आमच्या घरात १ जुलै २००४ रोजी एका गोड बाळाचं आगमन झालं. घरातील सगळीच मंडळी, काका, काकू, आत्या, मावशी, आजी आजोबा खूश होती. त्या लहानशा परीने, नताशाने, सगळ्यांच्याच आनंदात भर घातली होती. नताशा एक वर्षांची होता होता आम्हाला असं जाणवत होतं की ती आवाजाला प्रतिसाद देत नाही. ती लहान आहे, ऐकेल, बोलेल असं स्वत:ला समजवण्यातच आणखी सहा महिने गेले पण हवी तशी प्रगती होत नाही बघून मोठय़ा धीरानेच आम्ही तिला ऑडिओलॉजिस्टकडे नेलं. तिची बेरा टेस्ट केल्यावर कळलं की तिला ‘प्रोफाऊंड हिअिरग लॉस’ (म्हणजेच अतिशय गहन श्रवणदोष) आहे. हे ऐकल्यावर पायाखालची जमीनच सरकली. पण तेव्हाच आम्ही दाम्पत्याने ठरवलं जे शक्य आहे ते सगळं नताशासाठी करायचं जे काही उपचार करू शकतो ते सगळे करायचे. मग आमचा प्रवास सुरू झाला जिद्दीचा, परिश्रमाचा आणि ईश्वरावरील गाढ श्रद्धेचा.

डॉ. क्रिष्णा जोशी आणि ऑडिओलॉजिस्ट डॉ. ओझा यांच्या सल्ल्याने नताशाला ‘श्रुती स्कूल’ अंधेरी येथे ‘स्पिच थेरपी’साठी पाठवण्यास सुरुवात केली. लहान असल्याने नताशा तिच्या कानात घातलेलं श्रवणयंत्र फेकून देई. ते पुन्हा पुन्हा घालताना आमचा जीव मेटाकुटीला येई. परंतु स्पीच थेरपिस्ट पूनम यांच्या मदतीने नताशाची भाषा हळूहळू विकसित होऊ लागली. ती बोलू आणि ऐकू लागली. साधारणत: वर्षभरात तिचं ‘कॉकलीयर इम्प्लांट’ करावं जेणे करून ती व्यवस्थित ऐकू आणि बोलू शकेल असं आम्हाला सुचविण्यात आलं. तसंच या शस्त्रक्रियेसाठी होणाऱ्या खर्चाचीही आम्हाला कल्पना देण्यात आली जी होती आठ ते नऊ लाखांच्या घरात. तसंच केवळ शस्त्रक्रिया हाच उपाय नसून त्यानंतर होणाऱ्या स्पीच थेरपीचा खर्च, मशीनचा मेन्टेनन्स या खर्चाचीही कल्पना देण्यात आली. आमच्यासाठी ते अग्निपरीक्षेचेच दिवस होते. अखेरीस डिसेंबर २००७ ला नताशावर शस्त्रक्रिया करण्यात आली.

akola, after 3 months of victim death, Murder Case Registered, Akot Police Sub Inspector, murder case in akola, murder case, victim death, victim torture by police, crime news, akola news, marathi news,
पोलिसाच्या अमानुष मारहाणीत आरोपीचा मृत्यू; तीन महिन्यांनी गुन्हा दाखल
school boy electrocuted pune marathi news
पुणे: आनंद मेळ्यात विजेच्या झटक्याने शाळकरी मुलाचा मृत्यू; कात्रज-कोंढवा रस्ता येथील घटना
vasai, virar, fire, Vijay Vallabh Hospital, Fire Report release, after 3 Years, Officials Found Guilty, No Action Taken, marath news,
विजय वल्लभ रुग्णालय आग; दुर्घटनेचा अहवाल ३ वर्षांनी उघडकीस, पालिकेचे अनेक अधिकारी दोषी
Firing at Sand Ghat Clan wars erupted from disputes over supremacy
यवतमाळ : रेती घाटावर गोळीबार; वर्चस्वाच्या वादातून टोळीयुद्ध भडकले

शस्त्रक्रियेच्या सहा महिन्यानंतर आणि स्पीच थेरपीनंतर नताशा ऐकू आणि बोलू लागली. तिला मूक-बधिर शाळेत न घालता इतर सर्वसामान्य मुलांप्रमाणे मुख्य धारेच्या शाळेत घालावं, असं सांगण्यात आलं. तिची प्रगती बघता याहून मोठा आनंदाचा क्षण कोणता असावा पालकांसाठी. पण आमचा हा आनंद तात्पुरताच टिकला कारण मुख्य धारेच्या शाळेत प्रवेश मिळवणं सोपं नव्हतं. अनेक शाळांनी नताशाला ‘अपंग’ म्हणून प्रवेश नाकारला. मुलं प्रवेश प्रक्रियेच्या वेळी बरेचदा काहीच बोलत नसल्याने एका पालकांनी मला सुचवलं ती घरी असताना, बोलताना, अक्षर-रंग ओळखताना तुम्ही तिचे ‘व्हिडीओ शूटिंग’ करा आणि प्रवेशाच्या वेळेला ते दाखवा. मात्र, हाताची पाचही बोटं जशी सारखी नसतात, जसे कडू अनुभव येतात तसेच गोड अनुभवही येतात. ‘महिला संघ’ विलेपार्ले शाळेच्या कीर्ती भावे यांनी कुठल्याही अटीशिवाय तिला शाळेत प्रवेश दिला.

सकाळी शाळा, दुपारी थेरपीनंतर ऑफिस अशी माझी कसरत काही वर्ष सुरू राहिली. कौटुंबिक, व्यावहारिक, मानसिक आणि शारीरिक कसोटीचे ते दिवस होते. मूक-बधिर मुलाला श्रवणयंत्र लावलं की झालं असं होत नाही. तर त्याच्याकडून बोलण्याचा सराव करून घ्यायला लागतो (स्पीच थेरपी). नताशा आठवडय़ातून तीनदा एका तासासाठी थेरपीसाठी जायची. परंतु घरीदेखील सराव करणं जास्त गरजेचं होतं. हा सराव खेळाच्या माध्यमातून केला तर अधिक प्रभावी ठरतो. आम्ही दोघेही नोकरी करत असल्याने आमच्याकडे तिला द्यायला फारसा वेळ नव्हता. ‘क्वांटिटी’ वेळ देण्यापेक्षा आम्ही ‘क्वॉलिटी’ वेळ द्यायला प्राधान्य दिलं. रोज एक तास अगदी नेमाने तिच्याबरोबर बसून विविध खेळांच्या माध्यमातून, गोष्टींतून तिला शब्दांची ओळख करून दिली आणि उच्चारांचा सराव करून घेतला. कधी कधी नताशा सराव करायला कुरकुर करायची, मग मीही तिच्यावर जबरदस्ती न करता तिला जे करायचं ते करून देत त्यातच शब्दांची ओळख करून देत असे. पण संवादात कधीही खंड पडू दिला नाही. एक एक शब्द कळावा म्हणून प्रत्येक वेळी नवी नवी गोष्टीची पुस्तकं वाचून दाखवणं असे विविध प्रयत्न करत करत तिची भाषा समृद्ध करत गेलो.

तिच्या वडिलांचं. उदयचं आणि नताशाचं नातं घट्ट मैत्रीचं आहे. उदयचे आई-वडील लहानपणीच गेल्याने आई-वडील नसल्याची पोकळी आणि उणीव याची प्रकर्षांने जाण त्यांना होती. कदाचित त्यांना न मिळालेलं मार्गदर्शन, आधार आणि भावनिक गुंतवणूक याची त्यांनी नताशाच्या बाबतीत दुपटीने परतफेड केली. मुलाला आईच्या सहवासाची आणि संवादाची जेवढी गरज असते तेवढीच किंवा त्याहीपेक्षा जास्त वडिलांच्या सहवासाची आणि संवादाची गरज असते. जेव्हा वडील मुलांबरोबर मोकळेपणे आणि सकारात्मक संवाद साधतात तेव्हा मुलांमध्ये एक वेगळाच सकारात्मक बदल होतो. आत्मविश्वासाने भरलेलं, खंबीर असं व्यक्तिमत्त्व घडतं आणि उदयने हे काम चोख बजावलेलं आहे. वर्तमानपत्रातील बातम्या सांगणं, त्यांची फोड करणं तसंच वेळेचं कोणतंही बंधन न पाळता जमेल त्या ठिकाणी जसे रस्ते, बाजार, प्रवास करत असताना तिला न टाळता तिच्या शंकांचं निरसन करणं आदी सगळ्या गोष्टी त्यांनी केल्या. वडिलांचा मनमिळाऊ स्वभाव आणि कुणाहीसाठी कधीही धावून जाण्याची वृत्ती आणि त्यातून मिळणारा आनंद, आत्मसमाधान हे नताशा बघत गेली आणि घडत गेली.

नताशाची शाळेत चांगली प्रगती झाली. नताशा अतिशय प्रेमळ, शिस्तप्रिय आहे त्यामुळे शाळेत बाईंची लाडकी झाली. शाळेत वेगवेगळ्या स्पर्धामध्ये भाग घेऊ लागली आणि बक्षिसंही मिळवू लागली. नताशाने शालेय शिक्षणाशिवाय एखाद्या खेळात रस घ्यावा अशी आमची इच्छा होती म्हणून आम्ही तिला पोहणे, बॅडमिंटन शिकवलं. तिने कथ्थकच्या चार परीक्षाही दिल्या. लहान असताना नताशाला ‘सीआयडी’ मालिका फार आवडे आणि त्यामध्ये ज्याप्रकारे बंदूक पकडली जाते त्याचं तिला अप्रूप होतं, तिचा तो ओढा पाहून आम्ही तिला ‘प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुल’ येथील प्रशिक्षण केंद्रात घेऊन गेलो. तिला तिथलं रायफल शूटिंगचं प्रशिक्षण एवढं आवडलं की पुढच्या पाच वर्षांची फी आत्ताच भरून टाका, असं तिने सांगितलं आणि तिचा रायफल शूटिंगचा प्रवास सुरू झाला.

नताशाने रायफल शूटिंगची प्रॅक्टिस सुरू केली आणि तिच्या आयुष्याला वेगळी कलाटणी मिळाली. काही महिन्यांतच स्नेहल आणि जितेश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली चांगली प्रगती केली. तिने अनेक स्पर्धामध्ये भाग घेतला आणि पदकेही मिळवली. त्यात मेयर कप २०१६, डिस्ट्रिक स्पोर्ट ऑर्गनायझेशन, झोनल, एस एफ ए, इंटरस्कूल स्टेट अशा स्पर्धाचा समावेश आहे. नताशाने नुकत्याच झालेल्या भारतीय नेमबाजी संघात निवडीसाठी होणाऱ्या पहिल्या दोन स्पर्धामध्ये उत्तमरीत्या यश संपादन केलं आहे. आता ती भारतीय संघाचा भाग होण्यास उत्सुक आहे. सुधा नायर आणि पल्लवी पर्वते यांच्या मार्गदर्शनाखाली नताशाचा शाळेतूनही ‘बेस्ट स्टुडंट’ तसेच ‘बेस्ट स्पोर्ट्समन’ म्हणून गौरव करण्यात आला आहे. नताशाला भारतासाठी खुल्या आणि कर्णबधिर प्रकारात ऑलिम्पिक सुवर्ण पदक जिंकायचं आहे. तिची जिद्द, अथक प्रयत्न आणि झोकून देण्याची वृत्ती यामुळे ते ती मिळवेलच याची खात्री आम्हाला आहे.

हरिवंशराय बच्चन यांची ‘अग्निपथ’ ही कविता आम्हाला प्रेरणा देते. या संपूर्ण प्रवासात आमचं कुटुंब, नातेवाईक, मित्रमंडळी, शिक्षक – शिक्षिका आणि समाजातील अनेक व्यक्तींनी साथ दिली आहे, प्रोत्साहन दिले आहे. आमच्यासारख्या पालकांना एवढंच सांगेन की लहान मुलांची स्वप्नं फार मोठी असतात, त्यांच्या स्वप्नांना पंख द्या कधीही त्यांच्या स्वप्नांना कमी लेखू नका. मूल सर्वसाधारण असो वा अपंग त्याला पालकांकडून भरपूर प्रेमाची गरज असते. पालकांनी मुलांचे मित्र, मार्गदर्शक, आधारवड, प्रशिक्षक आणि सोबती अशा विविध प्रकारच्या भूमिका वेळेनुसार योग्यपणे मुलांच्या आयुष्यात बजावल्या पाहिजेत तरच संपूर्णपणे पालकत्वाची जबाबदारी नीट पार पाडली जाईल. जर ईश्वराने जन्मत:च काही उणिवा दिल्या असतील आणि जर तो अपूर्णाक म्हणत असू तर आपण आपल्या मेहनत, जिद्दीने आणि चिकाटीने त्याचे रूपांतर पूर्णाकात करू शकतो हा आमचा विश्वास आहे.

क्षितिजा जोशी

kshitijajoshi05@gmail.com

chaturang@expressindia.com