|| रेहाना अत्तार

आज आफ्रिदकडे पाहिलं की वाटतं खरंच आपण ‘तो’ निर्णय घेतला नाही हे किती चांगलं केलं. झालं असं की, २००१ च्या सुरुवातीपासूनच मला ताप येत होता. डॉक्टरांकडे ताप येतो म्हणून दाखवायला गेले तर तो टायफॉइड असल्याचं निदान तर झालंच, पण त्याचबरोबर मी गर्भवती असल्याचंही समजलं. तेव्हा आम्ही कोल्हापुरातच राहायला होतो. तिथल्या डॉक्टरांनी तापामुळे, औषधांमुळे गर्भाच्या वाढीवर परिणाम होण्याची शक्यता सांगून गर्भपात करण्याचा सल्ला दिला. द्विधा मन:स्थितीच मी निपाणीला आमच्या गावी आले. तिथे डॉ. सुलभा कुलकर्णी यांच्याकडे माझं पहिलं बाळंतपण झालं असल्याने त्यांचा सल्ला घेतला. अर्थात तोपर्यंत पाच महिने उलटून गेले होते. त्यांनी सांगितल्याप्रमाणे सोनोग्राफी केली आणि त्यात मुलाचा मेंदू तसंच इतर अवयवांची वाढ उत्तम असल्याचं समजलं.

सोनोग्राफीमध्ये बाळाचा उजवा हात झाकला गेला होता. त्याची इतरही वाढ उत्तम असल्याने डॉक्टरांनी गर्भपात न करण्याचा सल्ला दिला. सप्टेंबर महिन्यात मुलगा झाला. बाळाचं वजनही उत्तम होतं. मात्र मला कुणाच्याही चेहऱ्यावर आनंद दिसेना. मी त्याला पहिल्यांदा जवळ घेतलं आणि मला धक्काच बसला. बाळाला उजवा हातच नव्हता. डॉक्टरांनी  मला खूप धीर दिला. मला सावरायला त्यांचे शब्दच कामी आले. त्या म्हणाल्या होत्या की, उद्या अपघातानेसुद्धा ही आपत्ती ओढावू शकते. अशा आपत्ती मोठय़ा झाल्यावर आल्या की सगळंच त्रासदायक होऊन जातं. आता बाळाच्या जन्मापासूनच हात नसल्यानं त्याला शिकवणं, सावरणं सोप्प जाईल आणि एक हात नसला तरी त्याची इतर वाढ उत्तमच आहे. मग का वाईट वाटून घ्यायचं?

मला डॉक्टरांचं म्हणणं पटलं. मी आणि त्याच्या वडिलांनी त्याचा दुसरा हात व्हायचं ठरवलं. पण आज त्याला पाहिलं की जाणवतं आम्ही नव्हे तर तोच आमचा दुसरा हात झाला आहे. आफ्रिद लहान असताना मी त्याला होता होईल तेवढं झाकून ठेवण्याचा प्रयत्न करायचे, जेणेकरून मला कोणी त्याच्या हातावरून काही विचारू नये. कारण त्यावेळी नातेवाइकांचे अनुभवही काही चांगले नव्हते. तुम्ही काहीतरी पाप केलंय, म्हणून असा मुलगा तुमच्या पोटी आला, असं सुनावण्यासही काही जणांनी कमी केलं नाही. खरं कारण माझा टायफाइड असूनही. मात्र तो जसजसा मोठा होऊ लागला तस तसे आम्ही बदलत गेलो, ते त्याच्याचमुळे. हात नसल्याचं दु:ख आम्हाला होतं, तो मात्र त्याच्या त्याच्या बालसुलभ वृत्तीनुसार वाढत होता. हात नसल्यानं त्याचं काहीच अडायचं नाही. सामान्य लहान मूल ज्या चपळाईने रांगणं, जिने चढणं, खोडकरपणा करणं करतं ते तोही करायचा. मला आठवतंय, कोल्हापूरला आम्ही भाडय़ाच्या घरात राहयचो. ते घर पहिल्या मजल्यावर होते. काही सामान आणण्यासाठी मी आफ्रिद आणि त्याच्या भावाला बरोबर घेऊन खाली उतरले होते. तेव्हा तो जेमतेम दीड-पाऊणे दोन वर्षांचा असावा, तो कधी जिना चढून घरी गेला ते कळलंही नाही. अशा किती तरी गोष्टी..

तिथूनच मी आणि त्याच्या अब्बांनी त्याला आणि मोठय़ा निहालला वाढवताना कोणताही भेद न करता वाढवायचं ठरवलं. ज्या गोष्टी निहाल करायचा त्या सगळ्या गोष्टी आफ्रिद करायला शिकला. म्हणजे खाणं-पिणं तर होतच, पण शर्टची बटणं लावणं, लिहिणं, वस्तू आणून देणं सगळंच. त्याला शाळेत घालताना मात्र माझ्यातली आई पुन्हा हळवी झाली. त्याला शाळेत मुलं त्रास देतील, तो तिथं कसा राहील असा विचार करण्यात एक र्वष वाया गेलं. शेवटी जवळच्याच एका शाळेत गेलो, तर त्यांनी माझ्या भीतीला अधिक खतपाणी घालत त्याला अपंगांच्या शाळेत घालण्यास सांगितलं. त्यानुसार मनावर दगड ठेवून अपंगांच्या शाळेत गेलो. तिथली मुलं पाहून आफ्रिदची स्थिती खूपच चांगली आहे यासाठी देवाचे आभार मानावे की त्या मुलांसाठी दु:ख करावं हेच कळेना. तिथल्या मुख्याध्यापकांनी मात्र ठामपणे इथे प्रवेश न घेता तुम्ही सामान्य मुलांबरोबरच त्याला शिकवा असा सल्ला दिला. तसंच जर कोणी शाळा प्रवेश देत नसेल तर मी स्वत: येऊन प्रयत्न करेन, असं आश्वासनही दिलं. त्यांच्या सल्ल्यानंतर आणि खूप प्रयत्नानंतर त्याला शाळेत प्रवेश मिळाला.

निहाल तसा शांत आहे, तर आफ्रिद पहिल्यापासूनच खोडकर आहे. शाळेत त्याला कोणी बोललं तर.. ही माझी भीती व्यर्थच होती ते पुढे लक्षात आलं. त्याला एका हातावरून कोणी बोललं तरी ती भांडणं त्यानं घरापर्यंत कधीच येऊ दिली नाहीत. लहानपणी सगळ्या गोष्टी स्वतंत्रपणे करायला शिकवल्याने त्याच्यात कधीच न्यूनगंड आला नाही. उलट आत्मविश्वासाने तो सगळ्या गोष्टी करायला लागला. म्हणूनच की काय अपंगत्वावर कोणी बोट ठेवलं तर त्याला त्याच्याच भाषेत सुनावून येण्यासही तो कमी करत नव्हता. मुख्य म्हणजे दादागिरीबाबतीत निहालचा हा ‘दादा’ होता.

लहानपणापासून त्याला खेळाची प्रचंड आवड होती. त्यातूनच तो पाचवीत असताना सायकल चालवायला शिकला. मग काय सहावीत त्याला सायकल आणून देण्याशिवाय गत्यंतर उरलं नाही आणि तो सहावीपासून शाळेतही सायकलनेच जायला लागला. तिथेही आम्ही कधीच त्याला घाबरवलं नाही. त्याला निहालप्रमाणे इंग्रजी माध्यमातच प्रवेश घेतला होता, मात्र खेळात जास्त लक्ष असल्यानेही असेल आणि अभ्यास इंग्रजी माध्यमात असल्यानेही त्याची म्हणावी तेवढी प्रगती होतेय असं वाटेना. मग त्याला पाचवीपासून सेमी इंग्रजी माध्यमांत प्रवेश घेतला.

एकदा तो असाच मित्रांबरोबर पोहायला गेला. भीती आफ्रिदला माहीतच नाही. पाण्यात उतरल्यावर आपल्याला हात नाही याचा कोणताही बाऊ न करता तो पोहण्याची धडपड करत होता. तिथे जलतरण प्रशिक्षक संजय पाटील यांनी त्याला पाहिलं आणि तू पोहण्याचं प्रशिक्षण घे, असा सल्ला दिला. आफ्रिदने ते घरी येऊन सांगितलंही, पण घरी काही खेळाची पाश्र्वभूमी नसल्यानं त्याकडे दुर्लक्ष झालं. मात्र पाटील सरांनी पुन्हा विचारल्यावर मात्र त्याच्या अब्बांनी सगळी चौकशी करून त्याला त्यांच्याकडे प्रशिक्षण घेण्यासाठी पाठवलं. तेव्हापासून त्याने शालेय, जिल्हा, राज्य, राष्ट्रीय तसंच आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक बक्षिसं मिळवली आहेत. त्याला एक उत्तम जलतरणपटू बनायचं आहे, त्यासाठी तो प्रयत्नही करतो आहे. यावर्षी त्याने दहावीची परीक्षा दिली तेही त्याचे पोहण्याचे प्रशिक्षण, स्पर्धा सगळं सांभाळून.

आफ्रिद आणि त्याचे अब्बा एकमेकांशिवाय राहणं म्हणजे अवघड गोष्ट, पण सध्या दोघेही एकमेकांची तयारी करून घेतात म्हटलं तर वावगं ठरू नये. आज आफ्रिद आमचा सगळ्यांचा दुसरा हात आहे. मला माझ्या कामात अगदी झाड-लोट, घर आवरणं, स्वयंपाकाची तयारी यात तर तो मदत करतोच शिवाय आमचं बांगडय़ा आणि कटलरीचे दुकान आहे, तिथेही तो त्याच्या अब्बांना आणि मला मदत करतो. अगदी बांगडय़ांच्या माळा बांधण्यापर्यंत. मला एवढंच कळतं, की मुलांना तुम्ही कधीही कमी समजू नका. त्यांना त्यांच्या उणिवांची गरज नसताना जाणीवच करू दिली नाही तर ते त्यातूनही मार्ग काढायला शिकतात, नव्हे त्या उणिवा त्यांना भासतच नाहीत. फक्त त्यांना आत्मविश्वास देण्याचा प्रयत्न करा, मग पुढे तुम्हाला कधीच मागे वळून बघायची गरज पडणार नाही.

afridmattar@gmail.com

शब्दांकन : रेश्मा भुजबळ