भारतामध्ये आज पंजाब, हिमाचल प्रदेश, बिहारसारख्या अनेक राज्यांमध्ये अमली पदार्थाचे सेवन ही गंभीर समस्या आहे. पंजाबमध्ये सुमारे २ लाख ३० हजार व्यक्ती अमली पदार्थाचे सेवन करतात. युनो आणि भारतीय सामाजिक न्याय विभागाच्या माहितीनुसार भारतात आज जवळजवळ तीस लाख व्यक्ती अमली पदार्थाचे सेवन करतात, परंतु भारताकडे अजूनही या समस्येची योग्य मोजणी करण्याची यंत्रणा नाही.  जगभरात ‘हार्म रिडक्शन’ ही चौकटीबाहेरची उपचारपद्धती मोलाची ठरते आहे.

अमली पदार्थाची व्यसनाधीनता हा जगापुढे असलेला आरोग्याचा एक अतिशय गुंतागुंतीचा प्रश्न आहे. अमली पदार्थाच्या सेवनाने निर्माण होणारे आजार, व्यसनाधीन व्यक्तीच्या कुटुंबाला सोसावा लागणारा आर्थिक आणि मानसिक बोजा, अमली पदार्थ मिळवण्यासाठी पत्करले जाणारे धोके आणि त्याचा समाजावर होणारा परिणाम, असे या सामाजिक प्रश्नाचे विविध आयाम आहेत. मुळात अमली पदार्थ येतात कुठून, त्याचा पुरवठा कोण करतं, यामागचे राजकारण आणि अर्थकारण काय, यावर उपाय काय, अशा सर्व बाजूंनी हा सामाजिक आरोग्याचा प्रश्न विचारात घ्यावा लागतो. अमली पदार्थाच्या आहारी गेलेली केवळ व्यक्ती हीच ‘दोषी’ असे म्हणून प्रश्न सुटत नाही तर त्याचे आर्थिक-सामाजिक पदर समजून घ्यावे लागतात. म्हणूनच व्यसनाने गुरफटलेल्या व्यक्तीला ‘चूक-बरोबर’च्या तराजूत तोलण्यापेक्षा समाजाने मोठय़ा जबाबदारीने पुढाकार घेऊन या व्यक्तींना मदत करण्याची गरज असते.

upsc exam preparation tips in marathi
UPSC ची तयारी : पर्यावरण पारिस्थितिकी, जैवविविधता
peter higgs marathi articles loksatta,
पदार्थ विज्ञानातील जादूगार…
What Is Sugar Made Of Milk Honey Table Sugar
साखर हे पांढरं विष? दूध, मध, साध्या साखरेत नेमकं असतं काय? १० दिवस साखर खाल्ली नाही तर कसं बदलेल शरीर?
100 gram raw garlic revealing impressive impact on our lives how garlic boost your immune system said expert
१०० ग्रॅम लसणात आहेत ‘हे’ पोषक घटक; उच्च रक्तदाबामध्ये ठरेल वरदान, वाचा तज्ज्ञांची मते…

जगभरातील देश अमली पदार्थाच्या प्रश्नाशी झुंजण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहेत. अमली पदार्थ पसरण्यामागे प्रचंड मोठे अर्थकारण आणि राजकारण आहे, हे आपण जाणतो. अमली पदार्थाच्या जाळ्यात अडकलेल्या मेक्सिको देशाचे माजी राष्ट्राध्यक्ष फेलिप कॅल्डेरॉन यांनी २००७ मध्ये तेथील तस्करांवर लष्करी कारवाई केली. यात साधारणत: एक लाखांहून अधिक माणसे मारली गेल्यावरही हा प्रश्न सुटू शकलेला नाही. अमली पदार्थाच्या तस्करीवर आळा घालणे, कायद्याची कडक अंमलबजावणी करणे हे महत्त्वाचे मार्ग आहेतच, परंतु व्यसनाधीन व्यक्तींना पुन्हा सामाजिक प्रवाहात आणण्यासाठी आणि सामाजिक नुकसान टाळण्यासाठी काही देशांनी एक पद्धती आखली आहे. त्या पद्धतीचे नाव आहे ‘हार्म रिडक्शन पद्धत’ म्हणजेच हानी कमी करण्याचा प्रयत्न करणारी उपचारपद्धती. अमली पदार्थ सेवन करणाऱ्या व्यक्तींना केवळ अटक करून शिक्षा करण्यापेक्षा त्यांच्या आरोग्याची काळजी घेऊन त्यांना या पदार्थाच्या गर्तेतून बाहेर आणणे, हा या प्रणालीचा मुख्य उद्देश आहे.

युरोपमधील शास्त्रज्ञांनी या प्रणालीची अंमलबजावणी करण्यासाठी पुढाकार घेतला ते १९८०चे दशक होते. संगतीमुळे, नैराश्यामुळे किंवा आपणहून या पदार्थाकडे वळणाऱ्या लोकांवर गुन्हेगारीचा ठपका लागू नये म्हणून नेदरलँडस या देशाने १९८६ मध्ये एक कायदेशीररीत्या पर्यवेक्षित असे ‘अमली पदार्थ सेवन केंद्र’ स्थापन केले. हेच होते ‘हार्म रिडक्शन सेंटर.’ अमली पदार्थाच्या आहारी गेलेल्या परंतु ते सोडायची इच्छा असणाऱ्या, प्रयत्न करू इच्छिणाऱ्या सर्वासाठी हे केंद्र खुले केले गेले. हा जगातील अनेक देशांसाठी आणि शास्त्रज्ञांसाठी धक्काच होता. या केंद्रात अर्थातच अमली पदार्थ पुरवले जात नव्हते, पण अमली पदार्थ सेवन करणाऱ्या आणि त्यावर पूर्णपणे अवलंबून असलेल्या व्यक्तींना लागणारी साधन-सामग्री ही स्वच्छ, र्निजतुक असेल, याची खबरदारी येथे घेतली जायची. अमली पदार्थाचे सेवन करताना अस्वच्छ आणि एकमेकांची साधने वापरल्याने पसरणाऱ्या एच.आय.व्ही., एड्ससारख्या धोकादायक रोगांना यामुळे आळा बसावा, असे यामागचे मुख्य ध्येय होते. या सुविधेबरोबरच मानसोपचार, वैद्यकीय सेवा, पुनर्वसन सेवा अशा विविध सेवा येथे उपलब्ध केल्या गेल्या.

मानसोपचार, औषधोपचार सुरू केल्यावरही अमली पदार्थाच्या विळख्यातून बाहेर पडण्यासाठी अनेक दिवस किंवा अनेक महिने जावे लागतात. शरीरातील जैवप्रक्रियाच या पदार्थावर पूर्णपणे विसंबून राहिल्याने मनाबरोबरच शरीरालाही या व्यसनापासून लांब जाताना त्रास होतो. या काळात कित्येकदा पुन्हा व्यसनाकडे वळावेसे वाटते. छुप्या पद्धतीने धोकादायक मार्गाने हे पदार्थ शरीरात टोचून घेण्यापेक्षा किंवा शहरांमधील अस्वच्छ ठिकाणी, आड-गल्ल्यांमध्ये, पडक्या इमारतींमध्ये बसून अमली पदार्थाचे सेवन करण्यापेक्षा एका पर्यवेक्षित स्वच्छ, सुरक्षित ठिकाणी अमली पदार्थाचे सेवन करायला या केंद्राद्वारे मुभा मिळू लागली. अर्थातच ‘अमली पदार्थाचे सेवन हानीकारक आहे’, हे व्यसनाधीन व्यक्तीवर सतत बिंबवले जाण्याकरिता तेथे कसोशीने आणि विविध प्रकारे प्रयत्न केले जात होतेच. या केंद्रात रुग्णाच्या अमली पदार्थ सेवनाच्या सवयीवर बारकाईने लक्ष ठेवले जाते. रक्तातील पेशींचे प्रमाण, घातक आजारांची नियमित चाचणी केल्याने आरोग्यास असलेला मोठा धोका टळतो.

या केंद्राचा आणखी एक फायदा दिसून आला. अमली पदार्थाच्या अतिसेवनाने क्षणात मृत्यू ओढवू शकतो. या केंद्रांमध्ये व्यसनाधीन रुग्णाला त्वरित वैद्यकीय सेवा उपलब्ध असल्याने तसेच पर्यवेक्षणामुळे असे मृत्यू टाळले जाऊ  शकले. युरोपमधील ‘हार्म रिडक्शन’ केंद्राचे प्रयत्न पाहून अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडमध्येही अशा प्रकारचे कार्यक्रम राबवले जाऊ  लागले. एखादे व्यसन अचानक सोडल्यावर रुग्णाच्या शरीराकडून येणारी हिंसक प्रतिक्रिया (विथड्रॉवल सिम्प्टम) सुयोग्य पद्धतीने हाताळण्याकरिता या सर्व केंद्रामध्ये प्रशिक्षण दिले गेले.

‘हेरोईन’ या अमली पदार्थावर अवलंबून असणारी अमेरिकेतील एक स्त्री आरोग्यसंशोधक सुझान काल्र्बर्गला दिलेल्या मुलाखतीत सांगते, ‘‘हार्म रिडक्शन’ केंद्रात माझ्याकडे तुच्छतेने पाहात नाहीत. मला येथे सतत सांगत असतात की ‘अमली पदार्थ शरीरास धोकादायक आहेत, तू ते हळूहळू कमी करत सोडून द्यायला हवेत.’ त्यासाठी मी औषधेही घेत आहे. पण येथील परिचारिका असेही समजावतात की ‘आत्ता तू यावर अवलंबून आहेसच तर आम्ही तुला ते जास्तीत जास्त सुरक्षितरीत्या घेण्याकरिता मदत करीत आहोत’.. यामुळे आपली कुणीतरी काळजी घेत आहे असे वाटते. मी लवकरच यातून बाहेर पडणार आहे. कारण मला माहीत आहे की हे मी थांबवले नाही तर मी जणू मृत्यूला आमंत्रण देत आहे.’’

अमली पदार्थाच्या सेवनाने शरीरावर दूरगामी, खोलवर परिणाम होतात. मेंदूतील चेतापेशी आणि शरीरातील पेशींना या पदार्थाची सवय होते. व्यसन हे पेशींचीच गरज बनून जाते. अशा वेळी व्यसनाने ग्रासलेल्या व्यक्तीला केवळ तुरुंगात डांबून काय साध्य होणार? त्याने हे प्रश्न अधिकच कठीण होऊन बसतात. त्यामुळे माणसाचा माणुसकीने विचार करीत हार्म रिडक्शनची प्रणाली आखण्याचा प्रयत्न केलेला आहे. जगभरात आज अशा प्रकारची सुमारे १०२ ‘हार्म रिडक्शन केंद्रे’ चालवली जातात. या केंद्रांमध्ये आजवर एकही मृत्यू ओढवलेला नाही, हे महत्त्वाचे आहे.

‘हार्म रिडक्शन’ विषयी ही माहिती वाचून अर्थातच आपल्या मनात या पद्धतीला ‘योग्य की अयोग्य’ असे तपासणे सुरू होते. ‘एका बाजूला अमली पदार्थाच्या सेवनासाठी र्निजतुक सुविधा पुरवायच्या आणि दुसरीकडे ही सवय सुटावी यासाठी मानसोपचार पुरवायचे’ हे अतार्किक वाटू शकते. यामुळेच ‘हार्म रिडक्शन’ प्रणालीला आजतागायत जगभरात अनेक ठिकाणी विरोध झालेला आहे. हा विरोध मुख्यत: नैतिकतेला ‘चूक आणि बरोबर’ या द्वैताच्या नजरेतून पाहिल्याने होतो.

मुळात देशामध्ये अमली पदार्थाच्या सेवनाने निर्माण होणाऱ्या आरोग्यसमस्या अस्तित्वात आहेत आणि त्या सामाजिक आरोग्यास धोकादायक आहेत हे मान्य केल्याशिवाय या प्रश्नाबद्दल जागरूकता निर्माण होणार नाही तसेच सरकारी यंत्रणेकडूनही याकरिता पावले उचलली जाणार नाहीत. भारतामध्ये आज पंजाब, हिमाचल प्रदेश, बिहारसारख्या अनेक राज्यांमध्ये अमली पदार्थाचे सेवन ही गंभीर समस्या आहे. पंजाबमध्ये तर या समस्येने अत्यंत उग्र रूप धारण केलेले आहे. पंजाबमध्ये सुमारे २ लाख ३० हजार व्यक्ती अमली पदार्थाचे सेवन करतात, असे एका सर्वेक्षणातून लक्षात आले आहे. भारतातील अमली पदार्थ सेवन आणि त्यासंदर्भात घडलेल्या गुन्ह्यंपैकी ४४.५ टक्के गुन्हे पंजाबमध्ये घडतात. युनो आणि भारतीय सामाजिक न्याय विभागाच्या माहितीनुसार भारतात आज जवळ जवळ तीस लाख व्यक्ती अमली पदार्थाचे सेवन करतात, परंतु भारताकडे अजूनही या समस्येची योग्य मोजणी करण्याची यंत्रणा नाही. यामुळे भारताने ‘हार्म रिडक्शन’ला तत्त्वत: मान्यता दिली असली तरी त्या दिशेने भारतीय शासकीय यंत्रणा काम करताना दिसत नाही.

‘इंडिया एच.आय.व्ही. एड्स अलायन्स’ या संस्थेने इतर काही संस्थांच्या मदतीने २०१३ पासून भारतातील प्रमुख पाच शहरांमध्ये हार्म रिडक्शन प्रणाली राबवण्यास सुरुवात केली आहे, जिचे नाव आहे ‘हृदया’. डॉ अतुल आंबेकर हे दिल्लीतील भारतीय, आयुर्विज्ञान संस्थेमध्ये अमली पदार्थाच्या सेवनाविषयी अभ्यास करतात. ते एका लेखात नमूद करतात, ‘भारतातील हार्म रिडक्शन यंत्रणा अजून खूप कमकुवत आहे आणि अनेकदा ती रुग्णांपर्यंत खूप उशिरा पोहोचते. पोहोचली तरी अत्यंत कुचकामी ठरते. परिणामत: या पदार्थाच्या सेवनामुळे होणाऱ्या रोगांचा संसर्ग आणि खुद्द सेवनामुळे होणारे दुष्परिणाम फारसे कमी होताना दिसत नाहीत.’

व्यसनाच्या आहारी गेलेल्या व्यक्तीकडे आणि व्यक्तीच्या कुटुंबाकडे सहानुभूतीने, सहकार्यभावाने आणि ममतेने बघायला सांगणारी अशी ही उपचारपद्धती आहे. या प्रणालीकडे आपल्याला नैतिक-अनैतिकतेच्या चौकटीत घट्ट न बांधता पाहता येईल का?

मुक्ता गुंडी सागर अत्रे

gundiatre@gmail.com