रस्त्यावर सिगारेट ओढण्याचे व्यक्तिगत स्वातंत्र्य महत्त्वाचे की अप्रत्यक्षपणे इतर व्यक्तींना होणारा त्रास महत्त्वाचा? अ‍ॅन्थ्रॅक्स या रोगाचे जंतू सापडलेल्या व्यक्तीला काही काळापुरते समाजापासून लांब ठेवणे ही व्यक्तीवरील सक्ती की जनतेची गरज? क्षयरोग झालेल्या व्यक्तीला आपला आजार आपल्या कुटुंबापासून लपवून ठेवायचा आहे. असे करू देणे योग्य की अयोग्य? अमेरिकेत देशभरात बंदुकांमुळे सामान्यांचे जीव जात असताना व्यक्तिगत हक्क म्हणून बंदुका बाळगू देणे, हे नैतिकदृष्टय़ा बरोबर की चूक? माझ्या व्यक्ती म्हणून असलेल्या समजुती आणि माझ्या सवयी इतरांकरिता धोकादायक असल्या तरीही मी त्या बदलणार नाही, अशी भूमिका कुणी घेतली तर?

या आणि अशा कित्येक प्रश्नांवर जगभरात गेल्या कित्येक वर्षांपासून वादंग सुरू आहे. यापैकीच एक गाजलेला वाद आहे लसीकरणाचा. लस घेतल्याने फायदा नव्हे तोटाच होतो, लस घेणे हे व्यक्तिगत स्वातंत्र्य असायला हवे, लस घेण्याची सक्ती करणे ही मानवी स्वातंत्र्याची आणि हक्कांची पायमल्ली आहे, असे म्हणणारे अनेक गट आज जगभरात लसीकरणविरोधी भूमिका घेऊन लढत आहेत. या लसीकरण-विरोधी भूमिकेला अनेक छटा आहेत, हेही समजून घेतले पाहिजे.

१९९८ मध्ये डॉ. आंड्रय़ू वेकफिल्ड या आरोग्यशास्त्रज्ञाचा ‘लँसेट’ या सुप्रसिद्ध जर्नलमध्ये एक अभ्यास छापून आला. एकूण १२ रुग्णांच्या अभ्यासातून डॉ. आंड्रय़ू याने असे सिद्ध केले की, गोवर आणि गालगुंड या रोगांची बाधा होऊ  नये याकरिता दिली जाणारी एम.एम.आर. नावाची लस लहान मुलांमध्ये स्वमग्नता अर्थात ऑटिझम होण्यास कारणीभूत असते. या लेखाची साहजिकच खूप चर्चा झाली. बातम्या छापून आल्या, वाद-विवाद झाले; परंतु सर्वात महत्त्वाचा आणि गंभीर परिणाम दिसून आला तो असा की, हा लेख छापून आला त्याच वर्षी इंग्लंडमधील लसीकरणाचे प्रमाण घटले. डॉ. आंड्रय़ू यांना लसीकरणविरोधी गटाकडून आर्थिक पुरवठा झाल्याचे नंतर सिद्ध झाले. त्यांचा अभ्यास २०१० मध्ये ‘लँसेट’कडून मागे घेण्यात आला व त्यांच्यावर इंग्लंडमध्ये वैद्यकीय व्यवसाय करण्यास बंदीही घालण्यात आली.

परंतु विकाऊ  पद्धतीने केलेला एक अभ्यास अनेक देशांतील व्यक्तींमध्ये भीतीचे वातावरण पसरवून गेला. पालक आपल्या पाल्याला लस टोचून घेण्यास नकार देऊ  लागले. ही भीती फक्त इंग्लंडपुरतीच मर्यादित न राहता इतर काही देशांमध्येही पसरली. अमेरिकेतील एका सुप्रसिद्ध अभिनेत्रीने, जेनी मॅकार्थी हिने ‘लस घेतल्याने माझा मुलगा स्वमग्न (ऑटिस्टिक) झाला आहे’ असे जाहीररीत्या बोलून दाखवले आणि ही भीती अमेरिकेत अधिकच झपाटय़ाने पसरली. ‘ज्या वयात बाळांना ही लस दिली जाते त्याच वयात स्वमग्नतेची लक्षणे ठळकपणे जाणवू लागतात; परंतु याचा अर्थ लस घेतल्यामुळे हा आजार होतो, असे नव्हे!’ असे ‘वॅक्सिन एज्युकेशन सेंटर’तर्फे वारंवार सांगूनही अनेकांचा यावर विश्वास बसेना. दुर्दैवाने, ही भीती अनेकांच्या मनातून आजतागायत गेलेली नाही. या भीतीला काही जणांनी व्यक्तिगत स्वातंत्र्याचा मुलामाही दिला. ‘लसीकरणाची सक्ती करणे हा आमच्या व्यक्तिस्वातंत्र्यावर घाला आहे,’ असा आरोप करीत जगभरातील अनेक जण लसीकरण टाळत आहेत तर काही व्यक्ती धार्मिक कारण सांगून लस घेण्याचे टाळत आहेत. केवळ गोवर-गालगुंड या आजारांसाठीचीच नव्हे तर कोणतीच लस घेण्यास आम्ही बांधील नाही, असे सांगून लसीकरणाला विरोध करीत आहेत. एकीकडे गोवर, डांग्या खोकला यांसारखे आजार अमेरिकेत पुन्हा डोके वर काढत आहे; परंतु तरीही लसीकरणाविरोधी चळवळ पूर्णपणे थांबलेली नाही. ही चळवळ गेल्या काही वर्षांमध्ये इतकी वादग्रस्त ठरली आहे की, ‘महत्त्वाचे काय- व्यक्तीचे समज, व्यक्तिस्वातंत्र्य की समाजाचे हित?’ असा तात्त्विक प्रश्न घेऊन आज ती जगातल्या प्रत्येक व्यक्तीला विचार करायला लावत आहे.

एखाद्या आगगाडीतील प्रवाशाने कोणतीही अटीतटीची परिस्थिती उद्भवली नसताना जर गाडीची चेन ओढून गाडी थांबवली तर ‘चेन ओढण्याचे त्यास स्वातंत्र्य आहे की,’ असे म्हणून आपण दुर्लक्ष करू शकत नाही. याचे कारण असे की, व्यक्तिस्वातंत्र्याचा हक्क हा इतरांच्या स्वातंत्र्यावर घाला घालून वापरला जाऊ  शकत नाही. असेच काहीसे सामाजिक आरोग्याचेही आहे. एखाद्या समाजातील अधिकाधिक व्यक्ती जेव्हा लस घेणे नाकारतात तेव्हा केवळ लस न घेणाऱ्या व्यक्तीच नव्हे तर त्या अख्ख्या समूहाचीच प्रतिकारक्षमता अर्थात ‘हर्ड इम्युनिटी’ घटते. म्हणजेच जेव्हा आपण स्वत: लस घेतो किंवा आपल्या पाल्याला लस देतो तेव्हा लस न घेणाऱ्या किंवा काही वैद्यकीय कारणाने घेऊ  न शकणाऱ्या सर्व जणांकरिता आपण जणू काही एक सुरक्षाकवच तयार करीत असतो. जेव्हा अधिकाधिक व्यक्ती लस घेण्याचे नाकारतात तेव्हा या सुरक्षाकवचाला तडे जातात. साधारणत: ८० टक्के समाजाने लस घेतली की तो संपूर्ण समाज त्या रोगापासून मुक्त होण्याची शक्यता वाढते. अर्थात, ही टक्केवारी प्रत्येक रोगाकरिता काहीशी भिन्न असते; परंतु हे अधोरेखित होते की, लस घेणे किंवा नाकारणे हा मुळात ‘व्यक्ती’स्वातंत्र्याचा प्रश्न म्हणून बघताच येत नाही तर ती समाजहिताची जबाबदारी म्हणून बघावी लागते. एखाद्या लहान मुलाला त्याच्या आईने गोवर या रोगावरील लस न देण्याचे ठरवले. त्या मुलाला गोवर झाला. इतरांशी खेळताना हा रोग पसरला आणि प्रतिकारक्षमता कमजोर असलेल्या एखाद्या बाळाला किंवा कर्करुग्णाला गोवरची बाधा झाल्याने मृत्यू ओढवला तर जबाबदारी नेमकी कुणाची? या आणि अशा कित्येक वादांना पूर्णविराम देत ऑस्ट्रेलियातील शासनाने नुकताच अत्यंत कडक असा लसीकरण कायदा आणला आहे. त्याचे नाव आहे ‘नो जॅब नो प्ले, नो जॅब नो पे’. लसीकरण नाकारलेल्या पालकांच्या पाल्याला शिशु शाळेत दाखल न करून घेण्याचा, मुले आजारी पडल्यास त्यांना काही काळ सक्तीची सुट्टी देण्याचा आणि पाल्याला लस न देणाऱ्या पालकांना काही शासकीय सवलती नाकारण्याचा हा कायदा आहे. या कायद्याला अर्थातच अनेक बाजूंनी विरोध होतो आहे.

खरी मेख ही की सामाजिक आरोग्याचा विचार करताना अशा प्रत्येक नैतिक वादावर केवळ सक्ती करण्याचा उपाय लागू पडत नाही. याचे सर्वात उत्तम उदाहरण म्हणजे निरोधचा वापर. एड्सची लागण रोखण्यासाठी निरोध वापरणे हा उत्तम उपाय आहे. आफ्रिकेच्या खेडय़ांपासून ते जगभरातील अक्षरश: कानाकोपऱ्यात ‘एड्सचा प्रसार रोखण्यासाठी निरोध वापरावेत’, हे सर्वावर विविध माध्यमांमधून ठसवण्याचा प्रयत्न गेली कित्येक वर्षे सुरू आहे. हा संदेश पोहोचण्यात आता बऱ्याच अंशी यश मिळाले आहे, असे म्हणण्यास हरकत नाही. काही अपवाद वगळता आता एड्सच्या प्रसारामध्ये प्रचंड वाढ होताना दिसत नाही, किंबहुना एड्सच्या लागणीची गती कमीच होते आहे; परंतु आजही अनेक व्यक्ती निरोध वापरण्यास तयार नसतात. निरोधामुळे लैंगिक सुखामध्ये बाधा येते, हे त्यामागचे सर्वात महत्त्वाचे सांगितले जाणारे कारण आहे. या भूमिकेमागे स्वत:चा अनुभव, समजुती, सांस्कृतिक पाश्र्वभूमी, धार्मिक विचारांची पकड आणि व्यक्तिस्वातंत्र्य असे अनेक पदर आहेत. एड्सची लागण, अनियोजित गर्भारपण, पौगंडावस्थेतील गर्भारपण अशा कित्येक आरोग्यप्रश्नांवर निरोध वापरणे हा उत्तम उपाय असल्याने निरोध वापराविषयी ठोस भूमिका घेणे आरोग्य शास्त्रज्ञांना गरजेचे असते.

निरोध वापरण्याची सक्ती तर करता येऊ  शकत नाही मग सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने सर्वात उत्तम उपाय कोणता? जनजागृती हा अर्थातच एक उपाय आहे; परंतु हा अत्यंत नाजूक विषय केवळ जनजागृतीने हाताळता येऊ  शकत नाही, हे शास्त्रज्ञांच्या लक्षात येत आहे. या दृष्टीने एक अतिशय अनोखे पाऊल टाकले ते ‘बिल अ‍ॅण्ड मेलिंडा गेट्स फाऊंडेशन’ने. ‘वापरावे लागतील असे नव्हे तर वापरावेसे वाटतील असे निरोध’ निर्माण करण्याची एक स्पर्धा नुकतीच या फाऊंडेशनतर्फे घेण्यात आली. मानवी त्वचेच्या गुणधर्माशी सुसंगत, उत्तम प्रतीचे आणि स्वस्त असे निरोध विकसित व्हावेत, यासाठी नुकतेच काही संशोधकांना एक लाख डॉलर देऊ  केले गेले आहेत. अजून हे निरोध उपलब्ध झालेले नाहीत; परंतु उत्तम प्रतीचे आरोग्य-उत्पादन आपले समज आणि आपल्या सवयी बदलू शकते का, याची एक मोठी परीक्षाच या उपक्रमाने केली जाणार आहे, हे नक्की!

‘व्यक्तिस्वातंत्र्य की समाजहित’ अशा अत्यंत जटिल प्रश्नाची गुंतागुंत सोडवणे फारच अवघड असते. आज आरोग्यक्षेत्रातील अनेक विचार या पायरीवर येऊन थांबले आहेत. सक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ ठरते का ते येणारा काळच ठरवेल!

– मुक्ता गुंडी सागर अत्रे

gundiatre@gmail.com