ध्रुवाचा पिता, उत्तानपाद राजा आपल्या सर्वामध्ये दडलेला आहे. आपल्या मनात नेहमी नीती आणि रुची वास करून असतात. बहुतांश वेळी रुची नीतीवर मात करते. अढळपदासाठी ध्रुवबाळ एका पायावर उभा राहिला म्हणजेच त्याने आपल्या रुचीला लगाम घालून नीतिमत्ता जागरूक ठेवली. तेव्हा त्याला अढळपद मिळाले. आपणही रुचीला मुरड घालत सुनीतीच्या मार्गावर चालायला हवं..
महाविद्यालयामध्ये असताना एकदा आम्ही स्टडी टूरला गेलो होतो. शिक्षक आणि आम्ही गप्पा मारत असताना अचानक आमचे सर म्हणाले, ‘मी तुम्हाला ध्रुवबाळाची गोष्ट सांगतो.’ आम्ही महाविद्यालयातले विद्यार्थी होतो, त्यामुळे ही कसली गोष्ट ऐकायची असे वाटले. आम्ही सरांना सांगितले ही गोष्ट लहानपणी खूप वेळा ऐकली आहे. यात काय ऐकायचे? आमची स्पष्ट नाराजी त्यांच्यापर्यंत पोहचवली. पण तरीही त्यांनी आम्हाला गोष्ट सांगितली.

आपल्याला माहीत असलेली ध्रुवबाळाची गोष्ट म्हणजे : उत्तानपाद राजाला दोन राण्या होत्या. सुनीती आणि सुरुची. सुरुची राजाची लाडकी राणी होती आणि सुनीती नावडती राणी होती. ती धर्मराजाची मुलगी होती. सुरुचीच्या मुलाचे नाव होते उत्तम तर सुनीतीच्या मुलाचे नाव होते ध्रुव. एकदा राजाच्या मांडीवर ही दोन्ही मुले बसली होती. सुरुचीने हे पाहिले आणि तिला खूप राग आला. तिने खसकन ध्रुव बाळाला राजाच्या मांडीवरून उतरवले. ती ध्रुवबाळाला म्हणाली, तुला मांडीवर बसण्याचा अधिकार नाही. ध्रुवबाळ खूप दुखावला गेला. त्याने मनाशी निश्चय केला की आपण अशी जागा मिळवायची की जिथून आपल्याला कोणीही हलवू शकणार नाही. देवाला प्रसन्न करण्यासाठी त्याने तपश्चर्या करायचे ठरवले. लोकांनी त्याला अडवण्याचा प्रयत्न केला, तो लहान असल्याचे सांगितले. पण त्याचा निर्धार कायम होता. तो जंगलात गेला. एका पायावर उभा राहिला. त्याने तपश्चर्या करायला सुरुवात केली. कधी जोराचा पाऊस-वादळ, कधी खूप थंडी तर कधी खूप ऊन, वणवे, जंगली श्वापदे यांचा सामना करावा लागला. पण ध्रुवबाळाचा निश्चय ढळला नाही. तो एका पायावर उभा राहून तपश्चर्या करत राहिला. विष्णू त्याला प्रसन्न झाला आणि त्याला उत्तरेकडे अढळ स्थान मिळाले. आपल्याला सगळ्या ग्रह ताऱ्यांचे स्थान बदलताना दिसते, पण ध्रुव ताऱ्याचे स्थान मात्र कधीच बदलत नाही. त्याचे स्थान अढळ आहे.

shares market, stock prices
तेजीला पूर्णविराम की स्वल्पविराम?
GST Uniform taxation of goods and services
‘जीएसटी’च्या ध्येयपूर्तीसाठी…
taiwan earthquake reason
Taiwan Earthquake: २५ वर्षांतील सर्वात मोठ्या भूकंपाने हादरला देश, तैवानमध्ये वारंवार भूकंप का होतात?
Return journey to Alexander
भूगोलाचा इतिहास: ..जेव्हा सम्राट हतबल होतो!

आता गोष्टीचा वास्तव अर्थ बघू या. उत्तानपाद हा शब्द उत्तान आणि पाद या दोन शब्दांपासून बनला आहे. उत्तान म्हणजे अस्थिर आणि पाद म्हणजे पाय. ज्याचे पाय स्थिर नाहीत असा उत्तानपाद राजा. पाय स्थिर नाही याचाच अर्थ त्याचे मन स्थिर नाही. सुनीती शब्द सु आणि नीती या दोन शब्दांपासून बनला आहे. सु म्हणजे चांगले, नीती म्हणजे सद्प्रवृत्ती, सदाचरण, सारासारविवेक, सत्य असा व्यापक अर्थ नीतीचा होतो. ती धर्माची मुलगी होती. व्यावहारिक नियमांना नीती म्हणतात. नीतीने वागणे हा आपला धर्म असायला पाहिजे नाही का? नीतीचा मुलगा ध्रुव जो आता अढळस्थानी आहे. सुरुची, सु आणि रुची या दोन शब्दांपासून बनलेला आहे. स्वत:ला जे आवडते, योग्य वाटते ती रुची. त्यामुळे रुची ही मात्र वैयक्तिक असते. त्यामुळे ती उत्तमच असणार. म्हणून तिचा मुलगा उत्तम. सुनीती आणि सुरुची हे दोन्ही उत्तानपाद राजाचे दोन अस्थिर पाय झाले. अस्थिर पाय हे अस्थिर मनाचे द्योतक आहे.

उत्तानपाद राजा आपल्या सर्वामध्ये दडलेला आहे. आपल्या मनात नेहमी नीती आणि रुची वास करून असतात. पण बहुतांश वेळी रुची नीतीवर मात करते, पण आपण नीतीप्रमाणे योग्य वागायला हवे. ध्रुवबाळ एका पायावर उभा राहिला म्हणजेच त्याने आपल्या रुचीला लगाम घातला. ज्या पायावर उभा राहिला तो सुनीतीचा होता, तो सुनीतीचा मुलगा होता. त्याने आपली नीतिमत्ता जागरूक ठेवली. त्याला खूप संकटांना तोंड द्यावे लागले. त्याने तपश्चर्या केली तेव्हा त्याला हवे असलेले अढळ स्थान मिळाले. आपल्याला पण नीतीच्या मार्गावरून जाताना अडथळे येणारच आपली रुची आपल्याला नीती-नियमांच्या मार्गावरून ढकलण्याचा प्रयत्न करणार. परंतु ध्रुवाप्रमाणे आपणसुद्धा रुचीला मुरड घालायची सु-नीतीच्या मार्गावरून जायचा प्रयत्न करायचा तर आपल्यालाही आपले साध्य मिळेल.

उदाहरण बघायचे झाले तर नेहमीचे सिग्नलचे बघू या. रस्त्यावर नेहमीसारखा ट्रॅफिक नाही. माझ्यापुढे तीन गाडय़ा असतात. पिवळा सिग्नल पडतो पुढच्या दोन गाडय़ा पुढे निघून जातात. लाल सिग्नल पडतो. पुढची शेवटची गाडी सिग्नल तोडून पुढे जाते. माझे एक मन (जे नीतीने, नियमाने जात असते ना ते) मला बजावत असते. अरे बाबा, लाल सिग्नल पडलाय. आता थांबले पाहिजे, सिग्नल तोडणे योग्य नाही. दुसरे माझे मन म्हणते (जी माझी मर्जी आहे, रुची आहे) सिग्नल पाळायचा मी एकटय़ानेच ठेका घेतलाय का? काय फरक पडतो सिग्नल तोडल्याने? आणि माझी मर्जी यात श्रेष्ठ / उत्तम ठरते. मग ती माझ्या मनात नीतीने जाणारा, सिग्नल न तोडण्याचा विचार असतो त्याला ढकलून देते. जसे सुरुची ध्रुव बाळाला राजाच्या मांडीवरून ढकलून देते. मग मी सिग्नल तोडून पुढे जातो. कदाचित मी तसाच पुढे जाऊही शकेन. कदाचित दुसऱ्या बाजूने वाहन आले तर अपघात होऊन माझे किंवा समोरच्याचे जन्मभराचे नुकसान होऊ शकेल. सर्वाच्या हितासाठीच हे नियम, कायदे कानून केलेले आहेत. त्यामुळे आपल्या मनातील अगदी क्षीण आवाजात का होईना जी सुनीती बोलते आहे तिचे ऐकू या का?

दुसरे अगदी आपल्या बाबतीत होणारे उदाहरण बघू या. आपल्यापैकी बहुतेकांना जीवनशैलीत घडलेल्या बदलांमुळे अ‍ॅसिडिटीचा त्रास होतो. आपल्याला माहीत असतात त्याची कारणे. ऑफिसमध्ये कोणी तरी खेकडा भजी, बटाटेवडा ऑर्डर करतो. सगळे जण त्यावर तुटून पडतात. मला माझे भले कशात आहे, हे माझे (सुनीती) एक मन सांगत असते. ते मला आहाराच्या नियमांची आठवण करून देत असते. तर दुसरे मन (सुरुची )म्हणते, तुला आवडतंय ना मग खा की. कुणाला भितोस, अ‍ॅसिडिटीला? अरे खा बिनधास्त. अजून दोन दिवस गोळ्या खा, त्यात काय एवढे. परत पहिले मन म्हणते, अरे अशासारख्या गोळ्या घेणे बरोबर नाही. पुढे जाऊन अजून त्रास होईल. मग दुसरे मन म्हणते खा खा दोन वडे आणि एक प्लेट भजी खाऊन काही आकाश कोसळत नाही. आपण त्याच्यावर यथेच्छ ताव मारतो. औषधे पुढची चार दिवस घेतो. म्हणजेच आपल्या स्वत:च्या बाबतीतही आपले सुरुचीवाले मन बऱ्याच वेळा बाजी मारते.

गोष्ट ऐकल्यावर वाटले ही गोष्टपण आपल्याला हठयोगच सांगते आहे की. आपल्या मनातही परस्परविरोधी विचार चालू असतात. काही सुनीतीचे तर काही सुरुचीचे. या ठिकाणी मात्र सुनीतीचे विचार जिंकले तर आपण ध्रुवासारखं आनंदाचं अढळपद मिळवू शकू.