गुंतवणूकदार, सल्लागार, वितरक आणि विश्लेषक सर्वामध्ये एकाच प्रकारची चर्चा सुरू आहे. जाणते-अजाणतेपणी त्यांच्याकडून सध्याच्या बाजारस्थितीची तुलना २००७ सालातील बाजाराच्या स्थितीशी केली जात असल्याचे आढळून येत आहे.

या चर्चेतील एक सामाईक युक्तिवाद असा की, लार्ज कॅप निर्देशांक अर्थात निफ्टी निर्देशांकाची ९६०० पल्याड पातळी ही अनुगामी (ट्रेलिंग) स्वरूपात २२.५ पट किंमत/उत्पन्न (पी/ई) गुणोत्तर दर्शविणारी आहे. २००७ सालातही निफ्टीने ६,१०० च्या पल्याड पातळी गाठून २२.५ पटीची पी/ई गुणोत्तर पातळी गाठली होती. तोच निर्देशांकाचा शिखरबिंदू ठरला आणि पुढे २००८ सालातील बाजाराची अवस्था सर्वानी पाहिलीच आहे. जरी हा तपशील वस्तुत: खरा असला तरी त्यातून काढलेला निष्कर्ष मात्र भरकटलेला आहे.

किंमत/उत्पन्न गुणोत्तरामध्ये दोन प्रमुख घटक आहेत. यात किंमत ही विभाज्य, तर उत्पन्न ही विभाजक संख्या आहे. ब्लूमबर्गने दर्शविल्याप्रमाणे डिसेंबर २००७ मध्ये उत्पन्नातील वाढ (उत्सर्जन दर) २०.४ टक्के होती, तर आधीच्या दोन वर्षांत हा दर वार्षिक २८ टक्के इतका होता. त्यामुळे विभाजक संख्या (उत्पन्न) ही त्या उभारीच्या काळात एका उच्च पातळीवर पोहोचल्याचे स्पष्ट होते. काही ठळक संकेतांतून त्या समयी आर्थिक स्थितीलाही उज्ज्वलतेचा स्पष्ट पदर होता. औद्योगिक उत्पादन निर्देशांक त्यासमयी वार्षिक तुलनेत १५ टक्के दराने वाढत होता; आठ प्रमुख उद्योग क्षेत्रांचा एक वर्षांचा सरासरी वृद्धी दर ६.४ टक्के होता आणि बिगरखाद्य क्षेत्राला पतपुरवठय़ात वाढीचा दर २७ टक्क्य़ांच्या पातळीवर होता. अर्थात त्याचे प्रतिबिंब निफ्टी निर्देशांकातील कंपन्यांच्या गुंतलेल्या भांडवलावर परताव्याच्या २९ टक्के अशा भरीव दरातून उमटलेले होते.

याच्या अगदी उलट स्थिती आज आहे. मागील वर्षभराच्या कालावधीत उत्पन्नातील वाढ ही ४.६ टक्के आहे आणि दोन वर्षांचा काळ जमेस धरला तर वार्षिक वाढ सरासरी ५.८ टक्क्य़ांची आहे. औद्योगिक उत्पादनातील वृद्धी दर भिकार एकअंकी स्तरावर आहे; प्रमुख आठ उद्योग क्षेत्रांचा एक वर्षांचा विकास दर सरासरी ४.२ टक्के आहे. बिगरखाद्य क्षेत्राला पतपुरवठय़ाच्या दराने तर गत ६० वर्षांतील सर्वात नीचांकी ५.१ टक्क्य़ांचा तळ दाखविला आहे. निफ्टी निर्देशांकातील कंपन्यांच्या गुंतलेल्या भांडवलावरील परताव्याचा दर १३.६ टक्क्य़ांचा आहे. त्यामुळे २००७ च्या तुलनेतच काय, दीर्घावधीचा दृष्टिकोन ठेवला तरी सध्याचे अर्थसंकेत खूपच रोडावलेले आहेत, हे स्पष्टच आहे. याचा अर्थ असाही की, अर्थव्यवस्था कलाटणी घेऊन मुसंडी घेईल, तेव्हा  किंमत/उत्पन्न गुणोत्तरामध्ये (विभाजक संख्या बळकट झाल्याने) आनुषंगिक सुधार होईल.

हे झाले किंमत/उत्पन्न गुणोत्तराबद्दल. हे गुणोत्तर बाजार मूल्यांकनाचा हवाला देणारे केवळ एक निदर्शक आहे. दुसऱ्या निदर्शकांचे संकेतही जोखले गेले पाहिजेत. किमतीचे पुस्तकी मूल्याशी गुणोत्तर पाहिले तर ते सध्या २.८६ पट म्हणजे २००७ मधील ५.७४ पटीच्या तुलनेत निम्म्यावर आहे. किमतीचे विक्री उत्पन्नाशी गुणोत्तरही २.५ पट म्हणजे २००७ सालातील ३.६ पटीच्या तुलनेत ३० टक्के खाली आहे. त्याउलट, निफ्टी निर्देशांकातील कंपन्यांचा सध्याचा लाभांश परतावा (डिव्हिडंड यील्ड) १.५८ टक्के आहे जो २००७ सालात अवघा १ टक्के होता.

सर्वाधिक वापरात येणारा संकेतांक म्हणजे देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पादनाच्या (जीडीपी) तुलनेत एकूण बाजार भांडवल होय. हे गुणोत्तरही सध्या ०.८ पट म्हणजे २००७ सालातील १.३ टक्क्य़ांच्या तुलनेत ३८ टक्के खाली आहे. केंद्र सरकारच्या १० वर्षांच्या रोख्यांच्या परताव्याच्या दराचे आणि बाजाराच्या उत्पन्न दराशी गुणोत्तर हे १.५ पट आहे, जे डिसेंबर २००७ मध्ये १.७५ पट होते.

डिसेंबर २००७ अखेर निफ्टी निर्देशांकाचा १ वर्ष, ३ वर्षे, ५ वर्षे आणि ७ वर्षांचा एकत्रित परतावा अनुक्रमे ५५ टक्के, ४३ टक्के, ४१ टक्के आणि २५ टक्के असा होता. त्या तुलनेत मे २०१७ अखेर हे प्रमाण अनुक्रमे १८ टक्के, १० टक्के, १४ टक्के आणि ७ टक्के असे खस्तावलेले आहे.

त्यामुळे सर्वाधिक वापरात येणाऱ्या किंमत/उत्पन्न गुणोत्तराच्या पलीकडे, अन्य बाजारकेंद्रित परिमाणे तपासली तरी ती २००७ सालाच्या उल्हासी काळाच्याच नव्हे दीर्घ मुदतीच्या सरासरीपेक्षा खूप सध्या खाली आहेत.

निफ्टीचा १० वर्षांतील सरासरी भांडवलावरील परतावा १६.६ टक्के आहे. मागील १० वर्षे ही जागतिक वित्तीय अरिष्टाच्या परिणामांनी भारलेली होती, हे विसरून चालणार नाही. सध्याचा भांडवलावरील परताव्याचा दर जो १३.६ टक्के आहे. तो तेथून मागील १० वर्षांच्या सरासरीच्या निम्म्यावर म्हणजे १५.१ टक्के पातळीवर पुढील पाच वर्षांत पोहोचेल असे मानून चालू या. तसे घडायचे झाले तर येत्या पाच वर्षांमध्ये कंपन्यांच्या कमाईत (उत्सर्जनात) वार्षिक १४ टक्के दराने वाढ व्हायला हवी. कमाईतील ही संभाव्य वाढ साधारण नफाक्षमतेतून शक्य आहे.

हेही खरेच की, गेली तीन वर्षे उत्सर्जनातील वाढीने सलगपणे चकवा दिला आहे. तथापि चालू वर्षांत उत्सर्जनातील वाढ दिसेल असे सर्व ऐवज जुळून आले आहेत. जागतिक स्तरावर सर्वत्र अर्थव्यवस्था गती पकडताना दिसत आहेत. अशा स्थितीत भारताच्या निर्यातीत सुधार आणि त्याचा अर्थव्यवस्थेला फायदा होणे स्वाभाविकच आहे. दुसरीकडे, चांगले पाऊसपाणी होण्याने पीक उत्पादनांत वाढ होईल, ग्रामीण अर्थव्यवस्थेला उभारी येईल, व्याजाचे दर खाली येणे आणि सातव्या वेतन आयोगाचा कर्मचाऱ्यांना होणाऱ्या लाभातून ग्राहक मागणीला जोर चढेल. उद्योग क्षेत्राला घसरलेल्या व्याजदराने पतपुरवठा, त्याचप्रमाणे सरकारकडून भांडवली गुंतवणुकीत वाढीने अर्थचक्राला आवश्यक गती दिली जाईल. या सर्वाच्या परिणामी कंपन्यांच्या कमाईत वाढीला हातभार लागला आणि त्या परिणामी किंमत/उत्पन्न गुणोत्तर पातळीने आणखी उडी घेण्याला बांध लागला तर पुढील तीन वर्षांत बाजारातील गुंतवणुकीतून समुचित दोन अंकी परतावा मिळणे अवघड दिसून येत नाही.

समभाग गुंतवणूक ही स्वभावत:च प्रगतिशील असते. अर्थव्यवस्थेत वास्तविक सुधारणा दिसण्याआधी त्याची चाहूल लागून बाजाराचे पुढचे पाऊल पडलेले असते. सध्याच्या बाजारस्थिती अशी आहे. कोणत्याही अंगाने अतिउल्हासी अथवा बुडबुडा दर्शविणारी ही अवस्था म्हणता येणार नाही. त्यामुळे स्पष्टपणे २०१७ साल हे २००७ सारखे म्हणता येणार नाही. येथून पुढे आणखी बरीच मजल मारायची आहे. गुंतवणूकदार म्हणून निर्धारित लक्ष्यावर केंद्रित आपले ध्यान कदापि ढळू देऊ नये.

समभाग गुंतवणूक ही स्वभावत:च प्रगतिशील असते. अर्थव्यवस्थेत वास्तविक सुधारणा दिसण्याआधी त्याची चाहूल लागून बाजाराचे पुढचे पाऊल पडलेले असते. सध्याच्या बाजारस्थिती अशी आहे. कोणत्याही अंगाने अतिउल्हासी अथवा बुडबुडा दर्शविणारी ही अवस्था म्हणता येणार नाही. त्यामुळे स्पष्टपणे २०१७ साल हे २००७ सारखे म्हणता येणार नाही.

(लेखक बिर्ला सन लाइफ अ‍ॅसेट मॅनेजमेंट कंपनीचे सह-मुख्य गुंतवणूक अधिकारी आहेत)