी झाले आहे. मुलांना वाचनाची गोडी लागत नाही, याचे हेही एक कारण असू शकते. पण कॉमिक्स वाचनाचा आनंद तुम्ही ‘मिस’ करत असाल तर ‘माव्‍‌र्हल’ या जगप्रसिद्ध कॉमिक्स कंपनीचं अ‍ॅप नक्की डाउनलोड करा. स्पायडरमॅनपासून वूल्वरिनपर्यंत आणि अ‍ॅण्टमॅनपासून अ‍ॅव्हेंजर्सपर्यंत अनेक सुपरहिरोंना जन्म देणाऱ्या ‘माव्‍‌र्हल’च्या या अ‍ॅपवर शेकडो कॉमिक्स उपलब्ध आहेत. अर्थात यातील बरीचशी कॉमिक्स खरेदी करावी लागतात. मात्र, थोडय़ा संख्येने मोफत कॉमिक्सही या अ‍ॅपवर वाचायला मिळतात. या अ‍ॅपचे वैशिष्टय़ म्हणजे कॉमिक पुस्तकात आपली नजर जशी पानातील प्रत्येक चित्रचौकटीवर आणि त्यासोबतच्या मजकुरावर खिळते, त्याच पद्धतीने प्रत्येक चित्रानुसार हे कॉमिक अ‍ॅपवर वाचता येतं. शिवाय ते ‘झूम’ करण्याची सुविधा आहे. विशेषत: टॅब असेल तर हे अ‍ॅप कॉमिक वाचनाचा चांगला आनंद देतं.

असिफ बागवान
asif.bagwan@expressindia.com