04 December 2020

News Flash

चेतनादूत

आमच्या यवतमाळ जिल्ह्य़ाची ‘चेतनादूत’ म्हणून जिल्हा प्रशासनाने शिरीनची निवड केली.

शिरीन तबस्सुम

शकिला बानो शेख समशेर

शिरीन तबस्सुम ही यवतमाळ जिल्ह्य़ातील ‘चेतनादूत’ आहे. विदर्भातल्या शेतकऱ्यांना आत्महत्येपासून परावृत्त करण्यासाठी ती प्रयत्नशील आहे. ती शेतकऱ्यांना तिचेच उदाहरण देते, ते म्हणजे दोन हात आणि एक पाय नसताना जर ती कृतिशील आयुष्य उत्तम आणि आनंदी मनाने जगतेय, तर ‘ते’ का नाहीत. आपल्याला एवढे सकारात्मक बनवण्यामागे आहेत ते पालकांचे विचार आणि त्यांचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन हे शिरीन आवर्जून सांगते. 

आमच्या यवतमाळ जिल्ह्य़ाची ‘चेतनादूत’ म्हणून जिल्हा प्रशासनाने शिरीनची निवड केली. गेली दोन वर्षे ती शेतकऱ्यांनी आत्महत्येपासून परावृत्त व्हावे म्हणून प्रयत्न करीत आहे. ‘‘मला दोन हात आणि पाय नाही तरी मी आनंदाने जगतेय. तुम्हाला हातही आहेत आणि पायही, मग तुम्ही कशासाठी आत्महत्या करता? कधी काही वाटलंच तर तुमच्या घरच्यांशी मोकळेपणाने बोला’’ ही तिची वाक्यं असतात. तिच्याबरोबर या कामासाठी जिल्ह्य़ाभर फिरताना जाणवते ती तिची चिकाटी. तिचे जीवनाबद्दलचे प्रगल्भ विचार ऐकल्यावर एका गोष्टीची नक्की खात्री पटते, आपण तिची ‘परवरीश’ योग्य प्रकारे केली आहे तर!

साधारणत: २२ वर्षांपूर्वी शिरीनचे पप्पा रोजंदारीवर काम करायचे आणि महिन्याला जेमतेम ३५० रुपये मिळायचे. त्यातच घरभाडे, वीज देयक, किराणा, भाजीपाला, दूध आणि एका मुलीची शाळा-संगोपन अशी कसरत मी करीत होते. त्यामुळे दुसऱ्यांदा गर्भवती राहिले तरी डॉक्टरकडे जाणे, नियमित तपासणी वगैरे काही परवडत नव्हतं, तर सोनोग्राफीसारखे महागडे उपचार शक्यच नव्हते. क्वचित फारच बरे वाटले नाही तर सरकारी दवाखाना गाठायचा आणि ते देतील तीच औषधे घ्यायची एवढंच हाती होतं. त्यामुळे शिरीनच्या जन्माआधी तिच्यात काही दोष आहे किंवा नाही हे समजले नाही. शिरीनचा जन्म झाला, दोन हात आणि एक पाय नसलेल्या अवस्थेत. दु:ख करायलाही वेळ नव्हता; पण तरीही हा एक अपघात आहे असेच समजून स्वत:ची समजूत घातली. हा अपघात ती जन्माला येण्याआधीच झाला होता. त्यामुळे चिंता होती की तिचे पालनपोषण नीट होईल ना ; पण परमेश्वराच्या मनात मात्र काही चांगलेच असावे. कारण शिरीन झाली आणि तिच्या वडिलांना चांगली नोकरी लागली आणि नोकरीव्यतिरिक्तही करीत असलेल्या कामातून चांगले पैसे मिळू लागले. परिस्थिती थोडी सुधारली.

शिरीनला वाढवताना मी केवळ आणि केवळ एकच केले. ते म्हणजे तिला सामान्यपणे वाढवलं. तिची प्रगती सामान्य मुलांप्रमाणेच होती. फक्त अडथळा होता तो हात आणि पाय नसण्याचा. आम्ही कधीच तिची लाज बाळगली नाही. तिला आम्ही आमच्याबरोबर सगळीकडे फिरवायचो. नातेवाईक असो, कुठलाही कार्यक्रम असो, तिला कधीही घरी ठेवले नाही. तीन वर्षे झपाटय़ाने गेली आणि तिच्या शाळेसाठी आमची धडपड सुरू झाली. मी स्वत: बारावी झालेली, तर तिचे वडीलही पदवीपर्यंत शिकलेले. त्यामुळे आम्हाला तिने शिकावे असे वाटत होते. आम्ही तिचे नाव घालण्यासाठी जवळच्याच सरकारी शाळेत गेलो असता तिथे थोडा वाईट अनुभव आला. शाळा व्यवस्थापनाने तिला अपंगांच्या शाळेत घाला, असे सांगितले. आम्ही अपंगांच्या शाळेत जाऊन पाहणी केली. यवतमाळच्या अपंग शाळेची अवस्था फारच दयनीय होती. ते पाहून माझे मन काही तिथे प्रवेश घेण्यास धजावेना. तिने सामान्य मुलांबरोबर शिकावे, अशी माझी प्रबळ इच्छा होती, जेणेकरून तिचे शिक्षणही सामान्यपणेच होईल. अखेर तिला अंजुमन उर्दू हायस्कूल या खासगी शाळेमध्ये प्रवेश मिळाला. तिच्या बहिणीशी तिची पहिल्यापासून गट्टी होतीच. तिचे शाळेत जाणे, वह्य़ा-पुस्तकं, पेन्सिल, पेन यांची तिला ओळख होती. शिवाय आपल्याला हात नाहीत हेही त्या बालमनाला जाणवले असावे, त्यातूनच तिने स्वत:च पायामध्ये पेन्सिल पकडायला सुरुवात केली. आम्ही कुणीही न शिकवता पायात पेन्सिल पकडून तिने लिहायला सुरुवात केली. तिच्या शिक्षणाचा श्रीगणेशा झाला. पाचवीपर्यंत मी किंवा तिचे पप्पा तिला शाळेत पोहोचवायचो.

तिचे पप्पा वेल्डिंगचे काम करायचे. मग त्यांनी सहावीत असताना तिच्यासाठी व्हीलचेअर बनवली. त्या चेअरवर बसून ती शाळेत जायची. आमची सकारात्मक विचारसरणी बघून असावं किंवा शिरीनच्या स्वभावातला गोडवा असावा आम्हाला तिच्या बाबतीत कधीच वाईट अनुभव आला नाही. ना नातेवाईक ना शेजारीपाजारी, कुणीही कधी वावगा शब्द तिच्याबाबतीत सुनावला नाही. उलट होता होईल तेवढी मदतच केली. कधी मी सामान आणायला किंवा कामासाठी बाहेर गेले तर शेजारी असोत, नातेवाईक असोत, सगळेच आनंदाने तिला सांभाळायचे. सगळ्यांनाच तिचे कौतुक होते आणि आजही आहे. शाळेतही तिच्या मित्रमैत्रिणींनी तिला दुखावले नाही. ते तिची व्हीलचेअर ढकलत घरापर्यंत पोहोचवायचे, तिचे दप्तर धरायचे, तिला कंपासमधून हवी ती वस्तू काढून द्यायचे. ती पायाने जेवते म्हणून त्यांनी कधी तिला दूरही ठेवले नाही, उलट एकत्र जेवायला बसायचे सगळे. सामान्य मुलांच्या शाळेत घातल्याने इतर मुलांचे पाहून शिरीन बऱ्याच प्रमाणात स्वावलंबी झाली. खाणं-पिणं याबरोबरच अनेक गोष्टी ती शाळेत इतर मुलांचे पाहून शिकली. शाळेतल्या शिक्षकांनीही तिला कायम मदतच केली. दहावीपर्यंत ती व्हीलचेअरनेच शाळेत गेली. दहावीपर्यंत शिरीनने स्वत:च्या पायाने सगळे पेपर लिहिले. त्यानंतर तिला रायटर मिळाला. दहावीला तिला ७० टक्के गुण मिळाले. अकरावी-बारावीचे ‘काटेबाई गर्ल्स उर्दू ज्युनिअर कॉलेज’ हे घरापासून दूर असल्याने तिचे पप्पाच तिला कॉलेजमध्ये सोडण्याचे आणि आणण्याचे काम करायचे. आज शिरीनने कला शाखेतून पदवी प्राप्त केली आहे. तिला अंघोळ घालणे आणि वेणी घालून देणे ही कामं सोडली तर सगळी कामं तिची तीच करते. अगदी वैयक्तिक स्वच्छतेपासून ते काजळ लावणे, मेकअप करण्यापर्यंत.

शिरीनला तीन-चार वेळा जयपूर फूट आणि हात बसवण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी मुंंबई, नागपूर तसंच यवतमाळ इथे तिला घेऊन गेलो, मात्र ते बसवणे काही यशस्वी झाले नाही. कृत्रिम पायामुळे तिच्या खुब्यावर ताण यायचा, त्यामुळे पायही बसवणे यशस्वी ठरले नाही. शिरीनला जिल्हाधिकारी व्हायचे आहे. यासाठी ती यूपीएससी परीक्षेची तयारी करते आहे. आधी ती त्यासाठी क्लासला जायची, मात्र तो लांब असल्याने आणि आर्थिक चणचणीमुळे आता ती घरीच अभ्यास करते.

शिरीनला आतापर्यंत नवज्योती पुरस्कार, केसरी पुरस्कार आणि इतर अनेक पुरस्कार मिळाले आहेत. शिरीनचे कौतुक म्हणजे ती सतत आनंदी राहण्याचा प्रयत्न करते. आपल्या उणिवांविषयी खंत न करता त्यातून कसा मार्ग काढता येईल याचाच विचार ती करते. आम्हीही कुठल्या गोष्टीची खंत करीत नाही. जो दिवस येतो तो आनंदाने घालवतो.

शिरीनसारखी मुलं मुळातच चिकाटीने, जिद्दीने आयुष्याचा सामना करायला तयार असतात. उनका दिल छोटा नही करना चाहिये. त्यांची लाज वाटून घेऊन तुम्ही त्यांच्याकडे पाहिले, त्यांना समाजापासून दूर ठेवले, तर त्यांची प्रगती कशी होणार? त्यांना जगण्याचा अधिकार नाही का? हा विचार केला पाहिजे. सगळ्या गोष्टी जागच्या जागी असणाऱ्यांना कुणीही सांभाळेल, पण जर परमेश्वराने हा अपघात जन्माआधी घडवून आणला असेल, तर आपण ही जबाबदारी अधिक सजगतेने स्वीकारली पाहिजे. मग सकारात्मकतेने वाढणारी ही पिढी आजूबाजूचा परिसर आनंदी आणि सकारात्मक बनवतातच.

(सदर समाप्त)

nshireentabassum206@gmail.com

chaturang@expressindia.com

शब्दांकन – रेश्मा भुजबळ

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 22, 2018 1:50 am

Web Title: shirin tabassum a disabled girl who helps prevent farmer suicides
Next Stories
1 डोळस जबाबदारी
2 होऊनिया आधार..
3 पुनर्जन्म
Just Now!
X