‘‘तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार,’’ असे वामनराव पै म्हणतात ते खरंच आहे. शिल्प म्हणजे दगडातील नको असलेला भाग काढून टाकणे. आपल्याही जीवनातील अनावश्यक, त्रासदायक भाग काढून टाकायचा असेल, स्वत:ला आनंदी, समाधानी करायचं असेल, तर त्यासाठी आपले आपल्याशी असलेले नाते उत्तम असायला हवे. मला मी ओळखतो का? माझ्या मनात नेमके काय व का चालले आहे, याचे भान असणे आवश्यक आहे. त्यासाठी आपला आपल्याशी संवाद असणे गरजेचे आहे. तो संवाद कसा करावा, कसा वाढवावा, त्यासाठी कोणकोणते मार्ग आहेत, हे सांगणारं हे सदर दर पंधरा दिवसांनी.

नूतन वर्षांभिनंदन! हे वर्ष सगळ्यांना सुखाचे, समृद्धीचे, भरभराटीचे जावो.. असे म्हणण्यापेक्षा आपण असे म्हणूयात का, की आपण हे वर्ष सुखाने, समृद्धीने आणि आनंदाने जाण्यासाठी प्रयत्न करूयात? आपण खरंच तसे प्रयत्न करूयात म्हणजे आपण दुसऱ्या गोष्टी, परिस्थिती, माणसं यांवर आपल्या सुखासाठी अवलंबून राहण्यापेक्षा आपण आपल्या सुखाची जबाबदारी घेऊ या आणि सुरुवात करू या.

समजा, जर आपल्याला मुंबईहून दिल्लीला जायचे आहे, तर कधी बसने, कधी कारने, कधी ट्रेनने जाऊ . कधी विमानाने जाऊ, तर कधी तरी काश्मीरला जाऊन परत उलटे दिल्लीला येऊ, पण यायचं दिल्लीलाच. म्हणजे कधी तरी अगदी चौकटीबाहेरच्या मार्गानेही प्रवास करू. अशा प्रकारे आपण सुखाने, आनंदाने, समृद्धीने जगण्यासाठीच्या प्रवासाला सुरुवात करू या. वेगवेगळ्या मार्गाचा, साधनांचा वापर करूयात. कधी तरी चाकोरीबाहेर जाऊन बघू या. सुख, समाधान, आनंदाच्या थांब्यावर जाताना मध्ये काही राग, लोभ, मत्सर, ताण, अस्वस्थता, दु:ख अशी पण अनेक स्थानके लागणार. तिथेही आपण थांबणार, पण काहीही झाले तरी परत यायचं ते मात्र सुख, समाधान, समृद्धीच्या थांब्यावरच.

या उद्दिष्टासाठी आपण वेगवेगळ्या साधनांचा उपयोग करू या. जसे की काही भावनिक कौशल्ये, भावनांविषयीचे चातुर्य-हुशारी, योग, गोष्टी, पूर्वपरंपरागत चालत आलेल्या काही गोष्टी, विवेकनिष्ठ मानसोपचार पद्धती बघू. आय क्यू आपल्याला माहीत आहे, पण त्याचबरोबरीने ईक्यू, एसक्यू (सोशल- स्पिरिच्युएल कोशंट) यांचीही अधिक माहिती करून घेऊ. शरीर स्वास्थ्यासाठी व्यायाम करतो, आहाराचे नियम पाळतो. तसेच मन, भावनांच्या स्वास्थ्यासाठी यांचा वापर करू या. आचरणात आणूयात. आचरणात आणणे सगळ्यात महत्त्वाचे आहे.

आपण बघतो की, कधीकधी काही उत्तमोत्तम कोरिओग्राफर त्यांच्या शिष्यांकडून खूप छान पद्धतीने नृत्य करून घेऊ शकतात; पण स्वत: मात्र नाच करू शकत नाहीत किंवा एखादी आहारतज्ज्ञ जो सल्ला देते त्याने समोरच्याचे वजन कमी होते, पण तिचे स्वत:चे मात्र वजन कमी होत नाही. याचे मुख्य कारण म्हणजे ते जे ज्ञान, कौशल्य दुसऱ्याला सांगतात त्याचा उपयोग ते स्वत: करत नाहीत, आचरणात आणत नाही, त्यामुळे त्यांचा उपयोग होत नाही. ‘तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार,’ असे वामनराव पै म्हणतात ते खरंच आहे. तुम्हाला जे काही हवंय त्यासाठी तुम्हीच प्रयत्न करायला हवेत. शिल्प म्हणजे दगडातील नको असलेला भाग काढून टाकणे. आपणही आपल्या जीवनातील अनावश्यक, त्रासदायक भाग काढून टाकण्याचा प्रयत्न करूयात. यातही सुख म्हणजे नक्की काय असतं- परिपूर्ण, अर्थपूर्ण, यशस्वी जीवन म्हणजे काय हे शोधूयात. जीवन आनंदाने जगण्याचा प्रयत्न करू. जीवनाचा आस्वाद घेऊ. मनुष्य एकटा राहू शकत नाही. त्याला परिवार, समाजाची गरज आहे. अगदी निसर्गसुद्धा लागतो. यासाठी आपल्याला परिवार, समाज, निसर्ग यांच्याशी सुदृढ नाते संबंध प्रस्थापित करायला पाहिजेत. या सर्वाच्या आधी माझे माझ्याशी असलेले नाते उत्तम पाहिजे नाही का? मला माझा मी कळलो आहे का? मला नक्की काय आणि का हवं आहे? माझ्या मनात काय काय चालले आहे याचे भान असणे आवश्यक आहे. कोणत्या भावना माझ्या मनात आहेत? मला त्या शब्दरूपात मांडता येतात का? या भावना मला काही तरी माहिती देतात. त्याप्रमाणे माझे विचार असतात आणि मग आपण निर्णय घेतो. या सर्वाचे ज्ञान असणे, यालाच भावनिक साक्षरता म्हणतात. भावना अतिशय संसर्गजन्य असतात, तर या भावनांच्या छटा बघू. भावनिक कौशल्य, त्यांचा विकास, आणि त्यांचा जीवनात कसा वापर करता येईल ते पाहू.

समोरचा माणूस, व्यक्ती, परिस्थिती बदलता येत नसेल, तर आपण स्वत:ला बदलायचे म्हणजे नक्की काय करायचे किंवा त्याबद्दल आपला दृष्टिकोन कसा असायला हवे ते शिकू. आपल्या सोयीसाठी एक भावना निर्देशांक मापक (इमोशनल इंडिकेटर) तयार करू. योगाचा अभ्यास करताना हठयोगाची परिभाषा वाचली. ह म्हणजे सूर्य, ठ म्हणजे चंद्र. जगातील सर्वात विरोधाभास असलेल्या या दोन गोष्टी आहेत. अशा विरोधाने भरलेल्या जगात कसे जगावे हे शिकवतो तो हठयोग. ही झाली थिअरी, वाचताना खूप छान वाटली आणि आवडलीसुद्धा. म्हटले प्रत्यक्ष कसे करायचे ते बघू या म्हणून योगाच्या वर्गाला जाऊ लागले. तिथे शवासन शिकवलं. शरीर शिथिल झालं की, मनात आलेल्या विचारांकडे तटस्थपणे बघा, असं सांगितलं. हे काही केल्या जमत नव्हतं. माझेच विचार, त्यांना फक्त बघणं शक्य होत नव्हतं. उलट ते अजून जोरात आणि जास्त संख्येने मनात यायचे, पण जेव्हा भावनिक हुशारी (इमोशनल इंटलिजन्स), विवेकनिष्ठ उपचार पद्धती (आरईबीटी) (रॅशनल इमोटिव्ह बिहेवीअर थेरपी)चा अभ्यास केला तेव्हा भावना म्हणजे काय, त्या नियंत्रित करायच्या नाहीत, त्यांना बांध घालायच्या ऐवजी त्यांचे नियोजन करायचे हे कळलं. मग आपल्याच विचारांकडे त्रयस्थपणे बघता येणं म्हणजे काय ते कळलं. हे फक्त कळलं बरं का, पण फार कमी वेळा वळलं. त्यासाठी खूप अभ्यास, सरावाची गरज आहे.

योगाचे राजयोग, कर्मयोग, हठयोग, अष्टांगयोग असे प्रकार दिसून येतात. अष्टांगयोगात शरीरासाठी आसने सांगितली आहेत. शरीरशुद्धीसाठी नेती आदी क्रिया सांगितल्या आहेत. त्याचप्रमाणे मनासाठी प्राणायाम, ध्यान, धारणा, समाधी सांगितलं आहे. याची आपण तोंडओळख करून घेऊ . आयुर्वेदात मन हे एक अकरावे इंद्रिय मानले आहे. त्याचाही थोडासा अभ्यास करू. खरं तर सगळ्याचाच अभ्यास करायला सुरुवात करू या. अभ्यास म्हणजे एखाद्या गोष्टीचा सातत्याने केलेला सराव. यात यशस्वी होण्यासाठी तनमनाने शंभर टक्के त्या क्रियेशी एकरूप व्हायला पाहिजे. यासाठी आपला आपल्याशी सुसंवाद असायला हवा. विसंवाद किंवा द्वंद्व नको. नाही तर मग कसे होते, नवीन वर्षांपासून मी ठरवतो- रोज आसने करायची. मी तसे चांगले पंधरा दिवस न चुकता आसने करतो. मला माझ्यातला लवचीकपणा, उत्साह वाढलेला जाणवतो. मग माझ्यातला दुसरा मी म्हणतो, पंधरा दिवस केली न आसने, मग दोन दिवस नाही केली तर काय बिघडेल? माझ्यातला दुसरा मी वरचढ ठरतो आणि दोन दिवसांचे दहा दिवस होतात- मी आसने करत नाही. समर्थ रामदास म्हणतात- आनंदाचा अनुभव घेण्यासाठी मन तयार करावे लागते. तर चला मग आपण त्यासाठी ज्या वेळी जे उपयोगी पडेल त्या त्या साधनांचा वापर करून आपले ‘साध्य’ साध्य करायचा प्रयत्न तर करू या. आपल्या या एकत्रित प्रवासासाठी मनापासून शुभेच्छा.
madhavigokhale66@gmail.com

माझे माझ्याशी असलेले नाते उत्तम पाहिजे नाही का? मला माझा मी कळलो आहे का? मला नक्की काय आणि का हवं आहे? माझ्या मनात काय काय चालले आहे याचे भान असणे आवश्यक आहे. कोणत्या भावना माझ्या मनात आहेत? मला त्या शब्दरूपात मांडता येतात का? या भावना मला काही तरी माहिती देतात. त्याप्रमाणे माझे विचार असतात आणि मग आपण निर्णय घेतो. या सर्वाचे ज्ञान असणे, यालाच भावनिक साक्षरता म्हणतात.

अभ्यास म्हणजे एखाद्या गोष्टीचा सातत्याने केलेला सराव. यात यशस्वी होण्यासाठी तनमनाने शंभर टक्के त्या क्रियेशी एकरूप व्हायला हवे. यासाठी आपला आपल्याशी सुसंवाद असायला हवा. विसंवाद किंवा द्वंद्व नको. अन्यथा आपलच मन आपल्याच दुसऱ्या मनाच्या विरोधात जाईल आणि मग जे आपल्याला साध्य करायचं आहे ते कधीही साध्य होणार नाही. पण एकदा का मन एकरूप झालं की मात्र अनेक गोष्टी साध्य होतील.