स्मार्टफोनमुळे एकमेकांशी संवाद साधणे अतिशय सहज झाले आहे. व्हॉट्सअ‍ॅप, ट्विटर, फेसबुक यांसारख्या लोकप्रिय अ‍ॅप्सप्रमाणेच अन्य अनेक अ‍ॅप्स आहेत ज्याद्वारे आपण एकमेकांशी त्वरित संवाद साधू शकतो. पण हे करत असताना आपल्या भाषेत किंवा प्रादेशिक भाषेत मेसेज पाठवताना खूपच कसरत करावी लागते. सध्या भारतीय बाजारात दाखल होणाऱ्या प्रत्येक फोनमध्ये प्रमुख भारतीय भाषांमध्ये टायपिंग करण्याची सोय असते. परंतु, यातील ‘कीबोर्ड’ हाताळणे अनेकांना जमत नाही. अशा वापरकर्त्यांसाठी ‘गुगल इंडिक कीबोर्ड’ हे अतिशय उत्तम अ‍ॅप आहे. स्मार्टफोनमधील अ‍ॅण्ड्रॉइड सिस्टीम गुगलमार्फतच तयार केली जात असल्याने बहुतांश स्मार्टफोनमध्ये ‘गुगल कीबोर्ड’ची व्यवस्था उपलब्ध असते. परंतु काही वेळा स्मार्टफोन बनवणाऱ्या कंपन्या अ‍ॅण्ड्रॉइडमध्ये आपापल्या पद्धतीने बदल करताना स्वत: बनवलेले ‘कीबोर्ड’ त्यात समाविष्ट करतात. अशा वेळी ‘प्ले स्टोअर’वरून ‘गुगल इंडिक कीबोर्ड’ डाऊनलोड करून वापरण्याचा पर्याय खुला असतो.
‘गुगल इंडिक कीबोर्ड’चे प्रमुख वैशिष्टय़ म्हणजे, या कीबोर्डच्या माध्यमातून भारतातील अनेक भाषांमध्ये टायपिंग करण्याची सुविधा उपलब्ध आहे. या अ‍ॅपमध्ये दोन प्रकारचे कीबोर्ड पुरवले जातात. उदाहरणार्थ, मराठीसाठी या अ‍ॅपच्या माध्यमातून ‘इनस्क्रीप्ट’ किंवा ‘फोनेटिक’ पद्धतीचा कीबोर्ड ‘अ‍ॅक्टिव्हेट’ करता येतो. या कीबोर्डवरील अक्षरांची ठरावीक पद्धतीने मांडणी केलेली असते. ही मांडणी लक्षात ठेवल्यानंतर आपल्याला त्याद्वारे टायपिंग करणे सहज शक्य होते. मात्र हे करणे ज्यांना शक्य होत नाही, त्यांना या अ‍ॅपमध्ये ‘वर्ड टू वर्ड’ अर्थात इंग्रजी अक्षरांप्रमाणे मराठी किंवा देवनागरी टायपिंग करणे शक्य होते. म्हणजेच, ‘नमस्ते’ हा शब्द इंग्रजी कीबोर्डवरील ल्लें२३ी अशी अक्षरे टाइप करून लिहिता येतो. शिवाय, तुम्ही मराठी शब्द टाइप करता तेव्हा तो शब्द पूर्ण होण्याआधी त्या जुळणीतील शब्दांचे विविध पर्यायही कीबोर्डला जोडून असलेल्या पट्टीवर झळकतात. त्यामुळे अर्धवट शब्द टाइप करूनही तुम्ही पूर्ण शब्द लिहू शकता. या कीबोर्डच्या माध्यमातून तुम्ही इंग्लिश, हिंदी, मराठी या भाषांसह आसामी, बंगाली, गुजराती, कन्नड, मल्ल्याळम अशा सर्व प्रमुख भारतीय भाषांतून लिखाण करू शकता.
‘गुगल इंडिक कीबोर्ड’ आपल्या स्मार्टफोनमध्ये अ‍ॅक्टिव्हेट करण्याआधी तो तुमच्या स्मार्टफोनमध्ये आहे का, याची खात्री करून घ्या. नसल्यास डाऊनलोड करून घ्या. त्यानंतर पुढीलप्रमाणे प्रक्रिया करा :
(अ‍ॅण्ड्रॉइड ५ पेक्षा वरच्या ऑपरेटिंग सिस्टीमवर) सेटिंगमध्ये जाऊन Language & Inputl हा पर्याय निवडा. तेथे विद्यमान कीबोर्ड वर क्लिक करून ‘गुगल इंडिक कीबोर्ड’ निवडा. त्यानंतर Language & inputllनिवडून English & Indic Languages (Google Indic Keyboard)lहा पर्याय निवडा. हे केल्यानंतर तुम्ही मराठी किंवा अन्य कोणत्या भाषा निवडून त्यातून आपल्या स्मार्टफोनमध्ये टाइप करू शकता.
(अ‍ॅण्ड्रॉइड ४ किंवा त्यापेक्षा खालील ऑपरेटिंग सिस्टीमवर) सेटिंगमध्ये जाऊन KEYBOARD & INPUT METHODS हा पर्याय निवडा. तेथे Choose input method हा पर्याय निवडून ‘गुगल इंडिक कीबोर्ड’ निवडा.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

असिफ बागवान
asif.bagwan@expressindia.com

मराठीतील सर्व अॅपचं विश्व बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Information about uses of different applications on mobile and smartphone
First published on: 28-05-2016 at 01:41 IST