करदात्यांनो, १५ डिसेंबर जवळ आला आहे. पगारदारांच्या वेतनापासून कर कापण्यास साधारणपणे या महिन्यापासून सुरूवात होते. करवजावटीसाठी कलम ८० सी अंतर्गत गुंतवणुका उरकल्या जाव्यात, असे ही  तारीख स्मरण करून देते..

सर्वच पगारदारांना अग्रिम कर भरावा लागत नाही. ज्या करदात्याचा उद्गम कर (टीडीएस) वजा जाता वार्षिक उत्पन्नांतून देय कर १०,००० रुपयांपेक्षा जास्त आहे अशा पगारदारांनी आर्थिक वर्ष २०१६-१७ पासून चार हप्त्यात अग्रिम कर भरावयाचा आहे.  तो किती आणि केव्हा भरावा लागतो ते खालील तक्त्यात दर्शविले आहे :

कधी भरावा                   किती भरावा

१५ जूनपूर्वी                   १५.००%

१५ सप्टेंबरपूर्वी             ४५.००%

१५ डिसेंबरपूर्वी             ७५.००%

१५ मार्चपूर्वी                 १००.००%

वरील शेकडा प्रमाण हे अंदाजित देय कराचे आहे. उदा. अंदाजित देय कर (उद्गम कर वजा जाता) २०,००० रुपये इतके  असेल, तर २०,००० रुपयांच्या १५ टक्के म्हणजेच ३,००० रुपये १५ जूनला किंवा त्यापूर्वी भरावा लागेल, दुसरा हप्ता एकूण ४५ टक्के (९,००० रुपये) इतका कर भरला गेला पाहिजे, म्हणजेच दुसरा हप्ता   १५ सप्टेंबरपूर्वी ६,००० रुपयांचा भरावा लागेल. तिसरा हप्ता ७५ टक्के (१५,००० रुपये) भरला गेला असला पाहिजे, म्हणजेच तिसरा हप्ता १५ डिसेंबर रोजी किंवा त्या पूर्वी ६,००० रुपयांचा भरावा लागेल. शेवटचा हप्ता १०० टक्के (२०,००० रुपये) भरला गेला असला पाहिजे, म्हणजेच तिसरा हप्ता १५ मार्चपूर्वी ५,००० रुपयांचा भरावा लागेल. असा एकूण देय कर ३१ मार्चपूर्वी अग्रिम कर म्हणून भरावा लागतो. हा वेळेवर भरल्यास व्याज वाचू शकते.

हा अग्रिम कर मार्च संपल्यानंतरसुद्धा न भरल्यास ‘कलम २३४ ब’नुसार एप्रिलपासून व्याज भरावे लागते.

दोन वर्षांपूर्वीपर्यंत अग्रिम कर हा वैयक्तिक करदात्यांसाठी तीन हप्त्यात भरावा लागत होता, तो आता त्यांना चार हप्त्यात भरावा लागणार आहे. वैयक्तिक करदात्यांनो, १५ डिसेंबर जवळ आला आहे. निम्न पगारदारांचा कर कापण्यास या महिन्यापासून सुरूवात होते. कर नियोजन हे पूर्ण समजुतीने आणि आधीपासून केले जायला हवे. तरी ते केले गेले नसल्यास आणखी वाट न पाहता, योग्य सल्लागाराची मदत घेऊन ते आखले जावे, याचा १५ डिसेंबर हा पहिली घंटा समजली जावी. शेवटच्या क्षणी घाईने केवळ कर वाचवायचा म्हणून होणाऱ्या गुंतवणुका म्हणजे प्रत्यक्षात कर कापून गेला असता तरी परवडले असते, अशाच बहुदा असतात. या चुका आणि उपरती टाळण्यासाठी नियोजनपूर्वक गुंतवणूक तत्परता आवश्यकच!

‘फॉर्म १६’ मिळाला   नाही तर?

करदात्यांमधील अनेक गैरसमजांपैकी एक असा की, ‘फॉर्म १६’ हा सर्व पगारदारांना मिळालाच पाहिजे आणि त्याशिवाय प्राप्तिकर विवरणपत्र भरता येत नाही. फॉर्म १६ हा ज्यांचा उद्गम कर (टीडीएस) कापला जातो त्यांना देणे बंधनकारक आहे..

साधारण सर्व नियोक्ता अथवा नोकरी देणाऱ्या कंपनीकडून कर्मचाऱ्यांना त्यांच्या उत्पन्न आणि कर दायित्व तसेच केलेला कर भरणा याचे विवरण असलेला ‘फॉर्म १६’ दिला जातो.

जर कर्मचाऱ्याच्या वेतनातून उद्गम कर  (टीडीएस, अग्रिम कर) कापला नसेल तर  ‘फॉर्म १६’ देणे तुमच्या नियोक्ता अर्थात नोकरी करीत असलेल्या कंपनीला बंधनकारक नाही. आपण कंपनीकडे पगाराचे प्रमाणपत्र मागावे आणि त्याआधारे विवरणपत्र दाखल करावे. प्राप्तिकर कायदा ‘कलम २०३’नुसार जर मालकाने वेतनावर उद्गम कर (टीडीएस) कापला असेल तर त्यांना ‘फॉर्म १६’ देणे बंधनकारक आहे.  हा फॉर्म वेळेवर न दिल्यास मालकाला दंड भरावा लागतो. उद्गम कर कापला असून जर ‘फॉर्म १६’ कंपनीने दिला नसल्यास संबंधित प्राप्तिकर अधिकाऱ्याकडे तक्रार करावी. ‘फॉर्म १६’ मिळाला नसला तरी आपल्या माहितीच्या आधारे विवरणपत्र वेळेवर दाखल करावे. मात्र जर कंपनीने कर्मचाऱ्यांच्या पगारातून उद्गम कर कापूनही, तो भरला नसेल तर त्या कराचा लाभ कर्मचाऱ्याला मिळणार नाही.