भारत बदलत असला तरी येथील कुटुंबसंस्था आजही अभंग आहे. पूर्वीचे मोठय़ा एकत्र कुटुंबाचे अलीकडे छोटय़ा-छोटय़ा अनेक कुटुंबांत विभाजने झाली असली तरी हे खरेच आहे. छोटय़ा कुटुंबातील सदस्य तुलनेने कमी असले तरी एकाच कर्त्यां व्यक्तीवर या कुटुंबाचा भार येतो. अधिक चांगले जीवनमान, मुलांसाठी चांगले शिक्षण व राहणीमान, त्यांचे उच्च शिक्षण व तत्सम अनेक आर्थिक उद्दिष्टांसाठी कुटुंबातील कर्ता झटत असतो. त्याचे/तिचे उत्पन्न वाढविण्यासाठी प्रयत्नरत असतो. शहरी जीवनाच्या धकाधकीला सामोरे जाताना, येथील अनिश्चितता, अकल्पित जोखमींचा तो पदोपदी सामना करीत असतो. यातून काही अनावस्था प्रसंग घडला तर कुटुंबावरील तो गहिरा आघात ठरतो. कर्त्यांच्या पश्चात त्याच्या कुटुंबाला हलाखीच नव्हे, तर कैक प्रसंगी उपजीविकेसारखी मूलभूत गोष्टही दुरापास्त बनल्याचे आपल्याला दिसले आहे. या स्थितीवर तोडगा म्हणून आयुर्विम्याची प्रमुख भूमिका आहे. दुर्दैवाने अशा अकल्पित आघाताची स्थिती ओढवल्यावरच त्याचे महत्त्व अनेकांना लक्षात येते. तर दुसरीकडे पगारदार व्यक्ती कर बचत साधणारे एक साधन म्हणून आयुर्विम्याकडे पाहतात, तेही अगदी शेवटच्या क्षणी शेवटचा पर्याय म्हणून. करपात्र उत्पन्न व करदायित्व यांचे गणित जुळवून, घाईघाईने तेवढय़ा रकमेपुरताच विमा खरेदी करण्याचा प्रघात सर्रास आढळून येतो. हा दृष्टिकोन चुकीचा आणि आवश्यक संरक्षण मिळविण्याऐवजी नाहक आर्थिक नुकसान ओढवून घेणाराही आहे. म्हणूनच तांत्रिक अर्थाने जीवन विमा म्हणजे काय, तो कुणी का व किती प्रमाणात घ्यावा हे समजून घेऊन, त्या संबंधाने सजगपणे समंजस निर्णय घ्यायला हवा.

त्याची ही काही मार्गदर्शक तत्त्वे:

Success Story Mira Kulkarni
एकट्या मातेची मेणबत्ती व्यवसायाने सुरुवात; भारतातील सर्वांत श्रीमंत महिलांच्या यादीतील स्थानापर्यंत गरुडझेप!
mumbai, charkop, Architect s Attempt to fraud , fungible carpet area in MHADA Housing, MHADA Housing Societies charkop, redevlopment of mhada socieities, mhada society charkop, chrkop news,
चारकोपमधील म्हाडा पुनर्विकासात फंजीबल चटईक्षेत्रफळाचा घोटाळा, अधिकाऱ्याच्या दक्षतेमुळे अनर्थ टळला!
ie think our cities
IE THINC Second Edition: “लवकरच असमानता आणि हवामान बदल ही आपल्या शहरांसमोरची सर्वात मोठी आव्हानं ठरतील!”
Income tax now on loans overdue for more than 45 days of business
उधारीच्या नव्या नियमाने वस्त्रोद्योगाचे धागे विस्कटले ! ४५ दिवसांहून अधिक काळ थकलेल्या उधारीवर आता प्राप्तिकर

आयुर्विम्याची गरज काय?

सर्वात प्रधान गोष्ट म्हणजे तुमच्यावर अवलंबून असलेले लोक आहेत. एकटा जीव सदाशिव असणाऱ्यांना विम्याची गरज नाहीच. तथापि कुटुंबातील कर्त्यांच्या पश्चात त्यावर अवलंबून असणाऱ्यांना आर्थिक हलाखीला सामोरे जावे लागेल, हे लक्षात घ्या. तुम्ही नसताना त्यांना आधार देईल अशी कोणती संपत्ती नाही अशांसाठी आयुर्विमा अत्यावश्यकच! उलट तुम्ही उचललेले घराचे कर्ज, वाहन कर्ज, मुलांचे शिक्षण, त्यांचे खानपान, आजारपण यांचे वाढत जाणारे खर्च वगैरे तुमच्यामागे कुटुंबातील सदस्यावर नसता भार ठरतील.

जीवनाची सुरक्षा आणि कुटुंबाचा आधार, इतकेच नव्हे तर तुम्ही निश्चित केलेले दीघरेद्देशी लक्ष्य जसे मुलांचे उच्च शिक्षण, त्यांचे लग्न आदींसाठी दीर्घ मुदतीच्या बचतीचे साधन म्हणून आयुर्विमा उपयुक्त ठरतो.

सुयोग्य पॉलिसीची निवड कशी?

 सुयोग्य विमा योजनेची निवड कशी?

खरे तर येथे, माझ्या सध्याच्या व भविष्यातील आर्थिक गरजा व उद्दिष्टे काय? असा प्रश्न असायला हवा.

या प्रश्नाची उकल करणारे उत्तर तुमच्याकडे असेल, तर साजेशा विमा योजनेची निवड सोपी बनेल, कारण शुद्ध संरक्षण देणाऱ्या टर्म योजनेपासून, त्यासह नियत अवधीत लाभ मिळवून देणाऱ्या विविधांगी योजना आयुर्विमा कंपन्यांकडे आहेत. तुम्ही जीवनाच्या कोणत्या टप्प्यावर आहात, यावर ही निवड अवलंबून असेल. तरी आयुर्विम्याच्या वेगवेगळ्या उपलब्ध प्रकारांमुळे गोंधळ उडू नये आणि संभ्रम टाळण्यासाठी आयुर्विम्याचे मुदत विमा आणि बचत विमा अशा दोन ढोबळ वर्गवारी करू या.

मुदत विमा (टर्म इन्शुरन्स) हा किमान खर्चात अधिकाधिक विमा राशीचे संरक्षण देणारा शुद्ध विम्याचा मूलभूत प्रकार आहे. मुदत विम्याचे संरक्षण हे प्रत्येकाकडे असणे आजच्या घडीला आवश्यकच आहे. त्यामुळे मुदत विमा घेताना, आपल्याला आवश्यक विमा राशीचे संरक्षण आणि त्यासाठी येणारा खर्च या दोन घटकांना मुख्यत: ध्यानात घेतले जावे. तुम्ही जीवनाच्या कोणत्या टप्प्यावर आहात, डोईवरील उर्वरित कर्जाची रक्कम, निश्चित केलेल्या उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी आवश्यक रक्कम आणि चालू राहणीमान टिकवून ठेवू शकेल यासाठी कुटुंबाचे उत्पन्न किती यावरून मग तुम्हाला किती रकमेचे विमा कवच हवे, हे ठरविता येईल. हे विमा कवच कमीत कमी विमा हप्त्यात कोणत्या योजनेतून मिळेल ते पाहून निवड करण्यासाठी आजच्या माहितीयुगात अनेकविध साधने उपलब्ध आहेत. विमा घेऊ इच्छिणाऱ्याचे वय, प्रचलित आरोग्य स्थिती, व्यसने आणि उत्पन्नमान यातून प्रत्यक्ष विमा हप्त्याची रक्कम कमी-जास्तही होऊ शकेल.

बचतीचा विमा हा आपण निर्धारित केलेला दुसरा प्रकार जीवन संरक्षणासह गुंतवणुकीवर परताव्याचेही लाभ प्रदान करतो. टर्म इन्शुरन्समध्ये पॉलिसीच्या मुदतपूर्तीनंतर काही मिळत नाही, तर या प्रकारच्या विम्यात निवडलेल्या मुदतीनंतर काहीसा लाभ पदरी पडतो. त्यामुळे तुलनेने या प्रकारचा विमा महागडाही ठरतो. अशा विम्याच्या योजना मुख्यत: खालील प्रकारे ओळखल्या जातात.

१. युलिप्स – नावाप्रमाणे या बाजाराशी संलग्न गुंतवणूक असलेल्या या योजना आहेत. बाजारातील चढ-उतारानुरूप त्यातून परतावा दिला जातो.

२. पार्टिसिपेटरी योजना – विमा कंपन्यांकडे गोळा होणाऱ्या निधीतून वार्षिक तत्त्वावर जाहीर बोनसच्या रूपात परतावा पॉलिसीधारकाला मुदतपूर्तीअंती मिळतो.

३. गॅरन्टीड रिटर्न योजना – पॉलिसी घेताना परतावा दर सांगितला जातो आणि मुदतपूर्तीला तो देण्याची हमी दिली जाते.

मुळात विमा हाच एक दीघरेद्देशी करार असतो आणि ठरविलेल्या मुदतीपर्यंत पाळता येत असेल तरच या कराराच्या बंधनात सहभागी व्हायचे असते. तर कोणतीही गुंतवणूक करताना त्यामागचे उद्दिष्ट पक्के असायलाच हवे. या पाश्र्वभूमीवर वरील बचतीच्या विम्याच्या योजनांकडे पाहायला हवे. या योजना गुंतवणूक म्हणून दीघरेद्देशी नियोजनाने केल्या गेल्या तरच चांगल्या, अन्यथा वर म्हटल्याप्रमाणे त्या महागडय़ा असल्याने नाहक नुकसानकारकच ठरतील. मुलांचे उच्च शिक्षण व त्यांची लग्न या भविष्यातील मोठय़ा खर्चाची तयारी म्हणून वरील योजना घ्याव्यात. विमाधारकाच्या मृत्यूपश्चात अथवा कायमस्वरूपी पूर्ण अपंगत्वाच्या स्थितीत एकरकमी विमाराशीचे लाभ आणि त्यानंतरचे हप्ते भरण्यापासून सूट अशा अतिरिक्त वैशिष्टय़ांची खातरजमा करून घ्या.

विमा कवच व्यापक आहे काय?

जीवनाचे संरक्षण अर्थात मरणानंतर मागे राहणाऱ्या कुटुंबाचा आर्थिक आधाराची आयुर्विमा काळजी घेतेच; परंतु मृत्यूबरोबरीनेच अनेक संभाव्य जोखमी आहेत. जसे अपघातातून कायमस्वरूपी अपंगत्व, गंभीर आजारपण या बाबीही व्यक्तीच्या कमावण्याच्या शक्तीला बाधा पोहोचवितात. इतकेच नव्हे तोवर जमा बचत व गुंतवणूक पुंजीला अशा प्रसंगी वैद्यकीय खर्चातून खिंडार पडते. म्हणूनच मृत्यू, अपंगत्व, गंभीर आजारपण अशा कर्त्यांच्या जीवनाला असणाऱ्या सर्व जोखमींना एकाच पॉलिसीतून संरक्षण देणारे पर्याय आज उपलब्ध झाले आहेत. व्यापक संरक्षण देणाऱ्या अशा योजनांना प्राधान्याने लक्षात घेतले जावे.

पॉलिसीच्या सूक्ष्म तपशिलांना जाणून घेतले काय?

वर म्हटल्याप्रमाणे विमा हा पॉलिसीधारक आणि विमा प्रदाता कंपनी यातील दीर्घ मुदतीचा करार असतो. करार म्हटला की अटी-शर्ती, नियम येतातच. कर्तव्ये व अधिकाराच्या कक्षा ठरविल्या जातात. हप्ते नियमित रूपात भरण्याचे कर्तव्य पार पाडल्यानंतर, हप्त्यातील किती रक्कम प्रत्यक्षात आपल्याला अपेक्षित संरक्षणासाठी आणि प्रत्यक्ष शुल्करूपात कंपनीकडे जाईल हे आपण स्पष्टपणे जाणून घेतले पाहिजे. त्या संबंधाने उपलब्ध पर्याय, हप्ते भरण्यात दिरंगाई व खंड पडल्यास पडणारा भरुदड समजून घेतला पाहिजे. विमा कवच कोणत्या स्थितीत असेल आणि कोणत्या स्थितीत नसेल, पॉलिसीची मुदत, कालानुरूप वाढत जाणारे लाभ या गोष्टी विमा प्रस्तावातच असतात. विमेदाराच्या कर्तव्याचा आणखी एक घटक म्हणजे, आपले वय, आरोग्य स्थिती, एकूण उत्पन्न याची माहिती सत्य स्वरूपात प्रस्ताव अर्जात नमूद केली पाहिजे. बऱ्याचदा परिचयात असलेला एजंट सांगेल तेथे सह्य़ा करून विमा खरेदी केली जाते. त्याउलट हा अर्ज तुम्ही स्वत: पुरेशा सवडीने, काळजीपूर्वक वाचून आणि संपूर्ण सत्य माहिती देऊन भरून दिला पाहिजे. यातून भविष्यातील समस्या टाळल्या जातील आणि विम्याचा दावा (क्लेम) मिळविताना वारसदारांना अडचण भासणार नाही.

दर पाच वर्षांनी फेरमूल्यांकन आपण करतो काय?

व्यक्ती जीवनाच्या वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये जसा प्रवेश करतो, तसतशा त्याच्या आयुर्विम्याच्या गरजाही बदलत जातात. त्यामुळे त्या त्या वेळी प्रचलित विमा संरक्षणाबाबत फेरमूल्यांकन केले जायला हवा. कुटुंबातील सदस्यांच्या अर्थात कर्त्यांवर अवलंबून असणाऱ्या मंडळींच्या संख्येतील वाढ, वाढलेले उत्पन्न, वाढत गेलेले आर्थिक दायित्व, जीवनाबाबत वाढलेल्या आकांक्षा, जोडत गेलेली नवनवी स्वप्ने हे पाहता, मागे निश्चित केलेली विमाराशी ही १० वर्षांनंतरही तेवढीच राहणार नाही. त्यामुळे साधारण पाच पाच वर्षांच्या अवधीने फेरमूल्यांकन, विमा कवचाची व्याप्तीही वाढवत नेली पाहिजे.

श्रीनिवासन पार्थसारथी

(लेखक एचडीएफसी लाइफचे वरिष्ठ कार्यकारी उपाध्यक्ष आणि मुख्य अ‍ॅक्च्युअरी आहेत.)