04 December 2020

News Flash

अंधत्वही झाले खुजे

पप्पांनी तिचं नाव काय ठेवायचे हे आधीच ठरवून ठेवलं होतं.. अनुजा!

एका आनंदाच्या क्षणी अनुजा तिच्या आई आणि लेकासोबत

गुढीपाडव्याच्या मुहूर्ताला आम्हाला कन्यारत्न झालं, १९८६ ला. तिचा जन्म आम्हा उभयतांसाठी आनंदाचा, समाधानाचा होता. तिच्या पप्पांनी तिचं नाव काय ठेवायचे हे आधीच ठरवून ठेवलं होतं.. अनुजा!

ती हळूहळू बाळसं धरत होती. साधारणत: महिनाभरानंतर माझी मोठी बहीण मला भेटायला आली. ती म्हणाली, ‘‘अगं हिची नजर बघ? ती एका बाजूनेच बघते.’’ तिनं अनुजाला डॉक्टरांना दाखवण्याचा सल्ला दिला. मी तिला बोईसर इथल्या सरकारी दवाखान्यात दाखवलं. ते डॉक्टर म्हणाले, ‘‘बाळ लहान आहे. कदाचित तिरळेपणा असेल, जसं मोठं होईल तसा तिरळेपणा जाईल.’’ ती जसजशी मोठी होत होती तसतशी तिची नजर स्थिर होऊ लागली. मात्र तिला खूप त्रास होत होता. २/३ वर्षांची झाल्यावर तिचं डोकं खूप दुखायचं. डोळे लालबुंद व्हायचे. उलटय़ा व्हायच्या परंतु हे सर्व डोळ्यांमुळे होतंय याची जाणीव त्यावेळी झाली नाही. तिला हा त्रास वारंवार व्हायला लागला. मग बोईसर इथल्या नेत्ररोगतज्ज्ञांना अनुजाला दाखवलं. तेव्हा त्यांनी तिच्या डाव्या डोळ्यात काचबिंदू झाला आहे आणि उजव्या डोळ्यात मोतीबिंदू झाल्याचं सांगितलं. काचबिंदू असल्यामुळे तिच्या डोळ्यांवरचा दाब वाढतो आणि डोकेदुखी होते असं निदान केलं. त्यांनी काही औषधेही दिली. पण त्यावरच न थांबता तिला चेंबूर इथले शानबाग डॉक्टर, बॉम्बे हॉस्पिटल, हिंदुजा हॉस्पिटलमध्येही दाखवलं. मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी एका हॉस्पिटलमध्ये भरतीही केलं परंतु ज्या दिवशी शस्त्रक्रिया असायची त्याच दिवशी नेमके डॉक्टर उपलब्ध नसायचे. शेवटी तर आम्हाला सांगण्यात आलं की, तिच्यावर आता शस्त्रक्रिया होऊ शकणार नाही. ती सोळा वर्षांची झाल्यावर करा. त्यामुळे आम्ही तिच्यावर उपचार करणं सोडून दिलं. तिचं शाळेत नाव घातलं. ती ज्युनिअर / सीनिअर केजी अशी दोन वर्षे शाळेत गेली. ती शाळेत असताना पुस्तकं खूप जवळ घेऊन वाचायची. ती लिहितानाही वही खूप जवळ घेऊन लिहीत असे. तिला खूप त्रास झाला की मग डॉक्टरांकडे घेऊन जावं लागायचं.

अनुजाच्या जन्मानंतर साडेतीन वर्षांनी मला दोन जुळे मुलगे झाले. दोन जुळ्या मुलांचं करायचं आणि अनुजाचा वाढता आजार यामुळे माझी तारेवरची कसरत सुरू झाली. अशा स्थितीत मला अनुजाकडेही कधी कधी लक्ष देता यायचं नाही. एकदा तिच्या पप्पांचे दोन मित्र जोहरभाई आणि इराणी यांच्या आग्रहाखातर आम्ही एक दिवस अंधेरीच्या डॉक्टर जयेश यांच्याकडे अनुजाला घेऊन गेलो. त्यांनी १९९४ मध्ये ती पहिलीत असताना तिच्यावर मोतीबिंदू शस्त्रक्रिया केली. परंतु पदरी अपयशच आलं. जेव्हा डॉक्टरांनी सांगितले की, तिला आता कधीही दिसू शकणार नाही. तेव्हा मी पूर्णत: हादरले. आतून पूर्ण तुटून गेले. वाटलं, आपल्याकडून खूप मोठी चूक झाली आहे. आणखी मुलं होऊ द्यायला नको होती. आता अनुजाला कसं सांभाळायचं? अनेक प्रश्न डोळ्यासमोर आ वासून उभे राहिले?

डॉक्टर जयेश यांनीच आम्हाला दादरच्या कमला मेहता अंध शाळेविषयी माहिती दिली. ती निवासी शाळा होती. तिला शाळेत दुसरीकडे घालायचे म्हणजे आमच्यापासून दूर ठेवायचे. एवढय़ा लहान वयात एकटीला कसे सोडायचे एक ना अनेक प्रश्न मनात गलका करू लागले. परंतु दुसरं मन म्हणायचं, नाही! तिला शाळेत घालावंच लागेल. तिच्या भविष्यासाठी. खूप विचार करून कठोरपणे निर्णय घेतला आणि तिला आम्ही दादरच्या शाळेत घातलं.

अंध शाळेत तिला पहिलीच्या वर्गात बसवलं. तो दिवस लख्ख आठवतोय, पहिल्या दिवशी ती वर्गात गेली आणि इतकी रमली की, आम्हाला विसरूनच गेली. ती रडेल या काळजीने आम्ही मात्र सायंकाळपर्यंत शाळेच्या हॉलमध्ये बसून होतो. परंतु ती काही आली नाही आणि दिवसभराच्या घालमेलीने मी अश्रूंना वाट मोकळी करून दिली. जड अत:करणाने मी शाळेच्या पायऱ्या उतरले. तिला सोडून येण्यासाठी मन तयारच नव्हतं. दादर ते बोईसर या पूर्ण प्रवासात डोळ्यांच्या कडा ओल्याच होत्या. तिचे पप्पाही माझ्याकडे बघून रडत परत परत मला समजावत राहिले.

मधल्या काळात मीही एका शाळेमध्ये शिक्षिका म्हणून रुजू झाले होते. अनुजाची शाळा सुरू झाल्यानंतर पाच वर्षे दर शुक्रवारी पहाटे उठायचे, माझ्या शाळेत जाण्यासाठी पाच वाजता घर सोडायचे. शाळेतून घरी येऊन स्वयंपाक करायचा लगेच अडीचच्या गाडीने तिला घ्यायला दादरला जायचे, तिथून साडेसहाच्या वलसाड गाडीने रात्री नऊ वाजता घरी यायचे हाच दिनक्रम होता.

सुटीसाठी ती घरी आली की शेजारच्या मुली तिला खेळायलाही घ्यायच्या नाहीत. ती रडायची. तिला भांडीकुंडी खेळणे खूप आवडायचे. मुली तिची भांडी लपवून ठेवायच्या, तिला त्रास द्यायच्या. मग ती रडत रडत माझ्याकडे यायची. मी तिला समजावयाची, मलाही त्यावेळी खूप वाईट वाटायचं. मात्र तिला मी आत्मनिर्भर बनवलं. समाजात कसं वागावं हे उदाहरण देऊन शिकवलं, परिस्थिती नेहमी बदलत असते हे सांगत तिच्यात सकारात्मक दृष्टिकोन निर्माण होईल यासाठी झटत राहिले. तिच्या पप्पांची ती खूप लाडकी. त्यांच्याकडून बातम्या ऐकणं, क्रिकेट ऐकण्याचं वेड तिनं घेतलं. त्यांच्याकडूनच वाचनाची आवडही तिला लागली. ती आली की तिच्या गोष्टी ऐकताना आम्ही वेळेची सबब कधीही पुढे केली नाही. तिच्या वक्तृत्व गुणांचा वापर दैनंदिन जीवनात कसा होईल याचे पाठ तिला दिले. तिच्या दोन्ही भावांना आणि तिला वाढवताना त्यांच्या ताईमध्ये तेही कसे रमतील हे आम्ही कायम पाहिले. त्यासाठी लहान-मोठय़ा सहली आयोजित करणं, त्यांना घेऊन एकत्रपणे समारंभांना जाणं जेणेकरून ते तिघेही एकमेकांची काळजी घेतील या गोष्टी आम्ही केल्या.

शाळेत तिच्या सगळ्या बाई तिच्या प्रगतीमुळे खूश होत्या. पहिली ते दहावीपर्यंत तिने तिचा पहिला नंबर सोडला नाही. इतर अ‍ॅक्टिव्हिटीमध्येही तिचा सहभाग असायचा. जसे कांदा चिरणे, धान्य निवडणे, मल्लखांब, पोहणे, नाचणे, गाणे इत्यादी. वक्तृत्वही छान होतं. शाळेत कुणी पाहुणे आले किंवा बाहेर कुठे जायचे असेल तर तिच्या शिक्षिका आवर्जून तिला बरोबर घेऊन जायच्या. यामुळे तिचा आत्मविश्वास वाढला. तिच्या सर्वागीण प्रगतीने मी माझेही मन घट्ट करत होते, तिला दूर ठेवण्याच्या दु:खाला दूर सारत होते. तिला जे घडवले त्याचे जास्तीत जास्त श्रेय शाळेचे आहे, असे मला नेहमी वाटते. ती १० वीला प्रथम क्रमांकाने पास झाली. आमचा आनंद तर गगनात मावेनासा झाला.

पुढे ११ वी / १२ वीसाठी रुईया कॉलेजमध्ये तिने प्रवेश घेतला. तिथे पहिले तीन महिने तिने बोईसर ते माटुंगा असा प्रवास एकटीने केला. त्यावेळी तिला उगाच गर्दीची, लोकांची भीती न दाखवता एकटीने प्रवास करण्यासाठी उद्युक्त केले, त्यासाठी मार्गदर्शन केले. सतत सोबतीला कोणी असावे असा विचार न करता ती एकटी कशी जाईल यासाठी तिला ‘तयार’ केले. त्यातूनच पुढे जेव्हा तिने पदवी प्राप्त करून पत्रकारितेचा अभ्यास केला आणि एका प्रसिद्ध वाहिनीमध्ये इंटर्नशीप केली तेव्हाही ती बोईसर ते विक्रोळी असा प्रवास एकटीने करायची. पत्रकारितेत तिला करियर करायचे होते त्यासाठीही ती एकटीने सगळ्या कार्यालयांना भेट द्यायची. अर्थात तिच्या अंधत्वामुळे तिला तिथे संधी मिळाली नाही, याची खंत मलाच अधिक वाटते. पण तिने ती कसर ब्रेलमध्ये ‘अक्षर तेज’नावाचा दिवाळी अंक काढून पुर्ण केली. त्यानंतर तिला बंगळूरुला नोकरीची संधी मिळाली. तिला प्रथम मी व तिचे पप्पा सोडून आलो. तिथला प्रवास तिला समजावून सांगितला. तिथेही ती जवळपास आठ महिने एकटी राहिली. रेल्वेने एकटीने प्रवास करून दोनदा आम्हाला भेटायलाही आली.

आज अनुजा अंध असूनही मला तिची अजिबात काळजी वाटत नाही. ती स्वत:च्या पायावर उभी आहे याचा मला सार्थ अभिमान आहे. आज तिचं लग्न झालंय, मुलगा आहे.  स्वयंपाक करते, उत्तम गृहिणी आहे. अर्थात  तिच्या स्वयंपाक करण्याच्या आवडीला कधी नकार दिला नाही. त्यातही तिला मदत करून तिची तीही आवड तिला कशी जपता येईल यासाठी लहानपणापासून प्रयत्न केले.आज ती समाजात अगदी खंबीरपणे उभी आहे. ८ मार्च २०१४  च्या महिला दिनी तिची ‘हिरकणी’ पुरस्कारासाठी निवड झाली. एवढा मोठा पुरस्कार मिळवणारी माझी मुलगी आमच्या परिसरात एकटीच होती. पण मनाला रुखरुख एवढीच वाटली की, हा सोहळा बघण्यासाठी  प्राणापलीकडे प्रेम करणारे तिचे पप्पा नव्हते.

अपंग हा समाजातील उपेक्षित घटक आहे. सर्वसामान्य माणसांनी अशा उपेक्षित घटकांकडे सामंजस्याने पाहिले पाहिजे. त्यांचे मनोबल कसे वाढेल याचा विचार केला पाहिजे. म्हणजे त्यांच्याकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन बदलला गेला पाहिजे. समाजाच्या मुख्य प्रवाहात ते स्वत:हून येण्याचा प्रयत्न करतातच, त्यांना फक्त आपल्या हाताची गरज आहे. हे ओळखून समाजाने स्वत:हून मदतीचा हात पुढे केला पाहिजे.

जगात अशक्य असे काही नाही हे अनुजाने सिद्ध केले आहे. अशा अपंग मुलांचा जे तिरस्कार करतात त्यांनाही लाजवेल असं काम ती आज समाजात करत आहे. आज ज्या पालकांना अशी अपंग मुले आहेत त्यांनी त्यांना प्रथम शिक्षणाच्या प्रवाहात आणलं पाहिजे. शिक्षण घेतलं की, त्यांचे त्यांनाच काय करावे – करू नये हे समजतं. समाजाच्या मुख्य प्रवाहात यायचं असेल तर शिक्षणाला पर्याय नाही. त्याचबरोबर आपले व्यक्तिमत्त्वही खुलवते ठेवण्याची गरज आहे. असे झाले तर अपंगही जगात क्रांती घडवू शकतील हे पक्कं. म्हणूनच त्यांचं संगोपन घरातूनच नीट झालं पाहिजे. त्यांची अवहेलना होऊ देऊ नये. नाहीतर ते कोलमडतील. आणि तुमचं सर्व आयुष्य अंधारात जाईल आणि त्यांचंही!

पल्लवी संखे

anujasankhe@gmail.com

chaturang@expressindia.com

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 31, 2018 1:20 am

Web Title: articles in marathi on handicapped children and their parents inspiring stories part 6
Next Stories
1 बहिरेपणावर मात
2 देही मी परिपूर्ण, तरीही..
3 अंधत्वाकडून वैचारिक डोळसपणाकडे
Just Now!
X