आरोग्याविषयी अनास्था कमी करायची असेल आणि आरोग्यविषयक घातक समजुती बदलायच्या असतील तर गरज आहे- संवादाची! २००४ मध्ये ‘एकजूट’ या संस्थेने ग्रामीण जनतेमध्ये आरोग्यविषयक संवाद सुरू करण्यासाठी सहभागी शिक्षण आणि कृतीप्रणालीवर आधारित कार्यक्रम ओडिशामधील खेडय़ांमध्ये सुरू केला ते महिला बचत गटांच्या माध्यमातून. आज ओडिशामध्ये नवजात मुलांचा मृत्यू तब्बल ३२ टक्के कमी झाला असून इतर अनेक आरोग्य समस्यांमध्ये सुधारणा दिसून आल्या आहेत.

बिहारमधील मधेपुरा जिल्ह्य़ातील भतखोडा हे खेडे. गोठय़ापाशी काही मुले खेळत आहेत. त्यातल्या एका मुलीला गोवऱ्यांसाठी आई हाक मारते. ती लहान मुलगी उठून शेणाचा गोळा घेते, त्याच्या गोवऱ्या थापून जळणापाशी ठेवते, हात कपडय़ांना पुसते.. आईने वाढलेलं जेवणाचे ताट घेऊन जेवू लागते.. या लहानगीला आणि तिच्या घरच्यांना हात न धुण्याच्या सवयीमुळे काय आजार होऊ शकतात याची माहिती नाही. तिच्याशी याबाबत आजवर कुणी संवाद साधलेला नाही.

अशाच एका गावात स्त्रियांची गर्भावस्थेतील पोषणाबद्दल चर्चा रंगली आहे. तरुण स्त्री ठामपणे सकस आहार घेण्याचे समर्थन करत आहेत, पण एक आजी म्हणते, ‘‘आम्ही काय पोरं वाढवली नाहीत? डाळ, भाजी जास्त खाल्ली की बाळाची त्वचा चिकट होते, बाळ खूप मोठे होते. बाळाच्या अंगावर खूप केस येतात. यामुळे बाळंतपणात अडचण येते.’’ या आजींना सकस आहाराचे महत्त्व पटवून देण्यासाठी ती तरुणी अधिक जोमाने प्रयत्न करते. या तरुणीला असलेल्या शास्त्रीय माहितीमुळे, संवादामुळे आरोग्यविषयक विवेकीपणाची रुजवात होत आहे. आरोग्याविषयी अनास्था कमी करायची असेल आणि आरोग्यविषयक घातक समजुती बदलायच्या असतील तर गरज आहे- संवादाची!

२००४ मध्ये ‘एकजूट’ या संस्थेने ग्रामीण जनतेमध्ये आरोग्यविषयक संवाद सुरू करण्यासाठी सहभागी शिक्षण आणि कृतीप्रणालीवर आधारित असा कार्यक्रम ओडिशामधील खेडय़ांमध्ये सुरू केला. ओडिशामध्ये ‘शक्तीवार्ता’ नावाने चालवला गेलेला उपक्रम ‘जीविका’ या बिहारमधील सरकारी संस्थेतर्फे ‘ग्रामवार्ता’ या नावाने २०११ मध्ये राबविण्यात आला.

आपल्या दैनंदिन आयुष्याचा बारकाईने विचार केला की समजेल की बहुतांश वेळेला आपल्या सवयींचा उगम परंपरांमध्ये लपलेला असतो. समाजात वर्षांनुवर्षे रूढ असलेल्या, योग्य समजल्या जाणाऱ्या काही सवयी अनेकदा तान्ही बाळे, कुपोषित तरुणी आणि स्त्रियांसारख्या असुरक्षित घटकांच्या आरोग्यावर घातक परिणाम करणाऱ्या असू शकतात. या सवयी बदलण्यास सांगणे मोठे अवघड असते कारण अनेकदा त्यातून आपल्या संस्कृतीवर, परंपरागत ज्ञानावर हल्ला केला जात आहे, अशी असुरक्षिततेची भावना निर्माण होऊ शकते. म्हणूनच सवय बदल होण्याची नाजूक प्रक्रिया आतून व्हायला हवी, उमजून व्हायला हवी.

ग्रामीण आरोग्य म्हटले की खेडय़ात सेवा पुरविणे आणि औषधे पोहोचविणे यावर भर दिसतो. हे गरजेचे असले तरी परिपूर्ण नाहीत. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे कुठलीही सवय बदलण्यात येणारी अडचण. उदाहरणार्थ- एखाद्या ठिकाणी अतिसाराने होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण अधिक आहे म्हणून औषधे पोहोचवली गेली व लोकांना विनामूल्य साबण वाटले गेले तरी जोपर्यंत हात का धुवायचा, कधी धुवायचा, कसा धुवायचा हे मनावर बिंबत नाही आणि आचरणात उतरत नाही तोपर्यंत पुरवलेल्या सेवा आणि औषधे निष्प्रभ ठरू शकतात. ‘एकजूट’ला हे वर्तन-बदलाचे तत्त्वज्ञान महत्त्वाचे वाटले.

अपुऱ्या सेवासुविधा आणि संवाद न साधता मिळणाऱ्या आरोग्यविषयक सूचना यांना बिहारमधील लोक कंटाळले होते, असे ‘एकजूट’ला त्यांच्या कामातून जाणवले. हे प्रश्न महत्त्वाचे असले तरी त्यांना जनतेमध्ये हा विश्वास निर्माण करणे गरजेचे वाटले की वर्तनात छोटे-मोठे बदल करून कित्येक आरोग्य-समस्या कमी होऊ शकतात. हा विश्वास निर्माण करण्यासाठी सर्वाना आपल्याशा वाटणाऱ्या माध्यमातून योग्य तो संदेश पोहोचवणे गरजेचे होते.

यासाठी ‘एकजूट’ने महिला बचत गटांच्या माध्यमातून साधी-सोपी भाषेतली दहा बैठकींची मालिका तयार केली. बचतगटांच्या बैठकीत सादर करण्याजोग्या या संवाद-मालिकेत स्त्रिया व मुलांचे आरोग्य, पोषण, स्वच्छता, पिण्याच्या पाण्याची सुरक्षितता, हागणदारीचे परिणाम असे विविध विषय अंतर्भूत करण्यात आले.

समूहातील एका स्त्रीला निवडून प्रशिक्षित करून या बैठकींचे सत्र राबविण्यात आले. या बैठकींचे वैशिष्टय़ म्हणजे यात खेळ, हास्यविनोद आणि उदाहरणासह लोकांच्या सवयींचा त्यांच्या आरोग्यावर होणारा परिणाम दाखवून दिला जात होता. लोकांना त्यांच्या शौचास जाण्याच्या ठिकाणी नेऊन तेथील अस्वच्छतेचे निरीक्षण करण्यास सांगितले. गावातील आरोग्य समस्या नेमक्या कोणत्या हे समजून घेण्यासाठी त्यांना मातीवर समस्यांचे वेगवेगळे गोल काढण्यास सांगितले व जी समस्या गंभीर वाटते त्या गोलात प्रत्येक स्त्रीने एक दगड टाकायचा. अशा नावीन्यपूर्ण पद्धतीने मुलांचे पोषण, औषधे, लसीकरण, सरकारी योजना यांवर आपसूकच स्त्रियांमध्ये गांभीर्याने चर्चा घडू लागल्या.

या चर्चाचा शेवट अनेकदा ‘सरकार कुछ नहीं करती..’ अशा नकारात्मक वाक्याने होत असे. यावर उपाय म्हणून ग्रामवार्तामध्ये एक खेळ घेण्यात आला. त्याचं नाव होतं- ‘बोझ’. एका बाईने दुसरीला पाठीवर घेऊन चालायचा प्रयत्न करायचा आणि त्यानंतर हातात हात घालून चालायचं. स्त्रियांना विचारलं जाई, ‘‘कुठली पद्धत सोपी आहे?’’ शासनावर ओझं होण्याऐवजी आपणच हातात हात धरून शासनाला गती देऊ शकतो, अशी सकारात्मक ऊर्जा या खेळातून दिली जाई. आपल्या दैनंदिन आयुष्यात बदल केले आणि सरकारी योजनांचा फायदा करून घेतला तर त्याचे होणारे फायदे लोकांना हळूहळू समजू लागले. त्यांच्याच सवयींचा आरसा त्यांच्यातच घडणाऱ्या चर्चामधून त्यांच्यासमोर धरला गेला.

गावातल्या अंगणवाडी सेविका, नर्स, ‘आशा’, अशा आरोग्य-कार्यकर्त्यांनी त्यांचे काम चोखपणे पार पाडावे याकरिता एकत्रितपणे प्रयत्न करणे, हा या कार्यक्रमाचा महत्त्वाचा कलम होता. अनेक गावांमध्ये सरकारी सेवांची देखरेख करणारी एक समिती नेमली गेली, जी सेवांची गुणवत्ता, वक्तशीरपणा याचे मोजमाप करून समस्यांचेही निराकरण करू लागली, गरज पडल्यास बिनदिक्कत वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत  गाऱ्हाणे मांडू लागली.

ओडिशामध्ये ‘शक्तीवार्ता’मुळे नवजात मुलांचा मृत्यू तब्बल ३२ टक्के कमी झाला, तसेच इतर अनेक आरोग्य समस्यांमध्ये सुधारणा दिसून आल्या.  ग्रामवार्तातील संवादामुळे स्त्रियांना आर्थिक आणि लैंगिक शोषणाविरुद्ध आवाज उठवण्यास बळ येत आहे. कुटुंबनियोजनासारख्या संवेदनशील गोष्टींवर स्त्रिया आपल्या नवऱ्याशी बोलू शकत आहेत. लहान मुलांचे पोषण, योग्य तितके स्तन्यपान, मुलींचे पोषण यांबाबत स्त्रिया आग्रही भूमिका घेत आहेत तर मुलगा होण्याविषयीचा आग्रह काही प्रमाणात कमी झालेला दिसतो आहे. परंतु अजूनही सरकारी सेवांवरील अविश्वास, स्वच्छतेबद्दल उदासीनता आणि सरकारकडूनच सर्व सेवा मिळाव्यात ही अपेक्षा, अशी काही ठळक वैशिष्टय़े बिहारमधल्या सर्वेक्षणात दिसून आली. हा ‘स्त्रियांकरिता’ राबविलेला कार्यक्रम असल्याने पुरुष या कार्यक्रमांपासून लांब राहणे पसंत करीत होते, असेही दिसून आले. शासनाच्या सर्व आवश्यक विभागांना या कार्यक्रमात सामावून न घेतल्यामुळे या कार्यक्रमाचा योग्य तो फायदा अजून दिसलेला नाही.

विचारांची आणि सामूहिक सक्षमतेची मुळे रुजली की आपण स्वत:बरोबरच आपल्या समाजाचाही विचार करून कृती करतो, हे यामागील तत्त्वज्ञान आज भारत, आफ्रिका, नेपाळ आणि बांगलादेशमध्ये राबविल्या जाणाऱ्या अनेक आरोग्यविषयक प्रकल्पांकरिता वापरले जाते. ‘ग्रामवार्ता’च्या या तत्त्वज्ञानाचा आणि कार्यप्रणालीचा प्रभाव किती प्रभावी असू शकतो हे एका अनोख्या घटनेमुळे समजते..

स्थळ : पटना येथील ‘ग्रामवार्ता’मधील सहभागी स्त्रियांचे राज्यस्तरीय संमेलन.

कार्यक्रमाला मुख्यमंत्री नितीशकुमार येणार होते. नितीशकुमार आत प्रवेश करताच स्त्रियांचा एक मोठा समूह उठून म्हणाला, ‘‘मुख्यमंत्रीजी, पहले शराब बंद कराईये! हमारे घर बरबाद हो रहे हैं!’’ मुख्यमंत्री चकित झाले. मुख्यमंत्र्यांनी उद्घाटनाच्या आधीच या बायकांशी संवाद साधला. या स्त्रियांचे दारूसंबंधित अनुभव सुन्न करणारे होते. नितीशकुमार यांनी भाषण संपत आल्यावर उपस्थितांना धक्का दिला. ते म्हणाले, ‘‘दोबारा अगर बिहार की जनताने हमें मुख्यमंत्री बनने का मौका दिया, तो हम बिहार में शराब पर पाबंदी लगा देंगे!’’ सभागृहात जल्लोष झाला.

काही वर्षांपूर्वी नवऱ्यासमोर बोलायला कचरणाऱ्या बायकांनी थेट मुख्यमंत्र्यांसमोर आपले मत ठामपणे मांडले होते, ही साधी गोष्ट  नव्हे! सध्या बिहारच्या १९ जिल्ह्य़ात ६० लाख लोकांपर्यंत पोहोचलेल्या ‘ग्रामवार्ता’साठी मात्र हा फक्त एक टप्पा आहे. शाश्वत आणि विचारपूर्ण आरोग्याकडे नेणारा प्रवास अजून अंशत:च पूर्ण झालेला आहे..

मुक्ता गुंडी / सागर अत्रे

gundiatre@gmail.com