|| आदिती मराठे

अद्वैत येत्या जानेवारीमध्ये संगीतविशारद ही पदवी मिळवेल. त्याने नुकतंच एम.ए. (ललित कला) पूर्ण केलं आहे. संगीत विषयातच पुढे त्याला काम करायचं आहे. स्वत: अंध असून सामाजिक भान तो जपतो. तो नाटकात काम करतो, संगीताचे कार्यक्रम करतो. अद्वैतच्या सजग आणि डोळस जगण्यामागे आहे त्याची आई आदिती मराठे आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबीयांचे परिश्रम आणि ठाम विश्वास!

अद्वैतचं याच वर्षी एम.ए. (ललित कला) पूर्ण झालंय. त्याला त्या आणि गाण्याच्या क्षेत्रात करियर करायचं. तो स्वत:चे स्वतंत्र गाण्याचे कार्यक्रमही करतो. मुख्य म्हणजे संपूर्ण पुण्यात तो एकटय़ाने फिरतो. अंधपणाचा बाऊ न करता ‘डोळस’पणे जगतोय. अर्थात त्याच्यातील समजूतदारपणा, हळवेपणा, सामाजिक जाण यायला आम्हा सगळ्यांचीच कसोटी लागली होती.

अद्वैत झाला तेव्हा मला नुकताच सातवा महिना लागला होता. तो अपुऱ्या दिवसांचा असल्याने दोन महिने इन्क्युबेटरमध्येच होता. दोन महिने पूर्ण झाल्यावर आम्ही घरी परतलो. तो ४-५ महिन्यांचा झाल्यावर त्याच्या डोळ्यात काही दोष असावा, अशी शंका यायला लागली. कारण त्याचा एक डोळा लहान एक मोठा जाणवत होता. डॉक्टरांकडे घेऊन गेल्यावर त्याला दिसू शकणार नाही याचा अंदाज आला. डॉक्टरांनी सांगितलं की, तो इन्क्युबेटरमध्ये असताना जास्तीचा ऑक्सिजन दिल्यामुळे तसंच तो अपुऱ्या दिवसांचा असल्याने त्याला ‘रेटिनोपॅथी ऑफ प्रिमॅच्युरिटी’ हा आजार होऊन अंधत्व आले होते. सगळ्यात मोठा धक्का होता तो म्हणजे त्याच्या आजारावर, अंधत्वावर कोणतेही उपाय नव्हते, किंबहुना आताही नाहीत. त्यामुळे तो कायमस्वरूपी अंधच राहाणार होता. हे कळल्यावर आईचं मन ही गोष्ट सहजासहजी मान्य करायला तयार होत नाही. त्यामुळे त्या वेळी अगदी देशभरातील नेत्रतज्ज्ञांना आणि परदेशातील नेत्रतज्ज्ञांशी पत्रव्यवहाराद्वारे संपर्क साधला. अद्वैत चार-साडेचार वर्षांचा होईतो आम्ही हे प्रयत्न केले; पण कुठेच काही आशेचा किरण दिसत नव्हता. सगळ्याच तज्ज्ञांनी कोणतेही उपाय नसल्याचेच सांगितल्यावर मग मात्र सातत्याने डॉक्टरांना दिल्या जाणाऱ्या भेटी थांबवल्या. अद्वैतच्या अंधपणामुळे मीच नव्हे तर त्याचे बाबा आणि आजी-आजोबाही कोलमडले होते. आपलं मूल फक्त पाहूच शकत नाही, अन्यथा तो सामान्य आहे तेव्हा आता आपल्यालाच उभं राहणं गरजेचं आहे हे मी स्वत:ला बजावलं आणि त्या धक्क्यातून, दु:खातून बाहेर काढलं.

अद्वैतला आम्ही कोरेगाव पार्क अंध विद्यालयात घातलं. तिथे तो चौथीपर्यंत शिकला. त्याचं शिक्षण सुरळीत पार पडण्याला कारण मात्र त्याचे बाबा आहेत. त्यांनी न थकता त्याला शाळेत, पुढे महाविद्यालयात नेणे-आणणे केल्याने ते निर्विघ्नपणे पार पडले. अद्वैतचे बाबा म्हणजे अतुल मराठे यांचा व्यवसाय असल्याने त्यांनी अद्वैतच्या वेळापत्रकाप्रमाणे आपलं वेळापत्रक बनवलं होतं. माझ्या सासूबाई म्हणजे अद्वैतच्या आजी शिक्षिका होत्या, त्या अद्वैतला शिकवत असत. त्याचा अभ्यास घेता यावा यासाठी आम्ही दोघीही ब्रेल लिपी शिकलोय. त्याचा अभ्यास त्याच्या आजीने आणि मी अगदी महाविद्यालयापर्यंत घेतला, सहकार्य केले. आम्ही त्याला ब्रेलमधून तर शिकवायचोच शिवाय कॅसेटमध्ये त्याला समजेल अशा पद्धतीने अभ्यास रेकॉर्ड करून ठेवायचो. मग तो ते ऐकून समजून घ्यायचा. हीच पद्धत अगदी त्याचे एम.ए. पूर्ण होईपर्यंत वापरली.

तो लहान असताना एकदा अद्वैतला पोपटाची माहिती लिहायला सांगितली होती. हे त्यांच्या सारख्या मुलांसाठी आव्हानच होते, कारण फूल, पान, भाज्या अशा गोष्टी रंग, आकार यावरून ओळखायला शिकवता येतात, मात्र पक्षी किंवा जे प्राणी सहज उपलब्ध होत नाहीत त्याचे वर्णन कसे सांगणार? मग आम्ही येथील तुळशीबागेत जाऊन प्लॅस्टिकचा पोपट आणला आणि त्यावरून त्याची चोच त्याचा आकार वगैरेची माहिती दिली. अशाच प्रकारे अनेक पक्षी, प्राणी ओळखायला शिकवले. अद्वैतच्या आजीने त्याला चौथीत असताना स्कॉलरशिपच्या परीक्षेलाही बसवले होते. एवढेच नव्हे तर त्यांनी शाळेला विनंती करून चौथीच्या सगळ्याच मुलांना स्कॉलरशिपला बसवले, त्यांची फीसुद्धा भरली आणि त्यांना मार्गदर्शनही केले. शाळेचा स्कॉलरशिपचा निकाल १०० टक्के लागला. स्कॉलरशीपला बसणारी ही त्यांची पहिली आणि शेवटचीच बॅच ठरली, त्यानंतर असे प्रयत्न झाले नाहीत. चौथीनंतर मात्र पुण्यातल्या कुठल्याच सामान्य शाळेत त्याला प्रवेश मिळाला नाही. त्या वेळचा अनुभव फारच त्रासदायक होता. अखेर पाचवी ते सातवी तो मुंबईतल्या ताडदेव इथल्या ‘व्हिक्टोरिया मेमोरिअल स्कूल’ या शाळेत शिकला. आठवीला त्याला पुण्याच्या ‘ज्ञानप्रबोधिनी’ या शाळेत प्रवेश मिळाला. त्या शाळेमध्ये त्याला लेखनिकही मिळाला, त्यामुळे दहावीचे त्याचे शिक्षण उत्तमरीत्या पार पडले. माझी खरी कसोटी लागली होती ती अद्वैतला समजावताना. त्याला मी म्हटलं होतं की, ‘‘तुला फक्त डोळेच नाहीत, पण असे अनेक जण आहेत, की त्यांना अनेक गोष्टी (अवयव) नसतात. कित्येकांना हात-पाय नसतात, ज्यांना हात-पाय आहेत त्यांना ऐकायला येत नाही, बोलायला येत नाही, मग तू हे जग आमच्या डोळ्यांनी बघ.’’ आणि अद्वैतने सगळं समजूतदारपणे स्वीकारलं. त्याच्या आजी-आजोबांनी त्याला श्लोक, गीतेचे अध्याय शिकवले. तो शाळेतही चांगलाच रमला. कॉलेजला गेल्यावर तो त्याच्या गॅजेट्समध्ये लेक्चर रेकॉर्ड करून आणायचा आणि त्याच्यावरून अभ्यास करायचा. त्याला मोबाइल, अत्याधुनिक गॅजेट्स अगदी सहजपणे हाताळता येतात.

सगळ्यांच्या सहकार्यामुळे असेल तो घराबाहेर पडायला कधी बुजला नाही. नातेवाईकांचाही सकारात्मक पाठिंबा मिळाल्याने असेल लोकांमध्ये वावरण्याचा आत्मविश्वास त्याला आला. अद्वैतच्या प्रवासात त्याला अगदी काही अपवाद वगळता वाईट अनुभव फारसे आले नाहीत. त्याने पुणे विद्यापीठात बी.ए.साठी प्रवेश घेतल्यानंतर त्याच वर्षी त्याच्या प्राध्यापक मॅडमनी मला बोलावून घेतलं आणि तुमचा मुलगा ‘स्लो लर्नर’ आहे, असे सांगून दुसरीकडे प्रवेश घेण्याचा सल्ला दिला होता. अर्थात ‘इतक्या वर्षांत हे सांगणाऱ्या तुम्ही पहिल्याच आहात आणि शेवटच्याही असाल’, असं मी ठणकावून आले होते. मात्र या प्रकारामुळे अद्वैत फारच अस्वस्थ झाला होता. त्यातून त्याला सावरत अधिक चांगल्या प्रकारे अभ्यास करण्यासाठी त्याला प्रवृत्त केले आणि आज तो उत्तम गुणांनी एम.ए. झालाय. अर्थात त्या प्राध्यापिकेनेही सुरुवातीला अद्वैतला समजण्यात चूक झाली हे मान्य केले. एम.ए. करताना त्याच्या मित्रमैत्रिणींनी त्याला खूप सहकार्य केलं.

अद्वैतला आम्ही शाळेत असतानाच अलूरकर म्युझिक क्लासेसमध्ये गाणं शिकायला पाठवलं होतं. त्याला गाण्याची आवड आहे हे लक्षात घेऊन मग त्याची गाण्याची शिकवणी कायम सुरू ठेवली. तो जानेवारी महिन्यात गांधर्व विद्यालयातून संगीतविशारद ही पदवी पूर्ण करेल.याच महाविद्यालयातून तो पद्माकर थत्ते यांच्याकडे गाणं शिकला. तसंच तो उस्ताद अन्वर कुरेशी यांच्याकडे गझल शिकतो. श्रीधर फडके यांचेही त्याला मार्गदर्शन मिळत आहे.  त्याला कतरिना कैफबरोबर एका जाहिरातीत झळकण्याचीही संधी मिळाली आहे. स्वागत थोरात यांच्या ‘अपूर्ण मेघदूत’ या नाटकातही तो काम करतो. त्यांच्या प्रशिक्षणामुळे अद्वैत अधिकच मोकळा झाला.

अद्वैतशी माझा सतत संवाद सुरू असतो. रोज रात्री आम्ही काही वेळ संगीत ऐकण्यात घालवतो आणि त्या वेळी दिवसभरातल्या घडामोडींवर चर्चाही करतो. तो अतिशय संवेदनशील आहे. आम्ही कोणी आजारी असलो तर औषधं वेळेवर घेतोय ना, याची चौकशी करेल, एवढेच नव्हे तर आमच्या नातेवाईकांनाही नियमित फोन करून त्यांची विचारपूस करेल. असा हा अद्वैत!

विशेष मूल असलं तरी मुलांवर आपण १०० टक्के विश्वास ठेवला पाहिजे. या मुलांचं पालकत्व ही संपूर्ण घराची जबाबदारी. त्यांच्या पाठीशी आपणच खंबीरपणे उभे राहायला पाहिजे. आज जगात त्यांना ‘डोळस’पणे वावरता यावं यासाठी बऱ्या-वाईटाची शिकवण दिली पाहिजे. मग या मुलांनी त्यांचं त्यांचं आकाश कवेत घेतलं नाही तरच नवल!

adeetee1968m@gmail.com

chaturang@expressindia.com

शब्दांकन – रेश्मा भुजबळ