आतापर्यंत जिद्दीने आणि कणखर स्वभावाने यशाची नवनवीन क्षितिजे ओलांडत ‘ती’ने अनेक पुरस्कार मिळवले. ती सातवीला असताना राष्ट्रपती अब्दुल कलाम यांच्या हस्ते मिळालेला ‘बालश्री’ हा त्यातील एक मानाचा तुरा. ती दहावीची परीक्षा ८० टक्के गुण मिळवत उत्तीर्ण झाली आहे. सेंट झेवियर्स कॉलेजमधून तिने पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले आहे. तिने हिंदुस्तानी शास्त्रीय संगीतात विशारदची पदवी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण केली आहे, संगणकाचे प्रशिक्षण पूर्ण केले आहे. जर्मन भाषेची पहिली परीक्षा उत्तीर्ण केली आहे. सध्या ती ‘बँक ऑफ इंडिया’मध्ये नोकरी करते, गाण्याचे कार्यक्रम करते, तसंच सुचित्रा भागवत यांच्याकडे भावगीत शिकते आहे. ती म्हणजे माझी धाकटी मुलगी मनश्री. मनश्री उदय सोमण! तिचं कौतुक यासाठी की ती जन्मत:च दृष्टिहीन होती आणि म्हणूनच आजपर्यंतचा तिचा प्रवास कौतुकास्पद आहे.

१९९२ मध्ये मनश्रीचा जन्म झाला तेव्हा ती दृष्टिहीनच होती. पण ते एकच व्यंग नव्हतं. तिचे मणके जोडलेले नव्हते. तिच्या मेंदूची पूर्ण वाढ झालेली नव्हती. ओठ आतपर्यंत फाटलेला होता. अशा परिस्थितीत ती नीट चालू शकेल की नाही, ताठ उभी राहू शकेल की नाही,बुद्धीने कशी असेल, याची डॉक्टरांना खात्री नव्हती. ‘ती जसजशी मोठी होईल. वजनाने भरत जाईल त्यानुसार तिच्या हालचालीवर लक्ष ठेवा आणि देवावर भरवसा ठेवा’ असं त्यांचं म्हणणं होतं. मनश्री तीन महिन्यांची असताना आम्ही तिच्या फाटलेल्या ओठाची शस्त्रक्रिया केली. ती चांगल्या प्रकारे पार पडली. मग हळूहळू तिच्या इतरही सगळ्या गोष्टी नीट होत गेल्या.

मनश्री झाली तेव्हा माझी मोठी मुलगी यशश्री चार वर्षांची होती. ‘‘मनश्रीच्या सर्व व्यंगावर मात करून आपण तिला आणि यशश्रीला उत्तमरीत्या घडवायचंय. आपल्या समोर एक मोठे आव्हान आहे ते स्वीकारून पुढे जायचं.’’ असं सांगत माझे पती,उदय यांनी नव्या आव्हानांना तोंड देण्यासाठी मला प्रेरणा दिली. आपल्या पतीचा, कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीचा आपल्याला उत्तम प्रकारे पाठिंबा आहे आणि आपण तिला उत्तम प्रकारेच घडवायची हा माझा निर्णय मग अधिकच ठाम झाला. संपूर्ण घरच मग कामाला लागलं. अगदी चार वर्षांच्या यशश्रीपासून ७० वर्षांच्या सासऱ्यांपर्यंत सगळ्यांनी उत्तम साथ द्यायची, असं ठरवलंच होतं. मग हा आघात सोसायची ताकद आपोआपच निर्माण झाली.

एक बाल मानसिकतज्ज्ञ म्हणून तिच्या मानसिक आणि शारीरिक अशा दोन्ही वाढीकडे माझं स्वत:चं बारीक लक्ष होतं. मनश्री अंध असल्यामुळे असेल पण ती रांगत नसे ती थेट बसायचीच त्यामुळे तिला उभं करून चालायला शिकवण्यासाठी बरेच प्रयत्न करावे लागले. एक मात्र होतं की घरातले सगळेच तिच्याशी अगदी लहानपणापासून गप्पा मारत असल्यानं तिचं संभाषण उत्तमच होतं. मात्र अनेक गोष्टी दिसत नसल्यानं तिला वेगवेगळ्या आवाजांची भीतीही वाटायची, म्हणजे कुत्रा किंवा इतर प्राणी. ती भीती काढून टाकण्यासाठीही मला विशेष प्रयत्न करावे लागले. मनश्रीचं अंधत्व सोडलं तर तिची बुद्धिमत्ता तीव्र होती, तिचं पाठांतरही उत्तम होतं. त्यामुळे तिला मी दृष्टिहीनांच्या शाळेत घालायचं ठरवलं. तोपर्यंत मला सर्वसामान्य मुलांच्या शाळेत अपंग मुलांना प्रवेश मिळतो हे माहीत नव्हतं. त्यामुळे मी मनश्रीला एका दृष्टिहीनांच्या शाळेत घेऊन गेले खरी पण तिथली स्थिती पाहून गहिवरलेच. माझं मन मनश्रीला त्या शाळेत घालण्यास धजेना. दरम्यानच्या काळात मला मनश्रीला सामान्य मुलांच्या शाळेत प्रवेश मिळू शकतो हे आणि दृष्टिहीनांसाठी काम करणाऱ्या ‘नॅब’ (नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड) या संस्थेची माहिती मिळाली.

यशश्री कॉन्व्हेंट शाळेत होती. पण त्या शाळेनं मनश्रीला दाखल करून घेण्यास नकार दिला. अखेर बोरिवलीतील ‘सुविद्यालय’ या मराठी माध्यमाच्या सर्वसामान्य मुलांच्या शाळेत मनश्रीला प्रवेश मिळाला. शाळेनं तिची शैक्षणिक प्रगती आणि ती इतर सर्वसामान्य मुलांसोबत कसे शिकते त्याचं निरीक्षण करण्याचं ठरवलं. तिच्या प्रगतीप्रमाणे एकेक इयत्ता प्रवेश देण्यात येईल असा निर्णय घेतला. मात्र मनश्रीला तशी अडचण आलीच नाही. तिनं पहिल्याच वर्षी संस्कृत पठण, श्लोक पठण, बालगीते यांसारख्या तोंडी स्पर्धामध्ये शाळेला बक्षिसे मिळवून दिली. त्यामुळे मनश्रीबरोबर माझा आणि तिच्या शिक्षकांचाही आत्मविश्वास वाढला. मनश्रीला ‘सुविद्यालय’ शाळेतील शिक्षक-विद्यार्थ्यांकडून भरभरून प्रेम मिळालं. तिने तिचं दहावीपर्यंतचे शिक्षण ‘सुविद्यालय’मध्येच पूर्ण केलं.

मनश्रीच्या जडणघडणीत ‘नॅब’ संस्थेचीही मोठी मदत झाली. तिथे तिच्याबरोबर मीही शिकत होते म्हणण्यास हरकत नाही. मनश्रीचं सतत निरीक्षण करणं, तिला स्वावलंबी करण्यासाठी अधिकाधिक प्रयत्न करणं अशा गोष्टींसाठी सगळे घरचे माझ्याबरोबर प्रयत्नशील होतेच पण खरी कसोटी होती ती यशश्री आणि मनश्रीला एकत्रित वाढवताना. दोघींची वाढ चांगल्या प्रकारे आणि कोणाचंही मन न दुखावता झाली पाहिजे. तसंच यशश्रीच्या मनात बहिणीबद्दल अढी निर्माण होता कामा नये याकडे माझा कटाक्ष होता. मनश्री झाली तेव्हा यशश्री शाळेत जाऊ लागली होती त्यामुळे तिचा अभ्यास, तिचे शाळेतले कार्यक्रम यांच्यात मला खंड पडू द्यायचा नव्हता आणि दोघींमधले प्रेमही कमी होऊ द्यायचे नव्हते.

लहान असताना एक दिवस यशश्री मला म्हणाली, ‘‘आपली मिनू मला कधीच बघणार नाही, माझ्याशी खेळणार नाही का?’’ माझ्यापुढे कठीण प्रसंग उभा राहिला. मी तिला सांगितलं की, ‘‘हे बघ, आपल्या मिनू बाळाला देवानं दृष्टी दिली नाही. ती तुला काय आम्हाला कोणालाही कधी बघू शकणार नाही. तेव्हा आपल्याला आहे त्या स्थितीत तिला घडवायची आहे. हे बघ, आकाशातून देव फिरत होता तो म्हणाला, असं बाळ कोणाकडे द्यायचं जिथे तुझ्यासारखी ताई आहे, आमच्यासारखे आई-बाबा आहेत, आणि आजी-आजोबाही आहेत. मग देवानं आपली निवड केली. आपण सगळ्यांनी मिळून तिला छान वाढवायचं.’’ सांगताना अभिमान वाटतो यशश्री-मनश्री दोघींचं नातं बहिणीपेक्षा मैत्रिणींचं जास्त आहे.

मनश्रीला संगीताचा कान आहे हे मला लक्षात आलं होतं. त्यामुळे तिला अस्मिता कुलकर्णी यांच्याकडे सिंथेसायझर शिकण्यास पाठवलं. तिथे अस्मिता यांनी तिला गाणं शिकण्याचा सल्ला दिला. तेव्हापासून ती गायनाचे धडे घेत आहे. त्यांच्या स्पर्धा, परीक्षा, क्लास विविध उपक्रम हे सगळं मी त्यांच्या बाबांमुळे, सासू-सासऱ्यांमुळेच यशस्वीपणे सांभाळू शकले. मनश्रीचे नृत्य असो, अभिनय असो तिला नीटपणे जमण्यासाठी तिच्याकडून तयारी करून घेण्यासाठी मला तिच्या आधी ते शिकावं लागत होतं.

‘बालश्री’ पुरस्कारामुळे तिची बुद्धिमता, विविध कौशल्ये, तडफदारपणा आणि समयसूचकता या तिच्यातील गुणांची जाणीव झाली. ती उत्तम गायला आणि उत्तम हार्मोनियम वाजवायला शिकली. त्या वेळी मला माझ्या मेहनतीचं सार्थक झाल्यासारखं वाटलं. पुढे अकरावीत असताना तिच्यावर एक पुस्तक लिहिण्यात आलं. लोकांनी मनश्रीच्या ‘एका दृष्टिहीन मुलीची नेत्रदीपक यशोगाथा – मनश्री’ या पुस्तकालाच नव्हे तर मनश्रीलासुद्धा डोक्यावर उचलून घेतलं. आज आम्हाला मनश्रीचे आई-बाबा म्हणून जग ओळखतं याचा आम्हाला खूप अभिमान वाटतो.

मनश्री ‘नॅब’च्या कॅम्पमध्ये मल्लखांब शिकली. ती ‘बालभवन’च्या स्टेज शोमध्ये नाटक, नृत्य, गाणे अशा कार्यक्रमांत सहभागी झाल्यामुळे सभाधीट बनली. मनश्री बिनधास्त वॉटर स्किट करते. उत्कृष्ट कॅरम खेळते. मनश्रीच्या अंधपणाचा आम्ही कधीच बाऊ केला नाही. आपलं मूल अंध आहे म्हणून केविलवाणे वागलो नाही आणि तिलाही तसं कधी वागवलं नाही. तिला जे जे करायचं होतं ते ते तिला सहजपणे कसे करता येईल याकडे आम्ही लक्ष दिलं. त्याचबरोबर तिला स्वावलंबी बनवण्यासाठीही प्रयत्न केले. आज ती जगभरातल्या चालू घडमोडी ऐकते, रोजच्या बातम्यांवरून तिच्या बाबांशी चर्चा करते. अगदी सामान्य व्यक्तीप्रमाणे!

आज मागे वळून बघताना आठवतो तो अगदी छोटय़ाशा दृष्टिहीन मनश्री ते विचाराने डोळस झालेल्या मनश्रीचा आतापर्यंतचा प्रवास, मग मन कौतुकानं भरून येतं.

अनिता सोमण

udaysoman@gmail.com

chaturang@expressindia.com