इंटरनेट आणि तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे शॉपिंगपासून बँकिंग व्यवहारांपर्यंतच्या अनेक गोष्टी ‘ऑनलाइन’ करता येऊ लागल्या आहेत. यामुळे वापरकर्त्यांचा वेळ आणि धावपळ वाचली असली तरी, अशा व्यवहारांच्या सुरक्षिततेची चिंता प्रत्येकालाच सतावत असते. अशा वेळी वापरकर्त्यांसाठी समाधानाची गोष्ट असते ती म्हणजे, या अकाऊंटशी संबंधित ‘पासवर्ड’. ईमेल, नेटबँकिंग, ऑनलाइन शॉपिंग अशा सर्व प्रकारच्या ऑनलाइन व्यवहारांसाठी पासवर्ड हा सुरक्षिततेचा सर्वात महत्त्वाचा उपाय आहे. त्यामुळे आपला पासवर्ड हा किचकट आणि वेगळा असावा, याकडे प्रत्येकाचा भर असतो. परंतु, अशा प्रकारचा पासवर्ड विस्मरणात जाऊ शकतो. अशा वेळी मग ‘फरगॉट पासवर्ड’ करून नवीन पासवर्ड निर्मितीचा द्राविडी प्राणायम करावा लागतो. अनेक जण बँकेच्या एटीएमपासून ईमेलपर्यंतचे पासवर्ड, पिन क्रमांक एखाद्या डायरीत अथवा मोबाइलमधील ‘मेमो’मध्ये नोंदवून ठेवतात. परंतु, ही डायरी अथवा मेमो शंभर टक्के सुरक्षित अथवा गोपनीय राहण्याची खात्री देता येत नाही. त्यामुळेच ‘डॅशलेन पासवर्ड मॅनेजर’ (Dashlane’s Password Manager) हे अ‍ॅप आपल्याला उपयुक्त ठरू शकते. या अ‍ॅपमध्ये तुम्ही विविध ऑनलाइन अकाउंटचे पासवर्ड साठवून ठेवू शकता. याशिवाय तुमच्या विविध खात्यांसाठी वेगळे आणि अधिक भक्कम पासवर्ड निर्माण करण्यासही हे अ‍ॅप मदत करते. याशिवाय तुम्ही तुमची महत्त्वाची माहिती तसेच सुरक्षा क्रमांक या अ‍ॅपमध्ये साठवू शकता. या अ‍ॅपमध्ये ‘डिजिटल वॉलेट’ ही सुविधाही पुरवण्यात आली आहे. या सुविधेद्वारे तुम्ही तुमच्या क्रेडिट कार्डच्या नोंदी ठेवू शकता. ऑनलाइन खरेदी अथवा गुगल प्लेवरून पेमेंट करण्यासाठी तुम्हाला या क्रेडिट कार्डाच्या नोंदींचा उपयोग होऊ शकतो. पासपोर्ट, ओळखपत्र यांचा तपशील साठवण्याची सोयदेखील या अ‍ॅपमध्ये आहे. महत्त्वाचे म्हणजे, हे अ‍ॅप ‘एन्क्रिप्शन’ तत्वावर काम करत असल्याने तुम्ही नोंदवत असलेले पासवर्ड किंवा अन्य कोणतीही माहिती इतर कुणालाही हाताळता येत नाही.

7स्मार्टफोनची ‘स्पेस’ वाढवा
स्मार्टफोनमध्ये सर्रास आणि वेळोवेळी जाणवणारी समस्या असते ती जागेची. कितीही जास्त क्षमतेचे मेमरी कार्ड असले तरी वाढत्या वापराप्रमाणे स्मार्टफोनमधील जागा कमी कमी होत जाते आणि कधी तरी महत्त्वाची फाइल वा अ‍ॅप इन्स्टॉल करतेवेळेसच ‘लो स्पेस’ अर्थात ‘जागा कमी’ असा संदेश आपल्या स्क्रीनवर झळकतो. मग आपल्याला आधीचे काही अ‍ॅप हटवावे लागतात किंवा फोटो, व्हिडीओ किंवा गाणी हटवावी लागतात. स्मार्टफोनमध्ये दिवसेंदिवस निर्माण होणाऱ्या विविध सुविधांमुळे जागेची समस्या कायम राहते. अशा वेळी आपली माहिती ढगात अर्थात ‘क्लाऊड’मध्ये साठवण्याची सोय उपलब्ध असते. त्यासाठीच ‘गुगल ड्राइव्ह’ हे अ‍ॅप जरूर वापरले पाहिजे. ‘गुगल ड्राइव्ह’ हे तुम्हाला १५ जीबीपर्यंतची ‘क्लाऊड स्पेस’ पुरवणारे अ‍ॅप आहे. गुगलवर नवीन अकाउंट उघडल्यानंतर आपल्याला १५ जीबीची ‘स्टोअरेज स्पेस’ मिळते. आपल्याला येणारे ई मेल किंवा अँड्रॉइड फोनवर आपण डाऊनलोड करत असलेल्या अ‍ॅपच्या नोंदी आणि अन्य काही फाइल्स या जागेत राहात असतात. पण ‘गुगल ड्राइव्ह’च्या माध्यमातून तुम्ही तुमच्या स्मार्टफोनवरील फोटो, व्हिडीओ, डॉक्युमेंट्स ‘क्लाऊड’वर साठवून ठेवू शकता. त्यामुळे आपसूकच तुमच्या स्मार्टफोनमधील बरीचशी जागा रिकामी होते. महत्त्वाचे म्हणजे, गुगल ड्राइव्ह कोणत्याही संगणक वा लॅपटॉप वा टॅब्लेटवरून सुरू करता येत असल्याने तुम्ही ‘क्लाऊड’मध्ये साठवलेली माहिती अन्य कोणत्याही उपकरणावरून हाताळू शकता. हा सगळा ‘डेटा’ पासवर्डने सुरक्षित असतो. त्यामुळे त्याची चोरी होण्याची शक्यता नाही.

– असिफ बागवान