07 July 2020

News Flash

स्वत:शी मैत्री

केतकीचा मूड सकाळपासून खूप छान होता. तिला तिच्या आवडत्या विषयावर नॅशनल कॉन्फरन्समध्ये बोलायची संधी मिळाली होती.

आपल्या जिवाभावाच्या व्यक्तींविषयीही कधी कधी आपल्या मनात वाईट, दुष्ट विचार येतात. पण विचारांच्याच पातळीवर असतात तोपर्यंत आपण वाईट ठरत नाही. मनात वाईट विचार येऊ शकतात हे स्वीकारणं ही पहिली आणि त्यासाठी स्वत:ला वाईट वा दुष्ट न ठरवणं ही दुसरी पायरी ठरते. त्यासाठी बऱ्या-वाईट विचार स्वभावासह आपण आपल्याला स्वीकारायला हवं, स्वत:शी मैत्री करायला हवी.. अन्यथा अपराधी भावना आपल्याला जगू देणार नाही..

केतकीचा मूड सकाळपासून खूप छान होता. तिला तिच्या आवडत्या विषयावर नॅशनल कॉन्फरन्समध्ये बोलायची संधी मिळाली होती. खरं तर हा पेपर तिची मैत्रीण सोनाली सादर करणार होती. पण ती आजारी पडली. त्यामुळे ऐनवेळी ही जबाबदारी केतकीवर आली. केतकीलाही तिच्या विषयातल्या जाणकारांसमोर हा विषय विस्तृतपणे मांडायची खूप दिवसांपासूनची इच्छा होती. त्यामुळे सर्वागानं तिनं तयारी केली होती. स्टेजवर जायला फक्त दहा मिनिटांचा अवकाश होता..

.. तोच केतकीला छातीतील धडधड जाणवू लागली, घशाला कोरड पडली. हातापायाचे तळवे ओलसर झाले. स्टेजवर जाऊन एक शब्द तरी बोलता येईल का अशी शंका तिच्या मनात येऊ लागली. आपल्याला काही आठवत नाहीये आणि सभागृहातील जाणकार हसत आहेत, ती हतबल झाली आहे, असंही दृश्य तिच्या डोळ्यासमोर तरळून गेलं. इथून पळून जावं असं तिला वाटू लागलं. या विचारांनी ती मटकन खुर्चीत बसली. दोन घोट पाणी प्यायली. विचारांना झटकायचा प्रयत्न केला. यावर तिने एक तोडगा काढला. योग वर्गात शिकवतात तसं तिनं श्वासाकडे लक्ष वळवलं. श्वासाची गती वाढल्याचं तिला जाणवलं. मग तिनं सावकाश दोन दीर्घ श्वास घेतले आणि सोडले. थोडं बरं वाटलं. तिनं ठरवलं की अगदी स्टेजवर असा प्रसंग आलाच तर आता केलं तसंच दोन घोट पाणी प्यायचं, त्यात थोडा वेळ मिळेल मग प्रेक्षकांवरून एक नजर फिरवायची आणि त्याच वेळेला दोन दीर्घ श्वास घ्यायचे. आपली गाडी रुळावर यायला नक्कीच मदत होईल. मुख्य म्हणजे माझा या विषयातला अभ्यास सखोल आहे. तयारीही खूप छान केली आहे. आपलं प्रेझेन्टेशन नक्कीच चांगलं होईल. लोकांना आवडेल. या विचारासरशी तिच्या अंगात उत्साह सळसळला. तिच्या नावाची घोषणा झाली. ती आत्मविश्वासाने व्यासपीठावर गेली आणि तिने बोलायला सुरुवात केली..

केतकीचं बोलणं संपलं. टाळ्यांचा प्रचंड कडकडाट होत होता. या सगळ्या टाळ्या फक्त तिच्यासाठी होत्या. केतकी अतिशय भारावून गेली. प्रेक्षकांना अभिवादन करून ती आत वळली. तरीही टाळ्या वाजतच होत्या. केतकीच्या मनात आलं, ‘‘बरं झालं सोनाली आजारी पडली! नाही तर मला ही संधी मिळाली नसती. या टाळ्या तिला मिळाल्या असत्या..आणि मीही तिच्यासाठी टाळ्या वाजवत असते. प्रेक्षकातील एक बनून!’’ केतकी भानावर आली आणि आपल्या या विचारांमुळे दचकली. ‘‘आपल्या मनात असे विचार येऊच कसे शकतात? सोनाली माझी सख्खी, जिवाभावाची मैत्रीण. एकमेकांच्या अडीअडचणीत धावून जातो. आम्ही एकमेकांची सुखदु:ख, विचार अगदी गुपितसुद्धा शेअर करतो. एकमेकांच्या यशाने दोघीही आनंदित होतो. कुठंही कधी मत्सर, असूया अशा भावना दोघींच्याही मनात कधीही येत नाही. इतकी निखळ मैत्री आमची. लोकांना आमच्या मैत्रीचा हेवा वाटतो. आणि माझ्या मनात असं अभद्र येऊच कसं शकतं? इतकी मी नीच आहे? दुष्ट आहे?’’ तिच्या मनात आता हेच विचार घोळू लागले. ती स्वत:ला दोष देत राहिली.

ही अपराधी भावना नंतर किती तरी दिवस केतकीच्या मनात राहिली. तिनं यातून बाहेर पडायचं ठरवलं. तिनं ही गोष्ट सोनालीला सांगून टाकली. ती ऐकून सोनाली खळखळून हसली. तिला जवळ घेऊन म्हणाली, ‘‘होतं असं. आपण माणसं आहोत गं. तीसुद्धा भरपूर भावना असणारी! तुला आपल्या विचारांच्या मधेही काही भावना दडलेल्या सापडतील बघ. रामदास स्वामी म्हणतात, ज्या प्रकारचा विचार आपण करतो त्या प्रकारच्या प्रतिमा आपल्या मनात तयार होतात. तुझं पण तसंच झालं बघ. तुझ्या मनात विचार येत होते की मला ऐन वेळेला आठवले नाही तर आणि त्याप्रमाणे तुझ्या डोळ्यासमोर चित्र उभं राहिलं, तू बोलू शकत नाही आहेस आणि तुला सर्व जण हसताहेत. पण तू लागलीच स्वत:ला सावरलंस आणि त्यातून किती छान मार्ग काढलास. तू रोज करत असलेल्या योगाभ्यासाचा योग्य वेळी उपयोग केलास. एव्हढंच नाही तर व्यासपीठावर असं झालंच तर त्याचाही पर्याय काढलास. त्यामुळे तुझा आत्मविश्वास वाढला. परिणामी तुझं काम उत्तम पार पडलं.’’ सोनालीच्या या मनमोकळेपणानं बोलण्यानं खरं तर समजावून सांगण्यानं केतकीच्या मनावरचा भार हलका झाला.
सोनाली आजारी पडली हे आपल्या पथ्यावर पडलं या विचारामागे काय भावना असेल याचा विचार आता केतकी करू लागली. ‘‘सोनालीला पेपर सादर करायची संधी मिळाली तेव्हाच वाटून गेलं होतं कीसोनाली खरंच खूप हुशार आहे. छान झालं. त्याच वेळेला मनात आलं की मी काही तिच्याएवढी हुशार नाही, आणि तिच्याएवढी क्षमता पण माझ्यात नाही. पण या विषयातील माझा अभ्यास चांगला आहे. म्हणून तर स्टेजवर जायच्या आधी माझं ज्ञान चांगलं आहे, माझी तयारी चांगली आहे हा विचार करून आत्मविश्वास वाढवला होता. पण जेव्हा टाळ्या वाजल्या तेव्हा मात्र सोनाली नव्हती म्हणूनच मला या टाळ्या मिळू शकल्या या विचारामागे मी स्वत:ला कुठे तरी कमी लेखलं आणि त्या क्षणी तिच्याबद्दल असूया वाटली आणि तो विचार मनात येऊन गेला.’’ या जाणिवेने आता केतकीच्या मनातील सल कमी झाली होती.
एक दिवस तिला मनाच्या एका श्लोकात याचं उत्तर सापडलं. या विचारांच्या बाबतीत समर्थ रामदास स्वामी म्हणतात, ‘मना पाप संकल्प सोडुनी द्यावा । मना सत्य संकल्प जीवी धरावा। आपल्या मनात कधी कधी महाभयंकर विचार येतात. हे आपलेच विचार आहेत का असा प्रश्न पडतो. मनात कोणते विचार यावेत हे आपल्या हातात नाही. पण हे विचार आपल्या मनात येत आहेत हे कळणं मात्र आवश्यक आहे. ही सजगता आल्यावर ते आपले विचार आहेत याचा स्वीकार करणे दुसरी पायरी आहे. तो विचार मनात आल्यावर तो योग्य आहे की अयोग्य हे मात्र आपण नक्कीच विवेकबुद्धी वापरून ठरवू शकतो. तो जर अयोग्य, पापाचा, अनीतीचा असेल तर तो सोडून द्यायचा आहे. तो अयोग्य विचार अमलात न आणणं हे, त्या दृष्टीनं प्रयत्न न करणं हे तर आपल्या हातात आहे.

तिला आपल्या मनात आलेला विचार समजला होताच. तिनं विचारांना योग्य ती दिशा दाखवली. ‘आपल्या मनात आला तो फक्त विचार होता. ठीक आहे. त्या दृष्टीने काहीही कृती नव्हती. मी सोनालीचं नक्कीच वाईट चिंतत नाही. किंवा त्या दृष्टीने कोणतीही पावलं उचलत नाही आहे. त्यामुळे मी दुष्ट किंवा नीच नक्कीच नाही. माझं तिच्यावर प्रेम आहे. मग माझा मी असा मानसिक छळ का केला? माफ करायला पाहिजे होतं स्वत:ला. परवाच्या दिवशी कामवाल्याबाई घरातील सफरचंद उचलून घेऊन जाताना आपण पकडलं. ती कामावरून काढू नका म्हणून गयावया करू लागली. घरातील लहान मुलांसाठी घेतलं म्हणाली. तेव्हा तिला काहीही हवं असेल तर विचारून घे, असं सांगून तिला मनोमन माफ करून टाकलं होतं. पण स्वत:च्या बाबतीत मात्र आपण खूप कठोर वागलो. उदार मनाने आपण आपल्याला माफ करायला शिकलं पाहिजे..

परत अशा प्रकारचे विचार जर मनात आलेच तर त्यांना खुशाल येऊ देत. त्याच्यावर मी कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया देत बसणार नाही. किंवा मी तो विचार रवंथही करत बसणार नाही. या आपल्या विचारांना वळण लावलं पाहिजे. आपल्याकडे संतांनी, आधुनिक मानसशास्त्रज्ञांनी सांगितलेले अनेक मार्ग आहेत त्यांचा अभ्यास करायला हवा. योगाच्या वर्गात योगाभ्यास हा एक उत्तम मार्ग आहे हे सांगतातच. ते म्हणतात त्याप्रमाणे योग ही एक जीवनशैली बनवायला पाहिजे.’ या विचाराने केतकीला खूप हायसं वाटलं.
ती मनात म्हणाली, ‘‘सोनालीची तिच्या स्वत:शी किती छान मैत्री असेल नाही? मी किती भाग्यवान आहे मला सोनालीसारखी मैत्रीण मिळाली. मी पण माझ्याशी मैत्री करण्याचा प्रयत्न करेन.’’
केतकीने विचारांना योग्य ती दिशा देण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. आपण पण तिच्या पावलांवर पाऊल टाकू या. आपल्यालाही जमेल.

– माधवी गोखले

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 5, 2016 1:03 am

Web Title: first we have to friendship with our self
Next Stories
1 अचपळ मन माझे
2 कृती आधी विचार..
3 ध्रुवबाळाच्या गोष्टीचा मथितार्थ
Just Now!
X