मासिक पाळी ही प्रत्येक स्त्रीच्या शरीरचक्रातील महत्त्वाची प्रक्रिया आहे. शरीरातील सर्व प्रक्रिया व्यवस्थित चालाव्यात यासोबतच आई होण्यात कोणताही अडसर येऊ नये, यासाठी निसर्गाने स्त्रीला दिलेली ही सर्वात मोठी देणगी आहे. मात्र सध्याच्या धकाधकीच्या जीवनशैलीत अनियमित मासिक पाळी ही असंख्य स्त्रियांसाठी चिंतेची बाब होऊन बसली आहे. ताणतणाव, शारीरिक श्रम, हालचाली अशा अनेक गोष्टी याला कारणीभूत असतात. तो वेगळा मुद्दा आहे. मात्र, अशा अनियमिततेमुळे शरीरातील प्रक्रियेच्या या चक्रावर लक्ष ठेवणं अनेकींना शक्य होत नाही. अशा वेळी पीरियड ट्रॅकर, माय कॅलेंडर (Period Tracker, My Calendar) हे अॅप अतिशय उपयुक्त ठरतं. नावाप्रमाणेच मासिक पाळीच्या तारखांची नोंद ठेवण्याचं महत्त्वपूर्ण काम हे अॅप करतं. यासोबत स्त्रीबीजजनन किंवा अंडोत्सर्ग प्रक्रिया यांच्यावरही या अॅपद्वारे लक्ष ठेवता येतं. याशिवाय ‘गर्भारपणाच्या शक्यता, गर्भप्रतिबंधक गोळय़ांच्या दिवसांची नोंद, शरीराचं तापमान नोंदवण्याची सुविधाही या अॅपमध्ये आहे. त्याआधारे गर्भधारणा करण्या अथवा न करण्याविषयीचा अंदाज घेणे सोपे जाते. मासिक पाळीदरम्यान होणाऱ्या त्रासाची अथवा दिसणाऱ्या लक्षणांची नोंद करून त्यात काही तफावत आहे का, हे तपासणेही या अॅपद्वारे शक्य होते. एका प्रकारे आपल्या शरीरातील घडामोडींची नोंद ठेवणाऱ्या डायरीचं काम करणारं हे अॅप अॅण्ड्रॉइड आणि अॅपल या दोन्हींवर विनामूल्य उपलब्ध आहे.