18 October 2018

News Flash

सर्वे सन्तु निरामय:!

जॉन डालटन या प्रख्यात शास्त्रज्ञाने म्हटले आहे

जॉन डालटन या प्रख्यात शास्त्रज्ञाने म्हटले आहे, ‘जोपर्यंत एखाद्या गोष्टीचे मोजमाप होत नाही तोपर्यंत त्या गोष्टीचे अस्तित्व मान्य करता येत नाही.’ हे जरी खरे असले तरी आम्हाला यात बदल करून म्हणावेसे वाटते की ‘जोपर्यंत एखादा प्रश्न आणि त्यातील गुंतागुंत मांडलीच जात नाही तोपर्यंत त्या गोष्टीचे अस्तित्व लक्षातच येत नाही.’ रस्त्यावरील अपघात, धूम्रपान, बिघडणारे मानसिक स्वास्थ्य, हवा आणि पाण्याचे प्रदूषण किंवा अमली पदार्थाचे सेवन यांसारखे प्रश्न आपल्याला घेरून उभे असतात, पण ते आपल्याशी नेमके कसे निगडित आहेत हे मांडलेच गेले नाही तर त्या गोष्टींचे अस्तित्व फारसे ठळकपणे आपल्याला जाणवत नाही.

गेल्या काही दशकांमध्ये, आरोग्य क्षेत्राशी संबंधित अनेक वृत्तपत्रे, नियतकालिके यांमध्ये लेखन झालेले दिसून येते. परंतु, सामाजिक आरोग्याशी संपूर्णपणे बांधील, असे लेखन मराठी भाषेतून त्यामानाने कमी झालेले आहे. डॉ. अभय बंग, डॉ. अनंत फडके, डॉ. अरुण गद्रे, डॉ. रवींद्र रुक्मिणी पंढरीनाथ, डॉ. हिम्मतराव बावस्कर यांसारख्या काही आरोग्य तज्ज्ञांचे लेखनातील योगदान वगळता, सामाजिक आरोग्याला न्याय मिळेल असे आणि सामाजिक आरोग्याशी निगडित विषय सर्वाना सुलभ शब्दात कळतील, असे लिहिण्याचा प्रयत्न तसा तोकडा पडलेला दिसतो. या वर्षीच्या ‘मिळून साऱ्याजणी’ या मासिकाच्या दिवाळी अंकातील सार्वजनिक आरोग्यास वाहिलेला आरोग्याच्या बाजारीकरणावर भाष्य करणारा मोठा भाग यास आणखी एक अपवाद! बाकी सामाजिक आरोग्य क्षेत्रातील संशोधन, आकडेवारी, अहवाल आणि त्याचे विश्लेषण हे सर्व इंग्रजी भाषेत आणि फक्त जर्नलमध्ये छापून आलेले दिसते. हे जर्नलमधील लेख केवळ त्या क्षेत्रातील तज्ज्ञ वाचतात. समाजाच्याच आरोग्याचा आरसा असणारे हे संशोधन, समाजातल्या बहुतांश लोकांपर्यंत पोहोचतच नाही, हे आम्हाला दोघांना नेहमीच खटकत आलेले होते. रुग्णाला झालेला आजार आणि त्याला सुचवलेले उपचार त्यालाच समजले नाहीत तर काय उपयोग? त्याप्रमाणेच समाजाच्या आरोग्याचा आलेख समाजालाच दिसला नाही आणि कळला नाही तर काय उपयोग? वर्षभर आम्ही दोघांनी लिहिलेले या सदरातील सर्व लेख, हे आपल्या समाजाचे आरोग्यनिदान आणि उपचार आपल्यालाच समजावेत या उद्देशाने लिहिले होते.

जगातील अनेक देशांची उदाहरणे घेत आम्ही हे लेख लिहिले आणि त्यातून डोळसपणे आपण काय शिकायचे याचे प्रयत्नपूर्वक विश्लेषण केले. हे विश्लेषण करताना त्या त्या देशांचे त्या त्या काळातील सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, आंतरराष्ट्रीय संदर्भ जाणून घ्यायचा प्रयत्न केला आणि या सर्व दुव्यांचा त्या आरोग्य प्रश्नाशी असणारा संबंध अधोरेखित करायचाही प्रयत्न केला. अर्थात, शब्दमर्यादेमुळे या विश्लेषणात कमी राहिली, हेही खरे!

वर्षभरात आम्ही जे विषय निवडले त्यापेक्षा कित्येक पटीने मोठा असा या क्षेत्राचा आवाका आहे. त्यामुळे लेखासाठी विषय निवडताना कित्येकदा आम्हाला काही विशिष्ट निकष लावून विषय निवडावा लागला. असे करताना हिवताप, क्षयरोग, कर्करोग, किंवा समलिंगी व्यक्तींचे आरोग्याचे प्रश्न या किंवा अशा अनेक गंभीर विषयांना आम्हाला न्याय देता आला नाही याचा खेद वाटतो. तसेच या सदराचा सूर पूर्णपणे निराशावादी असता कामा नये याविषयी आम्ही ठाम होतो. जास्तीत जास्त विषयांवरील जगातील चाललेली उत्तम कार्ये, आपल्या समाजाच्या क्षमता आणि आपल्या कमतरता या साऱ्यांचे योग्य संतुलन साधणे आम्हाला आवश्यक वाटत होते. सदरातील बहुतांश लेखांमध्ये आम्हाला हे संतुलन राखणे जमू शकले.

अमेरिकेतील बंदुकांमुळे होणारी हिंसा किंवा चीनमधील वायुप्रदूषण यावरील लेख आपल्याला सावध करणारी होती तर मेक्सिकोतील शीतपेयांवरील कर, कम्बोडियातील ‘लकी आयर्न फिश’, झिम्बाब्वेतील समुपदेशन देणाऱ्या आज्या ही उदाहरणे अनेकांना आशादायी वाटली. या सर्व सकारात्मक तसेच नकारात्मक उदाहरणातून एक गोष्ट सतत अधोरेखित होत होती ती म्हणजे समाजाचे आरोग्य हा सामाजिक न्यायाचा अविभाज्य घटक आहे. तसेच आरोग्य हा केवळ वैयक्तिक हक्क नव्हे तर सामाजिक हक्क आहे आणि तो आबालवृद्ध, सर्व जाती-धर्म, सर्व लिंग आणि सर्व आर्थिक-सामाजिक घटकांना समानतेनेच मिळायला हवा.

सदरातील बहुतेक सर्वच लेखांना वाचकांनी लेखी अथवा प्रत्यक्षदर्शी दिलेल्या प्रतिसादामुळे ‘सामाजिक आरोग्याविषयी लिहिलेले लेख कोण कितपत वाचेल?’ ही आमच्या मनातील काही अंशी असलेली भीतीही निघून गेली. झिम्बाब्वेतील आजीबाईंवरचा लेख वाचून ‘आम्हाला असे काम करायला आवडेल’ असेही सांगणारे काही ई-मेल आले, सर्पदंशावरील लेख वाचून ‘विषदंश आणि विषमता यांचा घनिष्ठ संबंध दाखवल्याबद्दल धन्यवाद’ अशी प्रतिक्रिया आली, कम्बोडियातील ‘लकी आयर्न फिश’बद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ई-मेल आले आणि निरोगी कार्यालयांच्या वेगवेगळ्या संकल्पना वाचून ‘हे आमच्या कार्यालयात किती गरजेचे आहे हे जाणवते आहे’ अशा आशयाच्या प्रतिक्रिया आल्या. इंडोनेशियातील धूम्रपानाचा प्रश्न सांगणारा ‘धुआँ धुआँ’ या लेखाला सामाजिक न्याय विभागातर्फे घेण्यात आलेल्या ‘व्यसनमुक्ती साहित्य संमेलनाच्या स्मरणिकेत’ पुन्हा प्रकाशित करण्याचा प्रस्ताव आला. थोडक्यात, सामाजिक आरोग्य म्हणजे ‘माझेच’ आणि ‘माझ्याशी संबंधितच’ आहे हा विचार वाचकांपर्यंत पोहचवण्यात आम्ही थोडेबहुत यशस्वी ठरलो, असे वाटून गेले.

सदराच्या पहिल्या लेखात आम्ही ‘व्हॉट इज पब्लिक हेल्थ’ अर्थात ‘सामाजिक आरोग्यामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी समाविष्ट असतात?’ असे दर्शवणाऱ्या एका व्हिडीओचा उल्लेख केला होता. आपल्या आयुष्यात आपल्या आजूबाजूला असणाऱ्या कित्येक वस्तू आणि घटकांमुळे आपल्या आरोग्यावर होणारा सूक्ष्म पण तरी महत्त्वाचा परिणाम हा या व्हिडीओचा उद्देश होता. या सदरातून आम्हीही अशाच कधी कधी महत्त्वाच्या न वाटणाऱ्या पण तरी आपल्या आयुष्यावर परिणाम करणाऱ्या गोष्टींशी आपले असलेले नाते उलगडून दाखवण्याचा प्रयत्न केला. सध्या आपल्या आजूबाजूला असलेली ‘व्हॉट्सअ‍ॅप’सारखी माध्यमे आणि त्यातून आपल्यापर्यंत पोचणारे असंख्य संदेश यामध्ये आरोग्याबद्दलच्या काही संदेशांचाही समावेश असतो. बहुतांश वेळा कुठल्याही शास्त्रीय पुराव्याशिवाय केले गेलेले खोटे दावे या संदेशातून आपल्यापर्यंत पोहचतात. ‘कर्करोग टाळण्यासाठीचे हमखास उपाय’, ‘दारूचे शरीराकरिता असणारे सदुपयोग’ यांसारख्या असंख्य धोकादायक माहितीचे आपण सगळेच बळी पडतो, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. ‘फेक न्यूज’च्या काळात ‘फेक माहिती’ पसरवण्यास कितीसा वेळ लागणार? अशा माहितीवर कित्येक जण विश्वास ठेवतात. त्याचबरोबर अशा माध्यमांतून माहिती मिळाल्यावर ती बहुतांश वेळेला पडताळून पाहायची सवय आणि सोय दोन्ही नसल्यामुळे अनेक अफवा आणि गैरसमज पसरत जातात. दारू, सिगारेट, तंबाखू यावरील बोगस संशोधने (?) बातमी म्हणून प्रसिद्ध करणारी अनेक प्रसारमाध्यमे आहेत! आहाराविषयीची उलटसुलट माहिती आपल्याला रोज गोंधळवून टाकते. कोणतीही शहानिशा न करता सामाजिक आरोग्यासंदर्भात आकडेवारी प्रसिद्ध करताना आपली समाजाप्रति असलेली जबाबदारी विसरून कसे चालेल?

‘आरोग्यम् जनसंपदा’ या आमच्या सदराद्वारे अशी सामाजिक जबाबदारी अधोरेखित करण्याचा आमचा मानस होता. ‘लोकसत्ता’ला सामाजिक आरोग्य या विषयाला दर पंधरवडय़ाने लोकांपुढे आणावेसे वाटले ही गोष्ट त्यांची जबाबदार, समाजाभिमुख अशी पत्रकारितेशी असलेली बांधिलकी दर्शवते. ‘लोकसत्ता-चतुरंग’ने ही संधी आम्हाला दिली त्यामुळे आमचा या अनेक विषयांवर अभ्यास होऊ शकला. वेगवेगळ्या संशोधन अहवालांचे, आकडेवारीचे वाचन करून ते मराठीत किचकट न होऊ देता मांडण्याचे कौशल्य आम्हाला अजमावता आले, ही आमची मोठी कमाई आहे. संपूर्ण लेखमाला लिहिण्याची प्रक्रिया आमच्यासाठी अतिशय उत्साहवर्धक होती. या लेखमालेसाठी आम्हाला वेळोवेळी मदत केलेल्या आणि काही विषयांतील खाचाखोचा समजावून आम्हाला मार्गदर्शन केलेल्या सर्व तज्ज्ञांचे- डॉ. धरव शहा, श्रीकांत नावरेकर, डॉ. संपदा पटवर्धन,

डॉ. मालविका सुब्रमण्यम यांचे खूप खूप आभार!

सर्वे सन्तु निरामय:!

मुक्ता गुंडी सागर अत्रे

gundiatre@gmail.com

(सदर समाप्त)

First Published on December 30, 2017 12:20 am

Web Title: marathi articles in chaturang on healthcare information