दिवसाला चाळीस सिगारेट पिणाऱ्या अर्दी रिझाल या दोन वर्षांच्या मुलाने इंडोनेशियातल्या संवेदनशील सरकारी अधिकाऱ्यांची झोप उडवली आणि सुरू झाली मोहीम इंडोनेशियातील धूम्रपानविरोधातील मोहिमेची. इंडोनेशियातले सुमारे ६७ टक्के पुरुष व्यसनाधीन असून काही लाख मुलेही यात अडकली आहेत. आज याच्याविरोधात जोरात मोहीम सुरू असून ‘बोन-बोन’ नावाचं एक छोटंसं खेडं पूर्णत: व्यसनमुक्त झालेलं आहे.

अर्दी रिझाल. इंडोनेशियातल्या जेमतेम दोन वर्षांच्या या मुलानं २०१० मध्ये जगभरातल्या अनेकांची झोप उडवली. केवळ दोन वर्षांचा गोबऱ्या गालांचा अर्दी.. घराच्या ओसरीवर बसला आहे. सिगारेट ओढण्यात सराईत असलेल्या एखाद्या प्रौढाप्रमाणे एकामागून एक सिगारेट ओढतो आहे. त्याच्या भवताली तयार होणाऱ्या धुराच्या वलयात अर्दी सिगारेटच्या धुराचे झुरक्यांवर झुरके घेत आहे.. आजूबाजूला पडवीवर बसणाऱ्या प्रौढांना यात काही नवीन किंवा वावगं वाटत नाही..

२०१० च्या सुमारास या दोन वर्षांच्या छोटय़ाचा सिगारेट ओढतानाचा व्हिडीओ आणि बातमी सोशल मीडियावर वाऱ्यासारखी पसरली. दिवसाला ४० सिगारेट्स सहज ओढणाऱ्या या इंडोनेशियाच्या ‘स्मोकिंग बेबी’ला अर्थात अर्दीला बघायला जेव्हा प्रवासी गर्दी करू लागले तेव्हा इंडोनेशियातल्या काही संवेदनशील सरकारी अधिकाऱ्यांना यातले गांभीर्य समजले. त्यांनी अर्दीला डॉक्टरकडे सुपूर्द करून पुनर्वसन केंद्रात दाखल करून घेतले.

‘धूम्रपान करणाऱ्यांसाठी स्वर्गभूमी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इंडोनेशिया या देशातलं अर्दी रिझाल हे केवळ एक प्रातिनिधिक उदाहरण होतं, असं दुर्दैवानं म्हणावं लागतं! दिवसाला सिगारेट्सची दोन-दोन पाकिटे सहज फुंकणारी अर्दीसारखी असंख्य मुलं या व्यसनापुढे पुरती हतबल झालेली.. ज्या वयात लहानग्यानं फुग्यासाठी हट्ट करायचा त्या वयात या देशातल्या कित्येक मुलांना सिगारेटशिवाय दुसरं विश्वच उरलेलं नव्हतं. कुणाची आई म्हणतेय की, ‘‘आमचा मुलगा सिगारेट ओढतो; पण तब्येतीनं तो एकदम छान आहे.’’ तर कुणाचे वडील म्हणत आहेत, ‘‘सिगारेट काढून घेतली की खूप रडायला लागतो.. मग काय करणार! द्यावीच लागते..’’ काही वर्षांपूर्वी इंडोनेशियाच्या घराघरांत अशी परिस्थिती होती.. तंबाखू शरीराला अपायकारक असते, हेच मुळी या समाजाला मान्य नव्हते! २०१०-११ च्या सुमारास इंडोनेशियातली १६ वर्षांखालची काही दशलक्ष मुलं सिगारेटच्या धुरात आपलं बालपण व्यतीत करत होती.. अमेरिकेतील शोधपत्रकारिता करणाऱ्या ‘व्हाइस’सारख्या कित्येक संस्थांनी, वर्तमानपत्रांनी इंडोनेशियातल्या धूम्रपानाच्या या भयंकर परिस्थितीचा पुढील कित्येक र्वष पाठपुरावा केला.

ज्या देशात सिगारेट्स खरेदी करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे वयाचे बंधन नाही, जिथे एक डॉलरच्या पॉकेटमनीमध्ये पाचपेक्षाही जास्त सिगारेट्स सहजरीत्या मिळतात, जिथल्या जवळजवळ प्रत्येक चौकात, गल्लीत, इमारतीवर, खेळाच्या मैदानांवर सिगारेट्सच्या जाहिरातींनी कब्जा केलेला आहे, त्या देशात सिगारेट्स ओढण्याची अक्षरश: संस्कृती तयार होऊ शकते. असेच काहीसे इंडोनेशियाचे झाले. या देशात सिगारेट्स ओढणे लोकांच्या रक्तातच मुरले जणू! त्यातून सिगारेट कंपन्यांनी जनमानसावर कब्जा मिळवण्याकरिता जोमानं प्रयत्न केले. एक जाहिरात ‘स्टे कुल’असा ‘कुलनेस’चा फसवा संदेश देणारी होती. एका कंपनीनं तर ‘डोन्ट क्विट’ असाच फलक भर रस्त्यात लावला आणि त्याच्या खाली लिहिलं- ‘डू इट’ आणि एका कंपनीनं सिगारेट म्हणजे तुमची दोस्त असं दर्शवून बसवर जाहिरात केली, Dying is better than leaving your friend.. या सगळ्या उदाहरणांवरून दिसून येते ती सिगारेट कंपन्यांची हुशारी आणि मुजोरी!

इंडोनेशियात कित्येक जण आपल्या गोदामात, तबेल्यात वर्षभराचा जवळजवळ १०० किलोचा तंबाखूचा साठा करून ठेवू लागले. इच्छा झाली की तिथली तंबाखू घेऊन हातानं सिगारेट वळायची आणि सिगारेटचे झुरके मारायला सुरुवात करायची. ‘ग्लोबल अ‍ॅडल्ट टोबॅको’ सर्वेक्षणानुसार इंडोनेशियातले सुमारे ६७ टक्के पुरुष आणि ३ टक्के स्त्रिया या सिगारेट व्यसनाधीन आहेत. इंडोनेशियन पुरुषांमधील सिगारेट व्यसनाधीनतेचे प्रमाण हे जगात सर्वात जास्त आहे. १३ ते १६ वयोगटातल्या दर १०० मुलांमागे ४१ मुलं आणि ४ मुली सिगारेट ओढत होते. इंडोनेशियातलं तंबाखूच्या धुराचं हे साम्राज्य तिथले राज्यकर्ते आणि पॉलिसीमेकर्स सगळ्यांनाच जणू आंधळं करत होतं!

जाहिरातींचा परिणाम, क्रेटेक्स नावाच्या स्थानिक सिगारेटची मुबलक उपलब्धता, आंतरराष्ट्रीय सिगारेट कंपन्यांना जाहिरात करण्यासाठी मिळालेली सूट, वयाचे कोणतेही र्निबध न घालता विकली जाणारी तंबाखू आणि तंबाखू नियंत्रणाकरिता जागतिक आरोग्य संघटनेने भरवलेल्या अधिवेशनात सही न करण्याचा शासनानं दाखवलेला आडमुठेपणा याचा एकत्रित परिणाम इंडोनेशियन जनतेच्या आरोग्यावरही दिसू लागला. तंबाखूमुळे होणारे आरोग्याचे त्रास तर वाढलेच, पण त्याबरोबर तंबाखू सेवनाने होणाऱ्या मृत्युदरात झपाटय़ाने वाढ होऊ लागली. नुकतेच २०१६ मध्येसुद्धा तंबाखूमुळे होणाऱ्या क्षयरोग, कर्करोग, हृदयविकार आणि श्वसनाचे विकार यांसारख्या आरोग्याच्या वेगवेगळ्या प्रश्नांवर या देशाने जवळजवळ ६५ अब्ज रुपये खर्च केले आहेत.

समाजावर पडलेला आणि दिवसेंदिवस घट्ट होत जाणारा हा तंबाखूचा विळखा वेळीच सैल करण्यासाठी २०१०-११च्या सुमारास इंडोनिशियाच्या शासनाने काही कडक पावले उचलण्याचा निर्णय घेतला. याकरिता अर्थातच आंतरराष्ट्रीय दबाव हे एक मुख्य कारण होते. इंडोनेशियाची राजधानी असलेल्या जकार्ता या शहरामध्ये धूम्रपानविरोधी चळवळीने जोर धरण्यास सुरुवात केली. ‘उ्रॠं१ी३३ी ्र२ीं३्रल्लॠ ८४ ं’्र५ी’ अशा आशयाचे स्टिकर्स सार्वजनिक ठिकाणी लावण्यात आले. अमेरिकेतील ‘ब्लूमबर्ग इनिशिएटिव्हने’ पुरवलेल्या भरघोस आर्थिक मदतीच्या बळावर पुढील ३-४ वर्षांमध्ये इंडोनेशियातील सुमारे १७० शहरांनी सार्वजनिक ठिकाणी धूम्रपानास बंदी घालण्याकरिता कडक नियम बनवले आणि ते राबवण्यासाठी ठोस उपाय योजले. गंमत अशी की, ‘ब्लूमबर्ग इनिशिएटिव्ह’तर्फे राबवल्या जाणाऱ्या या चळवळीला इंडोनेशियामधूनच प्रचंड विरोध सहन करावा लागला. एक तर तेथील राज्यांचा सुमारे १० टक्के महसूल हा तंबाखू कंपन्यांच्या उत्पन्नावर आधारित होता आणि दुसरे म्हणजे तेथील सामान्य जनतेला हा त्यांच्या संस्कृतीवर केलेला हल्ला वाटत होता. कित्येक सरकारी अधिकारी आणि शासनाचे वेगवेगळे विभाग यांच्यातच तंबाखू धोरणाविषयी इतके टोकाचे मतभेद होत होते (आणि अजूनही आहेत!) की एका बाजूला आरोग्य विभाग तंबाखूविरोधी नियम राबवण्यात गुंतलेले असताना इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष जोको विडोडो मात्र अमेरिकेतील ‘फिलीप मॉरीस’ या सिगारेट उत्पादक कंपनीला इंडोनेशियात सुमारे १९ अब्ज डॉलरची गुंतवणूक करण्याचे निमंत्रण देऊन आले! या सावळ्या गोंधळात ‘ब्लूमबर्ग इनिशिएटिव्ह’च्या धूम्रपानविरोधी मोहिमेने आपले संपूर्ण लक्ष स्थानिक पातळीवर काम करत लोकसहभाग वाढवण्याकडे वळवले.

याच सुमारास इंडोनेशियाच्या आरोग्य विभागातर्फे एक अतिशय प्रभावी मोहीम राबवण्यात आली- जिचे नाव होते ‘पंजैतन’. मनत हिरस पंजैतन हा इंडोनेशियाचाच रहिवासी. तो १०-११ वर्षांचा असल्यापासून दिवसाला सिगारेटची तीन पाकिटे ओढून संपवत असे. वयाची चाळिशी उलटली आणि त्याला स्वरयंत्राचा कर्करोग झाला. शस्त्रक्रिया करून श्वसननलिका छेदावी लागली, गळ्याला दिसेल असे एक छिद्र तयार झाले, आवाज जवळजवळ गेलाच. तेव्हा पंजैतनने उरल्यासुरल्या आवाजाने आपल्या देशाला आरोग्याचा संदेश देण्याचा चंग बांधला. लोकांना आपलेसे वाटेल, खरे वाटेल असे तो जितेजागते उदाहरण बनला. या संदेशाचा १५ ते ४० वयोगटातील लोकांवर काय परिणाम होतो, हे आधी तपासण्यात आले. धूम्रपान न करणाऱ्यांनी धूम्रपान सुरू करू नये आणि जे तरुण धूम्रपान करीत आहेत, त्यांनी ते सोडून द्यावे याकरिता हा संदेश महत्त्वाची भूमिका बजावू शकतो असे या अभ्यासातून सिद्ध झाले. पंजैतनच्या घोगऱ्या आवाजात बनवलेला आरोग्यसंदेश यूटय़ूब, इंडोनेशियाची राष्ट्रीय वाहिनी, सिनेमागृहे अशा अनेक ठिकाणी दाखवण्यात आला.. सुरुवातीला गळ्याशी आपले बोट ठेवून बोलणारा पंजैतन व्हिडीओ संपत आला की ते बोट बाजूला करतो, तेव्हा त्याच्या घोगऱ्या आवाजाबरोबरच गळ्याला पडलेले छिद्रही बघणाऱ्याच्या मनावर परिणाम करते..

इंडोनेशियातील लहान मुलांना तंबाखूपासून दूर राहण्यासाठी प्रवृत्त करण्याकरिताही एक प्रभावी चित्रफीत बनवण्यात आली. अप्रत्यक्ष धूम्रपानाचे शरीरावर होणारे अपाय दर्शवण्याकरिता ‘Cigarette is eating you alive’ अशा आशयाचे वेगवेगळे चित्रदर्शी ग्राफिक संदेश तयार करण्यात आले. याबरोबरच स्त्रिया आणि लहान मुले यांच्यापर्यंत संदेश पोहोचवण्याकरिता ‘वायुंग कुलीत’ (पपेट शो) सारख्या पारंपरिक खेळाचा उपयोग करण्यात आला. २०१४ पासून ‘तंबाखूच्या सर्व उत्पादनांवर धोक्याची सूचना लिहिलेली असायला हवी’ असा नियमही काढण्यात आला.

तंबाखूच्या व्यसनाविरुद्ध इंडोनेशियाचा सुरू असलेला लढा अजूनही चालूच आहे आणि आजही त्या लढय़ामध्ये आंतरराष्ट्रीय तंबाखूनिर्मात्या कंपन्या वेगवेगळी विघ्ने आणत आहेत; परंतु या देशातील ‘बोन-बोन’सारखे केवळ २५० घरांच्या वस्तीचे एखादे छोटेसे खेडे जेव्हा २०१६ मध्ये पूर्णपणे तंबाखूमुक्त झाले, तिथली मुलं सिगारेटच्या धुरात न बसता मोकळ्या हवेत श्वास घेत जेव्हा फुटबॉल खेळू लागली तेव्हा या प्रयत्नांना यशाची छोटीशी पावती मिळाली!

आज आपला देशही तंबाखूच्या विळख्यात अडकलेला दिसतो. खर्रा, मावा यांसारख्या तंबाखू उत्पादनांची स्वस्त उपलब्धता, कित्येक पालकांमध्ये तसेच शिक्षकांमध्ये तंबाखूच्या परिणामांविषयी असलेले अज्ञान, सेलिब्रिटींनी सिगारेट/तंबाखूला मिळवून दिलेला ‘स्टेटस’ आणि तंबाखू नियंत्रण कायदे प्रत्यक्ष राबवण्यात असलेली ढिलाई यामुळे तंबाखूची संस्कृती अजूनही समाजमनावर पकड ठेवून आहे. ग्लोबल अ‍ॅडल्ट टोबॅको सर्वेक्षणाच्या आकडेवारीनुसार भारतात सुमारे ३५ टक्के प्रौढ जनता तंबाखूचे सेवन करते. तंबाखूमुळे जीव गमावणाऱ्या भारतीयांचे प्रमाणही २०२० पर्यंत वर्षांला १.५ दशलक्षपेक्षाही जास्त असू शकते, असे एका अभ्यासातून लक्षात आले आहे. आर्थिक परिस्थिती बेताची असतानाही तंबाखू सेवनावर अमाप पैसा खर्च केला जातो, हे ‘सर्च’ या संस्थेच्या अभ्यासातून लक्षात आले आहे. या अभ्यासातील एक संशोधक आणि मनोविकारतज्ज्ञ डॉ. धरव शहा हे गेल्या ८-१० वर्षांपासून तंबाखूविषयीचे जर्नल्समध्ये छापून येणारे ज्ञान सामान्यांपर्यंत पोहोचावे, याकरिता धडपड करीत आहेत. डॉ. शहा सांगतात, ‘‘वर्षांला काही लाख भारतीय लोकांचा जीव घेणारी तंबाखू किंवा सिगारेट समाजात ‘पॉप्युलर’ होते, ‘स्टेटस’ प्राप्त करते, हे फार दु:खद आहे. तंबाखूची संस्कृती रोखायची असेल तर आपल्याला तंबाखूच्या परिणामांविषयी सतत बोलत राहिले पाहिजे. ’’ मुंबईच्या टाटा मेमोरियल हॉस्पिटलमधील कर्करोगतज्ज्ञ डॉ. पंकज चतुर्वेदी यांनीही तंबाखूमुळे कर्करोग झालेल्या अनेक रुग्णांना जनतेसमोर आणून ‘व्हॉइस ऑफ टोबॅको व्हिक्टिम्स’ नावाने चळवळ सुरू केली आहे. तंबाखूमुळे आपल्याला झालेल्या त्रासाची कथा लोकांपुढे मांडत हे रुग्ण तंबाखूपासून परावृत्त होण्यासाठी कळकळीची विनंती करतात. भारतात तंबाखू उत्पादनांवरील कर वाढवण्यात आणि गुटख्यासारख्या तंबाखू उत्पादनांवर बंदी आणण्यात या चळवळीने महत्त्वाची भूमिका पार पाडली आहे.

तंबाखूच्या व्यसनाने तयार केलेली संस्कृती बदलण्यासाठी अजून बराच कालावधी जावा लागेल; पण स्थानिक पातळीवर मोहिमा राबवून, लहान मुलांकडे विशेष लक्ष पुरवून, सोशल मीडियाचा योग्य उपयोग करून आंतरराष्ट्रीय तंबाखू कंपन्यांच्या दबावाला पुरून उरत आरोग्याची कास धरता येते, हा आत्मविश्वास इंडोनेशियासारखा लहान देश आज जगाला देत आहे! तंबाखू सेवन करणारे छोटे छोटे ‘अर्दी रिझाल’ निर्माण होऊ नयेत यासाठी तंबाखूच्या घातक परिणामांबद्दल आपण सतत आवाज उठवत राहायला हवा!

मुक्ता गुंडी सागर अत्रे  gundiatre@gmail.com