स्वाती कुलकर्णी

श्रद्धा फुलासारखी नाजूक, जरासा धक्का लागला तरी फ्रॅक्चर होणारी. हाडे ठिसूळ असल्याने शरीर कमकुवत असले तरी ती मनाने मात्र तितकीच खंबीर आहे, म्हणूनच दहावीचा अभ्यास करून तिने ७८ टक्के गुण मिळवले. ती कविता करते, तिचे वक्तृत्व चांगले आहे, ती सध्या पोहायलाही शिकते आहे आणि तिला पुढे अजून खूप काही करायचे आहे. तिच्या या दुर्दम्य इच्छाशक्तीमागे आहे तिची आई- स्वाती कुलकर्णी. मायलेकींच्या इच्छाशक्तीची ही कहाणी.

आज आमची श्रद्धा विशेष प्रावीण्य मिळवून अकरावी आर्ट्सची परीक्षा पास झाली. आता येत्या शैक्षणिक वर्षांत तिची बारावी. दिवसांना जणू गतीचे चाक लागले आहे, पण आज मागे वळून बघताना आठवतोय तो प्रवास.. आजचा हा दिवस आमच्या सगळ्यांसाठी असा असेल याची २००० मध्ये ना आम्हाला कल्पना होती ना डॉक्टरांना; पण आमच्या जगण्या-वागण्यातल्या सकारात्मकतेने आणि श्रद्धेने आज तो सुखकर वाटतो आहे!

श्रद्धाच्या जन्माआधी सोनोग्राफीमुळे बाळाच्या पायांमध्ये समस्या असू शकते, हे समजले होते. तिचा जन्म झाल्यावर लगेचच माझ्या या परीला डॉक्टरांनी माझ्या हातात दिले त्या वेळी मला कधी एकदा तिला स्पर्श करेन असे झाले होते. तिचा तजेलदार गोरा चेहरा आणि सुंदर, उठावदार नाक बघून आम्हा सगळ्यांना खूप आनंद झाला होता; पण जन्मत:च तिला हात आणि पायाच्या वेगवेगळ्या हाडांना मिळून आठ फ्रॅक्चर होते. ड२३ीॠील्ली२्र२ केस्र्ी१ऋीू३ं, हे निदान केले गेले, ज्यात जराही धक्का लागला तर शरीरातील हाडे फ्रॅक्चर होऊ  शकतात, इतकी हाडे ठिसूळ असतात. त्यामुळे या लहानग्या बाळाला आंघोळ घालताना माझ्या आईला अगदी एका बोटाने तेल लावून फुलाला मालिश करावी त्या पद्धतीने तिला आंघोळ घालावी लागे. आम्ही सर्वानीच तिला डोळ्यांत तेल घालून जपले. मला तर तिच्याकडे खूपच लक्ष द्यावे लागायचे. लहान असताना मान धरणे, पालथे पडणे, बसणे या गोष्टी तिला हळूहळू जमल्या. तिची शारीरिक वाढ सामान्य मात्र संथ गतीने झाली. तिचा मेंदू मात्र तल्लख होता, आहे.

तान्ही असताना जर ती खूप रडायला लागली तर फ्रॅक्चर झाले असण्याची शक्यता असू शकते, असे डॉक्टरांनी सांगितले होते. त्यांच्या सहृदयतेने, सतत केलेल्या मार्गदर्शनामुळे ती दुसरीत जाईपर्यंतच तिला दहा-बारा वेळा फ्रॅक्चर झाले तरी आम्ही सगळे मिळून ते पार पाडत असू. यात अगदी जवळच्या सगळ्या नातेवाईकांचाही सहभाग असे. हळूच धक्का बसला, तरी तिचे हाड मोडत असे. कधी एक हात, कधी दोन्ही पाय आणि एकदा तर अचानक पडल्यामुळे दोन्ही पाय आणि एक हात एकाच वेळी प्लॅस्टरमध्ये ठेवावे लागले. कधी कधी ट्रॅक्शन द्यावे लागे. मात्र शरीराचा व्यायाम आणि फिजिओथेरपी आणि नंतर केलेल्या दोन मोठय़ा शस्त्रक्रिया यामुळे आता फ्रॅक्चर होण्याचे प्रमाण कमीत कमी आहे. तिला नियमित फिजिओथेरपिस्टकडे नेणे-आणणे, स्वत: फिजिओथेरपी करणे हे माझे काम. तिचा मूळ खेळकर स्वभाव त्या वेळीही प्रकर्षांने जाणवायला लागला. आपला मोकळा असेल तो हात-पाय वापरून ती खेळत असे आणि कुतूहलाने जगाकडे बघत असे.

तिला शाळेत घालावे असे मला वाटायचे, पण पुन्हा भीतीही वाटायची की, धक्का लागून फ्रॅक्चर झाले तर.. पण मग खूप प्रयत्नांनी मी माझी भीती काढून तिला शाळेत घालायचा निर्णय घेतला. तिला ‘नवरचना’ इंग्रजी माध्यमाच्या शाळेत प्रवेश मिळाला. तीन वर्षांच्या वयातली छोटी मुलं शाळेत तिच्यासोबत, पण त्यांनाही तिला धक्का लावायचा नाही हे पहिल्या दिवसापासून लगेच समजले. तिला शाळेत घातल्यानंतर काही दिवस मी तिच्या वर्गात नसले तरी शाळेच्या आवारातच बसून राहायची आणि शाळा सुटली की तिला घेऊन यायची. हळूहळू तिला आणि मला आत्मविश्वास आला, की ती शाळेत बसू शकते. मग माझा शाळेत बसण्याचा वेळ कमी कमी होत गेला. ती तिसरीत गेल्यावर मात्र पुन्हा एक समस्या उद्भवली होती. इतर मुले बेंचवर बसत, मात्र श्रद्धाला फ्रॅक्चर होण्याच्या भीतीने आणि उंची कमी असल्याने बेंचवर बसवणे धोकादायक होते. मग मी तिच्या स्थितीचा नीट अभ्यास केल्यानंतर आम्ही तिच्यासाठी तिला योग्य असा बेंच बनवून घेतला, त्यामुळे आजपर्यंत तिचे शिक्षण विनाअडथळा सुरू आहे.

श्रद्धा चार महिन्यांची असताना तिच्या बाबांनी आमच्या नाशिकच्या एका लहान मुलांच्या डॉक्टरांना विचारले होते की, ‘‘डॉक्टर, श्रद्धा शाळेत जाईल का?’’ पण लहान मुलांच्या त्या डॉक्टराने बाबांना वेडय़ातच काढले आणि उत्तर दिले की, ‘‘उद्या देवांची मीटिंग आहे त्या वेळी त्यांना विचारतो!’’ त्यांचे हे उत्तर ऐकून त्या वेळीदेखील आम्हाला वाईट वाटण्यापेक्षा नवल वाटले.. आणि आजची तिची शैक्षणिक प्रगती बघता असे वाटते की खरेच देवांची सभा भरली असेल.

पाचवीत तिला इंग्रजीपेक्षा मराठी माध्यमाच्या ‘आनंदनिकेतन’ या शाळेत घातले. तिथे तिच्या विचारांना आणि कल्पनेला चांगला वाव मिळाला. शाळेच्या वातावरणात श्रद्धा अजूनच बहरली, कविता छान करायला लागली. श्रद्धा पाच वर्षांची असताना ‘अवधूत’चा जन्म झाला. घरात बाळ येणार याचे तिला किती अप्रूप. तिला अनेक प्रश्न पडत. सगळ्यांची उत्तरे देता देता आमची मात्र करमणूक होत असे. ‘ताई’ झाल्यामुळे तिला एकदम छान वाटत असे. लहानपणापासून तिचे आणि अवधूतचे एकमेकांमधील संबंध अगदी जिव्हाळ्याचे होत गेले ते आजपर्यंत. तो लहानपणी बंडखोर होता, मात्र श्रद्धाच्या बाबतीत आमचे वागणे पाहून तो समजूतदारपणे वागू  लागला. तो तीन-चार वर्षांचा असताना आम्ही कोणी श्रद्धाच्या जवळ नसलो आणि तिला बेडवरून किंवा सोफ्यावरून खाली उतरायचे असल्यास हा तिच्यासाठी उशा रचून तिला हळुवारपणे उतरवून द्यायचा. आता तो आठवीत आहे. कोणतीही गोष्ट असो, त्यांचे अगदी गुळपीठ आहे. त्यालाही आपल्या प्रत्येक गोष्टीत ताई लागते. त्यांचे खेळही वेगळेच. शिवाय दोघांनीच पाणीपुरी, भेळ बनवणे, बागेतल्या तीन दगडांच्या चुलीवर चहा करणे, वांगी भाजून भरीत बनवणे, भजी बनवणे आणि तिथेच बसून सगळ्यांनी खाणे, असे त्यांचे खेळ. कधी दोघांमध्ये चिडवाचिडवी, रुसवेफुगवे, भांडणेही होतात.. पण मिटतात कधी ते कळतदेखील नाही.  बाबांबरोबर मस्ती करणे हाही तिचा सगळ्यात आवडता खेळ.

बालवाडीत असताना एकदा ती सगळ्यांसमोर संपूर्ण ‘वंदेमातरम’ न घाबरता आणि अडखळता म्हणाली, त्या वेळी ती सभाधीट आणि बुद्धीने तल्लख आहे, हे समजले. वेगवेगळ्या कथाकथन, गीतगायन, वक्तृत्व स्पर्धामध्ये ती भाग घेते. ती वेगवेगळ्या आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धात भाग घेऊन बक्षिसे मिळवायला लागली.

असे नाही की अडचणी आल्याच नाहीत, पण मार्गदेखील मिळत गेले. अडथळा असेल तर त्याला सोबत घेऊन जे काही आपल्याकडे आहे त्यातून आनंदी राहायचे हे तर तिला मी नेहमी सांगत आले आणि ती ते आत्मसातही करत आली. काही मोठय़ांचा अनुभव मात्र विचित्र आहे. असंवेदनशीलपणे ते असे काही प्रश्न विचारतात, की यामुळे आपण कोणाचे भावविश्व दुखावत आहोत याचेही भान त्यांना नसते. यात शिक्षित, अतिशिक्षित आणि अशिक्षितदेखील आहेत. अशा वेळी मन उद्विग्न झाले तरी श्रद्धाला त्याकडे दुर्लक्ष करून तिच्या विचारांच्या स्पष्टतेने तिचे मानसिक बळ टिकवून ठेवायला मी शिकवले.

शाळेने आणि आता ती महाविद्यालयात जाते तिथेही तिला कधीही कोणी खास वागवले नाही. तिचा एक व्यक्ती म्हणून स्वीकार केला. मीही कधी तसा आग्रह धरला नाही आणि लहानपणापासून तिलाही स्वतंत्र वागवले, त्यातून तिचा आत्मविश्वास वाढला. शाळेत पूर्णवेळ बसून तिचे अंग दुखत असे; पण अगदीच असह्य़ वेदना झाल्याशिवाय ती घरी बसत नसे. दहावीत तिचा क्लास सकाळी सहाला असायचा, त्यासाठी पाचलाच उठावे लागे. सहा ते आठ क्लास करून जेमतेम घरी येऊन लगेच पुन्हा नऊ वाजता शाळेत जाण्यासाठी निघावे लागे. मग ९ ते ३ शाळा आणि घरी आल्यावर स्वत:चा अभ्यास या सगळ्यात तिच्या पाठ आणि कंबरेने हा सगळा ताण सोसला ते केवळ तिच्यातल्या चिवट इच्छाशक्तीमुळे. दहावीत ७८ टक्के  मार्क मिळाले, याचे आम्हा सगळ्यांनाच खूप कौतुक वाटले. श्रद्धा सध्या पोहायला शिकते आहे. खरे तर त्यासाठी मीच मनातून खूप घाबरत होते, कारण तिच्या पाय कमकुवत असल्याने ती उभी राहू शकत नाही, मग ती पोहायला कसे शिकणार; पण तिला पाण्याची कधीच भीती वाटली नाही. शिवाय कोणतीही गोष्ट करताना मला जरी भीती वाटत असली तरी मी तिला कधीच अडवले नाही. तिला जे करावेसे वाटले आणि ती जे करू शकत होती ते करू दिले. सगळ्यांशी तिची फार पटकन मैत्री होते. एकदम बोलका आणि मनमिळाऊ स्वभाव आहे तिचा.. तिला आजपर्यंत कधीच शाळेतल्या, महाविद्यालयामधल्या मुलांमुळे त्रास झाला नाही, हे आवर्जून सांगावेसे वाटते. मुलांमध्ये समज खूप चांगली असते आणि मोठय़ांपेक्षा ते दुसऱ्यांना खूप मनापासून, नि:स्वार्थी भावनेने स्वीकारतात हा अनुभव आम्ही सगळ्यांनी वेळोवेळी घेतला.

तिच्या कल्पनाशक्तीला आणि विचारांच्या भरारीला तिच्या शारीरिक मर्यादा कधीच आड आल्या नाहीत. उद्याची अनेक स्वप्ने तिच्या मनात आहेत. रस्ता कठीण आहे, पण अशक्य नाही याची आम्हालादेखील खात्री आहे.

तिचे आजपर्यंतचे शिक्षक, मार्गदर्शक, घरातील प्रत्येक सदस्य, नातेवाईक, मित्रपरिवार या सगळ्यांमुळे अनेक सुंदर क्षण आजवरच्या प्रवासात आम्हाला मिळाले. हे खरे आहे की, ती शारीरिकदृष्टय़ा अत्यंत नाजूक, अगदी एखाद्या फुलाइतकी कोमल आहे. तिच्या मोकळ्या हालचालींवर अनेक बंधने त्यामुळे येतात. व्हीलचेअरच्या मदतीने ती अनेक छोटय़ामोठय़ा गोष्टी पार पाडते. पालकांना इतकेच सांगेन की, समाजात कदाचित वाईट खूप असेल आणि चांगले थोडे, पण त्या थोडय़ा चांगल्याची शक्ती आपल्याला पुढे जाण्यासाठी विश्वास आणि बळ देते.  शेवटी सामथ्र्य शरीरात नसते तर मनात असते, या श्रद्धेने माझी श्रद्धा घडते आहे!

swatipkulkarni@yahoo.com 

chaturang@expressindia.com