तीन दशकांपूर्वी अमेरिकेत काही अमली पदार्थ सेवन करणाऱ्या व्यक्तींमध्ये एक समजायला कठीण असा रोग आढळला होता. शरीराची रोगप्रतिकारकशक्ती पूर्णपणे संपवून टाकून, एरवी निरोगी माणसाला कधीही न होणारे रोग या व्यक्तींमध्ये आढळू लागले होते आणि कितीही उपचार केले तरी एकानंतर एक रोग होऊन शेवटी या व्यक्तींना अत्यंत विदारक मृत्यू येत होता.

प्रथम या रोगाचा शोध लागल्यावर शास्त्रज्ञांचा अंदाज होता की हा रोग केवळ अमली पदार्थ सेवन करणाऱ्या व्यक्तींपुरताच मर्यादित आहे, परंतु प्रथम अमेरिकेत आणि नंतर जगभरात असे रुग्ण आढळू लागले, आणि काही वर्षांच्या संशोधनानंतर मानवजातीमध्ये एच.आय.व्ही. एड्स या कठीण, अतिशय वेगाने आयुष्याचा कब्जा घेणारा रोग आढळला असल्याचे शास्त्रज्ञांनी जाहीर केले. तेव्हा जगामध्ये खरंच भयाची लाट पसरली होती. युद्धपातळीवर संशोधन करून यावर उपाय शोधण्याकरिता अब्जावधी डॉलर खर्च केले गेले.

एड्सच्या संकटाचा आणि त्याच्या गांभीर्याचा योग्य अंदाज आल्यावर मात्र आंतरराष्ट्रीय पातळीवर ज्या अनन्यसाधारण एकीने आणि हिरीरीने कृती कार्यक्रम आखून तो राबवण्यात आला ते वाखाणण्याजोगे होते. एकमेकांबद्दलचे हेवेदावे आणि राजकीय वैर विसरून जागतिक पातळीवर एड्सला रोखण्यासाठी चोख प्रयत्न झाले आणि त्याचमुळे आज एड्स हे पूर्वीच्या काळच्या प्लेगसारखा जगाच्या बहुसंख्य लोकसंख्येला नामोहरम करू शकेल असे संकट उरलेला नाही. अर्थात, अजूनही गाफील राहायला वाव नाही, पण आपण सध्या अस्तित्वात असलेले एड्स प्रतिबंधक कार्यक्रम चोखपणे कार्यान्वित ठेवले तर एड्सचा संसर्ग अत्यल्प होईल, ही शाश्वती देता येते, आणि ज्यांना एड्सची लागण झाली आहे त्यांना चांगले, कार्यक्षम आयुष्य मिळू शकेल, याबाबत विश्वास वाटतो. सध्याच्या संशोधनाच्या गतीमुळे पुढील काळात कदाचित रोग बराही होऊ  शकेल आणि या रोगाविरुद्धची लसही लवकरच उपलब्ध होऊ  शकेल, असा शास्त्रज्ञांना विश्वास आहे.

एड्स या रोगाने मानवी वृत्तीचे एक उत्तम उदाहरण जगाला दाखविले. इतर अनेक वेळेला आपल्या लष्करी, आर्थिक आणि राजकीय बळाने स्वत:च्या स्वार्थासाठी राजकीय गुंतागुंत निर्माण करणाऱ्या अमेरिकेने जगभरात एच.आय.व्ही.ची लागण आणि प्रसार रोखण्यासाठी काही उत्तम कार्यक्रम राबवले आहेत. किंबहुना अमेरिकेतील अनेक कंपन्यांना आणि श्रीमंत व्यक्तींना या रोगाविरुद्ध उभे राहण्यास वेगवेगळ्या कार्यक्रमांद्वारे आणि उपक्रमाद्वारे प्रवृत्त केले आहे. अशाच एका मोठय़ा कार्यक्रमाद्वारे अमेरिकेने राष्ट्रपती जॉर्ज डब्ल्यू बुश यांच्या नेतृत्वाखाली आफ्रिकेमध्ये प्रचंड प्रमाणावर मदत देण्याचा निश्चय केला, आणि २००३मध्ये बुश यांनी अमेरिकेकडून पुढील पाच वर्षांसाठी १५ अब्ज डॉलर्स इतकी प्रचंड मदत जाहीर केली. तेव्हा सुरू झालेला हा कार्यक्रम आजतागायत चालू आहे आणि त्यातून दिल्या गेलेल्या मदतीचा आकडा आता ७२ अब्ज डॉलर्स इतका आहे. जगभरात अनेक देशांमध्ये एड्सशी दोन हात करू शकेल, अशी आरोग्य यंत्रणासुद्धा या कार्यक्रमामुळे उभी राहते आहे. या कार्यक्रमाअंतर्गत दिली जाणारी मदत बऱ्याच अंशी आफ्रिकेतील १५ देशांना जाणार होती. बाकीचा काही अंश क्षयरोग, हिवताप आणि इतर अशा काही आजारांबाबतच्या संशोधनाला जाणार होता. या कार्यक्रमाचे नाव होते ‘पेप्फार’, अर्थात ‘प्रेसिडेंट्स इमर्जन्सी प्लॅन फॉर एड्स रिलीफ’.

जेव्हा हा कार्यक्रम सुरू झाला त्या वेळेस आफ्रिकेतील परिस्थिती भीषण होती. दोन कोटी व्यक्तींना एड्सची लागण झालेली होती, त्यातील अनेकांना कुठलेही औषध मिळत नसल्यामुळे संसर्ग झाल्यानंतर रोगाची लक्षणे दिसण्यात जो कालावधी जातो तो अत्यंत कमी होता. दक्षिण आफ्रिकेत तर या रोगाचे प्रमाण भयानक होते. एका अनुमानानुसार तेथील २० टक्के प्रौढ नागरिकांना एचआयव्हीची लागण झालेली होती. सगळ्यात विदारक सत्य हे की आफ्रिकेतल्या त्या दोन कोटींपैकी फक्त पन्नास हजार लोकांना गरजेची औषधे मिळत होती.

परंतु ‘पेप्फार’ कार्यक्रमाची परिणती अशी की आफ्रिकेमध्ये मोठय़ा प्रमाणामध्ये एच.आय.व्ही. आणि एड्सबाधित रुग्णांना मदत पोहोचण्यास सुरुवात झाली. एड्स या रोगाचा शोध लागला तेव्हापासूनच त्याचा प्रसार रोखण्यावर भर द्यावा, असे तज्ज्ञांचे मत होते. या रोगाचा संसर्ग होण्याचा सर्वात जास्त धोका असलेले काही गट, जसे की समलिंगी पुरुष, अमली पदार्थाचे सेवन करणाऱ्या व्यक्ती, वेश्या व्यवसायात असलेल्या व्यक्ती या सगळ्यांना आरोग्यशिक्षण आणि सेवा पुरवण्यावर लक्ष केंद्रित केले गेले. निरोध वापरणे आणि त्याचबरोबर लैंगिक संबंध ठेवण्याबद्दल जागरूक राहणे, गर्भवती असताना बाळाला एड्सची लागण होऊ नये यासाठी स्त्रियांना समुपदेशन करणे आणि अमली पदार्थाचे सेवन करताना एकाच सुईचा वापर अनेकांनी न करणे, असा बहुकलमी कार्यक्रम राबवला गेला. ज्यांना एड्स झाला आहे त्यांना प्रतिबंधक औषधे पुरवणे, त्यांना इतर रोगांची लागण होऊ न देणे, जे गंभीर रीतीने आजारी आहेत त्यांच्या कुटुंबाला आर्थिक नियोजन करण्यास मदत करणे, त्यांचे पुढील आयुष्य सुकर व्हावे यासाठी आर्थिक, व्यावसायिक मदत करणे, मुलांचे शिक्षण होण्यासाठी त्यांना मदत करणे अशा वेगवेगळ्या प्रकारे मदत केली गेली.

या सगळ्यामध्ये एक कार्यक्रम काहीसा वादग्रस्त होता. अमेरिकेत काही राज्यांमध्ये तरुणांनी लग्नबा लैंगिक संबंध ठेवू नयेत, अशी शिकवण देणारे काही गट आहेत. एड्स रोखण्यासाठी मात्र या पद्धतीने केलेले समुपदेशन उपयोगी पडत नाही, याविषयीचे शास्त्रीय पुरावे असतानासुद्धा या ‘पेप्फार’द्वारे लग्नबा संबंध ठेवण्यापासून रोखण्याविषयीचे शिक्षण दिले गेले. पुढे या पद्धतीचे मूल्यमापन झाल्यावर ती उपयोगी नाही हे सिद्ध झाले आणि सुमारे १-२ अब्ज डॉलर वाया गेल्याचे सिद्ध झाले. अनेक संस्थांनी कार्यक्रमाच्या या कलमावर केलेली टीका रास्त होती हे लक्षात आल्यापासून आता योजनांची आखणी अधिक विचारपूर्वक केली जात आहे.

उत्तम नियोजन असलेली आरोग्ययोजना काय घडवू शकते याचे एक उत्तम उदाहरण ‘पेप्फार’ने घालून दिले आहे. अमेरिकेच्या अनेक शासकीय आणि निम-शासकीय विभागांनी या कार्यक्रमावर एकत्र काम केलेले आहे. आंतरराष्ट्रीय एड्स नियंत्रण अधिकारी हे खास तयार केले गेलेले कार्यालय, त्याचबरोबर अमेरिकेचा आरोग्य विभाग, रोग नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्र, वाणिज्य मंत्रालय, कामगार मंत्रालय, अमेरिकेतील स्वयंसेवकांना एकत्र आणणारा पीस कोर्स हा कार्यक्रम, संरक्षण मंत्रालय आणि त्याचबरोबर अनेक खासगी कंपन्या असे प्रचंड जाळे अमेरिकेने या कार्यक्रमासाठी विणले आणि या सर्व देशांमध्ये कामाला लावले आहे आणि त्याचा परिणाम आज जगाला पाहायला मिळतो आहे.

या कार्यक्रमामुळे १.१५ कोटींहून अधिक व्यक्तींना औषधे पुरवली गेली आहेत, साठ लाख अनाथ बालकांना समुपदेशन आणि मदत देता आली, वीस लाख अर्भके त्यांच्या आईला एड्स असतानाही एड्सशिवाय जन्माला येऊ  शकली, साडेसात कोटी लोकांच्या चाचण्या होऊन त्यांना समुपदेशन दिले जाऊ  शकले. ‘पेप्फार’ कार्यक्रम राबवलेल्या देशात राहणाऱ्या नागरिकांमध्ये एड्सने मृत्यू होण्याची शक्यता १६ टक्क्यांनी कमी झाली, कार्यक्रमाच्या १५ पैकी ९ देशांमध्ये मृत्युदर ५० टक्क्यांपेक्षाही कमी झाला. काही देशांमध्ये नवीन रुग्ण येण्याचे प्रमाण ६०-७५ टक्के इतके कमी झाले आहे. मुख्य म्हणजे, आता आफ्रिकेतील अनेक देश हा कार्यक्रम पुढे राबवण्यासाठी मनुष्यबळ आणि तांत्रिक ज्ञान प्राप्त करून घेऊन तो पुढे स्वत: राबवण्यास उत्सुक आहेत. दक्षिण आफ्रिकेची त्या दृष्टीने तयारी सुरू आहे, पण ही प्रक्रिया घाईघाईत करू नये, असा तज्ज्ञांचा सल्ला आहे.

बुश राष्ट्राध्यक्ष झाले असताना आफ्रिकेला काही तात्काळ लष्करी आणि राजकीय गरज नसतानाही बुश यांनी राबवलेल्या या कार्यक्रमामुळे जगभर होणारा एड्सचा प्रसार कमी होण्यात नक्कीच मदत झाली. इतकेच नव्हे, तर अमेरिका कुठल्या तरी सकारात्मक दृष्टीने जगात पुढाकार घेऊ  शकतो हे अमेरिकेला या कार्यक्रमाद्वारे पटवता आले. भारत, आफ्रिका, नैऋत्य आशिया अशा अनेक ठिकाणी या रोगाबद्दल माहितीचा प्रसार व्हावा यासाठीही अमेरिकेने प्रयत्न केले आणि तेही खूप यशस्वी ठरत आहेत आणि या रोगाबद्दल नितांत गरजेची असलेली जागरूकता पसरवत आहेत.

आज जेव्हा पर्यावरण बदल आणि त्याबरोबरच येणारी असंख्य संकटे जगाला दिसत आहेत, तेव्हा कुठल्याही संकटाला तोंड देण्याची बुद्धी आणि क्षमता मानवी समाजामध्ये असतानाही जगामध्ये आज या प्रश्नावर ठोस, सर्वमान्य अशा कृती आराखडय़ावर एकमत नाही हे चिंताजनक आहे. तथाकथित विकास आणि प्रचंड विनाश हे दोन पर्याय असतानाही जग आज विकासाच्याच मागे धावत असल्याचे दिसते आहे, आणि इथेच पुन्हा जगाने ‘पेप्फार’चे उदाहरण आठवण्याची गरज आहे.

‘पेप्फार’ फक्त त्यातील आर्थिक किंवा तांत्रिक गुणवत्तेसाठी वाखाणण्याजोगा नाही. कुठलेही संकट आल्यावर, दूरदृष्टीने त्यावर मात करण्यासाठी योग्य वेळेला ठोस कृती करण्याची गरज हा कार्यक्रम अधोरेखित करतो. अशा संकटकाळी राजकीय हेवेदावे कुरवाळत बसलो तर सगळ्यांनाच त्याची किंमत मोजावी लागेल हे आज अनेक देशांना कळून चुकते आहे. पर्यावरण बदलाच्या स्वरूपात एड्सपेक्षा मोठे संकट आज आपल्यासमोर उभे आहे. ‘पेप्फार’चे उदाहरण डोळ्यासमोर ठेवून जर जागतिक पातळीवर कृती होऊ शकली तरच ‘पेप्फार’च्या अभूतपूर्व यशाला काही अर्थ राहील. अन्यथा आपण इतिहासातून काहीच शिकलो नाही तर काय होऊ शकते हे अत्यंत विदारक पद्धतीने निसर्ग आपल्याला शिकवण्यास समर्थ आहे!

मुक्ता गुंडी सागर अत्रे

gundiatre@gmail.com