|| सुषमा शिंदे

आज आकाशला लांबून कुणी पाहिले तर तो सामान्य मुलगा नाही हे लक्षातही येणार नाही. हे जाणवतं  फक्त त्याच्याशी जवळून बोलताना, त्याला चालताना बघितलं तरच. अर्थात त्या बदलामागे आहे तपश्चर्या. प्रचंड मेहनत आणि चिकाटी.

१२ ऑक्टोबर १९९६ ला अक्षयनंतर  आकाशचा जन्म झाला. आम्ही तेव्हा कामानिमित्त मुंबईलाच, कॉटनग्रीन इथं राहायला होतो. त्याचे बाबा एका कंपनीत काम करायचे. आकाश सहा महिन्यांचा झाला तरी मान धरत नव्हता, की मान हलवून इकडे तिकडे पाहातही नव्हता. काही मुलांची प्रगती हळूहळू असते, असा विचार करून आम्ही वाट पाहायची ठरवली. मात्र तो दहा महिन्यांचा झाला तरीही मान धरेना म्हटल्यावर आम्ही त्याला वाडिया हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो. तिथे गेल्यावर डॉक्टरांनी तो सेरेब्रल पाल्सी असल्याचं सांगितलं. डॉक्टरांनी सेरेब्रल पाल्सी म्हणजे काय याची माहिती दिली आणि त्याला फिजिओ थेरपी घ्यावी लागेल, असंही सांगितलं. मात्र तो चालू शकेल, बोलू शकेल की नाही, याबद्दल कोणतीच खात्री दिली नाही. वाडिया रुग्णालय आणि मुंबईतल्या इतर काही रुग्णालयात आम्ही जवळपास ११ वर्षे फिजिओ थेरपी घेतली.

आकाश सामान्य मुलगा नाही हे मला समजले आणि मी कोलमडूनच गेले. विचार करून करून मेंदू शिणून जायचा. शेवटी एक निर्णय घेतला. तो सामान्य तर होणार नाहीये मात्र त्याच्या पायावर उभा राहू शकेल असं काही तरी करायला पाहिजे. कारण तोपर्यंत त्याचा बुद्धय़ांक सामान्य आहे की नाही हे आम्हाला समजलं नव्हतं. मग मी कंबर कसून कामाला लागले म्हटलं तरी वावगं ठरू नये. हॉस्पिटलमध्ये एकदाच फिजिओ थेरपी द्यायचे. मी घरी आल्यावर सकाळ, दुपार, संध्याकाळ अशा पद्धतीने त्याला थेरपी द्यायला सुरुवात केली. माझ्या या प्रयत्नांना मात्र शेजारी आणि घरच्यांनीच खीळ घालायला सुरुवात केली. आकाश या थेरपीच्या वेळी खूप रडायचा त्यामुळे शेजाऱ्यांना मी त्याला उगाच त्रास देते असं वाटायचं. ‘कशाला रडवतेस त्याला काही होणार आहे का असं करून’, अशा शब्दांत मला थांबवण्याचा प्रयत्न केला जायचा. तर घरी ‘या मुलामागे, त्याच्या हॉस्पिटलच्या वाऱ्या करून काय मिळणार आहे, सुधारणार आहे का तो’ अशा बोचऱ्या शब्दांनी मला रोखलं जायचं. आजही त्या गोष्टी आठवल्या की डोळे भरून येतात. मात्र मी माझे प्रयत्न सोडले नाहीत. त्या प्रयत्नांमुळे तो मान धरायला लागला होता.

एवढय़ा प्रवासात आकाशचे बाबा मात्र कायम माझ्या पाठी होते. त्यांनी आकाशच्या उपचारांसाठी कायम प्रोत्साहनच दिले, शक्य असेल तेवढी मदत केली. गावाला गेल्यावर कोणी काही गावठी उपचार सांगितले तरी आम्ही ते आवर्जून करायचो. अशाच कुणाच्या सांगण्यावरून आम्ही त्याला शेळीच्या लेंडय़ांच्या खताच्या खड्डय़ात सूर्योदयापूर्वी २० मिनिटे ते अर्धा तास इतक्या कालावधीसाठी कमरेपर्यंत पुरून ठेवायचो. त्याचा फायदा असा झाला की त्याचे पाय भरले. तो उभा राहायला लागला. त्याला चालता यावे यासाठी पांगूळगाडा धरून चालवणं, जीभ सैल व्हावी म्हणून दातांत चॉकलेट अडकवून ते जिभेनं काढायला सांगणं, त्याच्याशी सतत बोलत राहणं, त्याआधी वेगवेगळे आवाज करून त्याची मान फिरती राहील हे पाहणं असे उपचार फिजिओ थेरपीबरोबर मी करत राहिले. त्याचा फायदा असा झाला की तो हळूहळू चालणं, बोलणं, बसणं अशा क्रिया करायला लागला.

आकाश साडेपाच वर्षांचा झाल्यावर मी त्याला कामगार कल्याण मंडळाच्या बालवाडीत प्रवेश मिळावा म्हणून खूप झगडले, मात्र तो पडला तर, त्याला काही इजा झाली तर असं सांगत आम्ही जबाबदारी घेऊ शकत नाही असं सांगत, शाळेने प्रवेश नाकारला. मात्र खूप झगडून मी त्याला तिथे किमान एक तास तरी बसू द्या, असं सांगत प्रवेश मिळवला. त्याचदरम्यान फिजिओ थेरपीच्या डॉक्टरांनी त्याला शिवडी इथं असणाऱ्या मतिमंदांच्या शाळेत प्रवेश घेण्याची सूचना केली. आकाशला सगळं समजतं तो मतिमंद नाही, असं सांगितल्यावर त्यांनी आग्रीपाडा इथल्या एसईसी डे स्कूलविषयी सांगितलं. तिथं गेल्यावर मानसोपचारतज्ज्ञांनी त्याचे परीक्षण करून मतिमंद नसल्याचा निर्वाळा दिला आणि त्याचा प्रवेश निश्चित झाला. तो त्या शाळेत ५ वीपर्यंत शिकला. शाळेने मला खूप मदत केली. तिथे केल्या जाणाऱ्या फिजिओ थेरपीचा आकाशलाही मोठय़ा प्रमाणात उपयोग झाला.

आकाश होण्यापूर्वीपासून मी घराला हातभार म्हणून शिवणकाम करत असे. आर्थिक गरज तर होतीच. त्याला आग्रीपाडय़ाच्या शाळेत घातल्यावर शाळेने मला अपंगांसाठी शिक्षिकेचे काम करता येत असल्याची माहिती देऊन कॉलेजचा पत्ता दिला. तिथे प्रवेश घेण्यासाठी प्रोत्साहन दिले. त्यावेळी शिवडी येथे असणाऱ्या महाविद्यालयातून मी डी.एड. केले. त्यानंतर माझी नेमणूक कळंब येथे झाली. मग आकाशला घेऊन मी कळंबला गेले. तिथल्या शाळेत तो ९ वीपर्यंत शिकला. पुढे माझी बदली आमच्याच गावी कुर्डूवाडीला झाली मग आम्ही सगळे गावाकडेच स्थिरावलो. आज मी इथल्या मतिमंदांच्या शाळेत शिकवते तर त्याचे बाबा शेती करतात. आकाशचा मोठा भाऊ अक्षय मात्र या प्रक्रियेमध्ये खूपच समजूतदार झाला. ‘आमच्या आकाशला बरे नाही म्हणून आईला बाहेर जावे लागते’ असं तो लहानपणी सांगायचा. मला माझ्या कामात मदत करायचा आणि आजही करतो. मलाच नाही तर आकाशलाही तो प्रेमाने सांभाळायचा आणि आजही सांभाळतो, मदत करतो. आकाश आज चालू शकतो, बोलू शकतो. चालताना मात्र थोडं डाव्या बाजूला झुकून चालल्यासारखं चालणं आहे, त्याचं बोलणं आपल्या सामान्य लोकांइतकं वेगाने नाही, मात्र समोरच्याला ते कळू शकतं. त्याला सहजपणे लिहिता मात्र येत नाही. म्हणूनच तर रायटर घेऊन तो आतापर्यंत शिकू शकला.

बारावीपर्यंतचं आकाशचं शिक्षण निर्विघ्नपणे पार पडलं. मात्र त्यानंतर त्याला रायटर मिळणं अवघड झालं. त्यामुळे त्याचं एक वर्ष वाया गेलं. अखेर यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठात प्रवेश घेतला. त्याच्या शिक्षणासाठी मलाही मदत करावी लागते. त्याचं लिखाण, प्रोजेक्टसाठीचं लिखाण मी करायचे आणि अजूनही करते. आज तो त्याची काम करू शकतो. बाहेर एकटय़ाने जाऊ शकतो, घरातली लहानमोठी काम करू शकतो, हेच समाधान देणारं आहे.

लहानग्या आकाशची अवस्था पाहून खूप वाईट वाटायचं. पण त्याच्या उपचारांसाठी बाहेर पडल्यावर त्याच्यापेक्षाही वाईट स्थिती असणारी मुले आणि त्यांचे पालक पाहिले आणि आपलं दु:ख काहीच नसल्याची जाणीव झाली. शिवाय ते दु:ख वाढवायचं की सावरायचं, कमी करायचं हे आपल्याच हाती आहे हेही समजलं. आपण प्रयत्न केले, मेहनत घेतली तर त्याचे फळ मिळतेच मिळते. आज आकाशही घडला आणि मीही घडले ते त्याच्यामुळेच. विशेष मूल हे सामान्य होऊ शकणार नसतातच, मात्र ते प्रगती करू शकतात हे लक्षात घेऊन प्रयत्न करणं गरजेचं आहे.

avshinde1296@gmail.com

chaturang@expressindia.com

शब्दांकन : रेश्मा भुजबळ