‘घार उडते आकाशी, चित्त तिचे पिल्लापाशी’ असं म्हटलं जातं. आपल्या शक्तिशाली पंखांनिशी आकाशात उंचचउंच भरारी घेण्याचं सामथ्र्य असतानाही अनेकदा कुटुंबाची चिंता स्त्रीच्या पायातली बेडी बनून राहते. क्षमता, गुणवत्ता, कौशल्य असे सगळे गुण अंगी असतानाही आपल्या चिमुरडय़ांना पुरेसा वेळ देता यावा, त्यांची व्यवस्थित काळजी घेता यावी म्हणून ती स्वत:च्या करिअरवर पाणी सोडते. अनेकदा कुटुंबाचा आर्थिक डोलारा सावरण्यासाठीच तिला घराबाहेर पडावं लागतं. घरात असो वा घराबाहेर, कुठंही असली तरी तिचं मन घरात, शाळेत, कॉलेजात असलेल्या आपल्या मुलाबाळांच्या, पतीच्या सुरक्षेविषयी चिंता करत असतं. सध्या अवतीभवती घडणाऱ्या घटना या चिंतेत आणखी भर टाकतात. एकूणच कुटुंबाची काळजी स्त्रीएवढं कुणीच करत नाही. अशा वेळी आपल्या कुटुंबाची ख्यालीखुशाली कळवणारं ‘लाइफ ३६०’चं ‘फॅमिली लोकेटर’ (Family Locator) हे अ‍ॅप अतिशय उपयुक्त ठरतं. या अ‍ॅपद्वारे कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती त्या क्षणी कुठे आहे, हे लगेच समजतं. त्यांच्याशी एका क्लिकवर संपर्कही करता येतो. केवळ कुटुंबच नव्हे तर, आपल्या मित्रमैत्रिणींचंही ‘सर्कल’ बनवून त्यांच्याशी सतत संपर्कात राहणं या अ‍ॅपमुळे सहज शक्य आहे. याखेरीज तुम्ही एखाद्या संकटात सापडला असाल तर त्यांच्याशी त्वरित संपर्क साधून त्यांना तुमचा ठावठिकाणा कळवणंही या अ‍ॅपमुळे सोपं होतं. अर्थात त्यासाठी हे अ‍ॅप कुटुंबातल्या प्रत्येकाच्या स्मार्टफोनवर असणं आवश्यक आहे. हे अ‍ॅप ‘जीपीएस’च्या आधारे काम करतं. त्यामुळे ‘सर्कल’मधील प्रत्येक व्यक्ती कुठे आहे, हे नकाशावरच दिसतं. हे अ‍ॅप अँड्रॉइड आणि अ‍ॅपल या दोन्ही प्रकारच्या स्मार्टफोनवर उपलब्ध आहे.

खिशातली रोजनिशी
‘दिसामाजी काहीतरी लिहीत जावे’ असं संतांनी सांगून ठेवलं आहे. आपल्या रोजच्या दिनक्रमानंतर रात्री झोपताना दिवसभरातील घटनाक्रम आणि त्याबद्दलच्या आपल्या भावना व्यक्त करण्याची सवय अतिशय चांगली. कारण त्यामुळे मनात साचलेलं सारं काही वाहून कागदावर उतरतं आणि नव्या दिवसासाठी मन नव्या जोमाने ताजंतवानं होतं. रोजनिशी लिहिण्याचा आणखी एक फायदा म्हणजे, मागे घडलेल्या घटना/प्रसंग/ कार्यक्रम विस्मरणात गेल्या तरी रोजनिशीतील शब्दरूपी स्मरणगाठी तो प्रसंग अनेक वर्षांनंतर तसाच्या तसा उभा करतात. पण आता जमाना ‘पेपरलेस’चा आहे. ‘स्मार्टफोन’मुळे तर अनेक गोष्टी काही बोटांच्या स्पर्शाने करणं शक्य झालं आहे. अशावेळी रोजनिशी किंवा खासगी डायरीला कागदाची काय गरज? त्यासाठी अँड्रॉइडवरील ‘पर्सनल डायरी विथ पासवर्ड’ (PERSONAL DIARY with password)ि हे अ‍ॅप पुरेसं आहे. या अ‍ॅपमध्ये तारखेनुसार नोंदी करून ठेवण्याची सुविधा आहे. त्यामुळे दररोज तुम्ही दिवसभरातील घडामोडी त्या तारखेच्या पानावर मांडू शकता. आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी तुम्हाला ‘इमोटिकॉन’ अर्थात स्मायलींचा आधारही मिळतो. शिवाय, तुम्ही या पानाला छायाचित्रे, ध्वनीदेखील जोडू शकता. सर्वात महत्त्वाचं म्हणजे, ही डायरी तुमच्या स्मार्टफोनमध्ये असणार असल्याने ती सतत तुमच्या जवळ असेल आणि त्यातही ‘पासवर्ड’शिवाय हे अ‍ॅप अन्य कुणीही चालवूच शकणार नाही. त्यामुळे स्मार्टफोन कुणाच्या हातात पडला तरी काळजी नाही. अशा प्रकारचे अनेक अ‍ॅप अँड्रॉइड आणि अ‍ॅपलच्या अ‍ॅप स्टोअरवर उपलब्ध आहेत. त्यातूनही तुम्ही निवडू शकता. मात्र, ‘पर्सनल डायरी विथ पासवर्ड’चं एकूण रूप देखणं आणि हाताळण्यास सहज सोपं आहे.

– असिफ बागवान
asif.bagwan@expressindia.com