‘‘मित्रांच्या दबावाला बळी न पडता कणखरपणे वागायचं कसं याचे धडे आदित्यला द्यायला हवेत. या माहितीचा स्फोट होत असलेल्या जमान्यात योग्य माहिती त्यांच्यापर्यंत पोहचवण्याचं जिकिरीचं काम आहे. त्याची तयारी पालक म्हणून आम्हा दोघांना करायला हवी, त्याचे मित्र बनून.’’ स्वत:शी संवाद साधून केतकी बऱ्यापैकी शांत झाली.

केतकी ऑफिसला जायच्या गडबडीत होती. इतक्यात फोनची रिंग वाजली. आदित्यच्या शाळेतून फोन होता. ‘पालकांनी भेटायला या’ असा वर्गशिक्षिकेचा फोन होता. काय झालं असेल याची चिंता केतकीला पोखरू लागली. तिने ऑफिसमध्ये फोन करून येत नसल्याचं कळवलं. मकरंदला आज उशिराने ऑफिसला जायचं होतं. म्हणून दोघंही शाळेत वर्गशिक्षिकेला भेटायला गेले.

शाळेत गेल्यावर बाईंनी सांगितलं की, आदित्य मागच्या आठवडय़ात दोनदा आणि कालही अनुपस्थित होता. आई-बाबा बाहेरगावी गेले असल्याने चिठ्ठी आणू शकलो नाही असं त्यानं बाईंना सांगितलं. काल त्यांच्या बाईंनी शाळेबाहेरच्या एका कोपऱ्यात दोन मुलांबरोबर सिगारेट ओढताना बघितलं. बाईंना बघून लागलीच सिगारेट टाकून दिली आणि तेथून पळ काढला. हे सर्व ऐकून केतकीच्या पायाखालची जमीन सरकली. पण तिचं मन सांगत होतं की, आदित्य असं करणं शक्यच नाही. तिने लागलीच बाईंना विचारलं, ‘‘आदित्य असं करणं शक्यच नाही. तुम्ही दुसऱ्या कोणाला तरी नाही ना बघितलं?’’ बाईंनी तो आदित्यच होता असं ठामपणे सांगितलं. त्या म्हणाल्या की, ‘‘आदित्य खूप चांगला मुलगा आहे. पण त्याची आताची लक्षणं काही ठीक दिसत नाहीत.’’ केतकीचे पाय लटपटायला लागले, तोंडाला कोरड पडली. मकरंदला तिची अवस्था लागलीच लक्षात आली. त्याच्याही मनात घालमेल चालली होती. केतकी कितीही विचारी असली तरी मुलांच्या बाबतीत ती खूप हळवी आहे. तेव्हा ती विवेकाने विचार करणं विसरून जाते. तिला आता आधाराची गरज आहे हे लक्षात घेऊन त्याने स्वत:च्या मनाला आवर घातला.

घरी जाताना केतकीच्या डोक्यात विचारांनी थैमान घातलं होतं. ‘‘असा कसा बिघडला हा? वाईट संगत कशी लागली?  पण तरीही आदित्य असं वागूच कसा शकतो? त्याला स्वत:ची अक्कल नाही का? मी नोकरी करायला नको होती. मीच संस्कार करण्यात कुठे तरी कमी पडले.’’ तिनं मकरंदला हे सगळं बोलून दाखवलं. तो तिला समजावत म्हणाला, ‘‘तुला आता कसं वाटतं आहे ते मला कळत आहे. माझी अवस्थाही फारशी वेगळी नाही, पण तुझ्या नोकरी करण्याचा आणि त्याच्या अशा वागण्याचा काहीही संबंध नाही. तो घराशिवाय बाहेरून अनेक गोष्टी शिकणार ना? त्यामुळे तू या अपराधी भावनेतून बाहेर पड. यातून शांतपणे मार्ग कसा काढायचा ते बघू.’’ केतकी नुसतंच ऐकत होती पण तिच्या डोक्यात एकही अक्षर घुसलं नव्हतं.

आदित्यला आई-बाबा शाळेत येऊन गेल्याचं माहीत नव्हतं. त्यानं घरात पाऊल टाकताच क्षणी केतकीने त्याला विचारलं, ‘‘सिगारेट ओढायला लागलास तू?’’ आदित्यला हा प्रश्न अनपेक्षित होता. तो सावरून घेत म्हणाला, ‘‘काहीही विचारतेस तू.’’ केतकीने त्याच्यावर प्रश्नांचा भडिमार केला, ‘‘शाळेला दांडय़ा मारतोस? कुठे जातोस? काय करतोस? हेच का शिकवलं आम्ही तुला?’’ आदित्य सगळ्याला ‘‘असं मी काही केलंच नाही’’ असं सतत चढय़ा आवाजात, अरेरावीने सांगत होता. त्याचं खोटं बोलणं केतकीला सहन होत नव्हतं. वातावरण तापलेलं पाहून मकरंदने सगळ्यांना जेवायला वाढलं.

जेवणानंतर मकरंदने केतकीला आदित्यशी बोलू दिलं नाही. तो तिला रूममध्ये घेऊन आला. केतकी मकरंदवर बरसली, ‘‘चांगला त्याला जाब विचारणार होते. चक्क खोटं बोलतो आहे. लाज नाही वाटत त्याला? सगळी परिस्थिती हाताबाहेर चालली आहे. पूर्वी कसं सगळं सुरळीत होतं. गुणी मुलगा होता. आता शिंगं फुटली आहेत. आता तर सारखा धडपडत तरी असतो किंवा काहीतरी पडत तरी असतं त्याच्या हातून.’’ इतक्यात बेल वाजली. केतकी दरवाजा उघडायला गेली तेव्हा आदित्यशी बोलायच्या आधी केतकीशी कसं आणि काय बोलायचं याचा मकरंद विचार करू लागला. ‘केतकीला जसा मेनोपॉजचा त्रास होत होता तसाच आदित्यची ही पौगंडावस्थेतली समस्या असणार. घडायचं ते घडून गेलं आहे. असं परत घडणार नाही याची काळजी घ्यावी लागेल. मागे कुठेतरी वाचलं होतं की, या वयात मुलांच्या हातून वस्तू पडतात, निसटतात. त्यामुळे हे तो मुद्दाम किंवा निष्काळजीपणाने करत नसणार. त्यांची शारीरिक, भावनिक, मानसिक आणि सामाजिक वाढ होत असते. मीही या वयात असताना बऱ्याच वेळा बऱ्याच गोष्टींमुळे संभ्रमात असायचो. त्यावेळचं वातावरण आणि आताचं वातावरण यात जमीन-अस्मानाचा फरक पडलेला आहे. या सर्व बदलांना तोंड देणं त्याच्यासाठीही सोपं नसणार. तो म्हणतोच की, आमचे प्रॉब्लेम्स तुम्हाला नाही कळणार. त्यामुळे आदित्यच्या अशा वागण्यामागचे कारण म्हणजेच तो असा का वागला. त्याला काय वाटत होतं म्हणून तो असा वागला हे त्याच्याकडून जाणून घ्यायला हवं. त्याला बोलतं करायला हवं.’’

केतकी आत आली. मकरंदने आदित्यला बोलावून शांतपणे विचारलं, ‘‘तू शाळेत तीन दिवस का गेलास नव्हतास? आम्ही शाळेत जाऊन आलो आहोत. त्यामुळे खरं काय ते सांग. त्यामागचं कारण काय होतं आणि हे सगळं करून तुला काय वाटलं?’’ मकरंदच्या शांतपणे बोलण्याचीच आदित्यला भीती वाटली. त्याने सांगितलं, ‘‘अपूर्व, निशांत म्हणाले की, दोन दिवस शाळा बंक करू या का? कोणाला काही कळणार नाही नि मस्त मजा मारू. मग आम्ही शाळेजवळच्या मॉलमध्ये फिरलो. तुम्ही दिलेले पैसे होते. त्यात बाहेर वडापाव खाल्ला. कोल्डड्रिंक्स प्यायलो.’’ मकरंदने सिगारेटविषयी विचारलं. त्यावर त्याने उत्तर दिलं, ‘‘अपूर्व, निशांत म्हणाले सिगारेट ओढण्यात थ्रिल असतं. स्टाइलीत ओढायची. मी त्यांना सांगितलं की, आई-बाबांना आवडणार नाही, शिवाय त्याने कर्करोग आणि बाकीचे रोग होतात. पण त्यांनी मला सांगितलं की, एकदा सिगारेट ओढून काही होत नाही. ट्राय करायची प्रत्येक गोष्ट.’’ केतकी त्याच्यावर कावलीच, ‘‘अरे, एवढा घोडा झालास तुला स्वत:ची अक्कल आहे ना?’’ आदित्य लागलीच म्हणाला, ‘‘अगदी असंच माझे मित्र म्हणाले. एवढा मोठा झालास तरी आई-बाबांचं कुक्कुलं बाळ राहाणार आहेस का तू. स्वत:ला वाटतं ते कर की. तुला तुझी मतं नाहीत का? मग मला मी एकदम शामळू वाटलो. शिवाय ते माझी मैत्री तोडतील अशी भीती होती. मलाही सिगारेट ओढण्यात थ्रिल आहे असं वाटत होतं. ती ट्राय करत असतानाच नेमकं बाईंनी बघितलं. हे तुम्हाला कळलं तर तुम्ही रागावाल तुम्हाला वाईट वाटेल म्हणून मघाशी खोटं सांगितलं.’’ शेवटचं वाक्य बोलताना त्याला मेल्याहून मेल्यासारखं होत असणार हे केतकीला जाणवलं. तिला स्वत:ला सावरण्यासाठी काही वेळ हवा होता. ती त्याला म्हणाली, ‘‘यावर विचार कर आणि कसं वागायचं ते ठरव. स्वत:ला काही नियम हवे आहेत का काहीच नको हे बघ. पण त्याच्या होणाऱ्या परिणामांना पण तयार राहा. कोणतंही स्वातंत्र्य फुकट मिळत नाही. तुझ्या मदतीला आम्ही दोघं नेहमीच आहोत.’’

आता स्वत:च्याच शेवटच्या वाक्यापाशी ती थबकली. स्वत:चं वागणं ती तपासू लागली. ‘मदतीला आहोत’ असं म्हटलं खरं पण त्याच्या छोटय़ा छोटय़ा आनंदात मात्र सहभागी होतोच असं नाही. परवा तो एक गाणं ऐकवायला आला तर मला तुमची उथळ, कर्कश गाणी आवडत नाहीत म्हणून धुडकावून लावलं. तो एकदा तरी ऐक म्हणून सांगत होता पण मी त्याचं ऐकलं नाही. आपल्यावेळची गाणी आपल्या आई-वडिलांना उथळ वाटायची. ही जनरेशन गॅप राहाणारच. पण त्याच्या आवडीत मी रुची दाखवायला हवी होती. तरच या त्यांच्या नाजूक वयाच्या टप्प्यावर जेव्हा त्यांचं सर्वस्व मित्र असतात त्या वेळी काही वेळापुरतं का होईना त्यांच्याशी मित्रत्वाचं नातं जोडता येईल. शरीरानं मोठे झाले पण मेंदू तितका प्रगल्भ झालेला नाही. त्यामुळेच सारासार विचार करता येत नाही. तेव्हा पालक म्हणून खंबीरपणे उभं राहायला हवं. लोक काय म्हणतील यापेक्षा मुलाचं हित सतत डोळ्यांसमोर ठेवून वागायला हवं. नीट वागा म्हणजे नक्की कसं हे समजावून सांगायला हवं. मित्रांच्या दबावाला बळी न पडता कणखरपणे वागायचं कसं याचे धडे द्यायला हवेत. या माहितीचा स्फोट होत असलेल्या जमान्यात योग्य माहिती त्यांच्यापर्यंत पोहचवण्याचं जिकिरीचं काम आहे. त्याची तयारी पालक म्हणून आम्हा दोघांना करायला हवी. दिवसातील काही वेळ तरी मुलांबरोबर त्यांचा कल, परिस्थिती बघून त्यांच्या आवडीच्या विषयात इंटरेस्ट घेऊन त्यांची मैत्रीण व्हायचा प्रयत्न करायचा. बाकीच्या वेळी आहोतच आपण पालक! स्वत:शी संवाद साधून केतकी बऱ्यापैकी शांत झाली होती.

माधवी गोखले madhavigokhale66@gmail.com