रवीला देसले kavitadesale97@gmail.com

कविताला प्रशासकीय सेवेत जाऊन अधिकारी व्हायचे आहे. त्यासाठी ती प्रयत्न करते आहे. आपल्या आजारावर, अपंगत्वावर मात करत तिने दहावी, बारावी उत्तम गुणांनी उत्तीर्ण होऊन आपल्या ध्येयाकडे पाऊल टाकले आहे. तिची शिक्षणाची आवड लक्षात घेऊन तिच्यात जिद्द निर्माण केली ती तिच्या आईने रवीला देसले यांनी. त्यामुळे आज ती सगळ्या वेदनांना मागे टाकून यशस्वी भविष्याकडे वाटचाल करत आहे.

teacher demanded physical relations after seeing student alone in classroom
नागपूर : वर्गात एकट्या विद्यार्थिनीला पाहून शिक्षकाने…
rte marathi news, rte latest marathi news
आरटीई अंतर्गत बदलांमुळे विद्यार्थ्यांच्या चौथी, सातवीनंतरच्या शिक्षणाचे काय होणार?
Vidya Prabodhini students from Kolhapur top in the UPSC final result
युपीएससीमध्ये कोल्हापूरचा झेंडा; विद्या प्रबोधिनीच्या विद्यार्थांची अंतिम निकालात बाजी
Two minor girls molested in a private tutoring class in nashik
नाशिक : खासगी शिकवणी वर्गात दोन अल्पवयीन मुलींचा विनयभंग

कविताची शिकण्याची जिद्द खूप आहे, ती बुद्धिमान तर आहेच शिवाय मेहनतीही. खचून जायचं नाही हा तिचा स्वभाव. म्हणूनच आज ती सगळ्या अपंगत्वावर मात करून स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासाबरोबर एफ.वाय.बी.ए.चा अभ्यास करते आहे.

कविता सगळ्या भावंडांत धाकटी. तिला दोन मोठय़ा बहिणी आणि एक भाऊ आहे. तिचा जन्म झाला तेव्हाच तिला चार ठिकाणी फ्रॅक्चर्स होते. तिचे पाय कमकुवत होते. आम्ही पालघर जिल्ह्य़ात असणाऱ्या विक्रमगड तालुक्यात असणाऱ्या माले गावात राहतो. अतिशय लहान गाव, वैद्यकीय सोयीसुविधा फार नसलेलं गाव. त्यामुळे तिला फ्रॅक्चर असल्याचं कळायला तसा वेळच गेला. तिला osteogenesis Imerfecta असल्याचं कळलं तेव्हा तिला आणि तिच्याबरोबर तिच्या भावंडांना वाढवायचा ताण होता. त्यामुळे तिच्या अपंगत्वाचं दु:ख करत बसण्याऐवजी आहे ते स्वीकारून तिला आहे त्या परिस्थितीत योग्य पद्धतीने कसं वाढवता येईल हेच पाहिलं. तिची हाडं ठिसूळ असल्याने ती जवळपास ४ वर्षे पाळण्यातच होती. तिला अंघोळ घालणे असो की तिला हाताळणे असो अतिशय सावधगिरीने सगळ्या गोष्टी कराव्या लागायच्या. तिची शारीरिक प्रगती इतर मुलांच्या तुलनेत तशी हळूहळूच होती. तिचे पायच वाकडे आणि कमकुवत असल्याने तिला चालता येत नव्हते. ती घसरत घसरत पुढे जायची. चौथ्या वर्षांनंतर हळूहळू तिला घरातल्या घरात आणि बाहेर एकटीने सोडायला सुरुवात केली. अर्थात तिच्या मोठय़ा बहिणी आणि भाऊ सतत तिच्या अवतीभवती असायचे, तसेच तिचे वडीलही. तिला तिच्या पायांवर उभे राहता यावे यासाठी तिच्या वडिलांनी खूप दवाखाने केले. मुंबईला हाजीअली येथे असणाऱ्या ‘ऑल इंडिया इन्स्टिटय़ूट ऑफ फिजिकल मेडिसिन अ‍ॅण्ड रिहॅबिलिटेशन’ येथे तिच्या पायांवर उपचार सुरू होते. तिथल्या डॉक्टरांनी सांगितलं होतं की, हिच्यावर शस्त्रक्रिया करूनही फारसा फायदा होणार नाही, अन्यथा ते फार गुंतागुंतीचे ठरेल. त्या वेळी खूप खचल्यासारखं झालं, पण तिच्याकडे बघून ते दुख गिळून टाकलं.

तिचे भाऊ, बहीण शाळेत जातात हे पाहून तिलाही अभ्यास, शाळा यांची आवड निर्माण झाली होती. मग आम्ही थोडी हिंमत करून तिला शाळेत पाठवण्याचा निर्णय घेतला. जिल्हा परिषदेची शाळा होती गावात, त्यात मोठी तीन मुलं असल्याने शाळेने कुठलीही खळखळ न करता तिला प्रवेश दिला. ती तिच्या बहिणीच्या वर्गातच बसत असे. त्यामुळे वर्गात कुणी त्रास देण्याची भीती मला नव्हती. अर्थात तोपर्यंत कविता ९ वर्षांची झाली होती. शाळेत तिची प्रगती चांगली होती. सगळ्या गोष्टी तिने झटकन आत्मसात केल्या. शाळेचा पहिला टप्पा पार केल्यानंतर मात्र तिला पुढे शिकायचं होतं, मात्र तिचं अपंगत्व तिथे आड आलं. माध्यमिक शाळा तालुक्याच्या ठिकाणी असल्यानं एक तर बसने किंवा सामान्य मुलांना सायकल सारखे अन्य पर्याय उपलब्ध होते. हिला नेणे-आणणे करणे तिच्या महाविद्यालयात शिकणाऱ्या भाऊ-बहिणीलाही शक्य नव्हते, की शेतात काम करणाऱ्या तिच्या वडिलांना. त्यामुळे पाचवीची शाळा सुरू होऊन दोन महिने झाले तरी कविता घरीच होती. त्या वेळी ती खूप नाराज झाली होती. तिला कोणत्याही परिस्थितीत शिक्षण घ्यायचेच होते. म्हणतात ना ‘इच्छा तेथे मार्ग.’ तुम्ही एखाद्या गोष्टीने प्रेरित झाला असाल तर ती गोष्ट तुम्हाला मिळतेच. तिला विक्रमगड येथे कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयात पाचवीसाठी प्रवेश मिळाला. तिने तिथे प्रवेश घेतल्यावर काही दिवसांनीच शाळेने तिच्यावर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. त्या वेळी शस्त्रक्रियेचा तिच्यावर फारसा परिणाम होणार नाही याची जाणीव तिच्या वडिलांनी शाळा प्रशासनाला करून दिली होती. मात्र त्यांनी शस्त्रक्रिया करून बघण्यास काय हरकत आहे, झाला तर फायदाच होईल असे सांगत २०१० मध्ये तिच्यावर ३ शस्त्रक्रिया केल्या. त्या वेळी नुकतेच तिच्या मोठय़ा बहिणीचे लग्न झाले होते. मात्र त्या शस्त्रक्रिया यशस्वी तर झाल्या नाहीतच शिवाय त्याचा परिणाम तिच्या स्वरयंत्रावर आणि कानावर झाला. तिला ऐकायला येणेच बंद झाले. तसंच ती आधाराने उभी राहात होती तेही बंदच झाले. शिवाय तिची हाडे ठिसूळ असल्याने पायात बसवलेला रॉड तुटला आणि पुन्हा शस्त्रक्रिया करावी लागली. त्यानंतर ती जवळपास वर्षभर घरीच होती. तिच्या वेदना पाहवत नव्हत्या. आई असल्याने तिच्या समोर दु:खही करता यायचे नाही. तिला धीर देणे हे मात्र मी नेहमी करायची.

एक मात्र होतं की एवढं होऊनही कविताची शिक्षणाची ओढ काही कमी झाली नव्हती. जणू तिला माहीत झालं होतं की, शिक्षणच तिचं तारणहार आहे, या सगळ्यात. तिने आणि तिच्या वडिलांनी शाळेत तिची स्थिती कळवली. तिथल्या मुख्याध्यापिका माधुरी जाधव मॅडम यांनी तिला खूप सहकार्य केले. अगदी मुलगी मानूनच त्या तिला आजही मार्गदर्शन करत असतात. तिच्या वाटचालीत त्यांचा मोठा वाटा आहे. त्यातूनच मग तिने सहावीचा अभ्यास घरीच केला आणि शाळेनेही सहकार्य करत तिच्या परीक्षा घरी येऊन घेतल्या. दरम्यान तिला कानासाठी मशीन मिळवण्यासाठी खूप प्रयत्न करावा लागला. आता तिला मशीनच्या साह्य़ाने चांगलं ऐकू येतं. अशा रीतीने तिने सहावी पूर्ण केल्यावर ती पुन्हा सातवीसाठी विक्रमगडला गेली. तिला दूर ठेवताना नेहमी एक चिंता असायची, मात्र शिक्षणासाठी अधीर झालेली कविता पाहिली की मी माझ्या सगळ्या चिंता, काळजी दूर ठेवून तिला एकटीने राहण्यासाठी तयार करायची. कविताने जिद्दीने दहावी पूर्ण केली तीही ८२ टक्के गुण मिळवून. आता ती तिची लढाई लढण्यासाठी तयार झाली होती.

तिला विज्ञान शाखेत प्रवेश घ्यायचा होता, मात्र जिल्ह्य़ात अशी कुठलीच शाळा अथवा महाविद्यालय नव्हते की तिला सामावून घेईल. तिने आणि तिच्या वडिलांनी खूप प्रयत्न केले, मात्र तिला प्रवेश मिळाला नाही. अखेर तिने विचार केला की आपल्याला पुढे प्रशासकीय सेवेतच जायचे आहे, तर विज्ञान शाखा असो अथवा कला. तिला निलेश सांबरे यांनी स्थापन केलेल्या झाडपोली इथल्या जिजाऊ शैक्षणिक व  सामाजिक संस्थेत कला शाखेसाठी प्रवेश मिळाला. तिथे राहून तिने ७५ टक्के गुण मिळवले. तिला लॉला प्रवेश घ्यायचा होता, मात्र प्रवेशपरीक्षेची तारीख निघून गेली होती. सध्या ती स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी तसेच पुढचे शिक्षण घेण्यासाठी दीपस्तंभ फाउंडेशन, जळगाव येथे राहते आहे.

आजही तिला दूर ठेवताना मन नेहमी धास्तावलेले असते, तिची ठिसूळ हाडे काही कारणांनी मोडणार तर नाहीत, तिचा पाय दुखावणार तर नाही, तिच्या हातांवर ताण तर येणार नाही, मात्र मी तिला असलेला शिक्षणाचा ध्यास पाहते आणि स्वत:ला निश्चिंत करण्याचा प्रयत्न करते.

मूल जरी विशेष असलं तरी त्याची आवड लक्षात घेऊन जर त्यासाठी त्याला धडपड करू दिली तर ते नक्कीच उत्तमरीत्या जगण्याचा प्रयत्न करते. त्यामुळे तिचे यशच आमचीही प्रेरणा आहे.

दहावीला उत्तम गुणांनी उत्तीर्ण झाल्यानंतर रिअल अकॅडमीतर्फे कविताचा सत्कार करण्यात आला.

chaturang@expressindia.com

शब्दांकन : रेश्मा भुजबळ