News Flash

जमिनीवरून विमानाची ‘सफर’

विमानाच्या शोधाला एक शतकाहून अधिक कालावधी लोटला आहे.

विमानाच्या शोधाला एक शतकाहून अधिक कालावधी लोटला आहे. जगभरातील देशांना हवाई मार्गाने जोडणारी विमानसेवा आजघडीला सर्वात जलद आणि आरामदायी वाहतूक मानली जाते. त्यामुळे या हवाई वाहतुकीबाबत प्रत्येकालाच आकर्षण असते. आयुष्यातून एकदा तरी विमानातून सफर घडावी, असा प्रत्येकाचाच मानस असतो. अलीकडच्या काळात हवाई सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांतील स्पर्धा आणि उंचावलेले राहणीमान यामुळे विमानप्रवास सामान्यांनाही परवडू शकेल, असा बनला आहे. पण तरीही हवेतून एखादे विमान जात असले तर आपण कौतुकाने आणि कुतुहलाने त्याकडे पाहात असतो. ढगांतून वाट काढत विमाने कशी मार्गस्थ होतात, प्रत्येक विमान आपल्याच मार्गाने कसे पुढे सरकते, आपण उभे आहोत ते ठिकाण विमानातून कसे दिसत असेल, विमाने गोल फेऱ्या मारताना का दिसतात असे अनेक प्रश्न आपली उत्सुकता वाढवत असतात. ही उत्सुकता प्रत्यक्ष विमानात बसल्यानंतरही शमवता येत नाही. पण हे सर्व जाणून घेण्याचा उत्तम मार्ग म्हणजे ‘फ्लाइटरडार२४-फ्लाइट ट्रॅकर’ (Flightradar24 –  Flight Tracker) हे अ‍ॅप होय. हवाई वाहतूक नियंत्रण कक्षात बसल्यानंतर समोरच्या स्क्रीनवर जी दृश्ये दिसू शकतात, ती दृश्ये आपल्याला या अ‍ॅपवर पाहायला मिळतात आणि तीही अगदी खरीखुरी. केवळ भारतच नव्हे तर जगभरातील आकाशांतून विमानांची वाहतूक कशी चालली आहे, याचा रेषांचे जाळे दाखवणारा नकाशाच आपल्यासमोर उलगडला जातो. त्यामुळे तुम्ही उभे आहात त्यावरील आकाशातून किती विमाने मार्गस्थ होत आहेत, हे आपल्याला पटकन समजू शकते. एवढेच नव्हे तर, या विमानांच्या ‘आयकॉन्स’वर ‘क्लीक’ करताच हे विमान कुठल्या कंपनीचे आहे, कुठून कुठे निघाले आहेत, त्याची आसनक्षमता काय आहे, ते किती उंचीवरून उडत आहे अशी सर्व माहिती आपल्या फोनच्या स्क्रीनवर झळकते. आकाशातून सरकणारी ठिपक्या ठिपक्यांसारखी विमाने पाहण्याची ही सुविधा म्हणूनच केवळ मनोरंजन नव्हे तर आपल्या ज्ञानात भर पाडणारीदेखील आहे. तुम्ही ज्या विमानाने प्रवास करणार आहात, ते सध्या कुठे आहे हेदेखील या अ‍ॅपने पाहता येते. ही सगळी रंजकता कमी म्हणून की काय, पण तुम्ही या अ‍ॅपच्या ‘सशुल्क आवृत्ती’मध्ये कोणत्याही विमानातून जमिनीवरचे दृश्य कसे दिसत आहे, हे पाहू शकता. त्या विमानाचा वैमानिक जे दृश्य पाहात असेल, तेच दृश्य तुम्हाला तुमच्या स्मार्टफोनच्या स्क्रीनवर दिसते. एकूणच या अ‍ॅपची सफर एक रोमांचक अनुभव आहे. हे अ‍ॅप मोफत आणि सशुल्क (१०० रुपये) अशा दोन्ही प्रकारांत उपलब्ध आहे. अर्थात मोफत अ‍ॅपमधील सुविधांवर मर्यादा आहेत. पण घरबसल्या विमानसफर करण्यासाठी एकदाच १०० रुपये खर्च करण्यातही हरकत नाही.

– असिफ बागवान 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 23, 2016 1:04 am

Web Title: flight tracker app
Next Stories
1 पासवर्डच्या सुरक्षिततेची हमी
2 नकाशावाचन ‘ऑफलाइन’
3 चुटकीसरशी वैद्यकीय मदत
Just Now!
X