नवीन वर्षांच्या सुरुवातीला केल्या जाणाऱ्या अनेक संकल्पांपैकी एक संकल्प म्हणजे, घरखर्च आटोक्यात ठेवण्याचा. दरमहा ठरावीक रक्कमच घरखर्चासाठी वापरायची, त्याचा तंतोतंत हिशेब लिहून ठेवायचा, त्यानुसार अनावश्यक खर्च कमी करायचा, असे बेत यानिमित्ताने आखले जातात. त्याला थाटात सुरुवातही होते, पण मग हळूहळू त्यातील जोम ओसरू लागतो. त्याची सुरुवात हिशेब लिहिण्याचा कंटाळा करण्यापासून होते. हिशेबाची वही सतत जवळ ठेवणे किंवा रात्री घरी आल्यानंतर दिवसभरातील सर्व खर्च त्यात उतरवून काढणे, या दोन्ही गोष्टी तशा कंटाळा देणाऱ्याच. यातूनच मग घराचं बजेट कोलमडून पडतं. असा अनुभव येत असणाऱ्यांना ‘डेली एक्स्पेन्स मॅनेजर’ (Daily Expense manager) हे अ‍ॅप अतिशय उपयुक्त पडू शकेल. तुमचे उत्पन्न आणि खर्च यांचा ताळमेळ घालून देणारं हे अ‍ॅप म्हणजे प्रत्येक कुटुंबाचा ‘मिनी’ अर्थसंकल्पच आहे. यामध्ये खर्चाच्या विविध वर्गवाऱ्या करण्यात आल्या आहेत. त्यानुसार गृहकर्ज, किराणा, गाडी, फोन, वीजबिल अशा प्रत्येक खर्चाची तपशीलवार नोंद करण्याची सोय यात आहे. प्रत्येक दिवसानुसार होणाऱ्या खर्चाची नोंद करण्यासोबतच गृहकर्जाच्या हप्त्यासारख्या मासिक खर्चाची पूर्वनोंद करणेही यात शक्य होते. त्यामुळे आपल्याकडील जमा आणि होणारा खर्च यांची तुलना करता येते. तसेच विविध प्रकारच्या हप्त्यांसाठी ‘रिमायंडर्स’ लावण्याची सुविधा यात उपलब्ध करून देण्यात आली आहे. विशेष म्हणजे, आपण आपल्या गरजेनुसार यातील खर्च आणि उत्पन्नाच्या वर्गवाऱ्या वाढवू अथवा कमी करू शकतो. त्याचबरोबर महिन्याच्या शेवटी कोणत्या गोष्टीवर किती खर्च झाला, याचा अंदाज घेणेही शक्य होते. एकूणच आपल्याला व आपल्या कुटुंबाला आर्थिक शिस्त लावायची असल्यास ‘डेली एक्स्पेन्स मॅनेजर’ हे त्यासाठी उपयुक्त अ‍ॅप आहे. हे अ‍ॅप अ‍ॅण्ड्रॉइड आणि अ‍ॅप्पल या दोन्ही प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे.

स्मार्ट मेकअप मन
बहुसंख्य स्त्रीच्या पर्समध्ये एक गोष्ट हमखास असते ती म्हणजे, तिचं मेकअप किट. आवश्यक असेल तेव्हा आणि संधी मिळेल तेव्हा या मेकअप डबीच्या आरशात स्वत:ला निरखून मेकअप नीट करणाऱ्या अनेक जणी आपल्याला दिसतात. सौंदर्य हे स्त्रीचं वैशिष्टय़ असल्याने त्याची काळजी घेणं किंवा ते अधिक खुलवणं यात चुकीचं काहीच नाही. उलट यासाठी आता तुम्ही तुमच्या स्मार्टफोनचीही मदत घेऊ शकता. अ‍ॅण्ड्रॉइड आणि अ‍ॅपलवर उपलब्ध असलेलं ‘यूकॅम- मेकअप मेकओव्हर स्टुडिओ’ (YouCam Makeup- Makeover Studio) नावाचं अ‍ॅप म्हणजे तुमचा पॉकेट मेकअपमनच आहे. या अ‍ॅपद्वारे तुम्ही स्वत:च्या चेहऱ्यावर वेगवेगळय़ा पद्धतीने मेकअप करू शकता. त्यासाठी तुमच्या स्मार्टफोनला फ्रंट कॅमेरा आणि चांगल्या क्षमतेचा प्रोसेसर असणं मात्र आवश्यक आहे. हा अ‍ॅप सुरू केल्यानंतर ‘मेकअप’वर क्लिक करताच फ्रंट कॅमेऱ्यातून आपली छबी टिपली जाते. त्यानंतर अ‍ॅपवर उपलब्ध असलेल्या मेकअपच्या वेगवेगळय़ा स्टाइल्स निवडण्यासाठी केवळ बोटांनी ‘स्वाइप’ करताच त्या पद्धतीचा मेकअप छबीवर चढतो. वेगवेगळ्या रंगाच्या लिपस्टीक्स, आय श्ॉडो आहेत. त्यातून आपल्याला कोणता मेकअप चांगला दिसेल याचा पटकन अंदाज घेता येतो. शिवाय जी स्टाइल चांगली वाटते, तो मेकअप कसा करायचा याच्या टिप्सही या अ‍ॅपवर उपलब्ध आहेत. याखेरीज तुम्ही तुमच्या गॅलरीतील फोटोंवरही मेकअप करून ते सोशल मीडियावर शेअर करण्यासाठी वापरू शकता. दुसरं म्हणजे, यात असलेल्या स्टाइलखेरीज तुम्ही स्वत:ही मेकअपच्या स्टाइल्स बनवू शकता.  मेकअप करीत असताना आपण आरशासमोर उभे राहतो. मात्र, आरसा आपण सध्या कसे दिसत आहोत, हेच दाखवतो. ‘यूकॅम’चे अ‍ॅप मात्र आपण अमुक मेकअप केल्यानंतर कसे दिसू, हे आपल्याला आधीच सांगू शकतो. आहे ना गंमत?

असिफ बागवान
asif.bagwan@expressindia.com